उन्हाळी तीळ पिकाची लागवड

उन्हाळी तिळाची पेरणी ही जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. उशिरा पेरणी करणे टाळावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम प्रति किलो, तसेच ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
cultivation of summer sesame crop
cultivation of summer sesame crop

उन्हाळी तिळाची पेरणी ही जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. उशिरा पेरणी करणे टाळावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम प्रति किलो, तसेच ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पूर्व विदर्भात उन्हाळी हंगामात भाताचे (धान) पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सलग उन्हाळीनंतर खरिपात भात पीक घेतल्यामुळे पूर्व विदर्भात खरिपात भात पिकावर किडींचा प्रादूर्भाव वाढतो. व्यवस्थापन खर्च वाढतो. त्याच प्रमाणे उन्हाळी भात अधिक पाणी लागते. उन्हाळी भाताला पर्याय म्हणून उन्हाळी तीळ घेणे फायदेशीर ठरते. भंडारा जिल्ह्यामध्ये उन्हाळी तीळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तीळ हे कमी दिवसांत येणारे पीक असून, सलग, आंतरपीक व मिश्रपीक म्हणूनही घेता येते.  हवामान तीळ पीक हे सर्व हंगामात घेता येते. या पिकास २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान पोषक असून, येणाऱ्या पावसाचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.  जमीन तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. पाणी साचून ठेवणाऱ्या जमिनी या पिकास मानवत नाहीत.  पूर्वमशागत व भरखते जमीन चांगली तयार करावी. उभी-आडवी नांगरून चांगली भुसभुशीत करावी. काडी-कचरा वेचून शेत स्वच्छ करावे. उभळ (पटाल) फिरवून पेरणी करावी. पेरणीपूर्वी १० ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून जमिनीत मिसळावे. तीळ बियाणे बारीक असल्यामुळे पेरणी करताना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यासाठी पूर्व विदर्भातील जमिनीमध्ये भात पिकानंतर अन्य पिके घेताना जमिनीत निघालेली ढेकळे बारीक करून घ्यावीत. अन्यथा, तीळ बियाणे वर मातीचे ढेकूळ विरघळून दाबले जाते. उगवण होत नाही. तिळाचे सुधारित वाण व त्याचे गुणधर्म  

वाण   फुलोऱ्यावर येण्याचा कालावधी (दिवस) परिपक्व होण्याचा कालावधी (दिवस)  १००० दाण्याचे वजन (ग्रॅम) दाण्याचा रंग हेक्टरी उत्पादन (क्विंटल) तेलाचे प्रमाण (टक्के)
एकेटी-१०१ ४८     ८५-९२ ३.०-३.८  पांढरा     ७.५-८.५  ४८-४९
पीकेव्ही एनटी-११ ४३ ८६-१०९   ३.४  पांढरा    ६.०-१०  ४८-४९

हेक्टरी बियाण्याचे प्रमाण  उन्हाळी हंगामातील तिळाच्या पेरणीकरिता ३ ते ४ किलो बियाणे प्रति हेक्टर वापरावे. बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम प्रति किलो, तसेच ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पेरणीची वेळ उन्हाळी तिळाची पेरणी ही जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. उशिरा पेरणी करणे टाळावे. पेरणी पद्धत तिळाचे बियाणे बारीक असल्याने त्यात समप्रमाणात वाळू किंवा गाळलेले शेणखत किंवा राख किंवा बारीक माती मिसळून पेरणी करावी. सलग लागवडीकरिता पेरणी पाभरीने किंवा तिफनीने ३० सें.मी. अंतरावर करावी. तिळाची बांधावरील लागवड टोकण पद्धतीने करावी. तीळ हे आपत्कालीन पीक म्हणूनही उपयुक्त ठरते. त्याची आंतरपीक आणि मिश्र पीक म्हणूनही लागवड करता येते. आंतरपीक पद्धतीमध्ये तीळः मूग (३ः३) हे प्रमाण फायदेशीर आढळले आहे. रासायनिक खतांची मात्रा व वेळ

  • पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (१२.५ किलो प्रति हेक्टर) व पूर्ण स्फुरद (२५ किलो प्रति हेक्टर) देऊन पेरणीनंतर ३० दिवसांनी उरलेल्या नत्राची (१२.५ किलो प्रति हेक्टर) मात्रा द्यावी. पेरणी वेळेस झिंक व सल्फर (या सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता असल्यास प्रत्येकी २० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे. उत्पादनात वाढ होते. 
  • रासायनिक खत मात्रेसोबतच पीक फुलांवर असताना व बोंड्या धरण्याच्या वेळी डी.ए.पी. २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी. 
  • विरळणी किंवा खाडे भरणे पेरणीनंतर ७-८ दिवसांनी खाडे भरावेत. पेरणीनंतर १५-२० दिवसांनी पहिली व ८ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपात १०-१५ सें.मी अंतर ठेवावे. म्हणजे शेतात हेक्टरी २.२५ ते २.५० लाख रोपांची संख्या राहील. आंतरमशागत व तण व्यवस्थापन आवश्यकतेनुसार २-३ कोळपण्या किंवा खुरपण्या देऊन घ्यावेत. निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ओलित व्यवस्थापन उन्हाळी पिकास किंवा अर्ध-रब्बी पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब ओलित करावे. त्यानंतर जमिनीच्या पोतानुसार १२ ते १५ दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरुवात होताना व बोंड्या भरताना ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. या काळात संरक्षित ओलित द्यावे. ओलित करताना पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. कापणी तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून बी सांडते. नुकसान होते. त्यामुळे कापणी वेळेवर करावी. झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरुवात होताच पीक कापणीस तयार झाले असे समजावे.  मळणी

  • कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात. ३ ते ४  दिवसांनी बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या साह्याने तीळ झाडावेत. काही बोंड्या तडकल्या नसल्यास ४ ते ५ दिवसांनी परत पेंड्या झाडाव्यात. बियाणे स्वच्छ करून व वाळवून साठवावे.
  • हेक्टरी उत्पादन ः तिळाच्या पिकापासून हेक्टरी ६ ते १० क्विंटल उत्पादन मिळते.
  • संपर्क - डॉ. एन. एस. वझिरे, ८००७७७५६१३ कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, भंडारा (साकोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com