अंबाडीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

अंबाडी ही भाजी म्हणून काही प्रमाणात खाल्ली जाते. मात्र या दुर्लक्षित पिकापासून प्रक्रिया उद्योगाला मोठा वाव आहे. या भाजीतील आरोग्यदायी गुणधर्म वर्षभर आहारामध्ये येऊ शकतात.
अंबाडीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ
अंबाडीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

अंबाडी ही भाजी म्हणून काही प्रमाणात खाल्ली जाते. मात्र या दुर्लक्षित पिकापासून प्रक्रिया उद्योगाला मोठा वाव आहे. या भाजीतील आरोग्यदायी गुणधर्म वर्षभर आहारामध्ये येऊ शकतात. 

अंबाडी ही माल्व्हेसी कुलातील वनस्पती असून, तिचे शास्त्रीय नाव  हिबिस्कस कॅनाबिनस  आहे.  मूळची आफ्रिकेतील या वनस्पतीची लागवड भारत, बांगलादेश, थायलंड, पाकिस्तान इ. देशांत केली जाते. भारतात आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार व महाराष्ट्र या राज्यांत अंबाडीची लागवड होते. महाराष्ट्रामध्ये सोलापूर, धुळे व जळगाव अशा कमी पावसाच्या जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात अंबाडीची लागवड होते.   अंबाडी हे साधारण ३-४ मीटर उंच व सरळ वाढणारे काटेरी झुडूप आहे.   पाने ः खोडाच्या खालच्या भागातील पाने हृदयाकृती तर वरच्या भागातील पाने हस्ताकृती, खंडित आणि दातेरी असतात.   फुले ः पिवळी व मध्यभागी जांभळी असतात. ती जानेवारी महिन्यात येतात.   बिया ः आकाराने मोठ्या व तपकिरी असतात.       उपयुक्तता   अंबाडीचे गावरान, देव अंबाडी आणि पिवळी अंबाडी असे प्रकार आढळतात. देव अंबाडीला येणारी लाल फुले आणि हिरवी पाने प्रक्रिया पदार्थ निर्मिती उद्योगामध्ये उपयुक्त ठरतात. मात्र अद्याप अंबाडी हे पीक म्हणून दुर्लक्षित आहे.   अंबाडीच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात तर बोंडांची चटणी करतात.   कोवळ्या फांद्या पानांसह जनावरांना वैरण म्हणून उपयोगी आहेत.   गूळ तयार करताना अंबाडीचा वापर केला जातो. बी कोंबड्यांच्या आणि गुरांच्या खुराकासाठी वापरतात.   पचनशक्ती सुधारण्यासाठी बी भाजून खातात.   खोड व फांद्यांपासून धागा (वाख) काढतात. या वाखांचा उपयोग दोर, पिशव्या, मासेमारीसाठी लागणारे जाळे विणण्यासाठी केला जातो.   अंबाडीच्या बियांपासून खाद्यतेलही काढतात. त्यात मोठ्या प्रमाणात ओमेगा-३ हे प्रतिऑक्सिडीकारक असते. या तेलाचा उपयोग जैवइंधन म्हणूनही करता येतो.   अनेक देशांत कागद बनविण्यासाठी या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.   अंबाडीच्या फुलांपासून जॅम, चहा, सरबत, चटणी व जेली, पानांपासून सूप, लोणचे, बियांपासून बेसन आदी नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थ तयार करणे शक्य आहे.    अंबाडीचे आरोग्यदायी फायदे   अंबाडीमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाणात वाढ होते.   दृष्टी क्षमता वाढते.   त्वचेवरील रोगांचे संक्रमण कमी होतात.   रोगप्रतिकार शक्ती वाढवते.  अंबाडीच्या सेवनाने पचन सुधारते, भूक वाढते. हाडे मजबूत होण्यास मदत होते.    अंबाडीचा रसाचे सेवन मधुमेहीसाठी योग्य असल्याचे मानले जाते.   अंबाडीचा सेवनाने रक्‍तवाहिन्यांचे काम सुधारते. हृदयरोग, उच्च रक्‍तदाब नियंत्रणास मदत होते.

अंबाडीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

  अंबाडीच्या फुलांपासून सरबत अंबाडीची फुले पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन फुलांपासून पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. त्यानंतर पाकळ्या सावलीत २ ते ४ दिवस वाळवून घ्याव्यात. ५० किलो अंबाडीच्या फुलांपासून ३० ते ३५ किलो सुकलेल्या पाकळ्या मिळतात. सुकलेल्या पाकळ्या फिल्टरच्या पाण्यामध्ये २२ ते २४ तासांसाठी बुडवून ठेवावे. १० लिटर पाण्याला १ किलो पाकळी असे प्रमाण वापरावे. सुमारे २४ तासांनंतर पाकळ्या काढून टाकाव्यात. खाली लाल गर्द द्रावण तयार होते. तयार होणारा अर्क हा ७ ते ८ लिटरपर्यंत मिळतो. तयार झालेला अर्क वस्त्रगाळ करून घ्यावा. अर्क अधिक काळ टिकण्यासाठी त्यात प्रति लिटर २ ग्रॅम सोडिअम बेन्झोएट हे परिरक्षक मिसळावे. तयार झालेले सरबत बाटल्यांत भरून बाटल्या हवाबंद करून पाश्चराईझ कराव्यात. बाटल्या थंड झाल्यावर थंड आणि कोरड्या जागी साठवाव्यात. अंबाडीच्या फुलांपासून चहा   अंबाडीला येणाऱ्या लाल रंगाच्या फुलांमध्ये औषधी गुणद्रव्ये आहेत. या फुलपाकळ्यांवर प्रक्रिया करून तयार करण्यात आलेल्या चहा उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, मूत्ररोग  आदींवर गुणकारी आहे. अंबाडीत व्हिटॅमिन सी आणि लोह असते. थंड आणि गरम अशा स्वरूपामध्ये हा चहा आरोग्यास उपयुक्त ठरतो. पारंपरिक चहाला पर्याय ठरणारा या कॅफेनमुक्त चहाला ‘हर्बल रेड टी’ म्हणून ओळखले जाते.  अंबाडीची फुले पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन, त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. त्यानंतर पाकळ्या ट्रेमध्ये ठेवून सूर्यप्रकाशामध्ये २ दिवस वाळव्यात. दर काही तासांनी पाकळ्या उलट्या सुलट्या कराव्यात. चांगल्या वाळवलेल्या पाकळ्याची ग्रायंडरच्या साह्याने भुकटी करून घ्यावी. ही भुकटी हवाबंद डब्यामध्ये भरून थंड आणि कोरड्या जागी साठवावी. एक चमचा अंबाडीच्या फुलांची भुकटी एक कप गरम पाण्यामध्ये टाकून काही मिनिटे ढवळावी. त्यात आपल्या आवश्यकतेइतकी गोडी येईपर्यंत (किंवा २ चमचे) मध टाकावा. आरोग्यासाठी जागरूक लोकांमध्ये अंबाडीच्या फुलांचा चहा लोकप्रिय बनत आहे. अंबाडीच्या फुलांपासून जेली  प्रथम अंबाडीची फुले पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन, पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. पाकळ्याचे लहान-लहान तुकडे करून स्टीलच्या पातेल्यात पाण्यामध्ये १:१ या प्रमाणात घेऊन शिजवावीत. शिजवल्यानंतर अंबाडीच्या फुलांचा निव्वळ रस कपड्यातून गाळून घ्यावा. अंबाडीच्या फुलांच्या रसात १:३ या प्रमाणात साखर मिसळून, १.५ टक्का पेक्टीन मिसळावे. मिश्रणाचा टीएसएस ६७.५ टक्के येईपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे ११० अंश सेल्सिअस असते.  जेली गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावी. जेली जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्यात २३० ते २५० मिलिग्रॅम प्रति किलो या प्रमाणे सोडिअम बेेन्झोएट हे परिरक्षक जेली उकळत असताना मिसळावे. जेली तयार झाल्यानंतर ती निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बरणीमध्ये हवाबंद करावे. बरणी थंड व कोरड्या जागी ठेवावी. अंबाडीच्या फुलांपासून लाल रंगाची, पारदर्शक अशी उत्कृष्ट जेली तयार होते.  अंबाडीच्या फुलांपासून जॅम  प्रथम अंबाडीची फुले पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन, त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. पाकळ्याचे लहान-लहान तुकडे करून स्टीलच्या पातेलीत पाण्यामध्ये मऊ होईपर्यंत शिजवावेत. शिजवलेले पाकळ्यांचे तुकडे व साखर १:१ या प्रमाणात घेऊन त्यांचे मिश्रण करावे. या मिश्रणामध्ये २ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळावे. हे सर्व मिश्रण एकजीव करून अर्धा ते एक तास शेगडीवरती गरम करावे. मिश्रण गरम करत असताना सतत स्टीलच्या पळीने हलवावे. मिश्रण एकजीव होऊन घट्ट गोळा तयार होईल. १०० अंश सेल्सिअस तापमानास १५ मिनिटे उकळून जॅमच्या बाटल्या निर्जंतुक करून घ्याव्यात. बाटल्या गरम असतानाच गरम जॅम त्यामध्ये भरावा. थंड होऊ द्याव्यात. बाटल्या थंड झाल्यावर त्यावर पातळ मेणाचा थर द्यावा. झाकण लावून सीलबंद करावे. नंतर त्यांची साठवण थंड  ठिकाणी करावी.

  अंबाडीच्या फुलांपासून चटणी  प्रथम अंबाडीची फुले पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन, पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. चटणी तयार करण्यासाठी प्रथम १ किलो अंबाडीची फुले अर्धा किलो साखर व ४० ग्रॅम मीठ मिसळून एकत्र ठेवावे. त्यांनतर कढईमध्ये वेलची १५ ग्रॅम, लाल मिरची पूड २० ग्रॅम, आले १५ ग्रॅम, बारीक चिरलेला कांदा ४० ग्रॅम व लसूण ३० ग्रॅम हे सर्व मसाले एकत्र करून फोडणी द्यावी. ती एकत्र ठेवलेल्या फुलांच्या मिश्रणामध्ये सोडावी. मिश्रण थोडे घट्ट होण्यासाठी मंद आचेवर १० ते १५ मिनिटे शिजवावे. अशाप्रकारे तयार केलेली चटणी गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांत भरून त्यावर पातळ मेणाचा थर द्यावा. बाटल्यांना झाकणे लावून त्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.    अंबाडीच्या फुलांपासून पावडर  अंबाडीच्या फुलांपासून तयार होणारी पावडर पदार्थांमध्ये पुडिंगसाठी, स्वाद निर्माण करण्यासाठी, रंग प्राप्त होण्यासाठी, सूप तयार करण्यासाठी उपयोगी ठरते. पावडर तयार करण्यासाठी प्रथम अंबाडीची फुले पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन, पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. पाकळ्याचे लहान-लहान तुकडे करून स्टीलच्या पातेलीत पाण्यामध्ये १:१ या प्रमाणात घेऊन शिजवावेत. पाकळ्या ट्रेमध्ये ठेवून ड्रायरमध्ये ४० ते ६० अंश सेल्सिअस तापमानास वाळव्यात. काही तासांनंतर पाकळ्या उलट्या बाजूनेही वाळवून घ्याव्यात. वाळवलेल्या पाकळ्याची ग्रायंडरच्या साह्याने भुकटी करून घ्यावी. पावडर ४० किंवा ६० मेशच्या चाळणीतून चाळून घ्यावी. अशा प्रकारे तयार केलेली भुकटी हवाबंद डब्यामध्ये भरून थंड आणि कोरड्या जागेमध्ये साठवून ठेवावी. अंबाडीच्या पानांपासून लोणचे अंबाडीच्या पानांपासून लोणचे बनविण्यासाठी अंबाडीची पाने १ किलो, गूळ (किसलेला) ४०० ग्रॅम, मोहरीची डाळ ५० ग्रॅम, चहा १० ग्रॅम,  हिरवी मिरची १० ते १२, लसूण पाकळ्या १० ग्रॅम, जिरे ३ ग्रॅम, व्हिनेगार २० मि.लि., तेल २०० मि.लि., हळद १० ग्रॅम, लाल तिखट १५ ग्रॅम, मीठ ५० ग्रॅम इ. घटक पदार्थ वापरावेत. अंबाडीची पाने स्वच्छ धुऊन एका सुती कापडावर पसरवून ठेवावीत. कोरडी झाल्यानंतर चिरून घ्यावीत. त्यात मीठ घालून एखाद्या बरणीत ५ ते ६ तास झाकून ठेवावी. नंतर किसलेला गूळ घालून नीट मिसळून घ्यावे.  मसाला तयार करण्यासाठी कढईत तेल तापवून त्यामध्ये वरील सर्व मसाले फोडणीसाठी घालावे. तयार झालेला मसाला झाकून ठेवलेल्या काचेच्या बरणीत अंबाडीच्या पानांवर ओतावा. त्यावर पळीभर कोमट तेल सोडा. हा मसाला थंड झाला की त्यात अंबाडीच्या पाकळ्या कालवून घ्याव्यात. अंबाडीच्या पाकळ्याचे लोणचे भाकरी, पोळी, वरण भात या बरोबर तोंडी लावता येते. तयार झालेले लोणचे काचेच्या बरणीत भरून बरणी थंड व कोरड्या जागी साठवावे.    पानांपासून सूप  सूप फार आरोग्यदायी असते. अंबाडीच्या पानांचे  सूप हे लवकर पचते. अंबाडीची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. अंबाडीची पाने ४०० ग्रॅम, बारीक कापलेला हिरवा कांदा ५० ग्रॅम, ४ ते ५ लसूण पाकळ्या, २० ग्रॅम बेसन, ५ ग्रॅम जिरे पावडर, ४०० मि.लि. पाणी, ३ ग्रॅम काळे मिरे, १० ग्रॅम मीठ, इ. घटक पदार्थ वापरावेत.  सर्वप्रथम कढईत तेल तापवून बारीक कापलेले कांदा, लसूण हलके लाल होईपर्यंत परतावेत. त्यात मीठ व काळे मीठ घालावे. त्यात बेसन मिसळून शेवटी त्यात पाणी व अंबाडीची पाने टाकून हे मिश्रण गॅसवर चांगले उकडून घ्या. ५ मिनिटे कमी तापमानावर ठेवावे. त्यात वरून जिरे पूड घालावी. नंतर गॅस बंद करा. हे मिश्रण थंड झाल्यावर ब्लेंडरमध्ये घालून ह्याचे पातळ सूप होऊ द्या. तयार झालेल्या सूपचा आस्वाद घ्या.  अंबाडीच्या बियांपासून तेल  अंबाडीच्या बियांपासून तयार होणाऱ्या तेलाचा उपयोग तेलाचे दिवे, वंगण, साबण, लिनोलियम व रंग या साठी करतात. अंबाडीच्या बियांपासून तयार होणारे शुद्ध तेल खाण्याकरिता वापरतात. अंबाडीच्या बियांत १८ ते २० टक्के तेल असते. त्यापैकी १३ टक्क्यांपर्यंत तेल गिरणीत दाबाखाली काढता येते.  विद्रावक पद्धतीचा उपयोग केल्यास यापेक्षा जास्त तेल निघते. हे तेल नितळ पिवळ्या रंगाचे असून, त्याला कोणताही वास नसतो. अंबाडीच्या बियांपासून तेल काढल्यानंतर शिल्लक राहणारी पेंड ही अळशीच्या किंवा सरसूच्या पेंडीसारखी दिसते. ती पशुखाद्यासाठी वापरली  जाते.   : सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (आचार्य पदवी विद्यार्थी,  अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग,  सॅम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय,  प्रयागराज, उत्तर प्रदेश.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com