अस्मानी संकटाला सामोरा जाणारा डोळस भूतान

वाढत्या तापमानामुळे भूतानमधील हिमनद्या वेगाने वितळू लागल्या आहेत. अशा सरोवरांच्या काठावरच विखुरलेल्या भूतानमधील शेती आणि शेतकऱ्यांसमोरील धोक्यामध्ये वाढ झाली आहे. हिमालयीन पर्वतरांगामधून म्हणजेच जणू आकाशातून कोसळणाऱ्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी भूतान डोळसपणे प्रयत्न करत आहे.
आधीच वेगाने वाहणाऱ्या हिमालयीन नद्यातील पुरांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा फटका काठावरील सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.
आधीच वेगाने वाहणाऱ्या हिमालयीन नद्यातील पुरांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा फटका काठावरील सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.

वाढत्या तापमानामुळे भूतानमधील हिमनद्या वेगाने वितळू लागल्या आहेत. अशा सरोवरांच्या काठावरच विखुरलेल्या भूतानमधील शेती आणि शेतकऱ्यांसमोरील धोक्यामध्ये वाढ झाली आहे. हिमालयीन पर्वतरांगामधून म्हणजेच जणू आकाशातून कोसळणाऱ्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी भूतान डोळसपणे प्रयत्न करत आहे. हिमालयाच्या सावलीमध्ये शांतपणे पर्यावरणपूरक जीवनशैलीमध्ये जगणारा आनंदी देश म्हणजे भूतान. भारताच्या सिक्किम, प. बंगाल, आसाम आणि अरुणाचल राज्याला जोडलेला हा देश उत्तरेकडे तिबेटच्या छायेखाली आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या भूतानला ‘लँड ऑफ ड्रॅगन’ असेही म्हणतात. जेमतेम आठ लाख लोकसंख्या असलेला या देशातील ६५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. रासायनिक घटकांपासून मुक्त असलेला हा देश संपूर्णपणे सेंद्रिय आणि पारंपरिक शेती करतो. पशुधनाचा आणि त्यांच्या चराऊ कुरणांचा सन्मान करतो. मुख्य म्हणजे शेतकरी कर्जमुक्त आहेत. जंगल विपुल तरीही प्रतिवर्षी लाखो वृक्ष लावण्यात येतात. देशात जीवाश्म इंधन कमी जाळले जाते. शेतकचरा शेतात, घरकचरा आणि सार्वजनिक कचऱ्यांचे खत केले जाते. कुठेही प्लॅस्टिक नाही, हिमालयाचा सहवास म्हणून वातानुकूलन यंत्रणा अतिशय कमी. पाणी मुबलक असले तरी जरुरीपुरताच वापर म्हणून आज या देशात हरितवायूचे प्रमाण जवळपास शून्य आहे. देशात तब्बल ५६ नद्या आहेत. हिमालयामधून उगम पावणाऱ्या या नद्या वेगाने वाहत असल्याने जलविद्युत प्रकल्पसुद्धा आहेत. हा देश तीन चतुर्थांश जलविद्युत निर्यात करतो. देशात सौरऊर्जा वापरली जाते. नद्या जास्त असल्या तरी शेतीसाठी चार नद्या जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यातील एक मानस नदी तिबेटमध्ये उगम पावते. भूतानमध्ये २७२ किमी प्रवास करून नंतर ती आसाममध्ये ब्रह्मपुत्रेला मिळते. तिच्या या नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर भूतानचे मोठे शेतीक्षेत्र विखुरलेले आहे. भूतानची शेती पर्वतराजी, डोंगरदऱ्या आणि सपाट भागावर विस्तारलेली आहे, त्यापैकी हिमालयाच्या उतरणीवरची शेती तशी बऱ्यापैकी सुरक्षित आहे. येथे पारंपरिक फळ उत्पादन घेतले जाते. डोंगर दऱ्या आणि सपाट भागावरची शेती गेली काही वर्षे वातावरण बदलाच्या तडाख्यात अडकलेली आहे. सर्व शेती नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यातील मानस आणि इतर तीन मोठ्या नद्यांना वारंवार महापूर येऊन शेतीवर नव्याने संकट येऊ लागले आहे. याला मुख्य कारण म्हणजे वाढत्या तापमानामुळे वितळणारा हिमालयामधील बर्फ. आशिया खंडामधील पहिला आनंदी देश असे भूतानचे मानांकन झाल्यावर पाश्‍चिमात्य पत्रकारांनी तेथील राजाला विविध प्रश्‍न विचारले त्यातील एक होता वातावरण बदल आणि त्याचा भूतानवर होणारा परिणाम. राजाने उत्तर दिले, सगळ्या जगावरच आलेल्या या संकटामध्ये भूतान अपवाद कसा असू शकेल? वातावरण बदलाच्या समस्येमध्ये भर घालणाऱ्या विकसित राष्ट्रांबरोबर आता अनेक गरीब निरापराध राष्ट्रेसुद्धा भाजून निघणार आहेत, मग भूतान त्यात असणारच ना! आमच्या देशाला या संकटामधून वाचवण्यासाठी गेली दोन दशके आम्ही सेंद्रिय व पारंपारिक शेतीला प्रोत्साहन दिले आहे. आमच्याकडे ७० टक्के वनक्षेत्र असतानाही, त्यात दरवर्षी लाखोची भर टाकतो. सौरऊर्जा वापरतो, जीवाश्म इंधन गरजेपुरतेच, प्लॅस्टिक कुठेही नाही, आमचे पशुधन चराऊ कुरणामध्येच असते त्यामुळे मिथेन उत्पत्ती शून्य आहे. हे सर्व आम्ही आमच्या राष्ट्रासाठी, येथील शेतकऱ्यांसाठी केले आहे आणि आजही करत आहोत, पण हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरावर, तेथील बर्फ वितळण्यावर आम्ही कसे नियंत्रण ठेवणार! वातावरण बदलामुळेच भूतानमधील नद्यांना गेल्या दशकापासून अचानक मोठमोठे पूर येत आहेत ते हे बर्फ वितळत असल्यामुळेच. आज हा पुरस्कार स्वीकारताना भविष्यामधील वातावरण बदलाच्या समस्येची भीती ही भूतानसाठी मोठे संकट असणार आहे याची जाणीव ठेवूनच आम्हाला यापुढे जास्त जागरूक राहावे लागणार आहे.” भूतानच्या राजाची ही मुलाखत आज २०२१ मध्ये तंतोतंत खरी ठरत आहे.  भूतानच्या उत्तरेस हजारो वर्षांपासून खोलवर साठलेला बर्फ विशेषत: तेथील हिमनद्या आता वेगाने वितळू लागल्या आहेत. भूतानच्या शेतीवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. निर्जन असा हिमालयीन बर्फाळ प्रदेश, अनेक बर्फाच्छादित सरोवरे आजपर्यंत सर्व जगासाठी अज्ञात होती. माणूस अजूनही तेथे पोचू शकलेला नसला तरी माणसांनी हव्यासातून तयार केलेले हवामान बदलाचे भूत तेथे अगदी सहज पोहोचले. या हिमनद्या, हिमपर्वताची टोके, गोठलेली सरोवरे यांना देवदेवता समजून भूतानमधील जनता पूजा करते. म्हणूनच तेथे हवामान बदल रुपी सैतानाचे जाणे त्यांना अशुभ वाटत आहे. लाखो वर्षांपासून शांत असलेला हिमालय आता का रागावला आहे, याचे उत्तर येथील प्रत्येक नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांनासुद्धा माहीत आहे. येथे शाळेच्या अभ्यासक्रमात मुलांना गणित, विज्ञानासोबत शेती, पर्यावरण आणि वातावरण बदलाचा स्वतंत्र अभ्यासक्रम शिकवला जातो. म्हणूनच आनंदात असलेल्या या चिमुकल्या राष्ट्राला हे भीतीचे सावट टाळता येत नाही. भूतानच्या उत्तरेकडील हिमालयाच्या कुशीमधील हिमनद्या हिमसरोवरांना मिळतात. भूतान हे राष्ट्र या सरोवरांच्या काठावरच विखुरलेले आहे. उपग्रहाद्वारे केलेल्या पाहणीमध्ये यातील काही हिमनद्यांमधील बर्फ वार्षिक सरासरी ३५ मीटर खोलीपर्यंत वितळत असल्याचे आढळले आहे. हे बर्फमय पाणी हिम सरोवरांना मिळाल्याने त्यांच्या पातळीत आणि क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. ही सरोवरे फुटून महापूर येण्याची शक्यता वाढली आहे. थोडक्यात, या सुप्त हिम सरोवरांना या वितळणाऱ्या हिमनद्यांनी अशीच जाग आणली तर त्यातील बर्फमिश्रित पाणी वेगाने खाली येऊन नद्यांना महापूर येतील. अशा वेळी त्यांच्यावर असलेले जलविद्युत प्रकल्प, काठावरची शेती, वसलेली गावे यांचे काय होणार, या चिंतेने हे राष्ट्र सध्या ग्रासलेले आहे. आज तेथे आकाशामधून येणाऱ्या या सुनामीचे संकट घोंघावत आहे. आणि ही सुनामी कधीही येऊ शकते, असे भूतानच्या राष्ट्रीय जल व हवामान विभागाचे प्रमुख डॉ. करमा म्हणतात. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वसलेल्या या राष्ट्रास भविष्यात मोठ्या जीवितहानी आणि आर्थिकहानीस सामोरे जावे लागणार आहे. यास आंतरराष्ट्रीय वातावरण बदल तज्ज्ञही पुष्टी देत आहेत. भूतानमध्ये आज वितळणाऱ्या हिमनद्यांच्या दबावाखाली २६७४ सरोवरे असली, तरी त्यातील १७ सरोवरे आज या धोक्याच्या पातळीला स्पर्श करत आहेत. सर्वच्या सर्व म्हणजे ७०० हिमनद्या एका पाठोपाठ एक वितळू लागल्या तर यातून अनेक सरोवरे निर्माण होतील. हे पाणी वेगाने खाली येऊ लागले तर काय होईल, याची कल्पनासुद्धा करता येऊ शकत नाही. भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटे शेरिंग आज याच चिंतेमध्ये आहेत. ‘चॅनेल आशिया’ला २८ जानेवारी २०२१ रोजी मुलाखत देताना त्यांनी ही भीती बोलून दाखवली. भूतानमधील सध्याचा तापत असलेला उन्हाळा आणि हिवाळयात उसवत चाललेली बर्फाची चादर सुप्त हिमनद्यांवर दबाव वाढवत आहे. पंतप्रधान म्हणतात, “आमची प्राचीन संस्कृती या हिमनद्यांना पूजनीय मानते. भूतानी जनतेचे अध्यात्म येथे एकवटलेले आहे. या हिमनद्यांच्या वितळण्यामुळे लोकांच्या अध्यात्मास तडा जात आहे. पर्यावरण आणि निसर्गाचा सन्मान करणाऱ्या माझ्या जनतेस, राष्ट्राला आज आमची काहीही चूक नसताना सामोरे जावे लागत आहे, याचे मला जास्त दु:ख होत आहे. हिमनद्या वितळल्या तर त्यांची पुन्हा निर्मिती होणे शक्य नाही, सर्व हिमनद्या आणि त्यांच्यापासून तयार झालेली सरोवरे नष्ट झाली तर येणाऱ्या पिढीला आम्ही काय देणार आणि काय दाखविणार? १९९४ मध्ये ‘ची सरोवर’ फुटून नदीला आलेला गाळाचा पूर, झालेली मानवी हानी आजही आम्ही विसरलो नाही. उलट त्यापासून आम्ही शिकून पर्यावरण आणि हिमालय रक्षणाचा वसा घेतला. पण जेथे मानवी हात अजूनही पोहोचलेले नाहीत, त्या हिमालयास नम्रपणे वाकून हात जोडून प्रार्थना करण्याशिवाय दुसरे काय करणार?  भूतानने घेतली वातावरण बदलाची दखल  भूतानने हिमालयामधील फुटण्याची शक्यता असणाऱ्या सर्व सरोवरांजवळ त्वरित सूचना देणारी यंत्रसामग्री बसवली आहे. शक्य तेथे मानवी पहाराही ठेवला आहे. नदी काठच्या लोकांना, गावांना सावध करून पाठीमागे जाण्यास प्रवृत्त केले आहे. नदीकाठच्या शेतीमध्ये शेतकऱ्याना त्यांच्या पारंपरिक शेतीऐवजी शतावरी आणि लेमनग्रासची लागवड करण्यास सांगितले. या दोन हिमालयीन वनस्पतींना परदेशात आज मागणी आहे, पण पुरवठा कमी आहे. वातावरण बदलामध्येही शेतकऱ्यांना घाबरून न टाकता, त्यांना धीर देऊन उत्पन्नाचा नवीन मार्ग दाखवून त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा हा देश आणि त्याचे नेतृत्व मला कायम वंदनीय राहिले आहे ते याचमुळे.   - डॉ. नागेश टेकाळे, ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com