पायरी न ओलांडणारी पायऱ्यांची शेती !

आपली पायरी न ओलांडता (निसर्गाची अनावश्यक हानी टाळत) केल्या जाणाऱ्या पायरीच्या शेतीसमोर आणि कठीण परिस्थितीतही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर तसाच नम्र, नतमस्तक झालो…
इंका संस्कृतीतील बांधीव पायऱ्याच्या शेतीचे आढळलेले अवशेष
इंका संस्कृतीतील बांधीव पायऱ्याच्या शेतीचे आढळलेले अवशेष

काही पायऱ्या अशा असतात, की तिथं तुम्हाला आपला माथा टेकावावासा वाटतो. भव्यदिव्य व्यक्तिमत्त्वाच्या पायाप्रमाणेच मंगल, पवित्र वास्तूच्या पायऱ्या तुम्हाला आपसूक नम्र करून टाकतात. आपली पायरी न ओलांडता (निसर्गाची अनावश्यक हानी टाळत) केल्या जाणाऱ्या पायरीच्या शेतीसमोर आणि कठीण परिस्थितीतही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर तसाच नम्र, नतमस्तक झालो… भूतानमधून खाली उतरत उतरत परत भारतात आलोय. नागालँडमार्गे मणिपूरचं सीमोल्लंघन केलंय. अगदी भूतानमधून निघाल्यापासून अधूनमधून डोंगरांच्या टोकाकडे जाणारी शेती लक्ष वेधून घेतेय. या प्रदेशात सपाट जमीन नाही, म्हणून दात कोरून पोट भरावं तसं इथं लोक डोंगर कोरून शेती करतात. एवढ्या कठीण परिस्थितीत शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्याला साष्टांग नमस्कार करावासा वाटला, पण बाइक वरून तोल जाईल म्हणून तो बेत रहित केला. हां! मनातल्या मनात मात्र हे काम उरकलं.  जगण्याच्या शर्यतीत, जगातील प्रत्येक जीव निसर्गाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. कीडे, सरड्यासारखे प्राणी, जीव वाचवण्यासाठी आणि शिकार मिळवण्यासाठी झाडापानात लपून, रंग बदलायला शिकले, पाण्यात राहून शिकाऱ्याला पाण्यात पाहणाऱ्या शार्क माशाने, मैलभर अंतरावरून रक्ताचा वास काढण्याचे कसब विकसित केलंय. ध्रुवीय प्रदेशातील बर्फाळ थंडीपासून वाचण्यासाठी ध्रुवीय अस्वलानं जाड, केसाळ ब्लॅंकेट मिळवलंय. अशाच प्रकारे माणसाने निसर्गाशी जुळवून घेत उत्क्रांतीच्या चक्रात बाजी मारलीय. केनियाच्या रिफ्ट व्हॅलीत मानववंशाच रोपटं लागलं आणि त्याचा वेलू पृथ्वीभर पसरला. स्थलांतर करत मनुष्यप्राणी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. त्याने दऱ्याखोऱ्यात, बर्फाळ प्रदेशात, मैदानी प्रदेशात तग धरत, आलेल्या अडचणींवर मात करत, निसर्गाशी जुळवून घेत तिथं वस्ती केली. मैदानी प्रदेशात शेती करणं सोपं होतं, पण डोंगराळ प्रदेशात शेती पिकवणं मोठं जिकिरीचं. पण हार न मानता त्याने डोंगरात शेती करण्याचं तंत्र विकसित करून पोटापाण्याची सोय केली. डोंगर पोखरून उंदीर काढणाऱ्यांच्या जगात या लोकांनी डोंगर पोखरून पिकं काढली. हां! आपल्याकडेही शहरात डोंगर पोखरून बहुमजली बिल्डिंग काढतात ती गोष्ट अलहिदा.   या पायऱ्यांच्या शेतीला ‘टेरेस फार्मिंग’ असंही म्हणतात. डोंगराळ भागात, उतारावर लांब पायऱ्यांच्या आकाराचे चरे देऊन शेतीयोग्य जमीन तयार करायची. या पायऱ्यांवर पिकं उगवायची आणि निसर्गाची पायरी सांभाळून शेती करायची.  ही शेती ‘रोका’ आता लवकरच प्रवासाच्या पुढील पायरीवर पोहोचायचं आहे. बाइकचा ॲक्सेलरेटर पिळला. एक घाट ओलांडल्यावर समोरच्या डोंगराच्या डोक्यावर भलं मोठं टक्कल पडलेलं दिसलं. अरे! या डोंगरबाप्पाला टक्कल कसं? थोडं पुढे जाऊन पाहिल्यावर माझ्या टक्कूऱ्यात प्रकाश पडला. अरे! ही तर ‘शिफ्ट शेती’ म्हणजे सरकणारी शेती. दहा वर्षांपूर्वी मणिपूरला ऑफिसच्या कामासाठी आलो होतो. तेव्हा एक गोरी मॅडम शिफ्ट ॲग्रिकल्चरवर संशोधन करायला आली होती. तिच्याबरोबरच संभाषण चौकस आठवलं. या सरकणाऱ्या शेतीचे संदर्भ काळाबरोबर सरकत ख्रिस्तपूर्व ८ हजार वर्षे मागे जातात. अगदी ‘निओलिथनिक’ काळातही या शेतीची सरसर सुरू होती, हे वेगवेगळ्या उत्खननातून सिद्ध झालंय. बालवाडीतून पोराने प्राथमिक शाळेतील ‘पहिलीत’ यावं, तसंच भटक्या, शिकारी माणसाचा शेतकरी होण्याच्या प्रक्रियेतील सरकणारी शेती म्हणजे ‘पहिली’ इयत्ता. शिकारीत दुसऱ्याचा जीव घेऊन उदरभरण करावं लागे. त्याऐवजी पिकात जीव ओतून शेती करण्याचाही दुसरा अहिंसक मार्ग त्याला उमगत गेला. मग काय, थोडंस गरजेपुरतं जंगल तोडायचं. जमीन साफ करायची. जंगल साफ करणं फारच अडचणी असेल, तर थोडंसं जाळून, थोडं हाताने ‘खांडववन’ करायचं. साफ झालेल्या जमिनीवर पिकं घ्यायची. दोन-चार वर्षं या जमिनीचा वापर करायचा. नंतर मात्र त्या जागेशी काडीमोड घेऊन तिथून दुसरीकडे स्थलांतर करायचं. ‘नवा गडी, नवं राज्य’ या उक्तीप्रमाणे परत नवीन ठिकाणी जंगल तोडायचं आणि शेती करायची. अशी ही भटकी शेती पिढ्या न् पिढ्या करत राहायची. नवीन जागा असल्याने माती सुपीक असते, त्यात पिकंही चांगली येतात. आजही मध्य आफ्रिका, मध्य अमेरिका आणि दक्षिणपूर्व आशियात ही सरकणारी शेती केली जाते. या शेतीला वेगवेगळ्या नावाने ओळखतात. ईशान्य भारतात हिला ‘जूम किंवा झूम’ म्हणतात. साहेबांच्या भाषेत ‘स्लॅश अँड बर्न’ असं नाव आहे. इंडोनेशियात ‘लाडक्मग’, फिलिपिन्समध्ये ‘काइंजिन’, मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत ‘मिलपा’, व्हिएतनाममध्ये ‘रे काँगो’ आणि मध्य आफ्रिकेत ‘मासोल’ आणि ब्राझीलमध्ये ‘रोका’ म्हणतात. या सर्व नावात ब्राझीलचं नाव माझ्या पर्यावरणपूरक दृष्टीला समर्पक वाटलं. ‘रोका !’ ही शेती त्या शब्दाच्या हिंदी अर्थाप्रमाणं रोखलीच पाहिजे. कारण या शेतीमध्ये दर वर्षा दोन वर्षाआड हजारो एकर जंगलं तोडली आणि जाळली जातात. जंगलाच्या नुकसानीबरोबरच जाळण्याच्या प्रक्रियेमुळे पर्यावरणाची दुहेरी वाट लागते. किती विपर्यास आहे ना? इथंच पायऱ्यांची शेती आपली आणि निसर्गाची पायरी सांभाळून आहे. मात्र सरकणारी शेती आपली पायरी सोडून निसर्गाचं टाळकं सरकवतेय. या शेतीचा इतिहास हा पायरीच्या शेतीचा इतिहास पार पुरातन संस्कृतींपर्यंत जातो. १३ व्या आणि १४ व्या शतकात अँडीज पर्वतात, इंका संस्कृतीत या प्रकारची शेती केली जायची. दक्षिण अमेरिकेतील माचूपिचू इथं आजही त्याचे अवशेष आढळतात. फिलिपिन्सच्या डोंगररांगांमधील पायऱ्यांची शेतीही हजारो वर्षं जुनी आहे. तिला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलं गेलंय.  दक्षिणपूर्व आशियात याच प्रकारे भाताचं पीक घेतलं जातं. भात पिकाला पाणी जास्त लागतं. पावसाचं किंवा वरती साठवून ठेवलेलं पाणी पायऱ्यापायऱ्यांनी संपूर्ण शेतभर फिरवत भाताला पाजता येतं. व्हिएतनाम, थायलंड, फिलिपिन्स यांसारख्या देशांतून पिकवला जाणारा बहुतांश भात अशाच डोंगरांच्या माथ्यावर (टेरेस) पिकवला जातो. आपल्याकडेही दक्षिण आणि ईशान्य भारतात पायऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या पायरीच्या शेतीचे भरपूर फायदे आहेत. सपाट जमीन नसलेल्या ठिकाणी डोंगरावरही शेतीक्षेत्र वाढवत नेता येतं. पण यापेक्षाही मोठा फायदा म्हणजे माती आणि पाणी संवर्धन. हो! इथं शेतातील पाण्याचा लोंढा धसमुसळेपणा करत वाहून जात नाही. तो पायऱ्यांच्या वळणावळणाने वळत, बागडणाऱ्या लहान मुलागत ‘रिंगा रिंगा रोजेस’ असं गात ते शेतभर गोलगोल फिरत, हुंदडत, झुळूझुळू वाहत पायथ्याकडे येतो. म्हणून जमिनीची धूप कमी होते, जमिनीतील अन्नद्रव्ये वाहून जात नाहीत. पर्यायाने जमिनीतील कस टिकून राहतो. पाण्याच्या या सम्यक प्रवाहामुळे शेतातील रसायने, गाळ पाण्याबरोबर वाहून जात नाही. परिणामी, नदीनाले आणि समुद्र प्रदूषित करण्याच्या पापात ते सामील होत नाही. पायऱ्यापायऱ्यांतून पाणी फिरताना शेतीमध्ये वापरली गेलेली किंवा त्यात तयार झालेली विविध रसायनं मातीत, पायऱ्यांच्या कडेला शोषली जातात. तेथील जिवाणू हे रसायने विघटित करण्याचं म्हणजेच ‘हलाहल’ पचवण्याचं काम अंगावर घेतात. अर्थात, सलग सपाट जमीन नसल्याने शेतीकामे करताना अडचणी येतात. मात्र हे आव्हानही येथील शेतकरी आनंदाने पेलतो.  ईशान्य भारतातून बुलेट धडधडत निघालीय. तिची धडधड हिमालयाच्या कानाकोपऱ्यातून पायऱ्यांच्या आणि सरकणाऱ्या शेतीला आम्ही येत असल्याचा सांगावा पोहोचवतेय. निसर्गाचा बाज राखणारी आणि त्याचा ऱ्हास करणारी, अशा एखाद्या सवतीप्रमाणे दोन्ही दोन टोकाच्या शेती सांभाळत हिमालय मात्र अविचल उभा आहे. भूतानमधून परत भारतात मणिपूरला आलोय. इथून पुढे म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश आम्हाला खुणावतोय. सरकणाऱ्या शेतीपासून होणारा पर्यावरण ऱ्हास वाचव असं ब्रह्मदेवालाच साकडं घालत आम्ही आमच्या गाड्या ब्रह्मदेशाकडे पिटाळल्या. - डॉ. सतीलाल पाटील, ९९२२४५९७८४ (लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा.लि. कंपनीचे संचालक आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com