Vilas Shinde : जागतिक दर्जाची मूल्यसाखळी हेच ध्येय हवे

शाश्‍वत कृषी विकासाच्या (Sustainable Agriculture Development) अंगाने शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये (Farmer Producer Company) थेट गुंतवणूक झालेली देशभरातील हे पहिलेच उदाहरण आहे. हा प्रवास कसा शक्य झाला, यासंबंधी कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्याशी केलेली खास बातचीत.
Vilas Shinde
Vilas ShindeAgrowon

भांडवल उभारणीसाठी ‘सह्याद्री’चे धोरण सुरुवातीपासून कसे राहिले?

- सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना २०१० मध्ये झाली. त्या वेळी बऱ्याच सहकारी संस्था बंद पडत असल्याने शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्था ही संकल्पना कुणीही शेतकरी नव्याने स्वीकारत नव्हते. त्यातही ज्या संस्था सुरू होत होत्या त्या सरकारी उपक्रमाचा भाग किंवा स्वयंसेवी संस्थांच्या आधारे सुरू होत होत्या. या सर्वांची भांडवल उभे करताना दमछाक होत होती. स्व-भांडवल नसल्यामुळे बॅंकाही संस्थांना कर्ज देण्यासाठी पुढे येत नाहीत, असा एकंदरीत गुंता आहे. ही परिस्थिती आजही जवळपास तशीच आहे.

Vilas Shinde
Rabi Crop Management : कोरडवाहू ज्वारी, हरभरा लागवडीचे नियोजन

सह्याद्रीमध्ये सुरुवातीपासून स्पष्टता होती, की आपण सरकारी यंत्रणेवर बिलकूल अवलंबून राहायचे नाही. शेतकरी उत्पादक कंपनी ही आपल्या सर्व शेतकऱ्यांची गरज आहे आणि त्यासाठी आपणच प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्व-भांडवलही आपल्याच पुढाकारातून उभे राहणे गरजेचे आहे. पण सर्व शेतकऱ्यांमध्ये उत्पादक कंपनीच्या यशस्वी होण्याविषयी विश्‍वास तयार होत नाही, तोपर्यंत ते भांडवलासाठी पुढे येणार नाही हे मला कळत होते. त्यामुळे स्व-भांडवल उभारणीसाठी दोन मार्गांचा आम्ही अवलंब केला.

Vilas Shinde
Tur Crop Management : तुर उत्पादन वाढीसाठी याकडेही लक्ष द्या

पहिला मार्ग, कंपनी उभारण्यासाठी आपण पुढाकार घेतो आहोत, त्यामुळे भांडवल उभारणीची पहिली नैतिक जबाबदारी आपली आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर आपल्या शेतातील जास्तीचे उत्पन्न कंपनीमध्ये भांडवल स्वरूपात कमीत कमी पाच वर्षे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दुसरा मार्ग, बरोबरीच्या शेतकऱ्यांना निर्यातीच्या पातळीवर झालेला जास्तीचा फायदा त्यांनी शेअर्सच्या स्वरूपात कंपनीत गुंतवावा असे धोरण आखले.

Vilas Shinde
Orbit Crop : ‘ऑरबीट क्रॉप’ ची पाच नवी उत्पादने बाजारात

त्याला सह्याद्रीच्या सुरुवातीच्या ७२६ सभासदांनी पहिली पाच वर्षे सकारात्मक प्रतिसाद दिला. या दोन्ही मार्गांनी आम्ही दरवर्षी पाच ते सहा कोटी रुपये या गतीने २०१२ ते २०१७ पर्यंत भक्कम स्व-भांडवल उभारणी केली. सह्याद्रीला सुरुवातीला सर्वच बॅंका कर्ज पुरवठ्यासाठी नकार देत होत्या. पहिली चार वर्षे त्यासाठी आम्हीही संघर्ष करीत होतो;

परंतु स्व-भांडवल भक्कमपणे उभे राहिल्यानंतर एक-एक बॅंक पुढे यायला लागली. २०१४ पर्यंत आम्ही रु. ३ कोटी स्व-भांडवल उभे केले, त्या आधारावर डीसीबी बॅंकेमार्फत सह्याद्रीला प्रथम ८ कोटी रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध झाले. या पद्धतीने स्व-भांडवल दरवर्षी वाढविणे त्याचबरोबर बॅंकाची अतिरिक्त भांडवलासाठी मदत घेणे हे घडत गेले.

शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून ‘सह्याद्री’मध्ये थेट परकीय गुंतवणूक कशा प्रकारे झाली आहे?

- शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकरी सोडून बाहेरचा गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकत नाही. ‘सह्याद्री’मध्ये झालेली गुंतवणूक थेट मुख्य कंपनीत न होता, तिची १०० टक्के मालकी असलेल्या उपकंपनी ‘सह्याद्री पोस्ट हार्वेस्ट केअर लि.’मध्ये झालेली आहे. ही कंपनी पब्लिक लिमिटेड आहे. त्यामुळे शेतकरी सोडून बाहेरची व्यक्ती वा संस्था त्यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

मुख्य शेतकरी उत्पादक कंपनी तिचे मालकी हक्क कायम ठेवेल. पण त्याचबरोबर गरजेप्रमाणे भांडवल उभारणीसाठी काही शेअर्स बाजार मूल्यांकनाप्रमाणे बाहेरील गुंतवणूकदारंना देईल, असा दृष्टिकोन आम्ही ठेवला. त्यातून फायदा असा, की शेतकरी उत्पादक कंपनीला अपेक्षित असलेले मूल्यसाखळी अधिक जोमाने व अधिक वेगाने उभी करता येईल.

Vilas Shinde
Paddy Crop : धान उत्पादक शेतकऱ्यांना हवा प्रतिहेक्टर २० हजारांचा बोनस

‘सह्याद्री’च्या मागील बारा वर्षांच्या प्रवासात स्व-भांडवल व बॅंकेच्या मदतीने आतापर्यंत ८०० कोटी रुपयांचा टप्पा आम्ही पार केला. पुढील विस्तारासाठी अधिकचे भांडवल उपकंपनीच्या माध्यमातून उभे राहून येणाऱ्या पाच वर्षांत आम्ही २००० कोटींचा टप्पा गाठू, असे आमचे नियोजन आहे. त्यासाठी उपकंपनीमधील १६.५ टक्के शेअर्स बाहेरच्या गुंतवणूकदारांना बाजार मूल्यांकनानुसार विकून ३१० कोटी रुपयांचे अधिकचे भांडवल उभे केले आहे.

Vilas Shinde
Paddy Harvesting : सिंधुदुर्गात नवरात्रानंतर भातकापणी

शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकरीच गुंतवणूक करीत नाही, अशी परिस्थिती असताना हे कसे शक्य झाले? गुंतवणूकदारांनी कोणत्या बाबी तपासल्या?

- मागील पाच वर्षांत शेतीशी संबंधित ॲग्रीटेक स्टार्टअप देशात मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. मूल्यसाखळी उभारणे, उत्पादनाच्या बाजूने प्रश्न सोडविणे अशी कामे खासगी पातळीवर तंत्रज्ञानाच्या मदतीने होताना दिसत आहेत. अशा स्टार्टअपमध्ये १० हजार कोटींच्या आसपास विदेशी गुंतवणूक आली आहे. काही ॲग्रीटेक स्टार्टअपना शेतीचे मूळ ज्ञान नसताना व त्याचबरोबर हे स्टार्टअप तोट्यात व्यवसाय करीत असतानाही ‘तंत्रज्ञान’ या मुद्द्यावर त्यांना गुंतवणूकदारांकडून आर्थिक पाठबळ मिळते.

सह्याद्रीने तर शेतकऱ्यांची संघटित मूल्यसाखळी उभी करून ८ ते १० वर्षांच्या वाटचालीत व्यावसायिक धोरण आखून ती यशस्वीपणे चालविली आहे. त्यामुळे प्रतिसाद मिळणार, हे अपेक्षित होतेच आणि तसेच घडले. या उपकंपनीत भांडवल उभे करतोय हे कळल्यानंतर गुंतवणूकदारांकडून संपर्क साधायला सुरुवात झाली. गुंतवणुकीच्या या प्रक्रियेत ‘अल्पेन कॅपिटल’ने सह्याद्री फार्म्ससाठी विशेष धोरणात्मक सल्लागार म्हणून काम केले. धोरणात्मक आखणी केल्यानंतर गुंतवणुकीसंबंधी बोलणी सुरू झाली.

‘ग्लोबल वार्मिंग’संबंधी युरोपमध्ये मोठी जागृती आहे. कार्बन उत्सर्जन कमी होईल, यासाठी जगभर ज्या संस्था प्रयत्न करत आहे, त्यांना मदत करून शेती व ग्रामीण जीवन शाश्‍वत होण्यासाठी सामाजिक दायित्वाची जाणीव असलेले गुतंवणूकदार पुढाकार घेत आहेत. सह्याद्रीच्या आत्तापर्यंतच्या १२ वर्षांच्या प्रवासात हीच उद्दिष्टे ठेवून काम झाल्यामुळे व त्याचबरोबर उपकंपनीच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने गुंतवणूक शक्य असल्यामुळे गुंतवणूकदार स्वारस्य दाखवत आहेत.

आर्थिक बाबी, उद्दिष्टे, प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाज करणाऱ्या यंत्रणा, सभासद शेतकरी, त्यांचे अनुभव या सर्व बाबींचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये २० प्रकारचे ऑडिट झाल्यांनंतर गुंतवणूकदारांमध्ये विश्‍वास तयार झाला.

युरोपियन गुंतवणुकदरांची पार्श्‍वभूमी नेमकी काय आहे?

- एकूण चार गुंतवणूकदार या गुंतवणुकीसाठी पुढे आलेले आहेत. नेदरलॅंड सरकारच्या मालकीची ‘एफएमओ’ ही ‘डच उद्योजक विकास बँक’ प्रमुख गुंतवणूकदार असून वित्तीय संस्था, ऊर्जा आणि कृषी व्यवसाय या तीन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. फ्रान्स सरकारच्या मालकीची ‘प्रोपार्को’ ही ‘एजन्स फ्रँकाइस डी डेव्हलपमेंट ग्रुप’ची (एएफडी ग्रुप) खासगी क्षेत्रात वित्तपुरवठा करणारी उपकंपनी आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून आर्थिक, सामाजिक आणि शाश्‍वत पर्यावरणीय विकासाला ती चालना देत आहे.

‘इंकोफिन’ ही एक स्वायत्त स्वतंत्र बाजारकेंद्रित प्रभाव (impact Fund) गुंतवणूक भांडवल व्यवस्थापक आहे. तिचा मुख्य भर वित्तीय समावेशन, कृषी-अन्न मूल्यसाखळी आणि सुरक्षित पेयजल यावर आहे. तर ‘कोरीस’ ही ‘कोलरुइट’ समूहाची गुंतवणूक कंपनी आहे व ती प्रामुख्याने जीवन विज्ञान, ऊर्जा संक्रमण आणि ग्राहक जागरुकता या तीन परिसंस्थांमध्ये शाश्‍वत मूल्य निर्माण करण्यासाठी काम करीत आहे.

गुंतवणूक झाल्यानंतर या ताकदीवर सह्याद्री कशाप्रकारे विस्तारू पाहत आहे?

- गुंतवणूक झाल्यानंतर प्रामुख्याने काढणीपश्‍चात कामासाठी विस्ताराच्या योजना आहेत. द्राक्ष सभासदांच्या गरजा ओळखून शेतीमालाच्या हाताळणी-प्रतवारी साठी पॅकहाउस, शीतसाखळी याकरिता गुंतवणूक होईल. तसेच प्रक्रियेच्या पातळीवर नवीन उपक्रम तयार होत आहेत. फळ, भाजीपाला प्रक्रिया, टाकाऊ घटकांचे व्यवस्थापन व मूल्यवर्धित उत्पादनांचा विकास, बायोगॅस निर्मिती, वीजनिर्मिती त्याचबरोबर भारतीय बाजारपेठेत स्वनियंत्रीत पुरवठा साखळी उभी करण्यासाठी ही गुंतवणूक कामी येणार आहे. ‘अमूल’च्या दूध उत्पादकांच्या मूल्य साखळीप्रमाणे फलोत्पादन करणाऱ्या २५ हजार शेतकऱ्यांची शाश्‍वत मूल्यसाखळी ‘सह्याद्री फार्म्स’च्या ब्रॅण्डच्या छत्राखाली असेल, ही आमची दिशा आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नेतृत्वास यानिमित्ताने काय सांगाल?

- शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य उद्दिष्ट सभासद शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकासाठी स्वंयपूर्ण व जागतिक स्पर्धेत टिकू शकेल अशी मूल्य साखळी उभी करणे हे आहे. नेतृत्वाने याचं भान ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तन-मन-धन झोकून कमीत कमी एक दशक तरी नेतृत्वाला गाडून घेऊन काम करावे लागेल. तसेच शेतकरी उत्पादक कंपनीकडे मूल्यसाखळी उभी करण्यासाठी तंत्रज्ञान, भांडवल व सक्षम मनुष्यबळ आकर्षित करावे लागेल.

आणि हे सर्व करताना मूल्यसाखळी सभासद शेतकऱ्यांच्याच नियंत्रणात कायम कशी राहील याचीही काळजी घ्यावी लागेल. जागतिक बाजारात व्यावसायिकता, दर्जा व कार्यक्षमता हे परवलीचे शब्द आहेत. ते आपल्याला अंगीकारावे लागतील. जागतिक बाजारपेठेत खोटी सहानुभूती व सरकारी कुबड्या घेऊन आपण टिकू शकणार नाही. हे आपण लक्षात घेतले तर आपल्याला कोणतीही आव्हानं पेलणं सोपं जाईल.

प्रामाणिक व पारदर्शी हेतू आणि सर्व क्षमतेने प्रयत्न केले, तर सभासद शेतकऱ्यांबरोबर इतर सर्वच घटकांमध्ये आपण विश्‍वास निर्माण करू शकतो. त्यातून आपल्या शेती व ग्रामीण भागाचे प्रश्‍न सरकारच्या मदतीशिवाय सोडू शकतो, ही खात्री सह्याद्रीच्या आजवरच्या प्रवासातून झाली आहे. पीक वा परिसर कोणताही असो; याच मार्गाने सर्वच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रवास करावा लागेल. तो अवघड असला तरी अशक्य नक्कीच नाही असे या निमित्ताने सांगावेसे वाटते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com