आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबा

आवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असते. आवळ्याचे मूल्यवर्धन केल्यामुळे ग्राहकांनाही आवळ्याचा आस्वाद वर्षभर घेता येतो. आवळ्यापासून लोणचे, सुपारी, कॅण्डी, सरबत, मुरंबा असे विविध पदार्थ तयार केले जातात.
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबा
value added products of amla

आवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असते. आवळ्याचे मूल्यवर्धन केल्यामुळे ग्राहकांनाही आवळ्याचा आस्वाद वर्षभर घेता येतो. आवळ्यापासून लोणचे, सुपारी, कॅण्डी, सरबत, मुरंबा असे विविध पदार्थ तयार केले जातात. चवीला आंबट तुरट व औषधी गुणधर्मयुक्त आवळ्याला जगभरामध्ये मोठी मागणी आहे. आयुर्वेदानुसार आवळ्याचे सेवन आरोग्यदायी आणि पोषक मानले जाते. ॲन्टिऑक्सिडंट, जीवनसत्त्व ‘क’चा प्रमुख स्रोत म्हणून आवळा ओळखला जातो. संत्र्याच्या तुलनेत आवळ्यामध्ये २० ते ३० पट अधिक जीवनसत्त्व ‘क’ असते. आले रसासोबत आवळ्याचा उपयोग केल्यास अधिक गुणकारी मानले जाते. आरोग्यदायी फायदे 

 • आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे.
 • आवळा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो.
 • -रक्तशुद्धीसाठी आवळा उपयुक्त मानला जातो.
 •  नियमित आवळ्याचे सेवन करण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. जीवनसत्त्व ‘क’चा समृद्ध स्रोत आहे.
 • डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते.
 •  कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर.
 • दंत विकार, हिरड्याची कमजोरी आवळा खाल्ल्याने दूर होते.
 • वजन कमी करण्यासाठी आवळा लाभदायक आहे.
 • हृदयाचे आरोग्य राखण्यास उपयोगी.
 • पचनक्रिया सुरळीत ठेवते.
 • मूल्यवर्धित पदार्थ  लोणचे  साहित्य  आवळा १ किलो, मीठ २०० ग्रॅम, मेथी २० ग्रॅम मोहरी डाळ १०० ग्रॅम, शेंगदाणा तेल ३०० मिलि, हळद १० ग्रॅम, मिरची पावडर २५ ग्रॅम. कृती प्रथम मंद आचेवर आवळा वाफवून घेऊन त्याच्या बिया वेगळ्या कराव्यात. वरील सर्व मसाल्याची पूड गरम तेलामध्ये भाजून घ्यावी. भाजलेली पूड आवळ्याच्या फोडीमध्ये चांगली मिसळून घ्यावी. नंतर त्यामध्ये मीठ घालून मिसळून घ्यावे. गॅसवर शेंगदाणा तेल गरम करून थंड करून घ्यावे. हे तेल मसाला लावलेल्या फोडीमध्ये टाकून ढवळावे. तयार लोणचे निर्जंतुक बरतीमध्ये भरून साठवून ठेवावे. कॅण्डी  कॅण्डी तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाचे निरोगी आवळे घ्‍यावेत. हे आवळे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून डीप फ़्रीजरमध्ये २ दिवस ठेवावे. दोन दिवसानंतर आवळे डीप फ्रीजरमध्ये ठेवलेले आवळे बाहेर काढून घ्यावेत. हे आवळे फोडून त्यातील बिया काढून पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. या फोडी ५० ब्रिक्स साखरेच्या द्रावणामध्ये २१ तासांसाठी भिजत ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी या फोडी पाकातून काढून त्यातील साखरेच्या द्रावणाची तीव्रता ६० ब्रिक्स करावी. या फोडी पुन्हा २४ तासांसाठी साखरेच्या द्रावणात भिजत ठेवाव्यात. तिसऱ्या दिवशी फोडी साखरेच्या द्रावणातून काढून त्या द्रावणाची तीव्रता ७० ब्रिक्स करावी. पुन्हा या फोडी त्या द्रावणामध्ये ३ दिवस टाकून ठेवाव्यात. नंतर या फोडी पाकातून काढून पिण्याच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. या फोडी दोन ते तीन दिवस सावलीमध्ये वाळवून घ्याव्यात. सुकलेल्या कॅण्डी प्लास्टिक पिशवीमध्ये भरून साठवून ठेवावी. सुपारी  आवळ्यापासून सुपारी तयार केली जाते. या सुपारीला बाजारामध्ये चांगली मागणी असते. सुपारी तयार करण्यासाठी एक किलो आवळ्याच्या फोडी करून घ्याव्यात. या फोडींमध्ये ४० ग्रॅम मीठ, १२ ग्रॅम काळे मीठ, मिरे पावडर, जीरा पावडर, ओवा पावडर प्रत्येकी १० ग्रॅम आणि थोडा लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करावे. तयार मिश्रण ३ ते ४ दिवस चांगले मुरण्यास ठेवून द्यावे. दिवसातून दोन वेळा मिश्रण चांगले हलवावे. नंतर मिश्रण ताटामधे पसरून घेऊन उन्हात वाळवावे. ३ ते ४ दिवस वाळवल्यानंतर तयार सुपारी हवाबंद डब्यात भरावी. आवळा सरबत  आवळा सरबतामध्ये १० टक्के आवळा गर आणि १० टक्के साखर असते. कृती  प्रथम एक लिटर गाळून घेतलेल्या आवळा गरामध्ये १ किलो साखर आणि ९ लिटर पाणी मिसळून घ्यावे. तयार मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटांसाठी गरम करून थंड करावे. तयार सरबत निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यावा. मुरंबा  प्रथम आवळे स्वच्छ धुऊन घ्यावेत. एका भांड्यामध्ये आवळे बुडतील एवढे पाणी घेऊन एक रात्रभर भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी आवळे पाण्यातून काढून स्वच्छ पुसून कोरडे करावेत. आवळ्याच्या सर्व बाजूंनी काटे चमच्याने आतपर्यंत टोचून छिद्रे पाडून घ्यावीत. हे आवळे मंद आचेवर गरम पाण्यामध्ये ५ मिनिटांसाठी उकळून घ्यावेत. गरम पाण्यामध्ये उकळल्यामुळे आवळे पांढरट दिसू लागतात. नंतर आवळे पाण्यातून निथळून घ्यावेत. आवळे गरम असतानाचा त्यामध्ये १ किलो आवळे आणि १ किलो साखर या प्रमाणात एकत्र करून घ्यावेत. चांगले एकत्रित करून रात्रभर तसेच ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवशी मंद आचेवर पातेल्यामध्ये मिश्रण घेऊन ते सतत ढवळत राहावे. उष्णता देत असतानाच मिश्रणामध्ये चवीनुसार वेलची पावडर, सुंठ आणि मीठ घालून चांगले ढवळून घ्यावे. उष्णता देणे बंद करून मिश्रण थंड होण्यास ठेवून द्यावे. तयार मुरंबा थंड झाल्यानंतर कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून साठवून ठेवावा. - व्ही. आर. चव्हाण, ९५१८३४७३०४ डॉ. आर. व्ही. काळे, ९४०३२६१४५० (एम.जी.एम. अन्नतंत्र महाविद्यालय, कृषी परिसर एम.जी.एम. हिल्स, गांधेली, जि. औरंगाबाद)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.