उद्धव ठाकरे : संवेदनशील व्यक्ती ते यशस्वी राजकारणी....

उद्धव ठाकरे : संवेदनशील व्यक्ती ते यशस्वी राजकारणी....
उद्धव ठाकरे : संवेदनशील व्यक्ती ते यशस्वी राजकारणी....

मुंबई : संवेदनशील लेखक, कवी, अभ्यासू छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणत आणि पक्षाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या विकासासाठी ते सातत्याने कार्यरत होते. 

श्री. ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे, आई स्व. मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा श्री. ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली. मुंबईत २७ जुलै १९६०ला उद्धव यांचा जन्म झाला आहे. ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे स्नातक असून, त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या श्री. ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.

राजकीय कारकीर्द श्री. उद्धव यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थिदशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय असलेल्या श्री. ठाकरे यांच्याकडे २००२ च्या बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले. २००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.

व्यक्तिगत जीवन श्री. उद्धव यांचा विवाह सौ. रश्मी यांच्याशी झाला असून, त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत. आदित्य हे युवा सेनाप्रमुख असून, वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

कलात्मक पैलू महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तिमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांनी आपल्या  ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या पुस्तकात केले आहे. ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या यथार्थ छायाचित्रणाने त्यांच्या ‘पाहावा विठ्ठल’ या २०११ मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे, तर जगाला भुरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.

योगदान शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनेस बुकने घेतली आहे. श्री. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषधपुरवठाही सुरू केला. 

उद्धव ठाकरेंचे इतर योगदान... - मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रुग्णालयांची निर्मिती. - विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी. - २००२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीचे प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी आणि विजयाचे शिल्पकार.  - महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश.  - गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटकपक्ष म्हणून सहभागी.  - राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश. - राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक ती मदत न मिळाल्याने त्यांनी २००७ मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबवली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com