गुलाबी बोंड अळी समस्येसाठी सुरुवातीपासून हवी तयारी

गेल्या दोन वर्षांमध्ये बीटी कपाशी पिकामध्ये सातत्याने तीव्र होत असलेल्या समस्या जाणून घेऊन, त्यांची तीव्रता कमी राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यावर सुरुवातीपासून योग्य, शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीचा अवलंबन करणे गरजेचे आहे.
pink ball worm and their management practices
pink ball worm and their management practices

गेल्या दोन वर्षांमध्ये बीटी कपाशी पिकामध्ये सातत्याने तीव्र होत असलेल्या समस्या जाणून घेऊन, त्यांची तीव्रता कमी राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यावर सुरुवातीपासून योग्य, शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीचा अवलंबन करणे गरजेचे आहे.  बीटी कपाशी पिकाचे विविध समस्यांमुळे  मोठे सार्वत्रिक नुकसान झाल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने अवास्तव वाढीमुळे पानांवरील बुरशीजन्य व जिवाणूजन्य ठिपके प्रादुर्भाव, त्यातून बोंडसडचा सार्वत्रिक मोठा प्रादुर्भाव यांचा समावेश होता. त्यातच  बोंड पक्वतेच्या अवस्थेत सातत्याने आलेला पाऊस, झालेली पातीगळ व बाळ बोंडगळ आणि कपाशी पीक अकाली पिवळे पडण्याची समस्या दिसून आली. किडींमध्ये गुलाबी बोंड अळी, रसशोषक किडींचा मोठ्या प्रमाणात झालेला प्रादुर्भाव आणि शेवटच्या टप्प्यात वाढलेला चिकट्याचा प्रादुर्भाव अशा समस्यांमुळे कपाशी पिकाविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये द्विधा अवस्था झालेली आहे. या समस्या निवारणाकरिता सुरुवातीपासूनच योग्य लागवड व्यवस्थापन केल्यास नुकसानीची पातळी कमी राखणे शक्य आहे.  गुलाबी बोंड अळी 

  • कपाशीचे बीटी वाण आल्यापासून बोंडअळ्याच्या प्रादुर्भावावर बऱ्यापैकी अंकुश आला होता. मात्र २०१७ पासून गुलाबी बोंड अळीचा बीटी वाणांवर प्रादुर्भाव सुरू झाला. गेल्या दोन वर्षात त्याचा उद्रेक झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. गुलाबी बोंडअळीला अटकाव करण्यासाठी पिकाच्या लागवडीपासूनच काही व्यवस्थापन सूत्रांचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. 
  •  ज्या शेतात बीटी कपाशीची लागवड करावयाची आहे, अशा शेतात आधीच्या पिकाच्या कापणी, काढणी झाल्याबरोबर लगेचच खोल नांगरणी करावी. 
  •  एकाच शेतात लागोपाठ कपाशीचे पीक घेऊ नये. पिकाची फेरपालट करावी. 
  •  बीटी कपाशीचे पीक ३५-४० दिवसांचे अवस्थेत असताना (पाती अवस्थेत येताना) शेतात प्रति एकर कमीत कमी  १२-१५ पक्षी थांबे लावावेत. कपाशीचे पीक शेतात किती उंच वाढते, याचा अंदाज घेऊन, त्यापेक्षा ४ ते ५ फूट उंचीवर पक्षिथांबे असावेत. पक्षिथांब्याच्या उंच काठीवर पक्ष्यांना बसण्यासाठी आडव्या काड्या बांधताना काठीच्या टोकावर व त्याखाली साधारणतः १-१.५ फुटाचे अंतर सोडून २-३ आडव्या काठ्या एका खाली एक याप्रमाणे बांधाव्यात. पक्षिथांबे कपाशीच्या ओळीत लावावेत. यामुळे आंतरमशागतीवेळी अडचण येणार नाही. पक्षिथांब्याच्या टोकावर बांधलेली आडवी काठीची दिशा ही पेरणीच्या दिशेला आडवी असावी. यामुळे पक्ष्यांना त्यावर बसून शेतातील अळी, किडी इ. वेचणे सोईचे होते.
  •  बीटी कपाशीचे पीक ३५-४० दिवसांचे असताना (पाती अवस्था सुरू होताना) शेतात गुलाबी बोंड अळी, हिरवी बोंड अळी तसेच ठिपक्याची बोंड अळीसाठी प्रति एकर कमीत कमी प्रत्येकी एक याप्रमाणे कामगंध सापळा लावावा. कामगंध सापळ्यात बोंड अळीनिहाय गुलाबी बोंड अळीसाठी पेक्टीनो अथवा गॉसी ल्युर, हिरव्या बोंड अळीसाठी हेलील्युर अथवा हेक्झाल्युर आणि ठिपक्याच्या बोंडअळी यासाठी विटाल्युर लावावा. प्रत्येक ३ आठवड्यांनी कामगंध सापळ्यामधील ल्युर बदलावा. कामगंध सापळ्यामध्ये ल्युर लावताना बोटांचा स्पर्श प्रकर्षाने टाळावा. त्यासाठी ल्युरचे पाऊच फाडून, ल्युरचा नरमभाग अंगठा व तर्जनी या बोटामध्ये पाकिटामध्येच पकडून ल्युअरचा टणक निमुळता भाग कामगंध सापळ्याच्या झाकणाच्या खाचेमध्ये खोचावा. ल्युरचे खाली पाऊच सुद्धा कामगंध सापळ्याच्या प्लॅस्टिक थैलीमध्येच टाकावे. यामुळे कामगंध सापळ्यामध्ये अडकलेले पतंग नेमक्या कोणत्या बोंड अळीचा आहे, याचा अंदाज मिळून पुढील कार्यवाही करणे सोपे होऊ शकते. गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी 

  •  गुलाबी बोंड अळीच्या अंड्यांचा  नाश करण्यासाठी प्रति एकर किमान एक ट्रायकोकार्ड कपाशीच्या पिकात पाती अवस्था सरू झाल्यावर लावावे. याद्वारे ट्रायकोग्रामा हा मित्रकीटक संपूर्ण शेतात  पसरून गुलाबी बोंड अळीच्या अंड्यांचे नियंत्रण करतो. यादरम्यान रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळावी. 
  •  पाते अवस्था सुरू झाल्यापासून यानंतरच्या प्रत्येक अमावास्येच्या साधारणत: ३-४ दिवस आधी निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी केल्यास बोंड अळीच्या पतंग शेतामध्ये येणे व अंडी घालणे या परावृत्त होत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. 
  •  गुलाबी बोंड अळी, अन्य अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी जैविक उपाययोजना बॅसिलस थुरिंजिएन्सिस ४ ग्रॅम अथवा बिव्हेरिया बॅसियाना ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी.
  •  रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) क्लोरपायरीफॉस अधिक सायपरमेथ्रिन (संयुक्त कीटकनाशक) २ मि.लि. अथवा इंडोक्झाकार्ब अधिक सायपरमेथ्रिन (संयुक्त कीटकनाशक) १.२ मि.लि. अथवा इंडोक्झाकार्ब अधिक ॲसीटामिप्रीड (संयुक्त कीटकनाशक) १ मि.लि. 
  • पानांवरील बुरशीजन्य व जिवाणूजन्य ठिपक्यांचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी, जैविक घटक :  व्हर्टिसिलियम ४ ग्रॅम अधिक मेटारायझीम ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीनंतर किमान एक आठवड्यापर्यंत रासायनिक घटकांची फवारणी करू नये. गुलाबी बोंड अळी व रस शोषक किडींसाठी कीटकनाशकाची फवारणीसोबत शिफारशीत बुरशीनाशक (उदा. मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर) आणि जिवाणूनाशक (उदा. स्ट्रेप्टोमायसीन* ०.१२५ ग्रॅम प्रति लिटर) यांचा वापर करता येईल.  - जितेंद्र दुर्गे,  ९४०३३०६०६७, (श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com