संत्र्याचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञान

संत्रावर्गीय फळांचा आकर्षक रंग,स्वाद, चव टिकून राहणे महत्त्वाचे असते. यासाठी फळांची काळजीपूर्वक तोडणी आणि हाताळणी फार महत्त्वाची असते. लिंबूवर्गीय फळांना चांगले दर मिळण्यासाठी काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
संत्र्याचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञान
Do not pile fruit in the garden after harvest

संत्रावर्गीय फळांचा आकर्षक रंग,स्वाद, चव टिकून राहणे महत्त्वाचे असते. यासाठी फळांची काळजीपूर्वक तोडणी आणि हाताळणी फार महत्त्वाची असते. लिंबूवर्गीय फळांना चांगले दर मिळण्यासाठी काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ग्राहकांपर्यंत फळे पोहोचेपर्यंत २० ते २५ टक्के फळे खराब होतात. अयोग्य हाताळणी, पॅकिंग व वाहतूक, साठवणुकीच्या अपुऱ्या सुविधा व तोडणीनंतरच्या प्रक्रियेचा अभाव या कारणांमुळे फळे खराब होतात.   संत्रा फळांची प्रत प्रामुख्याने लागवडीचे नियोजन, बागेच्या मशागतीच्या पद्धती, पीक व्यवस्थापन, काढणी आणि काढणीपश्‍चात व्यवस्थापनावर अवलंबून असते. 

 • फळांची तोडणी सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळी करावी. दमट हवामानात व पावसाळ्यात फळे तोडू नयेत. तोडलेली फळे उन्हामध्ये ठेवू नयेत.
 • तोडणी अर्धा ते पाऊण भागावर पिवळसर नारिंगी रंगाची छटा आल्यावर करावी. फळांच्या रसामध्ये किमान १० टक्के एकूण विद्राव्य घटक (TSS) आणि एकूण विद्राव्य आम्लाचे प्रमाण १४ पेक्षा जास्त असलेली संत्रा फळे स्वादिष्ट आणि दर्जेदार असतात.
 • लिबलिबीत फळे वाहतुकीसाठी योग्य नसतात. घट्ट, गुळगुळीत फळे वाहतुकीस व साठवणूकीस योग्य असतात. योग्य परिपक्वता व आकर्षक रंगासाठी निवडक संत्री ३ ते ४ वेळा तोडणी करून काढावीत. 
 • मोसंबी फळांमध्ये १० टक्के शर्करायुक्त पदार्थ व ४०-४५ टक्के रस असणे आवश्‍यक असते. कागदी लिंबात किमान ५० टक्के रस असणे आवश्यक आहे.
 • तोडणीवेळी घ्यावयाची काळजी 

 • पारंपारिक पद्धतीत फळे पीळ देऊन व ओढून तोडली जातात. फळांच्या देठाला इजा आणि छिद्र पडू न देता तोडणी करणे आवश्यक असते. 
 • फळे तोडण्यासाठी फळे तोडण्याच्या कात्रीचा वापर करावा. मात्र, देठ लहान ठेवून तोडणी करावी लागत असल्यामुळे तोडणीचा वेग कमी होतो. ज्या फळांची पारंपारिक पद्धतीने तोडणी नसेल त्यांची कात्रीने तोडणी करावी.
 • तोडणीदरम्यान फळांच्या देठाला व गोल तोटीस (कॉलर) इजा झाल्यास, त्याजागी ३ ते ४ दिवसांनंतर काळ्या, गर्द भुऱ्या रंगाचा डाग दिसू लागतो. यामुळे फळांचा दर्जा कमी होऊन बाजारात योग्य किंमत मिळत नाही.
 • फळे विक्रीला पाठवताना चांगली व खराब, खाली पडलेली फळे एकत्र मिसळू नयेत. तोटी असलेली व खाली पडलेली फळे काढून टाकावीत.
 • पॅकिंग हाऊसपर्यंत वाहतूक 

 • तोडणीनंतर बागेतच तणसावर फळांची प्रतवारी करणे टाळावे. तोडलेली फळे पिशवीतून प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये एकत्र करावीत. प्लॅस्टिकचे क्रेट्स सावलीत ठेवावेत.
 • फळे परंपरागत पद्धतीप्रमाणे सुकवण्यास ठेवल्यामुळे निस्तेज होतात. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही.
 • वाहतुकीदरम्यान प्लास्टिकच्या क्रेटखाली तणसाचा थर द्यावा. वाहनाला ताडपत्रीने झाकावे. वाहनामध्ये हवा खेळती 
 • राहून तापमान कमी करण्यास चहुबाजूंनी जागा ठेवावी.
 • फळांचा ताजेपणा टिकवण्यासाठी, तोडणीनंतर त्वरित प्रक्रिया व पॅकिंग करणे आवश्यक  आहे.
 • पॅकिंगहाऊसमधील नियोजन  अहरितीकरण 

 • फळाचे हरित रंगद्रव्य (क्लोरोफिल) कमी करून आकर्षक नारिंगी रंग विकसित करण्यासाठी अहरितीकरण केले जाते. ही प्रक्रिया अत्यावश्यक असेल तरच करावी. चांगल्या रंगाच्या फळांची तोडणी केल्यास अहरितीकरणाची आवश्‍यकता  नसते.
 • अहरितीकरणामुळे फळे जास्त काळ टिकून राहतात. यासाठी जास्त आर्द्रता (९० ते ९५ टक्के), योग्य तापमान (२५-२७ अंश सेल्सिअस) आणि इथिलीन वायूची योग्य मात्रा (५ ते १० पीपीएम) असणे आवश्यक आहे. अहरितीकरण ४८ तासांपेक्षा जास्त वेळ करू नये.
 • फळे तोडणीपूर्वी १५ दिवसांच्या अंतराने कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अहरितीकरण करण्यापूर्वी २ ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रतिलिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये फळे बुडवून घ्यावीत. यामुळे साठवणूकीदरम्यान देठाच्या बाजूने होणारी कूज कमी होते. 
 • फळे  शीतगृहामध्ये १ ते २ महिने साठवून नंतर विक्री करायची असल्यास, अहरितीकरणाची आवश्‍यकता नसते. शीतगृहातील साठवणूकीदरम्यान फळांना नैसर्गिक नारिंगी रंग  येतो.
 • प्रतवारी आणि स्वच्छता

 • प्रतवारी यंत्राच्या पट्ट्यावरून जाणारी ओबडधोबड आकाराची, मोठ्या देठाची, अपरिपक्व, अतिपरिपक्व, पोला, खरचटलेली, हिरव्या रंगाची, कीड, रोगग्रस्त आणि जास्त लहान, मोठी फळे काढून टाकावीत.
 • फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत. फळे स्वच्छ करणाऱ्या यंत्राचे ब्रश क्लोरिनने (१०००पीपीएम)  ओले करावेत. फळांवर मेणाची प्रक्रिया करण्यापूर्वी फळांवरील पाणी स्पाँज रोलरने काढावे.  
 •  मेणाची प्रक्रिया 

 • फळे पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर मेणाच्या द्रावणात ''स्टेफ्रेश हायशाईन वॅक्स'' २.५ टक्क्यांची फळांवर प्रक्रिया करावी. 
 • मेणाची प्रक्रिया करण्यापूर्वी वॅक्सिंग यंत्राचे सर्व ब्रश बुरशीनाशक युक्त मेणाच्या द्रावणाने ओले करावेत. या प्रक्रियेवेळी यंत्राची गती योग्य ठेवावी. त्यामुळे फळांवरील अनावश्‍यक ब्रशिंग टाळले जाईल.
 • टनेल ड्रायर यंत्रामध्ये फळांवरील मेण ५०-५५ अंश सेल्सिअस तापमानावर सुकवावे.
 • प्रतवारी 

 • फळांची आकारानुसार यंत्रावर प्रतवारी करावी.
 • साधारणतः संत्र्याचा व्यास ५.५० ते ८.५० सेंमी असतो. बॉक्समध्ये पॅक केलेल्या फळांच्या व्यासात ०.६० ते ०.७५ सेंमी पेक्षा जास्त फरक ठेऊ नये. अन्यथा पेटीमध्ये फळांचे योग्य पॅकिंग होत नाही.
 • फळांची प्रतवारी लहान (५.५० ते ६.१० सेंमी), मध्यम (६.११ ते ६.७० सेंमी), मोठी (६.७१ ते ७.३० सेंमी) व खूप मोठी (७.३१ ते ८.०० सेंमी) अशी  करावी.
 • वाहतूक व हाताळणी दरम्यान पेटीतील फळे हलण्याची शक्यता असते. यासाठी प्रतवारी केलेल्या फळांची हाताने पॅकिंग करावी. फळांच्या थरांमध्ये कोरूगेटेड बोर्डला (५ प्लाय) छिद्र करावे.
 • पॅकिंग बॉक्स 

 • रेग्यूलर, युनिव्हर्सल किंवा टेलिस्कोपिक पद्धतीच्या हवेशीर कोरूगेटेड बोर्डच्या बॉक्सचा वापर करावा. बॉक्सची कॉम्प्रेशन क्षमता ३६० ते ४०० किलो असावी.  तीन किंवा ५ प्लायच्या कोरूगेटेड प्लेटचा वापर कुशन म्हणून करावा. फळातील दोन थरांमध्ये, पेटीच्या तळाला व सर्वात वर कुशन टाकावे. 
 • कोरूगेटेड बोर्डाच्या पेटीमध्ये तणसचा वापर टाळावा. 
 • शीतगृहामध्ये साठवण करण्यासाठी पॉलीप्रोपोलीन प्लास्टिक लॅमिनेशन केलेल्या पेट्या वापराव्यात. पेटीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी दोन्ही बाजूला छिद्र करावेत. तसेच पेटी उचलण्यासाठी दोन्ही बाजूंनी लांब आकाराचे छिद्र करावेत.
 • देशांतर्गत बाजारासाठी ५० सेंमी लांब, ३० सेंमी रुंद, आणि ३० सेंमी उंच पेट्या निवडाव्यात. निर्यातीसाठी वेगळ्या प्रकारच्या बॉक्सची आवश्यकता असते. 
 • निर्यातीसाठी ७ ते १० किलोचे बॉक्स वापरले जातात. बॉक्सवर फळांचे वाण, वजन, संख्या, पत्ता इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे.
 • पॉलीइथिलिन (प्लास्टिक) चे आवरण 

 • फळांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी २५ ते ५० मायक्रोमीटर (१०० ते १२० गेज) जाडीच्या प्लास्टिक बॅगचे आतील बाजूला आवरण द्यावे. त्यावर फळे व्यवस्थित रचून पॅकिंग करावे. 
 • प्लास्टिक बॅगच्या १.५ टक्के भागावर हवेसाठी अर्धा सेंमी व्यासाचे लहान छिद्र ठेवावे. हे छिद्र मार्च- एप्रिलच्या शुष्क पण उष्ण हवामानात आवश्यक असते.
 • शीतगृहात साठवण 

 • निर्यातीदरम्यान किंवा शीतगृहात साठवण करण्यासाठी फळांच्या पेट्यांचे "फोर्स एअर कुलिंग" तंत्रज्ञानाने ६ ते ७ अंश सेल्सिअस तापमानावर शीतकरण करावे.
 • शीतगृहात ६-७ अंश सेल्सिअस तापमान व ९०-९५ टक्के आर्द्रता असल्यास फळे ४५ ते ५० दिवसांपर्यंत चांगली ताजी राहतात. तोडणीनंतर ३-४ दिवसांत पॅकिंग, वाहतूक व विपणन करायचे असल्यास, शीतकरणाची आवश्यकता  लागत नाही.
 • शीतगृहातून संत्री काढल्यावर फळ सडण्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी हाताळणी व विपणन करावे.  
 • प्रतवारीनुसार फळांची कोरूगटेड बॉक्समधील संख्या 

  प्रत (नंबर)  आकार      फळांचा व्यास   बॉक्समधील संख्या
  जंबो   खूप मोठा    ७.३१ ते ८.०० सेंमी  ९६-१०४
  अ-१ मोठा     ६.७१ ते ७.३० सेंमी  ११२-१२०
  अ-२  मध्यम      ६.११ ते ६.७० सेंमी  १४० ते १७५
  अ-३ लहान      ५.५० ते ६.१० सेंमी   २०० ते २२०
  अ-४ अति लहान  ४.७० ते ५.४९ सेंमी  २२५ ते २५०

  आंतरराष्ट्रीय बाजारात संत्रा फळांना आकाराप्रमाणे मागणी 

  आकार (सेंमी)  फळांची संख्या/१० किलो पेटीत  देशांची मागणी
  ५.५ ते ५.९ १००-१०५  युरोपियन देश
  ६.५ ते ६.९    ६८-७१  सिंगापूर
  ७.५ ते ७.९   ५३-६०   हाँगकाँग

  संपर्क ः डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७ ३५३५३ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.