महिला एकत्रीकरणातून बदलाला सुरुवात

SHG meeting
SHG meeting

मासेमारी आणि शेतमजुरी करतो. त्यामुळे रोजगारनिर्मिती कामाची सुरुवात ढीवर परिवाराच्या सर्वेक्षणापासून झाली. यातून महिला बचत गटाची उभारणी झाली. बचत गटामुळे महिलांना आरोग्य, रोजगार आणि शासकीय योजनांची माहिती मिळू लागली. याबाबत भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ या संस्थेच्या सदस्या शालू कोल्हे यांचे अनुभव...

भंडारा जिल्ह्याच्या नवेगाव बांध गावातील एका सामान्य ढीवर समाजातल्या परिवारातील शालू कोल्हे ही तरुण महिला, त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षणातून आलेल्या सामाजिक जागरूकतेतून तिच्या समाजाला अन्य समाजांकडून मिळणाऱ्या विषमतापूर्ण वागणुकीची जाणीव झाली. ढीवर समाजातल्या महिलांना योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी मार्ग शोधत असता त्यांना ‘भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ’ संस्थेचे मनीष राजनकर यांचे मार्गदर्शन मिळाले. जीविधा संवर्धनाच्या कामाविषयी समजून घेत असताना ढीवरांचे जीवन अवलंबून असणारे तलाव महत्त्वाचे संसाधन आहे आणि त्या नैसर्गिक संसाधनाचे जतन ढीवर समाज कशाप्रकारे करू शकतो हे लक्षात आले. 

ढीवर परिवाराचे सर्वेक्षण   तलावांची जीविधा जपताना ढीवर महिलांच्या सामाजिक समतेसाठीच्या लढ्याची कहाणी अनौपचारिकपणे नेतृत्व करणाऱ्या शालू कोल्हे म्हणाल्या की, आमच्या गावात कोहळी, कलार, तेली, कुणबी समाजाचे लोक आहेत. कोहळी म्हणजे शेतकरी, ढीवर म्हणजे भूमिहीन. हे शेतमजुरी करायचे. ढीवर समाजाच्या विकासासाठी मनीष राजनकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले, की महिलांची परिस्थिती आपण बदलू शकतो. मी स्वत:पासून सुरुवात करायची ठरवून मनीष भाऊंच्या संस्थेसोबत काम करायला लागले. ढीवर समाज जाळी विणतो, मासेमारी आणि शेतमजुरी करतो. कामाची सुरुवात ढीवर परिवाराच्या सर्वेक्षणापासून झाली. रोजगाराचा प्रश्न किती अवघड आहे ते दिसले. तलाव आणि तलावांचे व्यवस्थापन, मासेमारी सहकारी संस्था आणि ग्रामपंचायत सगळीकडे पुरुषांचंच वर्चस्व होते. ते मला खूप खटकले. महिला हुशार आहेत, कमी शिकलेल्या आहेत पण पुरुष तरी कुठे शिकलेले आहेत? तरीपण त्यांना मान मिळतो मग महिलांना का बरं नाही? हे आधीपासून खटकायचं. तेव्हा मी मनात ठरवलं होते की, मी पण पुढे जाईन आणि आमच्या समाजाच्या महिलांनाही पुढे नेईन. 

मालगुजारी तलावांच्या सामायिक वापराचा प्रश्न सर्वेक्षणामध्ये मनीष राजनकर यांनी मासेमारी तलावाबद्दल माहिती विचारली तेव्हा सगळ्यांनी सांगितले की, निमगावच्या सहकारी संस्थेचे चार तलाव आहेत. पण ते तलाव काही फायद्याचे नाहीत, कारण ते खूप कमी उत्पन्न देतात. तेव्हा भाऊंनी सांगितलं की त्या तलावांवर आपण काम करू शकतो.  तलावांच्या सामायिक वापराबाबत शालू कोल्हे म्हणाल्या की, मला आधीपासूनच तलावांमध्ये रस होता. तेव्हा मी एका साठीच्या वृद्ध माणसाला विचारलं की आपल्या तलावांमध्ये का उत्पन्न येत नाही? आधी कसे होते आणि आत्ता कसे आहेत? त्यांनी सांगितले की आधी तलावात मुलकी मासोळ्या होत्या. त्यांचे उत्पन्न खूप चांगले होते आणि तलावामध्ये खूप जैवविविधता होती. पण आता रोहू, कटला सारखे बंगाली मासे असल्यामुळे ते खूप वेगाने वनस्पती खातात. कोहळी समाजाचं वर्चस्व असल्यामुळे ते तलाव त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या ताब्यात जमीन आणि मालगुजारी तलाव दोन्ही होते. तेव्हा आमच्या लक्षात आले की, पहिल्यांदा तलाव बांधला तो काही फक्त कोहळी समाजाच्या लोकांनीच नाही, तर ढीवर समाजाच्या लोकांनीही बांधला. त्यांच्याजवळ पारंपरिक ज्ञान आहे. तेव्हा या कामाची सुरुवात मी महिलांपासून केली. सर्वांत पहिला उद्देश हा होता की महिलांना निर्णय प्रक्रियेत कसं सहभागी होता येईल. पुरुषांचं वर्चस्व कसं कमी करता येईल. 

महिलांच्या सहभागासाठी बचत गट    शालू कोल्हे म्हणाल्या, की मी महिलांसोबत बैठक बोलवायचे तेव्हा त्या येत नव्हत्या. त्या दिवसभर काम करायच्या आणि रात्री घरी यायच्या. मी त्यांच्याकडे रात्री जायची. महिलांना हळूहळू समजावून मी स्वत: बारा महिलांचा बचतगट तयार केला. त्यातून महिला गटाच्या बैठकीला यायला लागल्या. मी थोडं समाजाबद्दल बोलणे सुरू केले. आपली आर्थिक स्थिती, गावाची राजकीय स्थिती, सामाजिक स्थितीबद्दल बोलायला सुरुवात केली.     पुढे ग्रामसभा होती. मी त्यांना सांगितलं की, आपल्याला ग्रामसभेला जायचंय. सगळ्या महिलांना आश्चर्य वाटलं. त्या हो म्हणाल्या, पण एकही महिला आली नाही. मी एकटीच गेले. ग्रामपंचायतीत विचारलं गेलं की, “तू कशाला आलीस?” मी पंचायत राज बद्दल थोडे वाचले होते. मी म्हणाले, “आज महिला ग्रामसभा आहे, तर मग महिला नाही येणार तर कोण येणार?” त्यांना आश्चर्य वाटलं की ढीवर समाजाची महिला आज ग्रामपंचायतमध्ये आली. तेव्हा मी सांगितलं होतं की, ‘ग्रामपंचायतीत महिलांसाठी १० टक्के निधी येतो, अपंगासाठी ३ टक्के निधी येतो. महिलांना पंचायतीत स्वत:चा निर्णय मांडता येतो.’ जेव्हा गटातील महिलांना सांगितले, की ढीवर समाजाची एकटी मी गेले तेव्हा त्यांना इतका धक्का बसला, ढीवर समाजाच्या दहा महिला गेल्या तर किती बदल होईल.     २०१४ मधील गोष्ट. पहिली ग्रामसभा २६ जानेवारी रोजी होती. आमच्या गावामध्ये महिला पहिल्यांदाच ग्रामसभेत सहभागी झाल्या होत्या. तेव्हा ग्रामसभेला १५ महिला होत्या. त्या वेळी मला फारसं माहिती नव्हतं. त्यांनी म्हटलं की, कोरम पूर्ण झाल्याशिवाय महिला ग्रामसभा होऊ शकत नाही.” मी सांगितले की, महिला ग्रामसभेला कोरमची अट नसते. दाखवा कुठेय शासकीय निर्णय कायद्यामध्ये आणि महिलांची बैठक झाली. महिलांना खूप छान वाटले.    ग्रामसभेला महिलांना नेण्यासाठी मेहनत घ्यायला लागली. पहिल्यांदा हो म्हणून बायका आल्या नाहीत. यावेळेला मी सकाळी सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना सोबत घेऊन गेले. त्यांना हे समजावून सांगितलं की, तुम्हाला जाऊन काही करायचं नाही, फक्त जाऊन बसायचं आहे. तुम्हीही काही बोलू नका, मी ही काही बोलणार नाही. फक्त ते जे प्रश्न विचारतील ते ऐकायचे. बोलायचं आहे असं मी म्हणाले असते तर त्या आल्या नसत्या. खरोखर त्या काहीच बोलल्या नाहीत. पण त्या ग्रामसभेत महिलांचे काय अधिकार असतात ते थोडं थोडं कळलं. त्यांनी परत येऊन आणखी पंधरा महिलांना सांगितले.  आमच्या गावातील सरपंचांना सांगितले की, महिला ग्रामसभेला पुरुष नसतात. त्या वेळी आमच्याकडे ग्रामसेविका होत्या. त्यांनी सरपंचासह सर्वांना बाहेर जायला सांगितलं. मग महिलांची चर्चा सुरू झाली. गावातल्या महिला एकदा बोलायला सुरू झाल्या की थांबत नाहीत. सगळ्यात पुढे महिलांना खुर्चीवर बसवले, सगळ्यात मागे मी उभी होते. ग्रामसेविका जेव्हा प्रश्न विचारत होत्या, तेव्हा त्या बोलू शकत नव्हत्या. मी बायकांना म्हणाले की ‘तुम्ही पंधरा जणी ग्रामसभेला आलाय, माझ्यासाठी एवढंच खूप आहे.’ पुढचं काम मी स्वत: पाहते, जिथे अडचण लागेल तिथे तुम्हाला मदतीला बोलवीन. पण प्रत्यक्षात पंधरा महिलांनी वीस महिला जमवल्या. पहिल्यांदा महिलांचे आरोग्य, हिमोग्लोबीन यांवर चर्चा झाली. त्यातून मत्स्य तलावाबाबत चर्चा सुरू झाली. रोजगाराचे नवे साधन उभे राहू लागले.

इमेल ः bnvsam@gmail.com, shalukolhe@gmail.com   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com