संवर्धन वन्यजीव प्रजातींचे...

जागतिक निसर्ग संरक्षण संघटनेने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार सुमारे ८४०० वन्यजीव प्रजाती धोक्याच्या पातळीवर आहेत. सुमारे ३०००० प्रजाती संकटग्रस्त होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाचा समतोल हा केवळ वन्यजीवांसाठी गरजेचा नसून मानवी अस्तित्वासाठी देखील महत्त्वाचा ठरतो म्हणून वन्यजीव संपदेचे संवर्धन समजून घेणे आवश्यक आहे.
Wildlife conservation is a need of the hour.
Wildlife conservation is a need of the hour.

जागतिक निसर्ग संरक्षण संघटनेने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार सुमारे ८४०० वन्यजीव प्रजाती धोक्याच्या पातळीवर आहेत. सुमारे ३०००० प्रजाती संकटग्रस्त होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाचा समतोल हा केवळ वन्यजीवांसाठी गरजेचा नसून मानवी अस्तित्वासाठी देखील महत्त्वाचा ठरतो म्हणून वन्यजीव संपदेचे संवर्धन समजून घेणे आवश्यक आहे. जगभर ३ मार्च हा दिवस “जागतिक वन्यप्राणी दिन” म्हणून साजरा केला जातो. १९७३ च्या जागतिक संकटग्रस्त वन्य प्राणी आणि वनस्पतीच्या आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधी परिषदेतील (CITES) ठरावास संयुक्त राष्ट्रांनी स्वाक्षरी केल्याची आठवण म्हणून २०१३ पासून वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी कटिबद्धतेचे प्रतीक म्हणून जागतिक पातळीवर वन्यप्राणी दिन साजरा केला जातो. या निमित्ताने मानव आणि वन्यजीव संघर्षाची किनार काही भागात गडद असताना नैसर्गिक परिसंस्थेच्या समतोल विकासासाठी संवर्धनाच्या उपाययोजनांचे चिंतन केले जाते. विविध कारणांनी मानवाकडून नैसर्गिक परिसंस्थेस हानी पोचविली जात आहे, ज्यामुळे वन्यजीव संपदा (प्राण्यांचे आणि वनस्पतीचे) अस्तित्व धोक्यात येत आहे. वन्यजीव संपदेस धोके  मानवी वसाहत मूलतः जंगलाच्या कुशीत आणि वन्यजीवांच्या सहचर्यात सुरू झालेली असल्याने आजही अनेक आदिवासी मानवी वसाहती खाद्य, इंधन, औषधी, निवारा इत्यादी अनेक बाबींच्या गरजेपोटी जंगलांच्या सान्निध्यात आहेत. त्यांची उपजीविका आणि आर्थिक संधी जंगलापासून उपजलेल्या विविध वस्तूंवर अवलंबून आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष अनेकदा बघायला मिळतो. अनेक दुर्मिळ वन्यजीव प्राण्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बेकायदेशीर छुप्या पद्धतीने तस्करी करून पैसे कमविण्याच्या खटाटोपात वन्यजीवांची शिकार होते. जंगलालगत शेती असणाऱ्या पशुपालकांना अधिवास, अन्न, निवारा या बाबीसाठी शोधत असणाऱ्या वन्य प्राण्यांकडून होणारी पिकांची नासाडी, पशुधनाची शिकार वगैरे समस्यांना तोंड द्यावे लागते. वन्यजीवांना असणाऱ्या बहुतांश धोक्यांमध्ये त्यांचे नैसर्गिक अधिवास अवैध जंगलतोडीने नष्ट होणे यांसह कातडी, नखे, सुळे वगैरे हस्तगत करण्यासाठी होणारी शिकार, विषबाधा, रस्ते अपघात यांसारखे मानवनिर्मित धोके मोठ्या प्रमाणावर असतात. दुर्गम व जंगल क्षेत्रात विकासकामांच्या रूपाने होणारे धरणे, महामार्ग बांधणी, सारख्या बाबींमुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक परीक्षेत्रात मानवी वावर मोठ्या प्रमाणात वन्यजीवांना त्रासदायक ठरतो. याशिवाय वणवा, प्रदूषण, मानव आणि पशुतील सामायिकपणे संक्रमित होणारे संसर्गजन्य रोग, वातावरणातील बदल इत्यादी घटक वन्यजीव संपदेस धोकादायक आहेत. वन्यजीव संरक्षणासाठी कायदे  भारतीय वन्यजीवांच्या संरक्षणार्थ शासकीय आणि बिगरशासकीय पातळीवर अनेक अंगांनी प्रयत्न केले जात आहेत. अवैध शिकार, जंगलतोड, तस्करी यांना आळा घालण्यासाठी संविधानिक कायदे व नियम केलेले आहेत. १९७२ मध्ये अस्तित्वात आलेला वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत राष्ट्रीय वन्यजीव उद्याने (एकूण १०४), वन्यजीव अभयारण्ये (एकूण ५४३) , व्याघ्र प्रकल्प, पक्षी अधिवास यांच्या माध्यमातून वन्यजीवांना अभय देण्यात येत आहे. प्रोजेक्ट टायगर(१९७३), प्रोजेक्ट एलिफंट(१९९३), इको डेव्हपमेंट प्रोजेक्ट, सुसर पैदास प्रकल्प (१९७५) अशा विशिष्ट प्रकल्पांतून अति संकटग्रस्त प्राण्यांना विशेष संरक्षण दिले जात आहे. भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून व संकटग्रस्त प्रजातीसाठी संवर्धन प्रयोगशाळा (सीसीएमबी), हैदराबाद सारख्या शासकीय संस्थेसह वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड, वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया, बीएनएचएस अशा अनेक नामांकित बिगरशासकीय संस्था संशोधन आणि लोकप्रबोधनाचे महत्त्वाचे काम करत आहेत. भारतात विविध शहरात असलेल्या वन्यप्राणी संग्रहालयाच्या, सर्पोद्यान माध्यमातून जनसामान्यात जनजागृतीचे कार्य केले जाते. महाराष्ट्रात वन्यजीवांच्या संरक्षणार्थ राष्ट्रीय उद्याने (एकूण ५- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली; पेंच, ताडोबा, नवेगाव, गुगामल), व्याघ्र प्रकल्प (एकूण ४- मेळघाट, ताडोबा- अंधेरी, पेंच, सह्याद्री), अभयारण्य (एकूण ३२) संरक्षित क्षेत्र आहेत. वन्यजीव संपदा ही निसर्गातील विस्तृत परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक असून वने, मानव यांचेशी सामायिकपणे जोडलेले असल्याने वन्यजीवांचे संरक्षण हे पुढील काळातील मानवी अस्तित्वासाठी देखील तितकेच आवश्यक आहे. वन्यजीव संपदेचे महत्त्व 

  • भारताच्या भौगोलिक वैविध्यतेमुळे आढळणाऱ्या वन्यजीव संपदा प्रजातींमध्ये विविधता आढळून येते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने २.४ टक्के भूभाग असलेल्या आपल्या देशात जगाच्या एकूण वन्यजीव संपदेच्या ८ टक्के वन्यजीव अधिवास करतात.
  • उत्तरेस हिमालयापासून ते दक्षिणेस हिंद महासागरापर्यंत विविध वन्य प्राणी आणि वनस्पती दिसून येतात. वेगवेगळ्या भूप्रदेशातील माती, पाणी, हवामान आणि लोकजीवन इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक जीवसृष्टीवर होत असतो. भारतीय जैवविविधता पाहता, हिमालय, पश्चिम घाट, अंदमान निकोबार बेटे, सुंदरबन सारखे भूभाग जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचे आहेत.
  •  जगातील जैविक विविधता संपन्न अशा प्रमुख १७ देशात भारताचा अग्रक्रम आहे. ११ बायोस्पीयर रिझर्व्ह आणि २६ रामसार (पाणथळ) स्थळे आहेत. वन्यजीव प्रजातीचे वैविध्य पहिले तर, भारतात सुमारे ४०० सस्तन प्राणी, २०६० पक्षी, ३५० सरीसरूप प्राणी, २१६ उभयचर आणि ३० लाख कीटकवर्ग नोंदविलेले आहेत. काळवीट, सोनेरी माकड (कपी), सिंहपृच्छ वानर, पिग्मी होग सारखे प्राणी जगाच्या पाठीवर केवळ भारतातच आढळतात.
  • एकट्या हरिण वर्गाचा विचार केल्यास ९ विविध प्रकारचे हरणाच्या प्रजाती (कस्तुरी, कोटरा, चितळ, बारसिंगा, सांबर, होग हरिण, थमीन, हंगल, संगई) आपणास दिसतात.
  • जंगली कुत्रे, रानम्हशी, गवे, हत्ती, गेंडे, सिंह आणि वाघ हे भारतीय वन्यप्राणी जगभरातील वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासकांचा आकर्षणाचा विषय आहेत.
  • बंगाली वाघ ः राष्ट्रीय वन्यप्राणी, मोर ः राष्ट्रीय पक्षी, गंगेतील डॉल्फिन ः राष्ट्रीय जलचर प्राणी आणि हत्ती ः राष्ट्रीय वारसा प्राणी आहे.
  • वन्यजीव संपदा संरक्षण  एखाद्या विशिष्ट भूभागात वन्यजीवांच्या एकूण संख्येपैकी विविध प्रजातींच्या पैदासक्षम प्राण्यांची सरासरी संख्या त्यांचे नैसर्गिक परिसंस्थेतील अस्तित्व दर्जा ठरवतात. धोक्याच्या पातळी बाहेर, संकटग्रस्त, नामशेष प्रवण, नष्ट अशा विविध प्रवर्गात वर्गवारी करता येईल. त्यानुसार दुर्मिळ वन्य प्रजातींना संरक्षण देण्याचे काम कायद्यान्वये वन विभागामार्फत केले जाते. विविध निसर्ग अभ्यासक, शास्त्रज्ञ यांच्या संशोधनातून संरक्षण पद्धतीचे नियोजन करण्यास मदत होते.

  • ‘आययूसीएन' या निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार भारतात आजमितीला एकूण १७२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. यात सस्तन प्राण्याच्या ५३, पक्ष्यांच्या ६९, सरीसृप २३ आणि उभयचर प्राण्याच्या ३ प्रजातींचा समावेश होतो.
  • पट्टेरी भारतीय वाघ, सिंह, जंगली मांजर, काश्मिरी काळवीट, राजहंस, माळढोक, कासव असे अनेक वन्यपशुपक्षी संकटग्रस्त आहेत.
  • काही प्रमुख वन्यजीव संरक्षक कायदे  वन्य पक्षी संरक्षण कायदा ः१८८७ हत्ती जतन कायदा ः१८७९ भारतीय मत्स्य कायदा ः १८९७ भारतीय वन कायदा ः १९२७ बॉम्बे वन्य पशू व वन्य पक्षी संरक्षण कायदा ः१९५१ प्राणी क्लेश प्रतिबंधात्मक कायदा ः १९६० वन्यजीव संरक्षण राष्ट्रीय प्रणाली ः १९७० वन्यजीव संरक्षण कायदा ः१९७२ (सुधारित १९९१) भारतीय जैवविविधता कायदा ः २००२ पशुवैद्यक क्षेत्राची भूमिका 

  •  वन्यजीवांच्या संरक्षणात पशुवैद्यक क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. वन्य प्राण्यांचे रोगनिदान, औषधोपचार, लसीकरण, भूल, शवविच्छेदन, फॉरेन्सिक चाचण्या अशा विविध प्रसंगी तज्ञ पशुवैद्यक गरजेचा आहे.
  • विविध भागातील वन्यजीव संपदेचे संरक्षण करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने पशुगणना, प्रजनन आणि आनुवंशिकता लक्षात घेत पैदास व्यवस्थापन, संसर्गजन्य रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय आणि वन्यजीव व्यवस्थापन करण्याहेतू पशुवैद्यकांचे शास्त्रीय दृष्टिकोन हे जीवशास्त्रज्ञांच्या समवेत योजनाबद्ध नियमावली करण्यासाठी दिशादर्शक ठरू शकतात.
  •  राज्य शासनाच्या वन विभाग आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून गोरेवाडा, नागपूर येथे साकारलेले ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर तसेच आयसीएमआर सह प्रस्तावित झुनोसिस सेंटर याप्रमाणे सर्पदंश लस निर्मितीसाठी हाफकिन संशोधन संस्था, मुंबई वगैरे संस्था वन्यजीव संपदा संरक्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत.
  • - डॉ. प्रवीण बनकर,९९६०९८६४२९ ( डॉ. प्रवीण बनकर हे स्नापप संस्था, अकोला येथे डॉ. पावशे वन्यजीव प्रशिक्षण संशोधन केंद्र, गोरेवाडा, नागपूर येथे कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com