कारखान्यांकडून यंदा उसाची पळवापळवी शक्य

Sugarcane run by sugar factories?
Sugarcane run by sugar factories?

पुणे ः चालू वर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळविणे मोठे आव्हान बनले आहे. महापूर, अतिपाऊस व पाणीटंचाई, चाऱ्यासाठी तोडलेला ऊस यांमुळे गळीत हंगाम सुरू होत असताना कारखान्यांना उसाची टंचाई भासणार आहे. यामुळे गाळपाची सरासरी गाठण्यासाठी पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना झगडावे लागण्याची चिन्हे आहेत. 

जिल्ह्यात गेल्या वर्षी १२०.८२ लाख टन उसाचे गाळप झाले होते. चालू वर्षी उसाच्या टंचाईमुळे सुमारे ८२ लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३५ लाख ८२ हजार टनाने गाळप कमी होण्याचा अंदाज आहे. 

सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा दिसत असला, तरी पावसामुळे बहुतांशी पीक हातचे गेले आहे. काही ठिकाणचा ऊस गाळपयोग्य राहिलेला नसल्याने तोडणीकरिता शेतकऱ्यांची मानसिकता राहिलेली नाही. पिकांच्या पंचनाम्यात उसाचा समावेश आहे की नाही, याबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहिती मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोडीला पुढाकार घेत नसल्याचे दिसत आहेत. कारण किती नुकसान झाले, किती पीक चांगले यांचा पंचनामा झाला असला, तरी त्याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. त्यातच पावसामुळे नवीन ऊस लागवडी फार झालेल्या नसल्याने त्याचा विपरीत क्षेत्र घटण्यावर झाला आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत ऊस क्षेत्रात घट झाली आहे. याचा फटका कारखान्यांना बसणार आहे. जिल्ह्यात साखर पंढरी म्हणून ओळख असलेल्या बारामती, दौंड, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील साखर कारखान्यांना गेटकेन ऊस घेतल्याशिवाय त्याचा गळीत हंगाम पूर्ण होऊ शकत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

दरवर्षी थोड्याफार फरकाने अशी स्थिती असते. परंतु, यंदा यांचे प्रमाण अधिक असणार आहे. यामुळे चालू वर्षी उसासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा होणार हे गृहीत धरून कारखान्यांनी दर जाहीर करण्याकरिता अद्यापही हात आखडता घेतला आहे. पावसामुळे गळीत हंगाम लांबला असून, त्यातच उसाची कमतरता यांमुळे हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी कारखान्याकडून केली जात आहे. जिल्ह्यात एकूण १८ साखर कारखाने आहेत. सहकारी १२ तर ६ खासगी साखर कारखाने आहेत. त्यापैकी चार साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे.

कारखानानिहाय असलेले उसाचे क्षेत्र, हेक्टरमध्ये ः सोमेश्वर १०,७७२, माळेगाव १३,९२४, छत्रपती ११,५३५, भीमा पाटस ८०००, विघ्नहर ९८५०, इंदापूर १०,९४०, राजगड २६८१, संत तुकाराम ७२१४, घोडगंगा ६७७७, भीमाशंकर ७३७३, नीरा भीमा ४७१४, श्रीनाथ म्हस्कोबा ८५२५, अनुराज शुगर्स ४१९६, बारामती अॅग्रो १०,९०६, दौंड शुगर ६५६८, व्यंकटेशकृपा शुगर ८४५५, पराग शुगर ५४७५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com