मक्याला मागणी कायम, दरही टिकून जळगाव मका मार्केट स्थिती

जळगावच्या बाजारात मक्‍याची सुरू असलेली आवक
जळगावच्या बाजारात मक्‍याची सुरू असलेली आवक

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मक्‍याचे दर मागील आठ महिन्यांपासून स्थिर आहेत. यंदा या पिकाचे अतिवृष्टीत नुकसान झाले. साहजिकच जळगाव बाजारात आवक कमी आहे. कमी दर्जाच्या मक्‍याला क्विंटलला १००० रुपये तर दर्जेदार किंवा कमी आर्द्रतेच्या मक्‍याला २२०० रुपये कमाल दर मिळाला आहे. पोल्ट्री, स्टार्च उद्योगात मक्याची मोठी गरज असल्याने कायम मागणी राहते. त्यामुळे दर पुढेही टिकून राहू शकतील असा अंदाजही बाजारपेठेतील विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात मका हे ज्वारीपाठोपाठचे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. मक्‍याची खरिपात ५५ हजार ते ६० हजार हेक्‍टरवर दरवर्षी लागवड होते. रब्बीमध्ये जिल्ह्यात तापी, गिरणा, वाघूर नदीच्या क्षेत्रातील भागात मोठ्या क्षेत्रावर मका असतो. सुमारे पाच महिन्यांच्या काळात हे पीक शेतकऱ्यांना धान्यासोबत चांगला चाराही देऊन जाते. संकटांमुळे मक्याचे नुकसान जळगावच्या बाजारात मागील रब्बी हंगामात मक्‍याची आवक कमी होती. त्याचे कारण म्हणजे अमेरिकन लष्करी अळीचा या पिकात झालेला शिरकाव. त्यामुळे सुमारे ३० टक्के क्षेत्रात पीक मोडावे लागले. यंदा खरिपात सुमारे ३५ हजार हेक्‍टरवर मका होता. त्यावरही लष्करी अळीचा प्रकोप सुरुवातीला झाला. मेहनती, जिद्दी शेतकऱ्यांनी हा प्रकोप वेळीच रोखला. पीक जोमात होते. पुढे काढणी किंवा मळणीच्या वेळेस अतिपावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. आगाप पीक घेतलेल्यांच्या हाती उत्पादन हाती आले. परंतु एकूण क्षेत्रात हंगामात केवळ १० ते १२ टक्केच उत्पादन दर्जेदार मिळाले. मिळालेले दर चांगल्या ग्रेडच्या मक्याला ऑक्‍टोबरमध्ये प्रति क्विंटल २२०० रुपये तर कमी दर्जाच्या मक्‍याला प्रति क्विंटल किमान ८०० रुपये व कमाल १२०० रुपये दर मिळत आहे. मक्‍यात आर्द्रता अधिक असल्याने कमाल दर त्यापुढे न गेल्याचे चित्र आहे. मागील वर्षीदेखील दर ९०० ते १७०० रुपये होते. परंतु जानेवारीपासून ते स्थिरावले. त्यानंतर ते २२०० रुपयांपर्यंत पोचले. मागील रब्बी हंगामात एकरी सरासरी १८ क्विंटल उत्पादन साध्य झाले. यंदाच्या खरिपात हेच उत्पादन १० ते १५ क्विंटलपर्यंत साध्य होऊ शकले. मागील हंगामात तसेच उन्हाळ्यात कडब्याचा तुटवडा होता. यामुळे कडब्याची थेट शेतातून एकरी सात ते नऊ हजार रुपये या दरात खरेदी झाली. प्रतिशेकडा तीन हजार रुपये दर कडब्याला होता. सद्यःस्थितीत त्याचा दर्जा घसरला असला तरी दर प्रतिशेकडा साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहेत. जळगाव बाजार समितीतील मका उलाढाल

  • २०१७- ८२ कोटी
  • २०१८- ८० कोटी
  • २०१९- ७५ कोटी
  • यंदाची आवक (प्रतिदिन सरासरी व क्विंटलमध्ये)

  • मार्च- २०००
  • एप्रिल- ३६००
  • मे- ३८००
  • जून- ८००
  • ऑक्‍टोबर- ४००
  • नोव्हेंबर- ३००
  • २०१८- आवक स्थिती

  • मार्च- २५००
  • एप्रिल-३५००
  • मे- ३०००
  • जून- ८५०
  • मिळालेले दर (सरासरी प्रतिक्विंटल व रुपयांत)

  • २०१७- ११००
  • २०१८- १५००
  • २०१९- १६००
  • आवक व खेडा खरेदी जळगाव, चोपडा, अमळनेर येथील बाजारातील व्यापारी, मध्यस्थ गावोगावी जावून मक्याची थेट शेतातून खरेदी करतात. याला खेडा खरेदी देखील म्हणतात. यात शेतकऱ्यांचा मका बाजारात नेण्यासंबंधीचा वेळ, वाहतूक खर्च व अन्य त्रास कमी होतो. जळगावच्या बाजारात मक्‍याची आवक जळगाव तालुक्‍यातून अधिक तर औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड, जालना, बुलडाणा भागातूनही होते. जळगावसह जिल्ह्यात चोपडा, अडावद (ता. चोपडा), चाळीसगाव, मुक्ताईनगर, अमळनेर येथील बाजार मक्‍यासाठी प्रसिद्ध आहे. तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर व दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील शहादा येथील बाजार मक्‍यासाठी प्रसिद्ध आहे. मागणी कायमच टिकून मक्‍याची जेवढी आवक तेवढा उठाव बाजारात होत असतो. जळगाव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून मध्य प्रदेश, गुजरात भागांतील पोल्ट्री व्यावसायिक मक्‍याची खरेदी करतात. जळगाव व नजीकच्या उद्योगात मक्‍यापासून पशुखाद्य तयार करणारे सुमारे १० कारखाने आहेत. त्यांच्याकडूनही मक्‍याची चांगली बारमाही उचल केली जाते. शिवाय जळगाव, धुळ्यात स्टार्च कारखान्यांमध्येही मक्‍याचा उठाव चांगला होतो. यामुळे त्याचे दर स्थिर आहेत. मक्याला ठिबक फायदेशीर मक्‍याची बारमाही लागवड चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर या भागांत केली जाते. जळगाव भागात अनेक शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. त्यामुळे एकरी उत्पादकता मागील दोन वर्षे टिकून राहिली आहे. काही शेतकऱ्यांनी अनुकूल स्थितीत एकरी ३० ते ३५ क्विंटल उत्पादन रब्बी हंगामात घेतले आहे. खरिपाच्या तुलनेत अधिक उत्पादन रब्बीमध्येच साध्य करता येते असा त्यांचा अनुभव आहे. खरिपात मका घेतल्यानंतर शेतकरी मग केळीसारखे पीक घेतात. खरिपात काळी कसदार, सुपीक जमीन निवडतात. कारण पाऊसमान लहरी झाले तर अशा जमिनीत फारशा अडचणी येत नाहीत. प्रतिक्रिया मका आमचे हुकमी पीक आहे. रब्बीमध्ये अधिक उत्पादन घेतो. यंदा खरिपात आठ एकरांत लागवड केली होती. परंतु अधिक पावसाने मक्‍याचे नुकसान झाले. चारा हाती आला नाही. धान्याचा दर्जाही खालावला. परंतु दर मागील वर्षासारखेच टिकून आहेत. यंदा सुरुवातीला चांगल्या प्रतिच्या मक्याला २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. देवेंद्र पाटील, घाडवेल, जि. जळगाव संपर्क- ७०२०९३२७५७ चाळीस क्विंटल उत्पादन दरवर्षी रब्बीमध्ये २० ते २५ एकरांत मक्‍याची लागवड करतो. एकरी १७ ते २० हजार रूपयांपर्यंत खर्च होतो. लागवड गादीवाफ्यावर होते. पाणी व खते ठिबकद्वारे देतो. या पिकाला पाणी चांगल्या प्रकारे लागते. मी केळी किंवा अन्य पिकाच्या बेवडवर लागवड करतो. एकरी उत्पादन ४० क्विंटलपर्यंत घेतले आहे. विक्री एका पोल्ट्री व्यावसियाकास २६०० रुपये प्रतिक्विंटल दरात केली आहे. मका जळगावात पोच केला. चाऱ्याला प्रति शेकडा किमान तीन हजार रुपये दर होते. मात्र घरचे पशुधन असल्याने त्याचा उपयोग घरीच करता आला. पवन पाटील-८३२९४८६३९८ दापोरी, जि. जळगाव 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com