थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील पांथस्थ!

थायलंडमध्येही शेतमजुरांची उपलब्धता ही समस्या आहे. मग अन्य देशातील/राज्यातील गरजू मजूर येतात. हळूहळू मजुरी वाढत जाते. एकूणच सर्व घटकांमुळे वाढलेल्या उत्पादनखर्चामुळे येथील शेतकऱ्यांनाही कर्जबाजारीपणा चुकत नाही.
 थायलंडमध्ये अत्याधुनिक पद्धतीने निर्यातक्षम शेती करणारा शेतकरी आणि त्याच वेळा सामान्य शेतकरी असे दोन्ही वर्ग दिसतात. दोघांच्याही समस्या थोड्या फार फरकाने सारख्याच असल्याचे दिसून येते.
थायलंडमध्ये अत्याधुनिक पद्धतीने निर्यातक्षम शेती करणारा शेतकरी आणि त्याच वेळा सामान्य शेतकरी असे दोन्ही वर्ग दिसतात. दोघांच्याही समस्या थोड्या फार फरकाने सारख्याच असल्याचे दिसून येते.

शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच समस्या दिसून येतात. थायलंडमध्येही शेतमजुरांची उपलब्धता ही समस्या आहे. मग अन्य देशातील/राज्यातील गरजू मजूर येतात. हळूहळू मजुरी वाढत जाते. एकूणच सर्व घटकांमुळे वाढलेल्या उत्पादनखर्चामुळे ये?ल शेतकऱ्यांनाही कर्जबाजारीपणा चुकत नाही. उत्तम शेती करणारे निर्यातीचा विचार करतात, सामान्य कर्जाच्या ओझेने दबून राहतात. हे चक्र वेगवेगळ्या प्रकारे सुरू राहतं. ठाकसीन विद्यापीठातील प्राध्यापकांबरोबरची चर्चा रंगात आलीये. माझ्या अधाशी प्रश्नांच्या भडिमाराला ते उत्साहात उत्तरं देतायेत. थायलंडमधील, शेती, शेतकरी, समाज, समाजकारण अशा विविध विषयांच्या स्टेशनवर थांबत आमची गाडी शेतमजुरांवर येऊन थांबली. ‘‘तुमच्या देशात, शेतमजुरांची मजुरी किती असते?’’ असं विचारल्यावर ‘‘एका दिवसाचं किमान वेतन सव्वासहाशे ते साडेसहाशे रुपयांच्या घरात आहे, आणि शहरी भागात ते जास्त तर ग्रामीण भागात कमी आहे.’’ असं उत्तर मिळालं. शेतकऱ्यांच्या उत्पादनांबद्दल विचारल्यावर, ‘‘ते तो काय पिकवतो आणि व्यवहारात किती हुशार आहे, यावर अवलंबून आहे. काही शेतकरी बक्कळ कमावतात, पण काहीजण वार्षिक ६०-७० हजार कमाईवर येऊन अडकतात.’’ असं उत्तर मिळालं. शेतीच्या बाबतीत पुढारलेल्या थायलॅंडलाही काही प्रमाणात का होईना कर्जबाजारी शेतकऱ्यांची समस्या भेडसावतेय, हे ऐकून आश्चर्य वाटलं. सध्या देशात ट्रॅक्टर, हार्वेस्टर सारखी अद्ययावत यंत्र आलीयेत. पण ग्रामीण भागात काही थाई शेतकरी अजूनही रेड्याचा वापर शेतात करतात. ‘हॉर्स पावर’च्या जमान्यात ‘रेडा पावर’चाही वापर केला जातोय. थायलंडची शेती ३१ टक्के लोकांना रोजगार पुरवते. त्यात स्त्री-पुरुषांचं प्रमाण जवळपास सारखंच आहे. थायलंडमध्ये शेतीचा विकास झाला. नवनवीन पिके आली. निर्यात वाढली, पण शेतमजुरीची समस्या तोंड वर काढू लागली. शिकल्यासवरल्या तरुण पिढीला, चकाचक वातावरणात काम करायचं होतं. चिखल तुडवण्यात त्यांना रस नव्हता म्हणून ती शहराकडे धावली आणि शेतात काम करणाऱ्या तरुणांची संख्या गेल्या काही वर्षात रोडावली. ४० ते ६० वयोगटातील शेतमजुरांची संख्या वाढत ५० टक्क्यांवर गेलीय. मग सख्खे शेजारी म्यानमार, लाओस, आणि कंबोडियामधून शेतमजूरांचा ओघ सुरू झाला. घड्याळाच्या काट्याला बांधलेल्या देशी मजुरांच्या तुलनेत हे परदेशी मजूर शेतात बाराबारा तास राबतात. पैसे कमावतात आणि मायदेशी पाठवतात. एकदा का देशाची प्रगती सुरु झाली की लोकांची वार्षिक कमाई वाढते. मग गरजा वाढतात. घरात टीव्हीचा प्रवेश होतो. त्याच टीव्हीतून झगमगीत जाहिराती घरात येतात. आपलं पारंपारिक अन्न, कपडे, दागिने, बूट, चप्पल, दंतमंजन वगैरे कसं मागासलेलं आहे, हे टीव्हीतील ‘सुंदर चवळीच्या शेंगा’ आपल्याला पटवून देतात. नुसत्या टूथपेस्टच्या ताजगीने, मदनबाण चालवल्या सारख्या अप्सरा आजूबाजूला पिंगा घालतायेत असा भास होऊ लागतो. चुलीवरच्या कसदार गरमागरम भाजीभाकरीपेक्षा चकचकीत हॉटेल मधल्या रंगरंगोटी केलेल्या डिशेश आवडायला लागतात. मैदा कुजवून बनवलेल्या पिझ्झा, बर्गर सोबत सेल्फी काढल्या काढल्या, नुसत्या फेसबुकच्या लाईकने पोट भरू लागतं. आपल्या पारंपरिक, देशी गोष्टी डाऊन मार्केट वाटायला लागतात. मग देशी घर परदेश वस्तूंनी भरायला सुरवात होते. राबराब राबून कमावलेले स्वदेशी पैसे, महागडे परदेशी उत्पादने खरेदी करून सीमेपार गेलेले असतात. पूर्वी शेकड्यात भागणारा मासिक घरखर्च हजाराच्या घरात कमाई होऊनही भागत नाही. मग मजुरी वाढ अनिवार्य आहे, याची जाणीव व्हाट्सअप आणि फेसबुकवर बोटं चालवता चालवता होते. मजुरी वाढली की शेतमालाचा उत्पादनखर्च वाढतो. पण शेतमालाचा दर, भाव खात, रुसलेल्या जावयागत वर्षानुवर्षे एकाच जागी चिकटलेला असतो. मग ही वाढलेली मजुरी शेतकऱ्याची मजबुरी बनते. त्यावर एक उपाय म्हणून, अन्य देशातील/राज्यातील गरजू मजूर, कमी मजुरीत काम करण्यासाठी येतात आणि वार्षिक कमाई वाढून, मॉडर्न होण्याच्या प्रक्रियेत ते सामील होतात. असं हे चक्र सतत फिरत असत. प्रत्येक चक्रागणिक मजुरी, खर्च वाढतात, पण त्या पटीत शेतमालाचे भाव वाढत नाहीत. ही जगभरातील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. थायलंडमधील लिंगभेदीय समानता  ठाकसीन विद्यापीठातील प्राध्यापकांबरोबरची ही चर्चा सुरू असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे आजच्या बैठकीत एक प्राध्यापक तृतीयपंथी होते. त्यांच्या हावभावावरुन बोलण्याच्या पद्धतीवरुन त्यांची ओळख अजिबात लपत नव्हती. पण संपूर्ण स्टाफ आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांना सामान्य माणसासारखे सामावून घेतले होते. इतरांसारखीच समान वागणूक त्यांना मिळत होती. थायलंडच्या समाजात तृतीयपंथी लोकांना मानाचं स्थान आहे. ते सरकारी ऑफीस, कंपन्या, हॉटेल, बँका यासारख्या ठिकाणी सन्मानाने काम करतात. येथील समाजाने त्यांना सामावून घेतलंय. रस्त्यावर टाळ्या वाजवत भिक मागणारे तृतीयपंथी मला संपूर्ण थायलंडमध्ये कुठेच आढळले नाहीत. इथं किन्नरांसाठी ‘कथोआय’ हा शब्द इथं वापरला जातो. या खमेर भाषेतल्या शब्दाचा अर्थ ‘लेडीबॉय असा होतो. ‘कथोआय’ हा इथला एक समाज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे ‘कथोआय’ जास्त करून दुकाने, हॉटेल, ब्युटी पार्लर, मसाज सेंटर यामध्ये काम करतात. काहीजण फॅक्टरीतही कामाला जातात. ग्रामीण भागात शेतमजूर म्हणूनही ते काम करतात. थायलंड हा पर्यटनासाठी प्रसिद्ध देश असल्याने, मनोरंजन, कॅबरे, डान्सबार या सारख्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळतो. पट्टायातला ‘अल्काझार-शो’ मध्ये काम करणाऱ्या कलाकारांना पाहून हे ‘लेडी बॉइज’ आहेत यावर विश्वास बसणार नाही. दरवर्षी भारतात अंगमेहनत करणारे, थाईलंडमध्ये अंग रगडून घ्यायला जातात. पण त्यांना शेवटपर्यंत काळत नाही की आपल्याला रागडणारी ‘ती’ होती, ‘तो’ होता की, ‘ते’ होता. तृतीयपंथीयांना एवढी सन्मानजनक वागणूक मी इतर देशात पहिली नाही. काही तुरळक घटना सोडल्यास, देशभर ते ताठ मानाने आपली रोजीरोटी कमावतात. इतर देशात मात्र जन्माला आला त्या हॉस्पिटलपासून, तर मेल्यावर स्मशानात जाण्यासाठीच्या अर्जापर्यंत, सर्व ठिकाणी फक्त स्री आणि पुरुष असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. अर्धनारीनटेश्वराच्या आपल्या देशात तर ‘तो’ आणि ‘ती’ पेक्षा वेगळ्या मध्यम मार्गावरील निष्पाप पंथस्थांना शिक्षण, नोकरी, धंदा यासारखे उपजिवीकेचे सर्व मार्ग बंद केले जातात. त्यांना भिक मागण्याशिवाय फारसे पर्याय राहत नाहीत. या पार्श्वभूमीवर थायलंडमधील लिंगभेदीय समानता विस्मयचकित करणारी आहे. सर्वसमावेशकतेच्या देशा! शतशः नमन! - (लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा.लि. कंपनीचे संचालक आणि 'ड्रीमर अॅंड डुअर्स' पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com