रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा तिढा कायम 

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने जानेवारी महिन्यासाठी प्रति किलो द्राक्षाला ८२ रुपयांची एमएसपी जाहीर केली होती. मात्र, हा दर रशियाच्या मार्केटसाठी परवडत नसल्याने निर्यातदारांनी रशियासाठीची हार्वेस्टींग बंद केली होती.
Grapes
Grapes

पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने जानेवारी महिन्यासाठी प्रति किलो द्राक्षाला ८२ रुपयांची एमएसपी जाहीर केली होती. मात्र, हा दर रशियाच्या मार्केटसाठी (Russia Market) परवडत नसल्याने निर्यातदारांनी (Exporters) रशियासाठीची हार्वेस्टींग (Harvesting) बंद केली होती. आता निर्यातदारांनी बंद केलेली द्राक्ष हार्वेस्टींगला (Grape Harvesting) सुरूवात केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, शेतकऱ्यांसोबत ठरलेल्या दरांऐवजी ४५ ते ५० रुपये प्रति किलो इतक्या कमी दराने ही हार्वेस्टींग सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. 

द्राक्ष उत्पादकांना उत्पादन खर्चावर काही टक्के नफा मिळावा, या उद्देशाने द्राक्ष बागायतदार संघाने द्राक्षासाठी ८२ प्रति किलो एमएसपी (MSP) जाहीर केली होती. मात्र, पुन्हा हार्वेस्टींग सुरू झाल्यानंतर मिळणारा दर द्राक्ष बागायतदार संघाच्या जानेवारीसाठीच्या एमएसपीच्याही खाली आहे. रशियासाठी हार्वेस्टींग जरी सुरू असले, तरी बागायतदार संघाने घेतलेली एमएसपीची भूमिका आणि निर्यातदार सध्या देत असलेला दर यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था मात्र इकडे आड अन तिकडे विहीर अशी झाली आहे. 

व्हिडीओ पाहा - 

संघाने जाहीर केलेल्या दराच्या खाली भाव पाडून खरेदी होत असल्याने बागातदार संघाने बुधवारी (ता. १९) जानेवारी रोजी निर्यात प्रक्रियेत काम करणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हाइडरसोबत (Service Provider) ओझर मिग येथे बैठक घेतली. जिल्ह्यात जवळपास २०० हून अधिक सर्व्हिस प्रोव्हाइडर काम करत असताना या बैठकीला मात्र, अवघे २० ते २५ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीला द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह द्राक्ष उत्पादक आणि निर्यातदारही उपस्थित होते. यावेळी काही सर्व्हिस प्रोव्हाइडरकडून संघाने घेतलेल्या दराच्या निर्णयाबाबत गैरप्रचार होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. 

उत्पादन खर्च सर्वबाजुंनी वाढलेला असताना त्याचा फटका शेतकऱ्यांना बसायला नको, अशी रोखठोक भूमिका यावेळी मांडण्यात आली. उत्पादक व निर्यातदार हे दोन्ही द्राक्ष उद्योगाचे महत्त्वाचे घटक असून उत्पादक तोट्यात जाणार नाही, त्याला त्याच्या खर्चावर आधारित दर मिळावेत आणि निर्यातदारही टिकला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष कैलास भोसले (Kailas Bhosale) यांनी दिली. 

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असेलेल्या या गोंधळाचा द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.  द्राक्षांची गुणवत्ता कमी झाल्याचे सांगत निर्यातदार आणखी दर पाडत आहेत. दरम्यान, रशिया वगळता युरोपसाठी निर्यात होणाऱ्या द्राक्षांना ८० ते ८५ रुपयांचा दर मिळत आहे. 

माझ्या रशियासाठीच्या प्लॉटचे ६५ रुपये प्रति किलो दराने हार्वेस्टींग सुरू होते. पण निर्यातदारांनी मध्येच हार्वेस्टींग बंद केले. त्यानंतर पुन्हा हार्वेस्टींग सुरू झाले. पण उरलेल्या प्लॉटसाठी मला ५५ रुपयांचा दर निर्यातदाराने दिला आहे. याशिवाय ४ ते ५ टन मालाची गुणवत्ता घटल्याने तो माल आता मला स्थानिक बाजारातच विकावा लागणार आहे. 

- द्राक्ष उत्पादक, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com