नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापन

नारळाचे झाड लागवड केल्यानंतर ६० ते ८० वर्षे चांगल्या प्रकारे उत्पादन देते. झाडापासून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी योग्यप्रकारे खत,पाणी व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे.
Apply proper amount of fertilizers in coconut orchard.
Apply proper amount of fertilizers in coconut orchard.

 नारळाचे झाड लागवड केल्यानंतर ६० ते ८० वर्षे चांगल्या प्रकारे उत्पादन देते. झाडापासून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी योग्यप्रकारे खत,पाणी व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे.  नारळ जाती आणि नारळ झाडाचे शरीरविज्ञानशास्त्र जाणून घेणे गरजेचे आहे. जातीनुसार नारळाला फळधारणा ४ ते ७ वर्षांत सुरु होते. त्यानंतर मात्र नारळ झाडाला दर महिन्याला एक पान आणि एक फुलोरा (पोय) येत असते. यामध्ये हवामानाच्या विविध घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे या दिवसामध्ये देखील फरक पडत असतो. परंतु त्या फुलोऱ्याला फळ लागणे हे सर्वस्वी आपल्या मशागतीवर अवलंबून असते.

  • जातीनुसार फळधारणा सुरु झाल्यावर पहिल्या ६ ते ७ फुलोऱ्यांना (पोयीना) अनेक वेळा अजिबात फळे लागत नाही तर काही वेळा एखादं दुसरे फळ लागते. त्याचप्रमाणे फुलाचा तुरा बाहेर पडल्यापासून पहिल्या दोन महिन्यात गळीचे प्रमाण जास्त असते.  फळधारणा झाल्यापासून दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात गळीचे प्रमाण उच्चांक गाठते. 
  • कमी जास्त प्रमाणात वर्षभर फळगळ होत असते. तसेच पोयीचा (फुलोऱ्याचा) गर्भधारणा कालावधी हा ३२ ते ३६ महिन्यांचा असतो. त्यामुळे या कालावधीत त्याच्यावर होणारे निसर्गातील, वातावरणातील बदल महत्त्वाचे ठरतात. त्याचप्रमाणे याच कालावधीत अन्न आणि पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. यासाठी लागत्या नारळ झाडांना जातीनुसार खालील प्रमाणे खते द्यावीत.
  • शिल्लक २/३ नत्र आणि पालाश खतांची मात्रा समान हप्त्यात विभागून ऑक्टोबर, फेब्रुवारीमध्ये द्यावी.
  • एरिओफाईड माईट किडीचा प्रार्दुभाव नियंत्रणासाठी १० किलो निंबोळी पेंड दोन समान हप्त्यामध्ये विभागून द्यावी.
  • नारळ पिकात नत्र आणि पालाश अन्नद्रव्यांची गरज अनन्य साधारण आहे. अनेक वेळा बाजारात पालाश खत उपलब्ध होत नाही ते उपलब्ध करून घ्यावे. नसेल तर ज्यामध्ये तीनही घटक (नत्र, स्फुरद, पालाश) आहेत अशा मिश्र खतांचा वापर तीन हप्त्यात करावा.
  • खत देताना नारळ मुळांचा विचार करण्याची गरज आहे. मोठया नारळाची ८५ टक्के अन्न शोषून घेणारी मुळे ही खोडापासून आडवी १.८ मीटर आणि ९० ते १२० सें.मी. खोलीपर्यंत वाढतात. लागवडीपासून विचार केला तर ही मुळे दरवर्षी ३० सें.मी. वाढून ५ व्या वर्षी १.८० मीटरपर्यंत पसरतात.
  • नारळाची मुळे नारळ बुंध्यापासून गोलाकार पसरलेली असतात. त्यामुळे त्याला गोलाकार आळे तयार करून खते द्यावीत. यासाठी मोठ्या नारळ झाडास आळे करताना बुंध्यापासून ४५ सें.मी. त्रिजेचे गोलाकार अंतर सोडावे आणि पुढील १ ते १.३५ मीटर जागेत गोलाकार बशीसारखे आळे तयार करावे. त्यासाठी नारळ झाडाकडे तोंड करून उभे राहावे आणि माती फावड्याने आपल्याकडे ओढावी. आळ्याची मधील खोली ८ सें.मी. तर कडेने ६ सें.मी. असावी. यावेळी नारळ झाडाची मुळे तुटली तरी हरकत नाही ही तंतूमय मुळे असल्याने त्यावर विपरीत परिणाम होत नाही. 
  • आळे पद्धतीने खते जून महिन्यात द्यावीत. यावेळी शिफारस केलेली खते त्याचप्रमाणे बागेतील काडीकचरा आळ्यात टाकावा. त्यावर माती ओढावी त्यामुळे पालापाचोळा आणि शेणखत चांगले कुजेल. ऑक्टोबरमध्ये आळे करावे. त्यासाठी आळ्यातील चांगली माती बांधासाठी न वापरता आळ्याच्या बाहेरील माती घेऊन आळयाचा बांध करावा.
  • ऑक्टोबर / फेब्रुवारीचा खताचा हप्ता आळ्यात सभोवताली पसरून टाकावा आणि टिकाव किंवा विळ्याच्या साहाय्याने मातीत मिसळून पाणी द्यावे.
  • ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे असेल तर ज्याठिकाणी ठिबकचे पाणी पडते तेथे ऑक्टोबर आणि फेब्रुवारीतील खते देऊन मातीत मिसळावीत.
  • सेंद्रिय पद्धतीने खतमात्रा 

  • बागेतील झावळ्या आणि इतर काडीकचरा, गवत यांचा उपयोग करून गांडूळखत तयार करावे आणि त्याचा वापर करावा. नारळ झावळांपासून २२ ते २५ किलो गांडूळखत तयार करता येते.
  • मोठ्या झाडांच्या आळ्यात वळीवाचा पाऊस सुरु होताच मे महिन्याचे शेवटी धैंचा अगर ताग पेरावा आणि तो आळ्यात गाडावा. यामधून हिरवळीचे १५ ते २० किलो खत मिळू शकते.
  •  बागेच्या कुंपणाच्या कडेला गिरिपुष्पाची लागवड करून त्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर करावा.
  • फुलोऱ्यातील अडचणी आणि उपाय

  • जातीनुसार फुलोरा येत नसेल तर कुठेतरी आपल्या मशागतीमध्ये दोष आहे असे समजावे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन नारळ झाडातील अंतर योग्य असणे आवश्यक आहे. नारळाची बाग तयार करताना दोन झाडांमध्ये ७.५ X ७.५ मीटर (२५ X २५ फूट) अंतर आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुंपणाच्याकडेने, रस्त्याच्या बाजूने एकाच ओळीत लागवड करावयाची झाल्यास २० फूट अंतर ठेवले तरी चालू शकते. येथे नारळाच्या झावळयांचा विचार करण्याची गरज आहे. 
  • नारळाच्या झावळ्या एकमेकांमध्ये गुंतता कामा नयेत. त्याला योग्य प्रकारे सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे आहे. लागवडीनंतर दोन उन्हाळी हंगाम नारळास सावली लागते त्यांनतर मात्र त्याला आयुष्यभर सुर्यप्रकाशाची गरज असते. निसर्गाने नारळांचे झावळीची रचना देखील अशा प्रकारे केली आहे की सर्व झावळांना योग्य प्रकारे सूर्यप्रकाश मिळेल.
  • आपण कमी अंतरावर लागवड केल्यास नारळ झाडे सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी एकमेकात स्पर्धा करतात आणि अल्पावधीत उंच वाढतात. त्यांना फळधारणा होण्यास उशीर लागतो. ज्यावेळी ते वेडीवाकडी वाढून सूर्यप्रकाशात पोचतात त्यावेळी त्यांना फुलोरा येण्यास सुरवात होते. यामध्ये १२ ते १५ वर्षांचा कालावधी लागतो. शेती बांध, कातळ, पाण्याच्या पाटावर लागवड केल्यास सूर्यप्रकाश, मुळांची वाढ यावर विपरीत परिणाम होऊन झाड उशिरा उत्पादन देतात.
  • पाणी व्यवस्थापन 

  •  पाण्याची गरज ही जमिनीचा मगदूर आणि झाडाचे वय यावर अवलंबून असते. कोकणात पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते मे या कालावधीत नारळाला पाण्याची गरज असते. 
  •  आळे पद्धतीने पाणी देताना हिवाळ्यात १६० ते १८० लिटर तर उन्हाळ्यात २०० ते २४० लिटर पाणी चार दिवसाच्या अंतराने देणे गरजेचे आहे. परंतु लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी हिवाळ्यात ३० ते ३५ लिटर आणि उन्हाळ्यात ४० ते ४५ लिटर पाणी आळे पद्धतीने चार दिवसांनी द्यावे. आणि हेच प्रमाण दरवर्षी वाढवत जाऊन पाचव्या वर्षी आणि पुढे वरील प्रमाणे हिवाळ्यात १६० ते १८० लिटर आणि उन्हाळ्यात २०० ते २४० लिटर पाणी चार दिवसाच्या अंतराने द्यावे.
  • सुरवातीपासून ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे असेल तर पहिल्या वर्षी हिवाळ्यात ६ ते ७ लिटर तर उन्हाळ्यात ८ ते १० लिटर पाणी दररोज द्यावे. ते दरवर्षी वाढवत जाऊन पाचव्या वर्षी हिवाळयात ३० ते ३५ लिटर आणि उन्हाळ्यात ४० ते ४५ लिटर पाणी दररोज द्यावे.
  • बागेत जलसंधारण 

  •  वर्षातून दोनवेळा पावसाच्या सुरवातीस आणि अखेरीस बागेची नांगरट करावी.
  • प्रत्येक नारळाच्या आळ्यात उपलब्धतेनुसार सोडणाचा भुसा, हिरवा पाला, वाळलेला पालापाचोळा, गवत, नारळ झावळयांचे तुकडे यांचा आच्छादन म्हणून वापर करावा.
  • शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळखत, हिरवा पाला यांचा वापर करावा.
  • झाडाच्या आळ्यात चर खोदून सोडणे गाडावीत. शिफारशीनुसार पालाश खतांचा वापर करावा.
  •  नारळ जातीनुसार फुलोरा 

  • नारळाच्या जातीनुसार फुलोरा येत असतो. ठेंगू जातीमध्ये फुलोरा ३.५ ते ४ वर्षांनी येतो. यामध्ये चौघाट ऑरेंज डॉर्फ, चौघाट ग्रीन डॉर्फ आणि मलायन ग्रीन डॉर्फ आणि मलायन यलो डॉर्फ यांचा समावेश आहे. यांचे आयुष्य ३० ते ३५ वर्षाचे असून खोबऱ्याची प्रत चांगली नाही, परंतु शहाळे पाणी म्हणून वापर होईल.
  • उंच जातींमध्ये फुलोरा ६ ते ७ वर्षांनी येतो. यामध्ये  बाणवली, लक्षद्वीप, ईस्ट कोस्ट टॉल, प्रताप केरा बस्तर जातींचा समावेश आहे.यांचे आयुष्य ७० ते ९० वर्ष किंवा त्याहून अधिक आहे. खोबऱ्याची प्रत चांगली असते.
  • संकरित जातींमध्ये फुलोरा ४ ते ५ वर्षांत येतो. यामध्ये  टी X डी, डी X टी, कोकण भाटये नं.१ इ.जातींचा समावेश आहे. यांचे आयुष्य ६० ते ८० वर्ष असते. खोबऱ्याची प्रत चांगली असते.
  • - डॉ.दिलीप नागवेकर,  ९४२११३७७६९ (माजी कृषिविद्यावेत्ता,प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,भाटये,जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com