देशातील ऊर्जा आणि विद्युत क्षेत्राची गरज भागवण्यासाठी देशाला १० लाख कोटी रुपयांची पेट्रोलियम उत्पादने आयात करावी लागतात. येत्या पाच वर्षांत ही मागणी २५ लाख कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही बाब योग्य नसल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
भविष्यात पर्यायी इंधनाचा वापर करावा लागेल. इलेक्ट्रिक स्कुटर्स, कार आणि बसेसनंतर लवकरच आपल्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स आणि ट्रक्सही दाखल होणार आहेत. त्यासाठी आपण आग्रही असल्याचे गडकरी म्हणाले.
डिझेलवर चालणारी कृषी उपकरणे पेट्रोलवर चालवायला हवीत. फ्लेक्स इंजिनही इथेनॉलमध्ये परावर्तित करायला हवीत. बांधकाम सामग्री निर्मितीतही इथनॉलचा वापर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले आहे.
इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाकडे वळण्याची गरज व्यक्त करताना नितीन गडकरी यांनी कृषी व बांधकाम सामग्री क्षेत्रात इथेनॉल वापरासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. कारखान्यांनी साखर उत्पादनाकडून इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे सांगताना गडकरी यांनी त्यामागील अर्थकारण उलगडून सांगितले.
साखरेची वाढती मागणी ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. जेंव्हा कच्च्या तेलाच्या किमती १४० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत वाढतात त्यावेळी ब्राझील उसापासून इथेनॉल बनवतो. त्याचवेळी भारतातून साखरेची मागणी वाढत असते. मात्र जेंव्हा कच्च्या तेलाच्या किमती ७० ते ८० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत घसरतात, त्याचवेळी ब्राझीलमधून साखरेची निर्मिती केली जाते. जेंव्हा कच्च्या तेलाच्या किमती उतरतात, साखरेचे दरही उतरत असल्याचे गडकरी म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.