कृषी सल्ला : दापोली विभाग

पावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा बुरशीनाशक पानावरून वाहून जाण्याची शक्यता असते. त्यासाठी फवारणी द्रावणात स्टिकर (चिकट द्रव्य) मिसळून फवारणी करावी.
भातवरील करपा रोग आणि निळे भुंगेरे
भातवरील करपा रोग आणि निळे भुंगेरे

पावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा बुरशीनाशक पानावरून वाहून जाण्याची शक्यता असते. त्यासाठी फवारणी द्रावणात स्टिकर (चिकट द्रव्य) मिसळून फवारणी करावी. पावसाची तीव्रता कमी असताना खते द्यावीत. हवामान अंदाज 

 • प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी दिनांक ३१ जुलै ते ४ ऑगस्ट, २०२१ दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात वाऱ्याच्या वेगामध्ये वाढ संभवते.
 • विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात दिनांक ४ ते १० ऑगस्ट, २०२१ दरम्यान पाऊस सरासरी इतकाच राहील. तसेच कमाल व किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे.
 • सामान्य सल्ला 

 • पुरामुळे बाधित झालेल्या भात खाचरातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी सखल भागामधून उताराच्या दिशेने निचरा चर काढावेत. स्थानिक परिस्थिती व एकूण क्षेत्र विचारात घेऊन निचरा चरांचे आकारमान (लांबी व रुंदी) संख्या ठरवावी. यामुळे जमीन वाफसा स्थितीत लवकर येण्यास मदत होईल.
 • पावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा बुरशीनाशक पानावरून वाहून जाण्याची शक्यता असते. त्यासाठी फवारणी द्रावणात स्टिकर (चिकट द्रव्य) मिसळून फवारणी करावी.
 • पावसाची तीव्रता कमी असताना खते द्यावीत.
 • खरीप भात 

 • फुटवे अवस्था
 • पुरामुळे बाधित झालेल्या भात खाचरामध्ये तग धरून राहिलेल्या भात पिकाची वाढ पूर्ववत होण्याकरिता पूर ओसरल्यानंतर २० टक्के अतिरिक्त नत्र खताची मात्रा ४३० ग्रॅम युरिया प्रती गुंठा याप्रमाणे पाऊस कमी असताना द्यावी.
 • भात खाचरात बेणणी करून नत्र खताची दुसरी मात्रा ८७० ग्रॅम युरिया प्रती गुंठा पुर्नलागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी द्यावी.
 • पुरामुळे पूर्णपणे बाधित झालेल्या भात खाचरामध्ये चिखलणी करून जमीन समपातळीवर आणावी. त्यानंतर रहू पद्धतीने भात पेरणी (८०० ग्रॅम बियाणे प्रती गुंठा) करावी. यासाठी हळव्या जातीचे भात बियाणे २४ तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर हे बियाणे पाण्यातून काढून पुढील २४ तास ओल्या गोणपाटात झाकून ठेवावे. साधारण अंकुरल्यावर हे बियाणे लगेच पेरणीसाठी वापरावे.
 • पावसाची शक्यता लक्षात घेता भात खाचरामध्ये पाण्याची पातळी ५ सेंमी पर्यंत नियंत्रित करावी.
 • करपा रोग 

 • ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस यामुळे भात पिकावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
 • सुरवातीला पानावर ठिपके दिसून येतात. त्यानंतर पिकाच्या वाढीसोबत ठिपक्यांचा आकार वाढून पानावर असंख्य ठिपके निर्माण होतात. परिणामी पान करपून रोपाची वाढ खुंटते.
 • हे ठिपके दोन्ही बाजूला निमुळते असून मध्यभागी फुगीर असतात. कडा तपकिरी आणि मध्यभागी राखाडी रंग असतो.
 • नियंत्रण  ट्रायसायक्लॅझोल (७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) १ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप असताना फवारणी करावी. पाणथळ भागातील भात खाचरात पाणी साठून राहिल्यामुळे भात पिकावर निळे भुंगेरे व सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. निळे भुंगेरे 

 • या किडीची अळी आणि प्रौढ अवस्था हानिकारक आहे.
 • प्रौढ भुंगेरे पानाच्‍या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात. आणि अळ्या पानाची सुरळी करून आतील हरितभाग खातात. परिणामी पानांवर पांढरे पट्टे येतात.
 • नियंत्रण : फवारणी प्रति १० लिटर पाणी

 • क्विनॉलफॉस (२५ टक्के) २० मिलि किंवा
 • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के) ५ मिलि
 • पावसाची उघडीप असताना फवारणी करावी.
 • सुरळीतील अळी 

 • कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते. आणि त्याची सुरळी करून त्यात राहते.
 • रात्रीच्या वेळी अळी पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. शेत निस्तेज दिसते.
 • नियंत्रणासाठी, भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे. त्यानंतर कीडग्रस्त पिकावरून एक दोर आडवा धरून ओढत न्यावा. त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतील. नंतर शेतातील पाणी एका बाजूला फोडून लावावे. जेणेकरून सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा झाल्यावर नष्ट कराव्यात. त्यानंतर शेतात नवीन पाण्याची साठवण करण्याची व्यवस्था करावी.
 • भुईमूग 

 • वाढीची अवस्था
 • लागवड क्षेत्रातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
 • पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी गरजेनुरूप खुरपणी करून नंतर पिकाला मातीची भर द्यावी.
 • आंबा 

 • वाढीची अवस्था
 • हापूस आंब्यामध्ये वर्षाआड फळे धरण्याचा गुणधर्म १० वर्षानंतर प्रकर्षाने दिसून येतो. यासाठी पूर्ण वाढलेल्या (१० वर्षांवरील) हापूस आंब्याला दरवर्षी नियमित फळे धरण्यासाठी झाडाच्या विस्ताराचा पूर्व-पश्‍चिम व दक्षिण-उत्तर व्यास मोजून त्याची सरासरी काढून विस्ताराच्या प्रति मीटर व्यासास पॅक्लोब्युट्राझोल ३ मिलि या प्रमाणात मात्रा पाऊस कमी असताना द्यावी.
 • पावसाची तीव्रता कमी असताना पॅक्लोब्युट्राझोलची आवश्यक मात्रा ३ ते ५ लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याभोवती विस्ताराच्या निम्म्या अंतरावर १० ते १२ सेंमी खोल असे सम अंतरावर २५ ते ३० खड्डे मारून त्यात द्रावण समप्रमाणात ओतावे. नंतर खड्डे मातीने बुजवून टाकावे.
 • पॅक्लोब्युट्राझोल देण्यापूर्वी झाडाभोवतीलचे तण काढून टाकावे.
 • काजू 

 • वाढीची अवस्था
 • सततचा पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि कमी सूर्यप्रकाश यामुळे बुरशीला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे काजू झाडाची पानगळ आणि फांद्याची मर दिसून येते. नियंत्रणासाठी, मँकोझेब (०.२ टक्के) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर फवारावे.
 • काजूच्या ४ वर्षावरील प्रती कलमास ४० किलो शेणखत किंवा हिरवळीचे खत, २ किलो युरिया, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खते कलमाच्या विस्ताराच्या थोडे आतमध्ये बांगडी पद्धतीने चरात देवून चर बुजवून घ्यावा. वर दिलेली खताची मात्रा चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी १/४, दुसऱ्या वर्षी १/२, तिसऱ्या वर्षी ३/४ पट मात्रा व चौथ्या वर्षी आणि त्यानंतर खतांची संपूर्ण मात्रा द्यावी.
 • नारळ 

 • फळधारणा
 • सततच्या जोरदार पावसामुळे नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत कोंब कुजव्या या बुरशीजन्य रोगामुळे माडाचा कोब कुजण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव दिसून आल्यास, कुजलेला कोंब साफ करून त्यामध्ये १ टक्का बोर्डो मिश्रणाची आळवणी करावी. याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी कोंबा नजीकच्या गाभ्यावर पावसाची उघडीप पाहून करावी.
 • सुपारी 

 • फळधारणा
 • सततचा पाऊस आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे सुपारी फळांच्या देठावर कोळेरोग या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. या रोगामुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते.
 • फळांचे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी १ टक्का बोर्डो मिश्रणाची तिसरी फवारणी पानांच्या बेचक्यात पावसाची उघडीप पाहून करावी.
 • चिकू 

 • फळधारणा
 • वाढलेल्या आर्द्रतेमुळे चिकू बागेत बुरशीजन्य रोगांमुळे चिकू फळांची गळ झाल्याचे दिसून येते.
 • बागेतील कीडग्रस्त तसेच जमिनीवर पडलेले फळे गोळा करून नष्ट करावीत.
 • नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी बोर्डो मिश्रण १ टक्का किंवा
 • मेटॅलॅक्झील (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम.
 • भाजीपाला पिके 

 • फुलोरा
 • ढगाळ वातावरण व आर्द्रतेमुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी, रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. मॅन्कोझेब किंवा झायनेब २.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.
 • कारली, पडवळ, दुधीभोपळा, दोडका या वेलवर्गीय भाजीपाला पिकावर तांबडे भुंग्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी डायमिथोएट १.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
 • जोरदार पावसामुळे भाजीपाला पिकांच्या बुंध्याजवळची माती वाहून गेली असल्यास, रोपांना मातीची भर द्यावी.
 • - वाऱ्याच्या वेगामध्ये वाढ संभवत असल्याने वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार द्यावा.
 • वेलवर्गीय भाजीपाला फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. फळमाशीच्या नियंत्रणासाठी फुले येण्यास सुरवात होण्याच्या वेळी पिकामध्ये ‘क्यु ल्युर’ रक्षक सापळे एकरी २ या प्रमाणे मंडपात जमिनीपासून १ ते २ फूट उंचीवर टांगावेत. सापळ्यात ठेवलेले आमिष ६ ते ७ आठवडे चांगल्या प्रकारे काम करते.
 • हळद 

 • वाढीची अवस्था
 •  पिकाच्या बुंध्याजवळची माती वाहून गेली असल्यास, रोपांना मातीची भर द्यावी.
 • नत्र खताची पहिली मात्रा ८५० ग्रॅम युरिया प्रती गुंठा लागवडीनंतर दीड महिन्यांनी द्यावी. खते हळदीच्या ओळीलगत चर घेऊन त्यात टाकून मातीने झाकून घ्यावीत.
 • पशुधन  पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावरांमध्ये पातळ हगवण होणे, चारा कमी खाणे तसेच वजन घटणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यासाठी शेळ्यांना अलबेन्डाझॉल ७.५ मिलि प्रति किलो वजन या प्रमाणात द्यावे. - (०२३५८) २८२३८७ (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com