कोरडवाहू क्षेत्रात किफायतशीर पीक शेवगा

शेवग्या सर्व प्रकारचे हवामान मानवते. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. पावसाचे प्रमाण चांगले असलेल्या ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो. कोकणातील शेवगा तर केवळ पावसावरच येतो.
कोरडवाहू शेतीमध्ये शेवगा लागवड फायदेशीर ठरू शकते.
कोरडवाहू शेतीमध्ये शेवगा लागवड फायदेशीर ठरू शकते.

शेवग्या सर्व प्रकारचे हवामान मानवते. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. पावसाचे प्रमाण चांगले असलेल्या ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो. कोकणातील शेवगा तर केवळ पावसावरच येतो. महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रामध्ये बऱ्याच जमिनी हलक्या बरड असल्याने पडीक आहेत अशा जमिनीत शेवग्याची लागवड निश्‍चितच फायदेशीर ठरू शकते. शेवगा शेंगात व पानात अ आणि क ही जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, लोह व प्रथिनेही मुबलक असतात. वाळलेल्या शेंगांतील बियांपासून तेल काढलेले तेल (बेन ऑइल) सांधेदुखीवर उपयुक्त आहे. शेवग्याची मुळे, फुले, पाने व सालीचा वापर आयुर्वेदिक औषधांत केला जातो. हवामान व जमीन   शेवग्या सर्व प्रकारचे हवामान मानवते. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. पावसाचे प्रमाण चांगले असलेल्या ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो. कोकणातील शेवगा तर केवळ पावसावरच येतो. पश्‍चिम महाराष्ट्रात कोरडवाहू क्षेत्रात तर मराठवाडा आणि विदर्भातील भारी काळ्या जमिनीतही लागवड केली जाते. जाती   चांगल्या शेंगेची लांबी ५० ते ६० सें.मी., भरपूर गराची असते. कडवट चवीच्या शेंगेस दर मिळत नाही. शेंगा काढल्यानंतर त्याचा तजेला २-३ दिवस टिकून राहावा. दोन्ही हंगामांत भरपूर शेंगा देणारे एखादे झाड निवडून त्याच्या फाट्यापासून लागवड करता येते. काहीशा दुर्लक्षित अशा पिकाच्या तमिळनाडू कृषी विश्‍वविद्यालय, कोइमतूर या संस्थेने कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१, आणि पी.के.एम.-२ या लवकर शेंगा येणारे व भरपूर प्रथिने असलेले वाण प्रसारित केलेले आहेत. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण रुचिरा हे वाण प्रसारित केलेले आहे. या जातीचे झाडे ५ ते ६ मीटर उंच असून झाडास १६ ते २२ फांद्या असतात. बागलकोट (कर्नाटक) येथील विद्यापीठाने ‘भाग्या’ ही जात अधिक उत्पादनक्षम मानली जाते. लागवड   पावसाळ्यापूर्वी ६० सें.मी.लांब, रुंद आणि खोल खड्डे घ्यावेत. खड्ड्यांमध्ये चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, १५:१५:१५ (२५० ग्रॅम) आणि ट्रायकोडर्मा प्लस पावडर ५० ग्रॅम मिसळून खड्डा भरून घ्यावा. दोन झाडे व ओळींतील अंतर २.५ ते ३ मीटर ठेवावे. शेवग्याची रोपे अभिवृद्धी फाटे कलम व बियांपासून तयार केली जातात. बियांपासून केलेल्या  लागवडीत मातृवृक्षाप्रमाणे गुणधर्म असलेली झाडे मिळण्याची शक्यता कमी असते. बियांपासून केलेल्या झाडांना फाटे कलमाच्या तुलनेने शेंगा ३ ते ४ महिने उशिरा मिळतात. फाटे कलमापासून लागवडीसाठी ५ ते ६ सें.मी. जाडीच्या सुमारे १ ते १.२५ मीटर लांबीच्या फांद्या वापरतात. लागवडीचा हंगाम  कमी पावसाच्या प्रदेशात (खरिपात) जून-जुलैमध्ये पहिल्या पावसानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो. हवेतील आर्द्रता वाढते. अशी हवा फाटे कलम फुटण्यास किंवा रोपे रुजण्यास अनुकूल असते. याचवेळी शेवगा लागवड करावी. फाटे कलम अथवा रोपे लावल्यावर त्याच्या जवळील माती पायाने चांगली दाबावी. हातपाणी द्यावे. लागवडीनंतर ६ ते ८ महिने गरज पडेल तेव्हा पाणी देऊन झाडे जगवावी. किंवा झाडाच्या प्रत्येक खड्ड्यात २ ते ३ लिटर पाणी बसणाऱ्या मडक्याच्या तळाशी छिद्र करून, कापडाची लहान वात घालून ते मडके जमिनीत गळ्यापर्यंत गाडावे. त्यामध्ये ५-६ दिवसांच्या अंतराने पाणी टाकावे. शक्य असल्यास ठिबक सिंचन पद्धतही वापरता येते. लागवडीनंतर घ्यावयाची काळजी 

 • झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावीत. दोन झाडांच्या ओळीत वखरणी केल्यास तणांचा उपद्रव होत नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरेल. 
 • प्रतिवर्षी प्रति झाड पावसाळ्याच्या सुरुवातीला १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद, (३१२ ग्रॅम सुपर फॉस्फेट) व ७५ ग्रॅम पालाश (१२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. 
 • झाडे झपाट्याने वाढत असल्यामुळे छाटणी करून आकार द्यावा. अन्यथा, झाड उंच वाढून शेंगा काढणी अवघड होते. यासाठी लागवडीनंतर दोन ते अडीच महिने किंवा मुख्य खोड ३ ते ४ फूट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी. या वेळी खोड जमिनीपासून १ मीटर अंतरावर छाटावे. चार दिशेला चार फांद्या वाढू द्याव्यात. त्यानंतर पुन्हा ३-४ महिन्यांनी चारही फांद्या मुख्य खोडापासून एक मीटर अंतरावर छाटाव्यात. यामुळे झाडाचा मुख्य आराखडा तयार होईल. झाडांची उंची कमी राहून शेंगा काढणे सोपे जाईल. उत्पादन वाढेल. दर दोन वर्षांनी एप्रिल-मे महिन्यांत शेंगा निघाल्यावर छाटणी केल्यास झाड नियमित उत्पादन देते. 
 • - सोमनाथ पवार,   ९९२२५७२९५३ (सहायक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  logo
  Agrowon
  www.agrowon.com