आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार तेजीत

ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याचा अंदाज असल्याने अमेरिकेच्या सोयाबीनला उठाव मिळत आहे. शिकागो बोर्ड ट्रेडवर सोमवारी सोयाबीन दराने मागील आठ महिन्यांतील विक्रमी पातळी गाठली असून मार्चचे वायदे १५७९ सेंट प्रति बुशेल्सझाले.
soyabeen
soyabeen

पुणे -  शिकागो बोर्ड ट्रेडवर सोमवारी सोयाबीन दराने (Soyabean Rate) मागील आठ महिन्यांतील विक्रमी पातळी गाठली असून मार्चचे वायदे १५७९ सेंट प्रतिबुशेल्सने झाले. ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी राहण्याचा अंदाज असल्याने अमेरिकेच्या सोयाबीनला उठाव मिळत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली. याचा लाभ देशातील सोयाबीन बाजारालाही होत आहे. तसेच केंद्र सरकारने तेलबिया आणि खाद्यतेलावर स्टाॅक लिमिट लावण्याचे आदेश दिल्याचाही बाजारावर परिणाम दिसून आला नाही. बाजारात सोयाबीन दर सोमवारी स्थिर होते.

चालू हंगामात ब्राझीलमध्ये सोयाबीन पेरणीला उशीर झाला. त्यामुळे काढणीलाही उशीर होत आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील आणि अर्जेंटीना या महत्वाच्या देशांत विपरित वातावरण, दुष्काळ, उष्णतेची लाट आणि अधिक पावसाचा सोयाबीन पिकाला फटका बसला. ब्राझीलमध्ये हंगामाच्या सुरुवातील विक्रमी सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त होत होता. मात्र आता गेल्यावर्षीपेक्षाही कमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  याचा लाभ अमेरिकेच्या सोयाबीनला होताना दिसत आहे. सोयाबीनसाठी शिकागो बाजारावर खरेदी वाढत आहे.  लगेच डिलेव्हरीसाठी मागणी वाढल्याने नोव्हेंबरच्या तुलनेत दरात ३१ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे. अमेरिकेतून मागील आठवड्यात अडिच लाख टन सोयाबीन निर्यात झाल्याचे, अमेरिकेच्या कृषी विभागाने सांगितले. 

पिकाला फटका बसल्याने ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरुग्वे या देशांतून यंदा अपेक्षेपेक्षा २०० लाख टन कमी निर्यात होईल, असे बाजार विश्लेषकांनी सांगितले. तसेच या देशांतील स्थानिक प्रक्रियादारांनाही चांगले मार्जिन मिळत आहे. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीचा लाभ ब्राझीलमधील शेतकऱ्यांनाही होताना दिसतोय. येथील शेतकरी निर्यातदारांना सोयाबीनचे दर वाढीव सांगत आहेत. फेब्रुवारीत ब्राझीलमधून सोयाबीन निर्यात ९९ लाख होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ही निर्यात महिन्याचा विचार करता विक्रमी असेल आणि मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट असेल, असे येथील संस्थांनी सांगितले. म्हणजेच एकिकडे ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन उशीर येणार आहे आणि उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे निर्यातही वाढही होत आहे. यामुळे पुढील काळात सोयाबीनची मागणी अमेरिकेकडे वळण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ पाहा - 

केंद्र सरकारने नुकतेच देशातील खाद्यतेल(edible oil) आणि तेलबियांवर(oilseeds) स्टाॅक लिमिटचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढविला आहे. तसेच स्टाॅक मर्यादा ठऱवून राज्यांना लागू करण्याचे आदेश दिले. मात्र याचा सोयाबीन बाजारावर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे सोयाबीन आवकेचा मुख्य हंगाम आता संपला आहे. देशातील बाजार एक ते दीड लाख क्विंटलच्या दरम्यान आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मर्यादेपेक्षा अधिक साठा ना सोयाबीन व्यापाऱ्यांकडे आहे ना खाद्येत व्यापाऱ्यांकडे. त्यातच दर वाढलेले असल्यामुळे या दरात कुणी मोठा साठा बाळगणार नाहीत, असे एका सोयाबीन प्रक्रियादाराने सांगितले. देशातील बाजाराचा विचार करता सोयाबीन दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातही खाद्यतेल टंचाईमुळे सोयाबीन तेलाला मागणी वाढत आहे. याचा लाभही सोयाबीन बाजाराला होत आहे.

सोमवारी देशभरात सोयाबीनला ५ हजार ७०० ते ६ हजार ६०० रुपये दर मिळाला. मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक ४५ ते ५० हजार क्विंटल आवक होती. सोयाबीनला ५ हजार ८०० ते ६ हजार ६०० रुपये दर मिळाला. तर महाराष्ट्रात ४० ते ४५ हजार क्विंटल आवक होऊन ५ हजार ७०० ते ६ हजार ५०० रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले. तर राजस्थानमध्ये सोयाबीनला ५ हजार ९०० ते ६ हजार ४५० रुपये दर मिळला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com