Food Processing : मोह फुलांच्या प्रक्रियेमध्ये चांगली संधी

मोहाच्या फुलांमध्ये ‘सी’ जीवनसत्त्व भरपूर असून, प्रतिकारकतेसाठी फायदेशीर आहे. मोह फुलांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता प्रक्रियेमध्ये चांगल्या संधी आहेत. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात, साबण, डिटर्जंट आणि त्वचा निगेसाठी मोहाच्या फुलांचा वापर करतात.
Mohphul
Mohphul Agrowon

आरती देशमुख

वनोत्पादनामध्ये (Forest Produce) मोह अत्यंत महत्त्वाचा वृक्ष (Moh Tree) आहे. औषधी आणि व्यावसायिक उपयोगासाठी हा वृक्ष प्रसिद्ध आहे. आयुर्वेदात मोहाच्या झाडाचे औषधी गुणधर्म (Medicinal Properties In Moh Phul Tree) सांगितले आहेत. मोहाची फुले झाडावर मार्च-एप्रिल महिन्यात आढळतात. फुले पिवळसर पांढरी असतात. त्यांचा टिकवण कालावधीही अत्यंत कमी आहे. फुलांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता, मोहाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संधी आहेत. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात, साबण, डिटर्जंट आणि त्वचा निगेसाठी मोहाच्या फुलांचा वापर करतात.

Mohphul
मोह फुलांचा वाढेल गोडवा

मोह फुलामधून मिळणारी पोषक तत्त्वे (१०० ग्रॅम)

१) प्रथिनांचे प्रमाण १६.९ टक्के

२) कर्बोदकाचे प्रमाण २२ टक्के

३) वसाचे प्रमाण ३.२ टक्के

४) मेदाचे प्रमाण ५०-३१ टक्के

फुलांचे संकलन ः

१) झाडाभोवती नेटचा वापर करून स्वच्छ फुले गोळा करावीत. त्यामुळे कमी वेळात फुलांचे संकलन करता येते.

२) स्वच्छ महू फुलांच्या योग्य वाळवणूकीकरिता सोलर ड्रायरचा उपयोग करावा.

३) फुलांची साठवणूक करण्यापूर्वी कुची काढावी. फुलांच्या साठवणूककरिता पोलीप्रोपिलिन किंवा ल्यॅमिनेटेड ज्यूट पिशवीचा वापर करावा. अशा पद्धतीने साठवणूक केलेल्या मोह फुलांचा प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीत उपयोग करता येतात.

फुलांचा पारंपरिक उपयोग :

१) ताज्या फुलांमध्ये सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, अर्बीनोज आणि काही प्रमाणात माल्टोज हे घटक असतात. त्यांची चव गोड असते.

२) फुलांमध्ये ‘सी’ जीवनसत्त्व भरपूर असून, प्रतिकारकतेसाठी फायदेशीर आहे. यात कॅरोटिन असून ‘अ’ जीवनसत्त्वाचा मोठा स्रोत आहे.

३) फुलांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस अशी खनिजे, काही प्रमाणात प्रथिने आणि मेद आहे.

४) मोहाच्या फुलामध्ये जिवाणूरोधक, कृमिघ्न, वेदनाशामक, यकृताच्या व्याधीमध्ये उपयुक्त, कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत.

Mohphul
प्रक्रिया, मूल्यवर्धनातून फूल शेतीचा नवीन पर्याय ः तोमर

५) फुले खाण्यायोग्य असून, त्यात मोठ्या प्रमाणात शर्करा, जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, मेद आढळते.

६) फुलांचा वापर नैसर्गिक गोडी आणणारा पदार्थ म्हणूनही होतो.

७) पारंपरिक पदार्थ उदा. हलवा, खीर, बर्फी यांना गोडी आणण्यासाठी फुले वापरतात.

८) भात, नाचणी, ज्वारी किंवा रताळ्यासोबत फुलांचा वापर करून गोड भाकरी किंवा केक बनवतात.

९) वाळलेली फुले ही चिंच किंवा साल बियांसह उकळून धान्याला पर्याय म्हणून आदिवासी आहारात वापरतात.

१०) फुलांचा वापर पशुखाद्यामध्ये केला जातो, त्यामुळे दुधामध्ये वाढ मिळते. फुलांचे अवशेष हे पशुखाद्य म्हणून वापरतात.

११) भिजवलेल्या तांदळामध्ये मोहाची फुले मिसळून ती दळतात. हे पीठ साल पानामध्ये गुंडाळून आगीमध्ये भाजून केक बनवला जातो.

मोहाच्या फुलांचा औषधी उपयोग :

१) आयुर्वेदामध्ये फुलांचा वापर शीतकरणासाठी, वातनाशक, दुग्धवर्धक, स्तंभक म्हणून केला जातो.

२) फुलांच्या रसामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून टॉनिक म्हणून उपयुक्त.

३) खाज होत असलेल्या त्वचेवर चोळल्यास गुणकारी. डोळ्यांच्या रोगामध्येही उपयुक्त.

४) रक्तपित्तातील रक्तस्राव रोखण्यासाठी फायदेशीर. पित्तामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी वापर.

५) फुलांची भुकटी हगवण, बृहदांत्र शोथावर स्तंभक म्हणून वापरली जाते.

६) कच्ची फुले स्तनदा मातांच्या दुधामध्ये वृद्धीसाठी उपयुक्त.

७) भाजलेली फुले कफ, खोकला आणि दम्या सारख्या आजारावर वापरतात. वंध्यत्व आणि दुर्बलता विकारांमध्ये दुधामध्ये मिसळून फुलांचा वापर केला जातो.

८) तुपामध्ये तळून फुलांचा वापर मूळव्याधीच्या उपचारामध्ये केला जातो.

९) मधुमेहाची समस्या सामान्य झाली आहे. मधुमेह असलेल्या लोकांसाठी मोह औषधासारखे आहे. झाडाच्या सालीपासून बनविलेली डिकोक्शन मधुमेह असलेल्या रुग्णांना फायदेशीर ठरते. त्याचे औषधी गुणधर्म शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. मधुमेहाची लक्षणे त्याच्या सालातून बनविलेल्या डीकोक्शनच्या नियमित सेवनद्वारे दूर करता येतात.

मोहाचे तेल आणि पेंड ः

१) बियांमध्ये ५० ते ६१ टक्के तेल, १६.९ टक्के प्रथिने, ३.२ टक्के तंतुमय पदार्थ, २२ टक्के कर्बोदके, ३.४ टक्के राख, २.५ टक्के सॅपोनिन्स आणि ०.५ टक्का टॅनिन हे घटक असतात.

२) तेल काढल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पेंडीमध्ये ३० टक्के प्रथिने, १ टक्का तेल, ८.६ टक्के तंतुमय पदार्थ, ४२.८ टक्के कर्बोदके, ६ टक्के राख आणि ९.८ टक्के सॅपोनिन्स आणि १ टक्का टॅनिन असे घटक असतात.

३) बियांतील मेद काढून घेतल्यास त्यातील प्रथिनांचे, सॅपोनिन्स आणि टॅनिनची पातळी वाढते. वाढलेली सॅपोनिनची पातळी आयसोप्रोपॅनोलच्या प्रक्रियेने कमी करता येते. या प्रक्रियेनंतर पेंडीची पचनीयता ८१ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आढळले आहे. विषारीपणा कमी केलेल्या मोह बियांच्या पिठाचा वापर आहार आणि पशुखाद्यामध्ये प्रथिनांचा स्रोत ठरू शकतो. तेल काढल्यानंतर शिल्लक पेंडीमध्ये तेल शोषण्याचे इमल्सिफिकेशनचे गुणधर्म दिसून येतात.

४) एरंड आणि निम तेलाच्या तुलनेमध्ये मोहाच्या तेलामध्ये ओलाईट आम्लाचे प्रमाण अधिक (४५ टक्के) असते. पामतेल, साल मेद किंवा कोकमच्या तुलनेमध्येही ओलेईक आम्लाचे प्रमाण अधिक असल्याने अन्य कोकोआ पदार्थांना पर्याय म्हणून मोहाच्या तेलाचा वापर होतो.

५) मोहाचे तेल हे अखाद्य तेलामध्ये महत्त्वाचे आहे. पेंडीमध्ये कीटकनाशकाचेही गुणधर्म असून, मत्स्यपालनामध्ये वापर करतात.

मोह फुलांचे पारंपरिक पदार्थ ः

१) बीना आंबविता ः हलवा, पुरी, बर्फी असे गोड पदार्थ

२) मोह फुलांचा तृणधान्यासोबत केकमध्ये वापर.

३) धान्यासोबत पर्यायी खाद्य पदार्थ वापर.

४) पशुखाद्यामध्ये वापर.

५) बर्फी, बालुशाही, चकली, शंकरपाळे, पुरणपोळी

संपर्क ः आरती देशमुख, ९५०३६१२७०२

(विषय विशेषज्ञ गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com