निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामध्ये अन्नद्रव्ये, संजीवकांची योग्य वापर गरजेचा

सध्या द्राक्ष विभागामध्ये ५० टक्क्यांपर्यंत फळछाटणी झाल्याचे चित्र आहे. फळछाटणी घेऊन चांगल्या प्रतीची द्राक्षे मिळवणे हा महत्त्वाचा उद्देश असतो. त्यानुसार नियोजन केले जाते. यामध्ये जमिनीची परिस्थिती व त्यानुसार वेलीचे पोषण अन्नद्रव्यांच्या माध्यमातून करणे गरजेचे असते. वेलीचे पोषण चांगले झाले तरी घडाच्या विकासात मात्र संजीवकेही तितकीच महत्त्वाची असतात.
Proper nutrient management promotes good growth of grape vines.
Proper nutrient management promotes good growth of grape vines.

सध्या द्राक्ष विभागामध्ये ५० टक्क्यांपर्यंत फळछाटणी झाल्याचे चित्र आहे. फळछाटणी घेऊन चांगल्या प्रतीची द्राक्षे मिळवणे हा महत्त्वाचा उद्देश असतो. त्यानुसार नियोजन केले जाते. यामध्ये जमिनीची परिस्थिती व त्यानुसार वेलीचे पोषण अन्नद्रव्यांच्या माध्यमातून करणे गरजेचे असते. वेलीचे पोषण चांगले झाले तरी घडाच्या विकासात मात्र संजीवकेही तितकीच महत्त्वाची असतात. घडाच्या विकासात अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते. वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यासाठी वेलीची मुळेही सक्षम असावी लागतात. जोपर्यंत मुळे कार्यरत होत नाही, तोपर्यंत अन्नद्रव्यांची पूर्तता करूनही उपयोग होत नाही. फळछाटणीसाठी पानगळ करण्याच्या कालावधीमध्ये बोद उकरावेत. त्यामध्ये शेणखत, पिकांचे अवशेष किंवा कंपोस्ट भरून बोद झाकून घ्यावेत. छाटणी झाल्यानंतर डोळे फुटून पान बाहेर येते, तेव्हापर्यंत या बोदातील मुळे कार्य करण्यास सक्षम होतात. द्राक्ष बागेत हीच कार्यक्षम पांढरी मुळे मोलाची भूमिका निभावतात. त्याच्या आधीच्या कालावधीत अन्नद्रव्ये ही काडी आणि ओलांड्यातून घेतली जातात.  फळछाटणीपूर्वी जमिनीतील अन्नद्रव्यांची स्थिती समजून घ्यावी. माती परीक्षण करून नेमक्या कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, किंवा विपरीत परिस्थिती किती प्रमाणात आहे, हे लक्षात येईल. बऱ्याच बागेत जमिनीत चुनखडी कमी अधिक प्रमाणात दिसून येते. काही ठिकाणी पाण्यामध्ये क्षार अधिक आढळतात. जमिनीतील चुनखडीच्या उपलब्धतेमुळे अन्य महत्त्वाची अन्नद्रव्ये उदा. स्फुरद, फेरस, मॅग्नेशिअम आणि पालाशचे वहन होत नाही. त्यामुळे पानावर कमतरता दिसून येतात. परिणामी, उत्पादनामध्ये घट येते. पाण्यामध्ये क्षार उपलब्ध असल्यामुळे वेलीने उचलून घेतल्यानंतर पानांवर स्कॉर्चिंग होऊन पाने जळल्याप्रमाणे दिसतात. या स्थितीमध्ये पानांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण कमी होऊन प्रकाश संश्‍लेषणामध्ये अडचणी निर्माण होतात. अशा वेळी वेलीची वाढ खुंटते, दोन पेऱ्यांतील अंतर कमी होऊन पानांचा आकारही कमी होतो. त्यामुळे घडाचा विकास थांबतो. चुनखडीच्या प्रमाणानुसार गंधकाचा वापर फायद्याचा ठरेल. 

  •  जवळपास पाच टक्के चुनखडी असलेल्या बागेत २५ ते ३० किलो गंधक शेणखतात मिसळून द्यावे. 
  •  ५ ते ८ टक्क्यांपर्यंत चुनखडी असल्यास ४० ते ५० किलो गंधक प्रति एकर वापरावे. 
  •  त्यापेक्षा जास्त चुनखडीचे प्रमाण असलेल्या बागेत जवळपास ८० ते १०० किलो प्रति एकरी गंधकाचा वापर करावा लागेल. 
  •  अशा परिस्थितीत प्रत्येक हंगामात दोन ते तीन वर्षे सलग गंधकाची उपलब्धता केल्यास जमिनीचा सामू कमी होण्यास मदत होईल. 
  • पाण्यामध्ये क्षार असल्यास, जिप्सम १५० ते २०० किलो प्रति एकर या प्रमाणे जमिनीत मिसळावे. पाण्यात क्षार व जमिनीत चुनखडी दोन्ही असल्याच्या स्थितीत फक्त सल्फर वापरावे. चुनखडी असलेल्या जमिनीमध्ये लगेच परिणाम मिळणार नाहीत. पानांवर अन्नद्रव्याची कमतरता यावेळी दिसून येईल. तेव्हा फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेट प्रत्येकी २ ग्रॅम प्रति लिटर  (सात ते आठ पाने अवस्थेत) फवारणीद्वारे द्यावे. जमिनीतून द्यावयाचे झाल्यास फेरस सल्फेट १० ते १२ किलो प्रति एकर व मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो प्रति एकर या प्रमाणात द्यावे.  मणी सेटिंगपर्यंत सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करण्यास हरकत नाही. मात्र त्यानंतर मण्यावर स्कॉर्चिंग येण्याची शक्यता असल्यामुळे फवारणी शक्यतो टाळावी. फुलोरा अवस्थेत पान व देठ परीक्षण करणे महत्त्वाचे असते. पूर्ण फुलोरा अवस्थेत घडाच्या विरुद्ध बाजूचे पान घेऊन देठ अलग करावा. एक एकर बागेतून १०० ते १२० देठ परीक्षणासाठी पुरेसे होतील.  संजीवकांचा वापर घडाच्या विकासात संजीवके महत्त्वाची भूमिका निभावतात. निर्यातक्षम प्रतिचा घड, तसेच उत्तम प्रतिचा बेदाणा तयार होण्यासाठी  प्री ब्लूम अवस्थेत घडाचा विकास करून घेणे गरजेचे असते. या वेळी जिबरेलिक अॅसिड (जीए३) वापर महत्त्वाचा असतो. पोपटी रंगाचे घड असताना (फळछाटणीनंतर १७ ते २० दिवस) जीए ३ ची १० पीपीएम प्रमाणात फवारणी करावी. त्यानंतर पाच दिवसांनी जीए २ ची १५ पीपीएम तीव्रतेची दुसरी फवारणी करावी. जीए ३च्या वापरामुळे पेशींचे विभाजन होते. पेशींचा आकार वाढतो. परिणामी, दोन पाकळ्यांतील अंतर व पाकळीची लांबीही वाढते. जीए ३ च्या फवारणीची कार्यक्षमता वाढण्यासाठी युरिया फॉस्फेट किंवा सायट्रिक अॅसिड मिसळून द्रावणाचा सामू (५.५ ते ६ पर्यंत) नियंत्रणात आणावा. मुख्य म्हणजे फवारणी करिता वापरलेल्या पाण्याचा सामू ७ पर्यंत असावा.  साधारणतः ४ वाजल्यानंतर (आर्द्रता ६० टक्क्यांपेक्षा अधिक असताना) पानांद्वारे द्रावण शोषण्याची क्षमता जास्त असते. या वेळी फवारणी केल्यास फवारणी द्रावणाचे शोषण चांगले होते.  लांब मण्याच्या द्राक्ष जातीकरिता संजीवकांचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जातो. प्रीब्लूम अवस्थेत जीए ३ च्या फवारणीव्यतिरिक्त फुलोरा अवस्थेमध्ये जीए ३ च्या फवारण्या केल्यास मण्याची लांबी वाढण्यास मदत होते. या वेळी २५ टक्के फुलोरा अवस्थेत (२० पीपीएम जीए३), ५० टक्के फुलोरा अवस्थेत (२० पीपीएम जीए३), ९० ते १०० टक्के फुलोरा अवस्थेत (४० ते ५० पीपीएम जीए३) वापर करावा. जीए ३ चे परिणाम चांगले मिळण्याकरिता फवारणीपूर्वी झिंक आणि बोरॉन प्रत्येकी अर्धा ग्रॅम (चिलेटेड किंवा ऑक्साइड स्वरूपातील) फवारणी करावी.  बऱ्याच बागेत पानगळ झाल्यानंतर हायड्रोजन सायनामाइडचा वापर फवारणीद्वारे करण्यात आला. मात्र डोळे मागे पुढे फुटल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. यामध्ये हायड्रोजन सायनामाइडच्या फवारणीपेक्षा पानगळ व्यवस्थित झाली नसावी, छाटणीवेळी डोळे एकसारखे फुगलेले नसावेत किंवा बागेत कमी अधिक जाडीच्या काड्या जास्त प्रमाणात असतील. अशी परिस्थिती असलेल्या बागेत पुढील छाटण्यामध्ये पानगळ व्यवस्थितच झाली असल्याची खात्री करावी. हायड्रोजन सायनामाइड फवारणीऐवजी योग्य काळजी घेऊन हाताने पेस्टिंग करावे. तापमानात पुढे घट होईल, तेव्हा पेस्टिंगची मात्रा वाढवावी.  - डॉ. ए. के. उपाध्याय,  ९८९००७७७२१ डॉ. आर. जी. सोमकुंवर,  ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com