लसणापासून लोणचे, जेली, चटणी

लसूण हा आपल्या सर्वांना परिचित आहे. लसणाचा उपयोग विविध अन्नपदार्थांमध्ये अन्न स्वादिष्ट होण्यासाठी केला जातो. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा औषधोपचारासाठीदेखील वापर होतो. लसणामध्ये मॅंगेनीज, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब, जीवनसत्त्व क, सेलेनियम, तंतुमय घटकांचे चांगले प्रमाण असते. लसणापासून भरपूर मूल्यवर्धित पदार्थ बनविले जातात.
value added products of Garlic
value added products of Garlic

लसूण हा आपल्या सर्वांना परिचित आहे. लसणाचा उपयोग विविध अन्नपदार्थांमध्ये अन्न स्वादिष्ट होण्यासाठी केला जातो. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा औषधोपचारासाठीदेखील वापर होतो. लसणामध्ये मॅंगेनीज, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब, जीवनसत्त्व क, सेलेनियम, तंतुमय घटकांचे चांगले प्रमाण असते. लसणापासून भरपूर मूल्यवर्धित पदार्थ बनविले जातात. लसूण ज्यूस  पोटाच्या आजारावर, त्वचा रोग आणि कानदुखीवर उपयुक्त. कृती प्रथम वाळलेल्या लसणाच्या अंदाजे ४ मिमी आकाराच्या गोल चकत्या करून घ्याव्यात. तयार चकत्या गरम पाण्यामध्ये मऊ होण्यासाठी ठेवाव्यात. मऊ झालेल्या लसूण चकत्यांचे बारीक तुकडे करावेत. त्यांची पातळसर पेस्ट तयार करावी. तयार पेस्ट एका सुती कापडामध्ये घेऊन चमच्याने दाबून लसूण ज्यूस मिळवता येतो. लोणचे  साहित्य लसूण १०० ग्रॅम, तेल ५० ग्रॅम,अर्धा चमचा हिंग, हळद, मेथीचे दाणे पावडर आणि बडीशेप पावडर (प्रत्येकी १ चमचा), व्हिनेगार ६० मिलि, तिखट २ चमचे. कृती प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये १ चमचा हिंग घालावे. हिंग फुलल्यानंतर त्यामध्ये सोललेल्या लसणाच्या पाकळ्या व १ चमचा मीठ घालावे. जेणेकरून त्या पाकळ्या थोड्या लवकर मऊ होतील. साधारणपणे ४ ते ५ मिनिटांमध्ये लसणाच्या पाकळ्या मऊ होतात. त्यानंतर गॅस बंद करावा. त्यामध्ये मेथीदाणे पावडर, बडीशेप पावडर व मोहरी पावडर घालून चांगले एकत्रित करून घ्यावे. त्यानंतर त्यात व्हिनेगर मिसळावे. तयार लोणचे स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हवाबंद करावे. लसूण सॉस  साहित्य लसूण पाकळ्या १०० ग्रॅम, थंड दूध २५० मिलि, तेल ५०० मिलि, लिंबाचा रस ४ चमचे, मीठ अर्धा चमचा. कृती  प्रथम लसूण सोलून घ्यावा. सोललेल्या लसणाच्या पाकळ्यांमध्ये अर्धा चमचा मीठ व निम्मे दूध घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यानंतर उरलेले दूध पुन्हा त्यामध्ये मिसळून घ्यावे. तयार मिश्रण २ मिनिटांसाठी पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यामध्ये थोडे तेल घालून साधारणपणे ५ मिनिटे मिक्सरमधून फिरवून घ्यावे. मिश्रणामध्ये लिंबाचा रस मिसळून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. तयार सॉस बरणीमध्ये हवाबंद करावा. लसूण जेली  साहित्य  सोललेला लसूण १०० ग्रॅम, व्हिनेगर ५०० मिलि, साखर १ किलो, पेक्टिन १०० मिलि. कृती जेली बनवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या व व्हिनेगर एकत्रित करावे. त्यास ब्लेंडरच्या साह्याने मऊ होईपर्यंत एकजीव करून घ्यावे. नंतर एका सॉस पॅनमध्ये हे एकजीव झालेले मिश्रण, उरलेले व्हिनेगर व साखर एकत्रित करून घ्यावे. मिश्रणास मंद आचेवर उकळी द्यावी. उष्णता देत असताना मिश्रण करपणार नाही याची काळजी घ्यावी. मिश्रणामध्ये पेक्टिन मिसळून पुन्हा उकळी द्यावी. जेली तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा. तयार जेली निर्जतुक बरण्यांमध्ये भरून ठेवावी. लसूण चटणी  साहित्य  लसूण १०० ग्रॅम, लाल सुक्या मिरच्या ७ ते ८, चवीनुसार मीठ, जिरे अर्धा चमचा, तेल २ चमचे, चिंच २ चमचे, हिंग अर्धा चमचा. कृती  प्रथम तव्यामध्ये तेल गरम करून घ्यावे. गरम तेलामध्ये सुक्या लाल मिरच्या चांगल्या परतून घ्याव्यात. परतलेल्या मिरच्या बाजूला काढून घ्याव्यात. मंद आचेवर सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, मीठ व जिरे घालून थोडा वेळ परतून घ्यावे. लसूण थोडा मऊ पडला की त्यामध्ये चिंच आणि हिंग घालून पुन्हा २ मिनिटे परतून घ्यावे. परतलेले मिश्रण, तेलात फिरवून घेतलेल्या सुक्या मिरच्या व पॅनमध्ये उरलेले तेल एकत्रित करून बारीक होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. तयार चटणी काचेच्या बरणीमध्ये भरून हवाबंद करावी. गार्लिक सॉल्ट  साहित्य   २० ग्रॅम लसूण पावडर, मीठ ७८ ग्रॅम, कॅल्शिअम स्टिअरेट २ ग्रॅम.  कृती  लसूण पावडर, मीठ आणि कॅल्शिअम स्टिअरेट एकत्रित करून घ्यावे. हे प्रमाण १०० ग्रॅम गार्लिक सॉल्ट बनवण्यासाठी आहे. हे प्रमाण १०० च्या पटीत कमी किंवा जास्त करता येईल. गार्लिक सॉल्टचा उपयोग पदार्थांना चव आणण्यासाठी केला जातो. - करिश्मा कांबळे,  ८४५९३७४६८४ (सहायक प्राध्यापिका, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, आचळोली, जि. रायगड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com