Rural Development : गावे व्हावीत आत्मनिर्भर

खेड्यांमधील चैतन्य परत जिवंत करायचे असेल तर धोरणांपासून ते व्यवस्थांपर्यंत खूप काही बदलावे लागेल. निसर्गस्नेही रचना हा या व्यवस्थेचा अविभाज्य भाग होता, तो पुनर्स्थापित करावा लागेल.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

शेतीबरोबरच देशातील सहा लाखांवर खेडी (Indian Village) हा भारताचा आत्मा आहे, असे म्हटले जाते. या खेड्यांतील आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेला (Financial, Social System In Village) आता घरघर लागली आहे. खेड्यांमधील चैतन्य परत जिवंत करायचे असेल तर धोरणांपासून ते व्यवस्थांपर्यंत खूप काही बदलावे लागेल. निसर्गस्नेही रचना हा या व्यवस्थेचा अविभाज्य भाग होता, तो पुनर्स्थापित करावा लागेल. (Rural Development)

महाराष्ट्र दृष्टीक्षेपात ः

१) लोकसंख्या : ११,२३,७४,०००

२) स्त्री पुरुष प्रमाण : १००० पुरूषांमागे ९२९ महिला

३) लोकसंख्येची घनता (प्रति चौरस किलोमीटर) : ३६५

४) साक्षरता : ८२.३४ टक्के

- पुरुष : ८२.३ टक्के

- स्त्री : ७५.९ टक्के

५) जिल्हे : ३६ (ग्रामीण ३४)

६) तालुके : ३५५ (३५१ ग्रामीण)

७) ग्रामपंचायत संख्या : २७,९२४

८) नागरी लोकसंख्या : ५,०८,१८,०००(४५.२ टक्के )

९) ग्रामीण लोकसंख्या : ६,१५,५६,००० (५४.८ टक्के)

( माहिती स्त्रोत ः भारतीय जनगणना, २०११)

भविष्यातील अपेक्षा

१. गावशिवाराची स्वच्छता, जलसंधारण, शिक्षण, शाश्वत शेती, आरोग्य आदी सोयींमुळे गावांचे स्वरूप पालटले आहे. स्वच्छ गाव, पाणीदार गाव, वनसंपदेचे गाव, पुस्तकांचे गाव अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. राज्याची एकूण व्याप्ती लक्षात घेतली तर मात्र हे प्रयत्न अल्प ठरले आहेत. सरकारने या प्रयत्नांना आणखी बळ द्यायला हवे.

२. नगरपंचायती आणि मोठ्या ग्रामपंचायती कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण, रस्ते, जलसुरक्षा, नदी-नाले-ओढे यांच्यावरील अतिक्रमण या समस्यांनी विक्राळ स्वरूप धारण केले आहे. याबाबत सरकारने तातडीने उपाययोजना राबवायला हव्यात.

३. राज्यातील सुमारे ६० टक्के ग्रामपंचायती सातत्याने दुष्काळाच्या सावटाखाली असतात. त्यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुढील दशकात सुमारे ३० टक्के स्थलांतर शहरांकडे होईल, असा अंदाज आहे. ते टाळण्यासाठी जलसंधारणाच्या योजना तांत्रिकदृष्ट्याही प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत.

४. ग्रामीण जीवनाचे संपूर्ण चक्र उलटे फिरविता येणार नाही. परंतु भविष्यातील समस्या आणि अडचणी लक्षात घेऊन नियोजन केल्यास ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर नक्की कमी करता येईल. गावातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केल्यास स्थलांतर थांबेल. सरकारने त्यासाठी खासगी क्षेत्राचीही मदत घ्यावी.

Rural Development
Agriculture Development : शेतीच्या विकासासाठी अधिक काम व्हावे

५. तेराव्या वित्त आयोगाने थेट करातील काही वाटा सुनिश्चित करून स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. तीन ते चार दशकांचे नियोजन करून रचनात्मक कामांची उभारणी केल्यास शाश्वत ग्रामविकासाचे स्वप्न निश्चितपणे साकार होईल.

६. २०६० साली देशाची लोकसंख्या सुमारे १६० कोटींच्या आसपास जाण्याचा अंदाज. (संदर्भ: बिल आणि मिलिंडा गेटस फाउंडेशनचा अहवाल) वाढती लोकसंख्या, स्थलांतरामुळे नागरी प्रशासनावरील ताण आणि समस्यांचा अभ्यास करून सरकारने ग्रामीण आणि शहरी आराखडे तयार करावेत.

७. लोकसहभागातून जल, मृद संधारण, जलस्रोतांचे रक्षण, नद्यांचे पुनर्जीवन आणि शुद्धीकरण, रस्ते आणि दळणवळणाचे जाळे (दूरसंचार, इंटरनेट), अव्याहत वीज पुरवठा इत्यादी गोष्टींचे नियोजन सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावे.

८. गुणवत्तापूर्ण कौशल्यावर आधारित शिक्षण, आरोग्य सुविधा, कृषी, पशुसंवर्धनासाठी पायाभूत सुविधा, शीत साखळी, गुणवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.

९. शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गटाच्या माध्यमातून शेती विकास, व्यापार आणि समूह विकासाला चालना देण्याची गरज. त्यासाठी गावांनी पुढाकार घ्यावा.

१०. ग्रामपातळीवरील संस्थांनी पुढाकार घेवून पारंपरिक बीज संवर्धनासाठी बियाणे बॅंक, श्रम आणि वेळेच्या बचतीसाठी अवजारे बॅंकांची उभारणी करावी. काही ठिकाणी स्टार्टअप्स मदत करू शकतात.

११. ग्रामस्थांनी स्थानिक साधनांचा वापर करून पर्यावरणपूरक घरांच्या बांधकामाची गरज. अपारंपरिक ऊर्जेच्या (सौर ऊर्जा, बायोगॅस) वापरावर भर द्यावा.

१२. ग्रामस्थांनी निसर्ग रक्षण, पर्यावरणाला हानी न पोचवता गावशिवाराची जैवविविधता अबाधित ठेवावी.

Rural Development
Rural Development : गाव सहभागाने वाढेल

आध्यात्मिक

१. आपले बहुतांश सण, उत्सव शेती आणि ग्रामीण प्रथा-परंपरांशी संबंधित आहेत. पोळा सणादिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करून गावभर त्यांची मिरवणूक हा केवळ सोपस्कार नसून वर्षभर आपल्यासाठी अन्न देणाऱ्या श्रमशक्तीचा तो सन्मान आहे. दसरा,दिवाळी, पाडवा हे सणही कृषी आणि ग्रामीण व्यवस्थेचाच भाग आहेत.

२. आपली ईश्वर, भगवंताची व्याख्या म्हणजे पंचमहाभूते. आपल्याला वारश्यात मिळालेली अबाधित निसर्गसंपदा, नद्या, जैवविविधता, वनराई येत्या काळात जपणे आवश्यक आहे.

३. गंगा, गोदावरी खोऱ्यात पहिल्यांदा वसाहती झाल्या. गोदावरी खोऱ्यातील वसाहतीस ‘अश्मक' असे संबोधले जायचे. याच काळात प्रशासकीय चौकट अस्तित्वात आली, स्थिर झाली आणि त्यात सुधारणा. होत गेली. कौटिल्य आणि पाणिनी यांच्या साहित्यात त्याचा उल्लेख आहे.

४. मोहंजोदाडो, हडप्पा आणि तत्कालीन मानवी सभ्यतांचा उदय हे पहिले नागरीकरण. या काळात मेसोपोटेमियापासून ते सिंधू खोऱ्यापर्यंत व्यापाराचा विस्तार झाला. यामधील महत्वाची बाब म्हणजे भारतीयत्वाचा मूळ भाव हा खेड्यातूनच वृद्धिंगत झाला.

५. प्राचीन काळात ग्रामस्तरावर स्थानिक संस्था अस्तित्वात होत्या. त्यांना सभा, ग्रामणी, ग्रामवृद्ध अशा संज्ञा होत्या. गुप्तकाळानंतर दक्षिण भारतात गावांना ‘अग्रहार' असे संबोधले जायचे. यामध्ये ग्रामसंस्था आणि तिच्या अनेक उपसमित्या कार्यरत होत्या. याच काळात मध्य भारतात पंचमंडळी, ग्रामजनपद (बिहार) आणि पंचकुल (राजस्थान) अशा रचना अस्तित्वात आल्या. इसवीसन पूर्व ६०० या काळात महाजनपद अस्तित्वात आली.

भौतिक

१. स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर गावे हा भारताच्या कृषी, सामाजिक आणि आध्यात्मिक रचनेचा गाभा आहे.

२. भारतीय परंपरा लोकशिक्षणाचे महत्वाचे साधन आहे. आजही काही ठिकाणी या परंपरा जपल्या जातात. स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला आजच्या काळात आपण चक्रिय अर्थव्यवस्था (Circular Economy) असे म्हणतो.

३. आजही खेड्यांतील काही चालीरिती, प्रथा पूर्वी होत्या तेवढ्या उपयुक्त आहेत. जसे की, शेतकरी हा यजमान मानला जायचा आणि इतर कौशल्य असलेले आणि शेती नसलेले कारागीर त्याला मदत करायचे.

४. शेतीशी पूरक बाबींची पूर्तता करणाऱ्या समाजाची उपजीविका गाव पूर्ण करीत असे. विनिमयाचे माध्यम धान्य, श्रम असे.

५. महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ अशी हाक दिली, त्यामागे ग्राम स्वराज्याची संकल्पना होती. आपली खेडी भारताइतकी जुनी आहेत. शहरे मात्र परकीय सत्तेने तयार केलेली आहेत, असे त्यांचे मत होते.

६. अंतर्गत कलह, वादाचे निवाडे स्थानिक स्तरावरच होत असत. गावातील पंचांचा निर्णय सर्वमान्य असायचा. याच टप्यात शेतीमध्ये प्रगती होत गेली. अंतर्गत विनिमयाचे साधन हे शेतीमाल, वस्तू आणि सेवा हेच होते. आपली ग्रामरचना या सर्वांना पूरक अशीच होती. त्यावेळेची सुबत्ता ही शेती आणि पशुधन यामध्येच होती. ही रचना आत्मनिर्भर आणि परस्पर पूरक होती. आपली ग्रामव्यवस्था मजबूत आणि एकसंध असल्याने अनेक आक्रमणे झाली तरी ती अबाधित राहिली.

खेडी हा आपल्या भारतीय अर्थ आणि सामजिक व्यवस्थेचा कणा आहे. आपले पंचांग निसर्गाशी अनुरूप आहे. भारतीय परंपरा या केवळ समारंभ नसून तो जीवनशैलीचा भाग आहे. परस्पर संबंध दृढ करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हा याचा गाभा. मॉन्सून हा आपल्या देशाच्या समृद्धीचा पाया. मुबलक शेतजमीन, पशुधन ही आपली संसाधने आणि संपत्ती. याचे संरक्षण करणे आणि ते अबाधितपणे पुढील पिढीला हस्तांतरित करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा समग्र दृष्टीने ग्रामविकासाकडे पाहावे लागेल.
डॉ. सुमंत पांडे, ग्रामविकासाचे अभ्यासक आणि माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com