Polyhouse Farming : पॉलिहाउसमधील शेतीनेच दिले खरे समाधान

पुणे बाजार समितीत मापाडी, शहरात रिक्षाचालक असे दीर्घ अनुभव घेतल्यानंतर आर्वी (जि. पुणे) येथील केशव सणस पूर्णवेळ शेतीतच उतरले. मजूर न ठेवता संपूर्ण कुटुंबाचे पाठबळ व कष्टांच्या जोरावर त्यांनी पॉलिहाउसमध्ये जरबेरा शेती फुलवली.
Polyhouse Farming
Polyhouse FarmingAgrowon

पुणे बाजार समितीत (Pune APMC) मापाडी, शहरात रिक्षाचालक असे दीर्घ अनुभव घेतल्यानंतर आर्वी (जि. पुणे) येथील केशव सणस पूर्णवेळ शेतीतच उतरले. मजूर न ठेवता संपूर्ण कुटुंबाचे पाठबळ व कष्टांच्या जोरावर त्यांनी पॉलिहाउसमध्ये जरबेरा शेती फुलवली. त्यात अखंड सातत्य व विक्रीव्यवस्थेचे नियोजन करीत आज एकाची दोन पॉलिहाउसेस असा विस्तार करून शेती व कौटुंबिक अर्थकारणात त्यांनी स्थिरता व समाधान मिळवले आहे.

पुणे जिल्ह्यातील आर्वी (तानाजीनगर, खेड शिवापूर, ता. हवेली) येथील केशव निवृत्ती सणस २०१३-१४ च्या पूर्वी पुणे बाजार समितीमध्ये मापाडीचे काम करायचे. सकाळी हे काम आवरल्यानंतर दुपारी पुणे शहरात ते ‘शिफ्ट’वर रिक्षाचालक म्हणून काम करायचे. गावात दोन ठिकाणी विभागलेली प्रत्येकी दीड एकर अशी एकूण तीन एकर शेती होती. मात्र डोंगराळ भागात असल्याने ती पडीक होती.

Polyhouse Farming
Crop Damage : नुकसान होऊनही अकोल्याची सुधारित पैसेवारी ५३ पैसे

शिवाय केशव घरात एकुलते एक होते. एकूण परिस्थिती पाहता कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पुण्यात काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. प्रसंगी गावातून पहाटे पायी महामार्गापर्यंत चालत येऊन नंतर वाहनांमधून बाजार समितीपर्यंत येऊन काम करायचे असे कष्ट घेणे सुरू होते.

Polyhouse Farming
Crop Insurance : शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा भरपाईसाठी प्रस्ताव

शेतीकडे वाटचाल

सन २०१०-११ मध्ये पुणे शहरातील सनदी लेखापाल (सी.ए.) असलेल्या एका व्यक्तीने गावात शेती खरेदी केली. त्यांनी पॉलिहाउस उभारले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत चार- पाच शेतकऱ्यांनी पॉलिहाउसेस उभारली. दोन, तीन वर्षांतील या शेतकऱ्यांचा अनुभव व त्यामागील अर्थकारण पाहून केशव यांचाही आत्मविश्‍वास वाढला. आपणही पॉलिहाउस उभारून शेतीतच लक्ष घालावे असे त्यांनी ठरवले. अखेर निश्‍चय झाल्यानंतर २०१३-१४ मध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत दहा गुंठ्यांचे पॉलिहाउस उभारले.

त्यासाठी १३ लाख रुपयांचे कर्ज कॉर्पोरेशन बॅंकेकडून घेतले. जरबेरा फुलशेतीचे नियोजन झाले. सुरुवातीची धडपड पॉलिहाउस उभारणीसाठी दर्जेदार लाल मातीची आवश्यकता होती. ती उपलब्ध करण्यासाठी भोर परिसरातून १३० ब्रास माती चौदाशे रुपये प्रति ब्रास दराने खरेदी केली. सुमारे ३३ ब्रास शेणखतही खरेदी केले. लालमाती, शेणखत आणि ‘बेसल डोस’च्या मिश्रणातून गादीवाफे (बेड) तयार केले.

ठिबक सिंचनाची अंथरणी केली. सुमारे सहा हजार ४०० रोपांची लागवड केली. माती खरेदीपासून ते फुलांचा पहिला तोडा सुरू होईपर्यंत जिद्द, संयम आणि चिकाटी ठेवली. अनुभवातून कुशलता येत गेली. उत्पन्न चांगले मिळत गेले. त्यातून संपूर्णपणे कर्जपरतफेड करणे शक्य झाले.

पॉलिहाउसचा विस्तार

अर्थकारण सक्षम होऊ लागल्यानंतर दुसरे पॉलिहाउस उभारण्यासाठी केशव यांची उमेद वाढली. सन २०१७-१८ मध्ये खेड शिवापूरच्या युको बॅंकेच्या १८ लाखांच्या आर्थिक सहकार्याने १० गुंठ्यांचे दुसरे पॉलिहाउस उभारले. एकदा लागवड केल्यानंतर सरासरी पाच वर्षांपर्यंत उत्पादन मिळत राहते. मात्र योग्य व्यवस्थापानातून सात वर्षांपर्यंत चांगले उत्पादन घेतल्याचे केशव सांगतात.

उत्पादन व विक्री नियोजन

जरबेरा फुलांचे उत्पादन वर्षभर सुरू राहते. दररोज एक हजार ते तेराशेपर्यंत फुले मिळतात. सकाळी काढणी झाल्यानंतर पांढरा, पिवळा, लाल, पिवळा अशा विविध रंगांच्या फुलांच्या जुड्या बांधल्या जातात. पॅकिंग केल्यानंतर गावातील निश्‍चित केलेल्या पिकअप वाहनातून फुले पुणे बाजार समितीत पाठविली जातात. वाहतुकीसाठी प्रति १० गुंठ्यांसाठी २१०० रुपये मोजावे लागतात. वाहन चालक गावातील शेतीमालाचे संकलन करून पुणे बाजार समितीमध्ये तो घेऊन जातो. वर्षभर सण-समारंभ व बिगर हंगामी काळ लक्षात घेता फुलांचे दर बदलतात. प्रति फूल एक रुपयापासून ते ३ रुपये व लग्नसराईत हा दर १० रुपयांपर्यंत मिळतो. दोन्ही पॉलिहाउसमधील उत्पन्न लक्षात घेता वर्षाला दहा लाखांपर्यंत एकूण उत्पन्न मिळते.

मजुरांविना शेती

पॉलिहाउसमधील कामांसाठी कोणत्याही मजुराची मदत घेतलेली नाही. पत्नी माधवी, मुलगी श्रुतिका, दीपिका, मुलगा कृष्णा असे कुटुंबातील सर्व सदस्य व्यवस्थापन पाहतात. एक मजूर कुटुंब व्यवस्थापनासाठी ठेवले असते तर वर्षाला पावणेदोन लाख रुपयांपर्यंत मजुरीखर्च आला असता. त्यात पूर्णपणे बचत झाल्याचे केशव सांगतात. अर्थात, मागे वळून पाहताना पूर्वीचे व्यवसाय, त्यातून होणारे कष्ट, उत्पन्न व आता पूर्णवेळ शेती व त्यातून उंचावलेले अर्थकारण ही समाधान देणारी बाब असल्याची कबुली केशव देतात.

व्यक्त केल्या अपेक्षा पॉलिहाउस उभारले त्या वेळी फुलांचे जे दर होते त्याच आसपासचेच दर आज आहेत. दुसरीकडे खतांचे दर मात्र दुप्पट झाले असल्याने निव्वळ नफा कमी झाल्याचे केशव सांगतात. अर्थात, योग्य व्यवस्थापन, उत्पादनातील सातत्य आणि उत्पादन खर्च कमी केला तर ही शेती परवडते असा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळेच पॉलिहाउस शेतीचा विस्तार करणे शक्य झाले.

शासनाने सुमारे एक लाख ३० हजार रुपयांचे लागवड साहित्य अनुदान बंद केल्याने नव्याने पॉलिहाउस उभारणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे नव्याने पॉलिहाउस उभारणी होत नसून सरकारने याचा विचार करावा असे केशव म्हणतात. सरकार एकीकडे प्लॅस्टिक बंदीची घोषणा करते आणि बाजारात मात्र त्या फुलांची सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे फूल उत्पादकांचे मोठे नुकसान होत असल्याची खंत केशव व्यक्त करतात. फूल उत्पादक शेतकरी टिकवायचा असेल तर प्लॅस्टिक फुलांवर बंदी आणावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

संपर्क ः केशव सणस, ९६२३०३०४०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com