agriculture news in marathi, Photo Feature form Melghat region | Agrowon

मेळघाटातील जनजीवन...

गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

मेळघाट मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेले अभयारण्य आहे. या पर्वत रांगांना गाविलगड पर्वत रांग असंही संबोधलं जातं. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार या पाच नद्या वाहतात. त्या पुढे तापी नदीला जाऊन मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भांडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणं आहेत. विविध प्राणी, जैव संपदा आणि वनांनी समृद्ध असा प्रदेश आहे. या परिसरातील आदिवासी जनजिवनातील काही क्षणचित्रे प्रगतशील शेतकरी दीपक जोशी (देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांनी टिपले आहेत..

हिरवाईची चादर पांघरलेला आणि हिरवाईचाच गालीचा अंथरलेला हा प्रदेश दूरवर पसरलेल्या ऊंच ऊंच पर्वत रांगा आणि खोल दऱ्यांनी श्वास रोखून धरायला लावतो. ऊंचावरून कोसळणारे धबधबे, विस्तीर्ण पसरलेली नैसर्गिक तळी मनाला मोहून टाकतात. पावसाळ्यात तर ढग हातावर उतरल्यासारखे वाटतात. गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८० चौ.कि.मी), मेळघाट वन्यजीव अभयारण्य (७८८.७५० चौ.कि.मी), नरनाळा वन्यजीव अभयारण्य (१२.३५० चौ.कि.मी), वान वन्यजीव अभयारण्य (२११.००६ चौ.कि.मी) आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य (१२७.११० चौ.कि.मी) असे क्षेत्र मिळून मेळघाट व्याघ्र प्रकल्प अस्तित्त्वात आला आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहात असून इतर समाजाचेही लोक राहातात.

येथे पट्टेवाला वाघ, बिबळे, रानगवे, सांबर, भेकर, रानडुकर, वानर, चितल, नीलगायी, चौसिंगा, अस्वल, भूईअस्वल, रानमांजर, तरस, कोल्हे, लांडगे, ससे यासारख्या प्राण्यांबरोबरच कृष्णमृग, उडत्या खारी, मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुर बगळा, करकोचे, बलाक, बदके, ससाणे, सर्पगरूड, पारवे, बुलबूल असे पक्षी देखील आहेत. या अभयारण्यात सागाची झाडं विपूल प्रमाणात आहेत. वाघ आणि आदिवासी लोक इथं एकत्र नांदतांना पहावयास मिळतात. मेळघाट जंगलाला कौतुकाने किपलिंग प्रदेश असे संबोधण्यात येते. सातपुडा-मैकलचा हा प्रदेश खोल दऱ्या आणि ऊंच पर्वत रांगांनी बनलेला आहे. पक्ष्यांचे संगीत आणि वाघांच्या डरकाळ्यांनी येथील पर्वतरांगा जिवंत आहेत.

भारतात घोषीत करण्यात आलेल्या ९ व्याघ्रप्रकल्पांपैकी एक असणारा मेळघाट व्याघ्र प्रकल्प फेब्रुवारी १९७४ रोजी अस्तित्वात आला. हा भारतातील सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. कोरकू आदिवासींची संस्कृती असणाऱ्या लोकांच्या वस्त्या आणि वाघ यांची ही भूमी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट, वान, आंबाबरवा आणि नरनाळा या अभयारण्याचा समावेश झाला असून अमरावती जिल्ह्याचे बरेचसे क्षेत्र या व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येते. तर राखीव क्षेत्राचा भाग हा अमरावती, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांमध्ये येतो.
(सर्व छायाचित्रे : दीपक जोशी)