गांडूळखत निर्मिती करताना...

स्थानिक उपलब्ध घटकांच्या साह्याने गांडूळखत निर्मितीसाठी शेड तयार करावी.
स्थानिक उपलब्ध घटकांच्या साह्याने गांडूळखत निर्मितीसाठी शेड तयार करावी.

सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनासाठी गांडुळे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. गांडूळ खताची निर्मिती करताना जागेची निवड, शेड, बेड किंवा खड्ड्यामध्ये योग्य थरांमध्ये पदार्थांची भरणी याकडे लक्ष दिले पाहिजे.   जागेची निवड

  • गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी.
  • खड्ड्याच्या जवळपास मोठी वृक्ष/झाडे नसावीत. कारण झाडांची मुळे गांडूळ खतामधील  पोषक घटक शोषून घेतात.
  • गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते. त्यासाठी छप्पर किंवा शेड करणे आवश्यक आहे.
  • छप्पर बांधणीची पद्धती : ऊन आणि पावसापासून बचाव करण्याकरिता ८ फूट उंच, १० फूट रुंद व ३० ते ४० फूट लांब,  आवश्यकतेनुसार लांबी कमी जास्त चालू शकते. छपरात/शेडमध्ये शिरण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी रुंद कडेची बाजू मोकळी ठेवावी. सुरक्षितता नसेल तर लांबीच्या दोन्ही बाजूंना कूड घालावा. गांडूळ पालनाची पद्धती : छपरामध्ये दोन फूट रुंदीचा मधोमध रस्ता सोडून त्यांच्या दोन्ही बाजूने तीन फूट रुंदीच्या दोन ओळी ठेवा. पहिला थर ः त्या दोन ओळीवर उसाचे पाचट, केळीचा पाला किंवा इतर काडीकचरा यांचे तुकडे करून सहा इंच उंचीचा थर द्यावा. या जाड काडी कचऱ्यामध्ये गांडुळांना आश्रय घेता येतो.  दुसरा  थर ः चांगल्या मुरलेल्या, रापलेल्या खताचा किंवा सुकलेल्या स्लरीचा द्यावा. तो उष्णता निरोधनाचे काम करील. त्यासोबत साधारण मुरलेले खत टाकल्यास गांडुळांना खाद्य म्हणून कामी येईल. बीज रुप म्हणून या थरावर साधारण ३ x ४० फुटासाठी १० हजार गांडुळे समान पसरावीत. तिसरा थर ः गांडुळे पसरल्यानंतर त्यावर कचऱ्याचा  १ फूट जाडीचा थर घालावा. पुन्हा चार-पाच इंच कचऱ्याचा द्यावा. हलके पाणी शिंपडून ओल्या पोत्याने किंवा गोणपाटाने सर्व झाकून ठेवावे. बेड –  थर

  • जमीन
  • सावकाश कुजणारा सेंद्रिय पदार्थ २ ते ३ इंच जाडीचा थर  (नारळाच्या शेंड्या, पाचट, धसकट इत्यादी )
  • कुजलेले शेणखत/गांडूळखत २-३ इंच जाडीचा थर.
  • गांडुळे सोडणे
  • कुजलेले शेणखत/गांडूळ खताचा एक थर
  • शेण, पालापाचोळा वगैरे १२ इंच जाडीचा थर
  • गोणपाटाने झाकणे
  • गांडुळाचे खाद्य : सर्व सजीवांप्रमाणे गांडुळाच्याही खाण्यामध्ये आवडीनिवडी असतात. त्यांच्या आवडीच्या खाद्यामध्ये गांडुळांची वाढ व प्रजोत्पादन झपाट्याने होते. झाडांची पाने, कापलेले गवत, तण,  काडीकचरा, पालापाचोळा, भाज्यांचे टाकावू भाग, प्राण्यांची विष्ठा (कोंबड्यांची विष्ठा वगळता)  कंपोस्टखत, शेणखत, लेंडीखत इत्यादी पदार्थ गांडुळाचे आवडीचे आहेत. - शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळ खत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुद्धा खत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत व सेंद्रिय खत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरून गांडूळ खत तयार करता  येते.

  • गांडूळ खाद्यामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले  पिकाचे अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड यांचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य  गांडुळासाठी वापरताना त्यामध्ये १:३ या  प्रमाणात शेणखत मिसळणे आवश्यक आहे.
  • गांडूळ खाद्य नेहमी बारीक करून टाकावे.
  • -बायोगॅस प्लॅन्टमधून निघालेली स्लरीसुद्धा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणता येते.
  • खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्याअगोदर गांडूळ खाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे. म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल.
  • सूक्ष्म जिवाणू संवर्धके (बॅक्टेरीयल कल्चर) वापरून खत कुजविण्याच्या प्रक्रियेस वेग देता येतो. त्यासाठी १ टन खतास अर्धा किलो जिवाणू संवर्धके वापरावीत.
  • गांडूळ खत वेगळे करण्याची पद्धत ः गांडूळ खत हाताला भुसभुशीत व हलके लागते. गांडूळ खत तयार झाल्याचे दिसून आल्यावर दोन दिवस पाणी मारणे बंद ठेवावे. साधारण वरचा थर कोरडा झाल्यामुळे गांडुळे खाली जातात. नंतर उघड्या जागेमध्ये गांडूळ खताचे हलक्या हाताने ढीग करावेत. उजेड दिसताच सर्व गांडुळे ही खाली जातात. तेव्हा त्यावरील खताचा थर वेगळा करावा. खालील थर पुन्हा एकदा थंड जागेत साठवण्यास ठेवावा. अशा पद्धतीने क्रमाक्रमाने अवलंब करून गांडुळांना खद्य पुरवून खताची निर्मिती सुरू ठेवावी. गांडूळखत वेगळे करताना कुदळी, टिकाव, फावडे, खुरपे यांचा वापर करू नये. त्यामुळे गांडुळांना इजा पोहचू शकते. या गांडूळखतामध्ये गांडुळाची अंडी, त्याची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रति वर्ष या प्रमाणात जमिनीत टाकावे. गांडूळ खत व कंपोस्ट / शेणखत यातील फरक :

    गांडूळ खत कंपोस्ट / शेणखत
    गांडूळखत लवकर तयार होते.  (गांडुळे गादी वाफ्यावर स्थिरावल्यावर २-३ आठवडे) मंदगतीने तयार होते. (जवळजवळ ४ महिने लागतात.)
    घाण वास, माश्‍या, डास यांचा उपद्रव नाही. आरोग्याला अपायकारक नाही. घाण वास, माश्‍या, डास यांचा उपद्रव संभवतो.
    जागा कमी लागते. जागा जास्त लागते.
    ४  x  १  x  ७५ फूट आकाराच्या गादीवाफ्यापासून (म्हणजेच ३०० घनफूट)  दर पंधरा दिवसाला ३ टन खत मिळते.   ३ x १० x १० फूट आकाराच्या  खड्ड्यापासून दर महिन्याने १० टन खत मिळते.
    ऊर्जा, गांडूळखत, द्रवरुप खत मिळते.  कंपोस्ट व्यतिरिक्त इतर पदार्थ मिळत नाहीत.
    हेक्टरी मात्रा ५ टन लागते.  हेक्टरी मात्रा १२.५ टन लागते
    तापमान फार वाढत नसल्यामुळे जिवाणूंचे कार्य जोमात होते.  तापमान वाढत असल्यामुळे जिवाणूंचे कार्य मंद असते.
    नत्र उपलब्ध २.५ ते ३ टक्के  नत्र उपलब्ध ०.५ ते १.५ टक्के
    स्फूरद उपलब्ध १.५ ते २ टक्के  स्फूरद उपलब्ध ०.५ ते ०.९ टक्के
    पालाश उपलब्ध १.५ ते २ टक्के  पालाश उपलब्ध १.२ ते १.४ टक्के
    सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध  होतात.  सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध  होतात.
    गांडुळांच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते.  कोणतेही अतिरिक्त उत्पन्न मिळत नाही.

    गांडूळखत तयार करण्याची पद्धत शेड ः गांडूळ खत तयार करण्यासाठी शेडची आवश्यकता असते. गांडुळांचे सूर्यप्रकाश व पावसापासून संरक्षण आवश्यक असते. त्यासाठी शेडची रुंदी २ व ४ ढिगांसाठी अनुक्रमे ४.२० मी. व ७.५० मी. असावी. लांबी सोयीनुसार ठेवावी. गाळे साधारणतः ३ मी. लांबीचे असावेत. शेडच्या छपराच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबाची उंची १.३५ ते १.५० मी. व मधल्या खांबाची उंची २.२५ ते २.४० मी. असावी. शेड शक्यतो पूर्व पश्चिम लांबी येईल अशी ठेवावी. छपरासाठी उपलब्ध वस्तू म्हणजे गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लास्टिक कागद, सिमेंट अथवा लोखंडी पत्र्याचा उपयोग करावा. शेडमधील जमिनीवर एकाच दिशेने उतार येईल असा ४ इंची कोबा करावा अथवा कॉंक्रीट करावे. त्यावर ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करावे. ढीग पद्धत : ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणतः २.५ ते ३ मी. लांबीची, ०.०९० ते १.२० मीटर मोकळी जागा सोडावी. प्रथम पाणी टाकून जमीन ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस अथवा गव्हाचे काड अथवा उसाचे पाचट इ. लवकर न कुजणाऱ्या पदार्थाचा ३ ते ५ सेमी. जाडीचा थर रचावा. हा थर पाणी शिंपडून ओला करावा. त्यावर ३ ते ५ सेमी जाडीच्या अर्धवट कुजलेला शेणाचा अथवा कंपोस्टचा अथवा पोयटा मातीचा थर द्यावा. गांडुळांना या थराचा उपयोग तात्पुरते निवारा स्थळ म्हणून होतो. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळुवार रीतीने सोडावीत. कंपोस्टच्या थरावर गांडूळखत तयार करण्यासाठी वापरायच्या पदार्थांना म्हणजे जनावरांचे मलमूत्र पिकांचे अवशेष, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरिपुष्प, शेवरी या द्विदल झाडांची पाने, भुईमूग, उडीद, सोयाबीनचे काड, कडूनिंबाची कोवळी पाने व डहाळी, बोनमील, मासळीचे खत इ. चा वापर करावा. मात्र हे सेंद्रिय पदार्थ शेणस्लरीत अर्धवट कुजलेले असावे. त्यांच्यातील कर्ब व नत्राचे गुणोत्तर ३० ते ४० च्या दरम्यान असलेले वापरल्यास अधिक चांगले. संपूर्ण ढिगाची उंची ६० सेमी. पेक्षा अधिक होणार नाही याची काळजी घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमध्ये ४० ते ५० टक्के पाणी असावे. त्यासाठी दररोज झारीने अथवा स्प्रे पंपाने पाणी फवारावे. शक्यतो ढिगावर गोणपाटाचे आच्छादन द्यावे. गांडूळाच्या पुरेशा वाढीसाठी ढिगाचे तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी. फायदे : उत्तम प्रकारे तयार झालेले गांडूळखत, सैल, भुसभुशीत, चहाच्या भुकटीसारखे रंग गडद काळा (ह्युमससारखा) रंग असतो. त्याला आल्हादकारक मातीचा वास येतो. त्याचे स्वरूप कणीदार असते. त्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. गांडूळखताचे पृथःकरण केले असता त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण साधारणपणे नत्र २ टक्के, स्फुरद १.२ टक्के, पालाश १ टक्के , गंधक ०.४ टक्के, कॅल्शिअम १.५ टक्के, मॅग्नेशिअम ०.४० टक्के, लोह ०.७० टक्के, मॅगनीज ४६५ पीपीएम, तांबे १०६ पीपीएम, बोरॉन २३ पीपीएम, मॉलिब्डेनम ४७ पीपीएम असे असते

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com