महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तारूढ

thakare government
thakare government

मुंबई ः महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. २८) शिवाजी पार्कवर शपथ घेतली. राज्यपाल भगवंत कोशियारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या एकूण सहा नेत्यांचाही या वेळी शपथविधी झाला.  शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तसेच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ठाकरे सरकारच्या या पहिल्या शपथविधी सोहळ्यात महाआघाडीच्या नेत्यांनी सामाजिक आणि प्रादेशिक समतोल राखल्याचे दिसून येते.  शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सातच्या सुमाराला हा भव्य-दिव्य डोळ्यांचे पारणे फेडणारा शपथविधी सोहळा पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी, मुले आदित्य, तेजस, बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रतिभाताई पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, कमलनाथ, राजीव शुक्ला, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तसेच उद्योगपती मुकेश अंबानी कुटुंबीयांसह उपस्थित होते. त्यासोबतच या सोहळ्याला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, उद्योगपती, अभिनेते तसेच विविध क्षेत्रांतील व्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत लाखो जण उपस्थित होते.  जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला, त्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या साक्षीने हा शपथविधी रंगला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे ठाकरे घराण्यातील उद्धव ठाकरे हे पहिलेच असल्याने हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी शिवाजी पार्कवर तुफान गर्दी लोटली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, ''कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला'', ''जय भवानी, जय शिवाजी'', ''आवाज कुणाचा, शिवसेनेचा'' असा जयघोष करत हजारो शिवसैनिक कुटुंबकबिल्यासह शिवतीर्थावर धडकले होते. त्यामुळे संपूर्ण दादर परिसर गर्दीने फुलून गेला होता. त्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्यभरातील कार्यकर्तेही शिवाजी पार्कवर दाखल झाले होते. पार्कवर तीनही पक्षांचे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.  या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर खास व्यासपीठ तयार करण्यात आले होते. सुप्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्यासपीठ साकारण्यात आले होते. संपूर्ण व्यासपीठाला किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्ठित आणि अश्वारूढ प्रतिमा व्यासपीठाच्या मध्यवर्ती ठिकाणी होती. तसेच, स्वराज्याची ''शिवमुद्रा'' व्यासपीठावर कोरण्यात आल्याने याठिकाणी शिवशाही अवतरल्याचा भास निर्माण होत होता. व्यासपीठावर तीनशे मान्यवरांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. तसेच शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी सुमार साठ हजार खुर्च्यांची सोय करण्यात आली होती.  प्रत्यक्षात सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर लाखो नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी पार्क परिसरात सुमारे एक हजार गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. शपथविधी सोहळ्याचे शेट प्रक्षेपण पाहण्यासाठी शिवाजी पार्कच्या कानाकोपऱ्यात वीस एलईडी लावले गेले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीलाही पुष्पआरास करण्यात आली होती. सोहळ्यादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांबरोबरच, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), बॉम्बशोधक आणि नाशक पथक, मुंबई वाहतूक विभाग आणि जवळपास २ हजार अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा तैनात करण्यात आले होते. गर्दीवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येत होती. तसेच साध्या वेशातील पोलिसही डोळ्यात तेल घालून गस्त घालत होते.  पारदर्शक, जबाबदार, गतिमान सुशासन देणार ः सोनिया गांधी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष अत्यंत असामान्य अशा स्थितीत एकत्र आले आहेत. देश आज भाजपच्या अभूतपूर्व अशा संकटाचा सामना करत आहे. राजकीय वातावरण आज अत्यंत विषारी बनले आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. शेतकऱ्याला प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात बनलेली महाविकास आघाडी आश्वासक आहे, अशा भावना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला निश्चितच पारदर्शक, जबाबदार आणि गतिमान सुशासन देणारे सरकार आम्ही सारे मिळून देणार आहोत, असे सोनियांनी पुढे म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com