कवठाची जॅम, जेली

wood apple jelly
wood apple jelly

कवठाचे औषधी उपयोग लक्षात घेऊन फळापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे शक्य आहे. गरापासून जेली, चटणी, जॅम, सरबत, सॉस आणि पावडर असे अनेक पदार्थ बनवता येतात.    

कवठ हे अवर्षणप्रवण भागातील काटक फळपीक आहे. कवठाची फळे कठीण कवचयुक्त असतात. पिकल्यावर काळपट पांढऱ्या रंगाची होतात. पिकललेल्या फळास आंबट-गोड  वास असतो. गर चॉकलेटी रंगाचा व अनेक मऊ बियांमध्ये लगडलेला असतो. 

 गरनिर्मिती  

  •  फळापासून कोणताही प्रक्रिया पदार्थ तयार करण्यासाठी प्रथम त्याचा गर काढून घ्यावा.
  • पूर्ण पिकलेली, चांगली, निरोगी फळे निवडून घ्यावीत. कठीण कवच असलेली फळे फोडून त्यातील गर चमच्याने बियांसहित काढून घ्यावा.
  • काढलेल्या गरामध्ये त्याच्या वजनाएवढे किंवा वजनाच्या दीडपट पाणी मिसळावे.  गर हाताने दाबून त्यातील बिया व शिरा जितक्या निघतील तितक्या हातानेच काढून घ्याव्यात. 
  • या मिश्रणात २ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून ७० ते ८० अंश सेल्सिअस तापमानाला १५ ते २० मिनिटे गरम करावे. गरम करताना मिश्रण सारखे ढवळत राहावे. त्यामुळे गर बियांपासून वेगळा होताे. 
  • मिश्रण थंड झाल्यावर मलमलच्या कापडातून हाताने दाबून रस गाळून  घ्यावा किंवा यासाठी हायड्रॉलिक बास्केट प्रेस यंत्राचा वापर करावा. 
  •  हा रस स्वच्छ, निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये भरून ठेवावा.  विविध पदार्थ निर्मितीसाठी गराचा वापर केला जातो. 
  •   जेली  

  • पिकलेल्या फळांमध्ये पेक्टिनचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्यापासून उत्तम प्रकारची जेली तयार करता येते.
  • जेली तयार करण्यासाठी काढलेला गर एका मोठ्या पातेल्यात २४ तास ठेवावा. त्यामुळे गर तळाशी बसेल. गरावरील पाणी अलगद बाजूला करून घ्यावे. या रसाची पेक्टिन परीक्षा घेऊन त्यात १:१ या प्रमाणात साखर मिसळावी. हे मिश्रण गॅसवर ठेऊन सारखे ढवळत राहवे. मिश्रण घट्ट होवू लागते किंवा तुकड्यात पडू लागते. 
  • या मिश्रणाचा एक थेंब थंड पाण्यात टाकल्यास तो जसाच्या तसा न पसरता पाण्याच्या तळाशी बसला म्हणजे जेली तयार आहे असे समजावे. यालाच ‘गोळीबंद पाकाची परीक्षा’ असे म्हणतात. नंतर पातेले शेगडीवरून उतरून खाली घ्यावे. त्यावर येणारा फेस पळीने काढून टाकावा. त्यामुळे जेली मधाळ रंगाची होत नाही. 
  •  गरम असतानाच जेली निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यामध्ये भरावी. या बाटल्या थंड करून त्यावर वितळलेल्या मेणाचा थर देवून बाटल्यांना झाकण लावून लेबल लावावे. थंड व कोरड्या जागी साठवणूक करावी.
  • जॅम 

  • जॅम करण्यासाठी पूर्ण पिकलेली मोठ्या आकाराची कवठे घ्यावीत. कवठ फोडून स्टीलच्या सुरीने गर काढून घ्यावा. एका पातेल्यामध्ये एक किलो गरास २०० मि.लि. पाणी मिसळून गर हाताने कुस्करून लगदा करावा. 
  •  लगदा स्टीलच्या चाळणीत घेऊन तो हाताने दाबून त्याचा गर पातेल्यात काढून घ्यावा. तयार गर जॅम करण्यासाठी वापरावा. 
  • साहित्य ः कवठाचा गर १ किलो, साखर १ किलो, सायट्रिक आम्ल २ ग्रॅम. 
  • जॅम करण्यासाठी पातेल्यामध्ये गर आणि साखर एकत्र करून शेगडीवर ठेवावे. पहिल्या उकळीनंतर त्यात दोन ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे. हे मिश्रण सारखे ढवळत राहावे. या दरम्यान मिश्रण घट्ट होवू लागते किंवा तुकड्यात पडू लागतात. 
  • जॅम तयार झाला की नाही हे पहाण्यासाठी काही परीक्षा घ्याव्या लागतात. मिश्रणाचा एक थेंब थंड पाण्यात टाकल्यास तो जसाच्या तसा न पसरता पाण्याच्या तळाशी बसला म्हणजे जॅम तयार आहे असे समजावे. किंवा साधारण १०५ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत जॅम शिजवावा. जॅमचा टी.एस.एस. ६८ अंश ब्रिक्स होईपर्यत शिजवून घ्यावा.  नंतर पातेले शेगडीवरून उतरून खाली घ्यावे. गरम असतानाच जॅम निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरावा. या बाटल्या थंड करून त्यावर वितळलेल्या मेणाचा थर देवून झाकण लावून लेबल लावावे. थंड व कोरड्या जागी साठवून ठेवावे. 
  • औषधी गुणधर्म

  • कवठाचा गर पाचक आणि अजीर्णनाशक असतो. 
  • कच्च्या फळांचा गर अतिसार, खोकला व जुलाबावर अत्यंत गुणकारी असून दाताच्या हिरड्यावर परिणामकारक आहे.
  • दूध व खडीसाखरेसोबत झाडाची पाने लहान मुलांना दिल्यास पोटाचे विकार कमी होतात. 
  •  झाडापासून मिळणाऱ्या डिंकाची पावडर मधाबरोबर घेतल्यास लहान मुलांचा अतिसार व हगवणीचा त्रास थांबतो.  
  • - अश्विनी चोथे ashwinichothe7@gmail.com (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com