पोटापुरते शेत त्याचे, आकाशाच्या लाटा...

लक्षद्विप या बेटावरील अरबी समुद्रपातळीच्या केवळ ६ फूट उंचीवर शेती करणारे शेतकरी आपणास न बोलताही किती मोलाचे ज्ञान अगदी सहज देऊन जातात. तेही वातावरण बदलाचा महाराक्षस त्यांच्या शेताच्या बांधावर उभा असताना... ​पोटापुरते शेत त्याचे, आकाशाच्या लाटा...। निधड्या छातीवरी झेलतो, होवो कितीही घाटा ।।
Anthony Vaidyayar's innovative method of pepper production
Anthony Vaidyayar's innovative method of pepper production

लक्षद्विप या बेटावरील अरबी समुद्रपातळीच्या केवळ ६ फूट उंचीवर शेती करणारे शेतकरी आपणास न बोलताही किती मोलाचे ज्ञान अगदी सहज देऊन जातात. तेही वातावरण बदलाचा महाराक्षस त्यांच्या शेताच्या बांधावर उभा असताना... पोटापुरते शेत त्याचे, आकाशाच्या लाटा...। निधड्या छातीवरी झेलतो, होवो कितीही घाटा ।। भारताचा नकाशात आपल्याला वर डोक्यापाशी काश्मीर, पायथ्याशी दिसते कन्याकुमारी. कन्याकुमारी -केरळपासून डाव्या बाजूच्या अरबी समुद्राकडे नजर वळविल्यास ३०-३५ लहान मोठ्या बेटांचे पुंजके दिसेल. केरळच्या समुद्र किनाऱ्यापासून अंदाजे ४०० किमी दूर समुद्रात असणारी ही हरित बेटे म्हणजेच लक्षद्विप. ३६ बेटांचा हा केंद्रशासित प्रदेश, कावाराट्टी बेट हे त्याची राजधानी. जेमतेम ३२ चौ.कि. क्षेत्रावर पसरलेल्या सर्व बेटांवर फक्त एक जिल्हा आणि त्याचे दहा उपविभाग आहेत. कागदोपत्री ३६ बेटे असली, तरी ‘पाराली’ हे बेट वातावरण बदलामुळे म्हणजे समुद्र पातळी वाढल्यामुळे जवळपास बुडाल्यातच जमा आहे. उरलेल्या ३५ बेटांपैकी फक्त १० बेटांवरच मनुष्यवस्ती आणि थोडी फार शेती. अन्य बेटे प्रवाळ या समुद्री जिवासाठी प्रसिद्ध आहेत. लक्षद्विपमध्ये जेमतेम ६४ हजार लोक राहतात, त्यातील ७० टक्के स्थानिक शेतकरी किंवा मच्छीमार आहेत. स्थानिक लोक ज्वारी, रागी, भात, डाळवर्गीय पिके आणि भाजीपाला पिकवतात. केळी, आले, अननस, रताळीसुद्धा उत्पादित केली जात असली, तरी मुख्य पीक म्हणजे नारळ. या बेटांचा ८४ टक्के भूभाग नारळ या पिकाने व्यापलेला. मुख्य व्यवसाय मासेमारी. या बेटानजीक मिळणारा ‘ट्युना’ मासा येथून जगभरात सर्व खवय्यांपर्यंत जातो. मनुष्यवस्ती असलेल्या सर्व बेटांवर एकूण ३००० हेक्टर जमीन आहे, त्यातील २७०० हेक्टरवर (सुमारे ८४ टक्के) नारळ आणि थोडी सुपारी आहे. उरलेल्या ३०० हेक्टरवर शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते अन्न, तेही सेंद्रिय नक्कीच पिकवतात. ना जमीन, ना जंगल मग हे शेतकरी शेती करतात तरी कशी? हा प्रश्‍न तुम्हाला निश्‍चितच पडला असणार. त्याचे उत्तर येथील शेतकरी त्यांच्या निसर्गप्रेमामधून देतात. लक्षद्विपला अन्नधान्य आणि इतर आवश्यक गोष्टीचा पुरवठा केरळमधील कोची, तिरुअनंतपुरम आणि मंगलोर या शहरातून होतो. समुद्री अंतर २००-४०० कि.मी. असल्याने बोटीने पुरवठा होतो. मात्र अनेक वेळा समुद्राचा प्रकोप, चक्रीवादळाची शक्यता यामुळे बोट वाहतूक बंद असते. विशेषतः पावसाळ्यात मुसळधार पावसामुळेही बोट वाहतूक बंद राहते. येथील शेतकरी त्याच्या घराच्या आसपास पोटापुरते शेत पिकवतात. जमीन तयार करण्यापासून सर्व गोष्टींसाठी नारळ या कल्पवृक्षाचा वापर होतो. नारळाच्या शेंड्या, झावळ्यापासून गांडूळ खत बनविले जाते. त्यावरच हे शेतकरी ज्वारी, भात, डाळी पिकवतात. मोजकी फळे आणि भाजीपालाही होतो. या बेटावर जगभरातून पर्यटक प्रवाळ आणि येथील निळ्या समुद्राच्या आकर्षणाने येतात. पर्यटकांमुळे नारळ, नारळपाणी यांना मोठी मागणी. नारळपाणी आणि खोबरे काढल्यावर उरलेल्या सर्व भागाचे कोकोपीट, काथ्या, दोरखंड, चारकोल निर्मिती असे अनेक छोटे मोठे उद्योग आहेतच. पण सर्वाधिक वापर हा गांडूळ खत निर्मितीसाठी केला जातो. शेतीसाठी ते उपयुक्त ठरते. वातावरण बदलामुळे समुद्रपातळी वाढते आणि लाटा खोलवर आत येतात. ही सर्व बेटे समुद्रपातळीपासून जेमतेम २ मीटर उंचीवर आहेत. त्यामुळे शेती करणे हेच मुळात फार कठीण. एका जागतिक दर्जाच्या पर्यावरण संस्थेने लक्षद्विपचा पर्यावरण अहवाल १५ जुलै २०२१ ला सादर केला. त्यानुसार, या भौगोलिक क्षेत्रात प्रतिवर्षी समुद्रपातळी ०.४ ते ०.९ मि.मी. ने वाढत आहे. म्हणूनच २०५० पर्यंत सुंदरबनप्रमाणे हा प्रदेश राहणार की जाणार, हे अरबी समुद्रच ठरवणार आहे. लक्षद्विपवर पर्यावरणास हानिकारक अशा गोष्टींचा वापर होत नाही. येथे रासायनिक खते, कीटकनाशके वापरली जात नाही. प्लॅस्टिकमुळे प्रवाळांची हानी होत असल्याचे लक्षात आल्यावर आता त्यावरही पूर्ण बंदी आहे. येथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. पृष्ठभागालगत गोड पाणी मिळते. मात्र समुद्र आत आला की ते सर्व खारे होऊन जाते. आयआयटी खरगपूर आणि भारत सरकारच्या ‘डीएसटी’तर्फे लक्षद्विपच्या वातावरण बदलाचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, येणारी तीन दशके या द्विपांसाठी अग्निपरीक्षेसारखी असणार आहेत. समुद्राच्या उग्र स्वरूपामुळे येथील जमीन सैल होऊन, त्यातील ६० टक्के वाहून जाण्याचा धोका आहे. ‘मिनीकॉय’ आणि ‘कावाराट्टी’ धोक्यात आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. शेती तर केवळ असंभव होईल. स्थानिक लोकांसमोर येथील समुद्र किनाऱ्यांचे रक्षण करणे, वृक्ष लागवड करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि गांडूळ खत तसेच शेणखतास प्रोत्साहन देऊन पारंपरिक शेती करणे हेच उपाय राहिल्याचे अहवालात नमूद केले आहे. समुद्रात खोलवर मासेमारी आणि तीही यांत्रिक पद्धतीमुळे लक्षद्विपचे समुद्रकिनारे धोक्यात आले असल्याचे स्थानिक मच्छीमारांचे मत आहे. तब्बल ३७५ मासेमारी बोटी या बेटावर तळ ठोकून असतात. येथील शेतकरी त्यांच्या थोड्या फार शेतीबरोबरच मुक्त चराईवर गाईसुद्धा पाळतात. वातावरण बदलास सामोरे जाताना येथील गरीब शेतकरी अजून तरी हार मानण्यास तयार नाही. येथे व्हॅनिला आणि अळिंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. केरळमधून मागणी असलेल्या काही औषधी वनस्पतीची शेतीसुद्धा शेतकरी करतात. गांडूळ खत, शेणखत शेतात मिसळून कुटुंबास वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य पिकवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे वातावरण बदलास घाबरून कोणी स्थलांतरित होण्याचा विचार करत नाही. लक्षद्विप बेटावरील शेती मर्यादित असली तरी एका बेटावरील ‘वाझावाट्टा’ या लहानशा गावामधील ॲन्टोनी वैद्ययार यांची काळी मिरी उत्पादनाची नावीन्यपूर्ण पद्धती इथे सांगितलीच पाहिजे. पारंपरिक पद्धतीमध्ये खोल खड्डा घेऊन त्यात जाड सरळ लाकूड उभे केले जाते. त्याच्या आधारावर काळ्या मिरीचे उत्पादन घेतले जाते. लक्षद्विप बेटावरही काही शेतकरी अशीच मिरी पिकवत. मात्र समुद्राच्या उधाणामुळे, वारे, चक्रीवादळामुळे ही शेती उखडून जाऊ लागली. जिथे शिल्लक राहिली, तिथे पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादन कमी आहे. ॲन्टोनी यांनी पद्धतीत थोडी सुधारणा केली. खड्ड्यात उभारलेल्या लाकडाभोवती चौकोनी लोखंडी जाळी बसवली. त्यात नारळाच्या शेंड्या, भाताचे काड, शेणखत भरले. काळी मिरीची रोपे या जाळीच्या बाहेर लावली. जाळीच्या आधाराने रोपे वेगाने वाढू लागली. जाळीच्या आतून त्यांना मूलद्रव्ये, नत्र मिळू लागले. पावसाचे पाणी जाळीच्या आत पडून ते भूगर्भात जिरू लागले. ॲन्टोनी यांच्या काळ्या मिरीला पावसाचा, वादळाचा कसलाही धोका निर्माण झाला नाही. ३७ रोपांपासून त्यांना पहिल्या दोन वर्षांत दोन क्विंटल मिरी मिळाली. पुढील चार वर्षांत हेच उत्पादन दुप्पट होईल, याची त्यांना खात्री आहे. आपल्या कोकणामध्येही काळी मिरी घेतली जाते. मागील दोन वर्षांत आलेल्या चक्रीवादळामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने अनेकांनी हे पीक घेणे सोडून दिले. ॲन्टोनीचे हे प्रारूप आपल्या कोकणामधील शेतकऱ्यांनीही जरूर स्वीकारावे. या प्रयोगामधून भूगर्भ जलसाठा तर वाढतोच, त्याच बरोबर पिकाला शाश्‍वत पाणी, नत्र आणि आधारही भक्कम मिळतो. लोखंडी जाळी अथवा चेंबरमध्ये घालण्यासाठी लागणाऱ्या नारळाच्या शेंड्या, भाताचे तूस, शेण कोकणात नक्कीच उपलब्ध आहे. चारही बाजूंनी घोंघावणारा विशाल अरबी समुद्र असताना लक्षद्विपच्या एखाद्या बेटावर जीव मुठीत घेऊन आपली थोडीशी शेती पोटापुरती का होईन पिकविणाऱ्या या शेतकऱ्यांकडून आपणास काय शिकता येईल?

  • जमीन नसली, जंगल नसले तरी शेती करता येते.
  • गांडूळ खत आणि शेणखत याद्वारे पारंपरिक पिकाची शेती उत्तम होते.
  • वातावरण बदलास घाबरून स्थलांतर करण्यापेक्षा नावीन्यपूर्ण प्रयोगांमधून शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न करा.
  • पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करा.
  • पारंपरिक पिकाबरोबर भौगोलिक परिस्थितीनुसार फळ लागवड करा.
  • पशुधनास (गाय) शेतीसोबत जोडा.
  • शेतीला जोडून काहीतरी जोडधंदा करा.
  • नेहमी बहुपीक शेतीला प्राधान्य द्या.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com