उसाच्या रसापासून नाविन्यपूर्ण जॅम

कोइमतूर येथील संस्थेचे संशोधन ,देशातील पहिलेच उत्पादन
cane
caneagrowon

तमिळनाडू राज्यातील कोइमतूर येथील ऊस पैदास संस्थेतील शास्त्रज्ञांनी उसाच्या रसापासून नावीन्यपूर्ण अशा जॅमची (cane jam) निर्मिती केली आहे. देशातील अशा स्वरूपाचे हे पहिलेच उत्पादन असल्याचा दावा संस्थेतर्फे करण्यात आला आहे. खनिजे व जीवनसत्वांनी भरपूर असलेला हा जॅम अनेक बाबतीत
फळांच्या जॅमच्या (Fruit jam)तुलनेत आरोग्यदायी अधिक चांगला असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
प्रक्रिया उद्योगांसाठी हे तंत्रज्ञान संस्थेकडून उपलब्ध करण्यात आले आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत तमिळनाडू राज्यातील कोइमतूर येथे ऊस पैदास संस्था (शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्यूट-एसबीटी) कार्यरत आहे. उसाचे सुधारित वाण विकसित करण्यासह ऊस पैदास कार्यक्रम व संबंधित प्रकल्प संस्थेमार्फत चालविले जातात. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होण्याची समस्या तयार होते त्यावेळी उसावर आधारित नावीन्यपूर्ण प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करणे काळाची गरज बनली आहे. सन २०१६ च्या सुमारास संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ.बक्षी राम यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यानंतर केलेल्या अभ्यासानुसार उत्तर प्रदेशात एका वाणाचे अतिरिक्त उत्पादन व्हायचे. अशा वेळी उसाच्या रसापासून मूल्यवर्धित उत्पादन विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेतला होता.
फळांचे गर आणि साखर यांचे समप्रमाणात मिश्रण करून बाजारात विविध प्रकारच्या स्वादाचे जॅम उपलब्ध आहेत. ही बाब लक्षात घेऊन संस्थेचे वनस्पती जैव रसायनशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सुरेशा.जी.एस. यांनी त्या अनुषंगाने संशोधन सुरू केले. डॉ. बक्षी आणि संस्थेच्या प्रभारी संचालक डॉ. जी. हेमप्रभा यांच्या मार्गदर्शनाखाली उसाच्या रसापासून जॅम (केन जॅम) तयार करण्यास त्यांना यश आले आहे. देशातील अशा स्वरूपाचा हा पहिलाच जॅम असल्याचा दावा संस्थेतर्फे करण्यात आला आहे.

मूल्यवर्धनाचे महत्त्व

बाजारपेठेत विविध वैशिष्ट्ये असलेल्या फळांच्या जॅमची किंमत प्रकारानुसार प्रति किलो ३०० पासून ते ५०० किलोपर्यंत आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार उसाच्या रसापासून जॅम निर्मितीसाठी प्रति किलो १०५ ते १०६ रुपये उत्पादन खर्च येतो. त्यामध्ये ऊस, मजूर, वीज, प्रक्रिया आदींचा समावेश आहे. त्यामध्ये तयार उत्पादनाला किलोमागे १५० रुपये उत्पन्न मिळू शकते. एक हजार मिली ज्यूसपासून २०० ते ३०० ग्रॅम जॅम तयार होतो. या जॅमची किंमत प्रति २०० ग्रॅम बॉटल पॅकिंगसाठी ६० रुपये आहे.
ऊस उच्पादकांना तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत छोटे युनिट सुरू करून त्यापासून फायदा मिळवणे शक्य होऊ शकते.

निर्मिती प्रक्रियेतील बाबी

पूर्णपणे उसाच्या रसापासून नव्या, वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रियेद्वारे हा जॅम तयार करण्यात आला आहे.
त्याची प्रक्रिया व पध्दत यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. जॅमचा स्वाद वाढवण्यासाठी त्यात कोणताही संमत असलेला नैसर्गिक स्वादयुक्त घटक (फळे किंवा मसालेयुक्त) समाविष्ट करणे शक्य आहे. संस्थेने अननस, चेरी, चॉकलेट, आले-लिंबू, आले व दालचिनी आदींचे स्वादयुक्त केन जॅम तयार केले आहेत. ब्रेड, पोळी, इडली, डोसा, केक आदी विविध खाद्यपदार्थांसोबत त्याचा वापर करता येतो.

cane
मराठवाड्यात २६ लघु प्रकल्प कोरडेठाक

केन जॅमची वैशिष्ट्ये

-उसाच्या रसात जी काय साखर असेल तेवढीच. त्या खेरीज कोणतीही साखर या जॅममध्ये समाविष्ट केलेली नाही. या उलट फळांच्या जॅममध्ये फळे व शर्करा यांचे प्रमाण (गुणोत्तर) ५०-५०
असते.
-'टोटल शुगर’चे प्रमाण सुमारे ४६. ५ टक्के आहे. फळांच्या जॅममध्ये हेच प्रमाण अधिक म्हणजे ५० ते ६५ टक्के असते.
- उष्मांक मूल्य (कॅलोरीफिक) केवळ २६२ किलो कॅलरी आहे. बाजारातील जॅममध्ये ते अधिक
म्हणजे २७२ किलो कॅलरीपर्यंत असते.
-अन्य फळांच्या जॅममध्ये आर्द्रतेचे (ह्युमिडीटी) प्रमाण २० ते ३० टक्के असते. या जॅममध्ये
हेच प्रमाण बरेच कमी म्हणजे ८.३९ टक्के आहे. ‘वॉटर ॲक्टिव्हिटी सह आर्द्रतेचे
प्रमाण कमी असल्याचा फायदा म्हणजे त्याची ठिकवणक्षमता वाढते.

जॅमची पौष्टिकता अर्थात खनिजांचे प्रमाण (प्रति १०० ग्रॅम)

सोडियम- २८.४ मिलीग्रॅम.
-कॅल्शिअम- ७.२ मिग्रॅ.
-फॉस्फरस- ७०.९ मिग्रॅ.
-झिंक- १.१ मिग्रॅ
-फळांच्या जॅममध्ये पोटॅशियमचे प्रमाण ७७ मिलीग्रॅम आहे. त्या तुलनेत केन जॅममध्ये हेच प्रमाण दहापटीने जास्त म्हणजे ७४७.७ मिग्रॅ. आहे.
-जीवनसत्वांमध्ये बी कॉम्प्लेक्स (५७ मिलीग्रॅम) व ई (५.७३ मिलीग्रॅम) यांचा समावेश आहे.

तंत्रज्ञान हस्तांतरण

भारतीय कृषी संशोधन परिषदेची ९३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अलीकडेच झाली. त्यामध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते या उत्पादनाचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र आणि तमिळनाडू राज्यातील दोन कंपन्यांना या तंत्रज्ञानाचा परवाना व्यावसायिक उत्पादनासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. इच्छुक अन्नप्रक्रिया उद्योगांना हे तंत्रज्ञान देण्यात येत आहे. त्यासाठी
ऊस पैदास संस्थेकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------------
संपर्क: डॉ.सुरेशा.जी.एस- ०८१२२३७८५५१,
इमेल: Director.sbi@icar.gov.in

---------

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com