प्रक्रिया, थेट विक्री, चारा व्यवस्थेतून किफायतशीर दुग्ध व्यवसाय

पाटील यांचा गोठा व थेट दूध विक्री
पाटील यांचा गोठा व थेट दूध विक्री

प्रक्रिया, थेट विक्री, चारा व्यवस्थेतून किफायतशीर दुग्ध व्यवसाय नगर जिल्ह्यात कडा (ता. आष्टी) या दुष्काळी भागात पंकज श्रीकृष्ण पाटील या तरुणाने दहा वर्षांपूर्वी दोन म्हशींपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. सातत्य, कष्ट, दुधापासून प्रक्रिया उत्पादने, त्याची विक्री व्यवस्था मजबूत करणे, थेट विक्री आणि चाऱ्याची पुरेशी उपलब्धता या बाबींकडे विशेष लक्ष दिले. त्याद्वारे चोख व्यवस्थापन करून उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवले. व्यवसायातील फायदा वाढवण्याचा प्रयत्न केला. आज पंचक्रोशीत अनेक वर्षांपासून आदर्श दुग्ध व्यवसाय करणारे कुटुंब म्हणून पाटील यांच्याकडे पाहिले जाते. नगर जिल्ह्यातील कायम दुष्काळी असलेल्या आष्टी तालुक्यातील कडा येथील पंकज पाटील यांच्या कुटुंबाची उच्चशिक्षित अशी ओळख आहे. त्यांचे बंधू अनिरुद्ध यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून ते पुण्यात नोकरी करतात. वडील श्रीकृष्ण व आई अनुराधा हे दोघेही सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. पंकज यांनी बीएसस्सी चे शिक्षण घेतले आहे. ते पूर्णवेळ दुग्ध व्यवसाय पाहतात. पंकज यांच्या पत्नी प्रिती जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. उच्चशिक्षित अशा या परिवाराने दुग्ध व्यवसायात पंचक्रोशीत आपले नाव कमावले आहे. दुग्ध व्यवसायाचा आदर्श पंकज यांच्या वडिलांनी नोकरी सांभाळून अनेक वर्षे आपला दुग्ध व्यवसाय जोपासला. आता पंकज यांनी त्याचा विस्तार केला आहे. शिक्षणानंतर पंकज यांनी दोन वर्षे औरंगाबाद येथे जाहिरात कंपनीत नोकरी केली. सोबत राजू कुलकर्णी हे मित्र काम करत होते. त्यांनी तेथे म्हशी खरेदी करून दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. चारा, पाणी विकत घेऊनही तो परडवत असल्याचे पंकज यांनी पाहिले. मग मित्राकडूनच त्यांना किफायतशीर व्यवसायाची प्रेरणा मिळाली. वडील सांभाळत असलेल्या गाई त्यावेळी विकलेल्या होत्या. पंकज नोकरी सोडून गावी आले. सन २००७ च्या सुमारास दोन म्हशी खरेदी केल्या. व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांनी संपूर्ण आखणी केली. व्यवस्थापन चोख ठेवले. दर्जेदार दुधाला चांगली मागणी येत राहिली. म्हशीच्या संख्येत टप्प्याने वाढ केली. काही वर्षांतच व्यवसायात स्थिरता आणून तो आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनवला. पंकज यांचा दुग्ध व्यवसाय- ठळक बाबी

  • सध्या लहान-मोठी मिळून सुमारे १०० जनावरे. ५५ म्हशी, आठ संकरीत (एचएफ) तर दोन गीर गायी,
  • सुरवातीला स्थानिक पातळीवरील दोन म्हशींची खरेदी. पुढील काळात संख्येत वाढ करताना जाफराबादी, म्हैसाणा आणि मुऱ्हा जातींवर भर
  • गोठा व्यवस्थापनापासून ते वितरण, विक्रीपर्यंतची सारी जबाबदारी पंकज पाहतात.
  • दूध विक्रीतून भांडवल उभे करत जनावरांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ
  • ७२ बाय ४२ फूट आकाराचा एक व अन्य दोन आकारांचे गोठे
  • पंकज सुरवातीला नोकरी करायचे. आता चारा, गोठा व्यवस्थापन व अन्य कामांसाठी त्यांच्याकडे सुमारे ११ मजूर तैनात आहेत.
  •  प्रक्रिया व मजबूत विक्री व्यवस्था दररोज एकूण सुमारे ४०० लिटर दुधाचे उत्पादन होते. त्यातील २५० ते ३०० लिटर दुधाची थेट ग्राहकांना विक्री होते. म्हशीचे दूध प्रति लिटर ६० रूरुपये दराने तर गायीचे दूध ४० रुपये दराने विक्री होते. देशी गायीचे दूध ६० रुपये दराने विकण्यात येते. कडा शहरात दूध विक्री केंद्र सुरू केले आहे. संकलनातील उर्वरित १५० लिटर दुधापासून पनीर व दही तयार होते. जामखेड, आष्टी, पाथर्डी, आदी परिसरात सुमारे ३० ते ३२ होटेल्सचे मार्केट पंकज यांनी काबीज केले आहे. त्यांना होलसेल दरात तर स्वतःच्या विक्री केंद्राद्वारे ३०० रुपये प्रति किलो दराने पनीरची विक्री होते. प्रत्येक पदार्थाचा दर्जा चांगला असल्याने मागणीही कायम असते. चारा, खाद्य व्यवस्थापनाला प्राधान्य पंकज यांनी दुग्ध व्यवसायात चारा व खाद्य व्यवस्थापनाला प्राधान्य दिले आहे. त्यांची कडा येथे वडिलोपार्जित साडेबावीस एकर जमीन आहे. त्यातील ११ ते १२ एकर क्षेत्रावर केवळ चारा घेण्यात येतो. चार एकर ऊस तर प्रत्येकी एका एकरावर लसूणघास, दशरथ गवत, पंजाबी, गोपीकृष्ण कडवळ असे प्रकार आहे. त्यांचा दररोजच्या आहारात समावेश असतो. किफायतशीर व्यवसाय पंकज म्हणतात की, स्वतःकडे चारा व्यवस्था चांगली असेल तर दुग्ध व्यवसाय किफायतशीर होऊ शकतो. त्याचबरोबर थेट विक्री, प्रक्रिया करणे या बाबींद्वारेही नफ्याचे प्रमाण वाढू शकते. सर्व परिस्थिती अनुकूल राहिली तर या व्यवसायातून ४० टक्क्यापर्यंत नफा होतो. आता चारा, खाद्य यांची दरवाढ झाल्याने नफ्याचे प्रमाण घटले असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळावर केली मात आष्टी तालुक्याला सातत्याने दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. यंदाही सर्वत्र जोरदार पाऊस झालेला असताना या भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या वर्षी पंकज यांना गंभीर दुष्काळाशी सामना करुन आपला व्यवसाय सांभाळला. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी चारा व पाण्याअभावी जनावरे विकली. पंकज यांनी मात्र सलग आठ महिने चारा विकत घेऊन जनावरे जोपासली. त्यासाठी सुमारे पाच ते सहा लाखाचा खर्च झाला. मात्र हार न मानता त्यांनी दुष्काळावर मात केली. पंकज यांच्याकडून शिकण्यासारखे

  • एकाच वेळी भांडवल गुंतवणूक न करता टप्प्याटप्प्याने म्हशीच्या संख्येत वाढ
  • -गीर गायींची संख्या वाढविण्याचे पुढील नियोजन
  • दुधाचा दर्जा चांगला राहावा यासाठी वेगवेगळ्या खाद्यांचा आहारात समावेश
  • वर्षभरात सुमारे दीडशे ट्रॉली शेणखताचे उत्पादन. त्यातील अर्ध्या खताची विक्री. एक ट्रॉलीखत
  • साडेतीन हजार रुपयांना विकण्यात येते.
  • प्रतिक्रिया मी जिद्दीने दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यात सातत्य ठेवले आहे. यात समाधानी आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता चिकाटीने व धैर्याने व्यवसाय केला तर यशस्वी होता येते. पंकज पाटील संपर्क- ९८९०८४२४४४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com