कमाल, किमान तापमानातील तफावतीमुळे द्राक्ष बागेत जाणवणाऱ्या समस्या

सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत तापमानामध्ये वाढ होत असताना दिसून येते. दिवसाचे तापमान जास्त (३५ अंश सेल्सिअस) वाढत असून, रात्रीच्या तापमानामध्ये तेवढीच घट (१० अंश सेल्सिअसपर्यंत) होत असताना दिसते. या तापमानामध्ये बऱ्यापैकी तफावत राहत असल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम द्राक्ष बागेत दिसून येतील. त्या परिणामांमुळे येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ.
कमाल, किमान तापमानातील तफावतीमुळे द्राक्ष बागेत जाणवणाऱ्या समस्या
grapes advisory

सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत तापमानामध्ये वाढ होत असताना दिसून येते. दिवसाचे तापमान जास्त (३५ अंश सेल्सिअस) वाढत असून, रात्रीच्या तापमानामध्ये तेवढीच घट (१० अंश सेल्सिअसपर्यंत) होत असताना दिसते. या तापमानामध्ये बऱ्यापैकी तफावत राहत असल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम द्राक्ष बागेत दिसून येतील. त्या परिणामांमुळे येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ. द्राक्ष घडाचा सुकवा   दिवसा वाढत असलेली उष्णता व रात्रीची थंडी यामुळे तापमानामध्ये तफावत दिसून येत आहे. वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचे संतुलन कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस व किमान तापमान १५ ते २० अंश सेल्सिअस असताना साधले जाते. अशा वेळी वेलीची प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया सुरळीत चालते. सध्या जाणवत असलेल्या तापमानातील अधिक तफावतीमुळे वेलीमध्ये समस्या येऊ शकतात. तापमानामध्ये अचानक बदल घडल्यामुळे मुख्यतः द्राक्षवेलीची पाणी, अन्नद्रव्यांची गरज आणि त्यांची उपलब्धता यांचा समतोल बिघडतो. मुख्यतः वाढत्या तापमानामध्ये पानांमधून बाष्पोत्सर्जनामुळे पाणी निघून जाते. परिणामी, वेलीची पाण्याची गरजही तितकीच वाढते. घडाच्या विकासामध्ये पाण्यासोबतच अन्नद्रव्याचीही तितकीच गरज असते. याचाच अर्थ जर वेलीची पाण्याची गरज वाढली असेल, तर अन्नद्रव्याचीही गरज तितकीच वाढलेली असू शकते. तेव्हा बागायतदारांनी वेलीची पाण्याची गरज समजून घेण्यासाठी बोद किती मोकळे आहेत किंवा मुळांच्या कक्षेमध्ये पाणी किती प्रमाणात साचलेले आहे, याची तपासणी करून घेणे महत्त्वाचे असेल. शास्त्रीय अंदाजासोबतच आपला स्वतःचा मागील अनुभवही महत्त्वाचा असतो. बाग वाफसा स्थितीत आहे, याचा अर्थ वेलीला पाण्याची फारशी गरज नाही. मात्र बाग वाफसा स्थितीत नसल्यास वेलीला पाण्याची गरज लागेल. द्राक्ष वेलीला तीन ते चार दिवसांचा पाण्याचा ताण बसल्यास घडाचा १५ ते २० दिवसांचा विकास कमी होतो. माती वाफसा स्थितीत आहे का, हे समजून घेण्यासाठी मुळांच्या कक्षेतील मातीचा गोळा करून जवळपास तीन फूट अंतरावरून फेकावा. हा गोळा फुटल्यास वेलीला त्वरित पाणी द्यावयाची गरज आहे, अन्यथा वेलीला लगेच पाण्याची गरज नसल्याचे समजावे.  बऱ्याच वेळी वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा खंडित होतो. घडाच्या विकासामध्ये पाणी उतरण्याच्या वेळी मुख्यतः स्फुरद, कॅल्शिअम व मॅग्नेशिअम या अन्नद्रव्याची गरज असते. तर फळामध्ये गोडी उतरण्याकरिता पालाश या अन्नद्रव्याची गरज असते. जर वातावरणात बदल झाल्यास मुळांच्या कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होतात. याचाच अर्थ, किमान तापमानात घट झाल्यास मुळांद्वारे अन्नद्रव्य घेण्याची प्रक्रिया मंदावते. मण्यात पाणी उतरतेवेळी अचानक असे बदल झालेल्या बऱ्याच बागेत सुकवा होत असल्याचे दिसून येईल. द्राक्ष घडाच्या विकासात वाढत असलेली प्रमुख अन्नद्रव्याची (स्फुरद, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम) गरज हेच त्याचे प्रमुख कारण असते. एकदा सुकवा आल्यानंतर मण्याच्या पेशी ढिल्या झालेल्या असल्यामुळे फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्याची उपलब्धता करूनही फारसा फायदा होत नाही. कारण त्यात अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी टाळावी. शक्य होत असल्यास ठिबकद्वारे अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरच भर द्यावा. वास्तविक या वेळी त्याचाही फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे बागेत पाणी उतरण्याच्या अवस्थेपर्यंत कॅल्शिअम, मॅग्नेशिअम यांची फवारणी करून घ्यायला हवी. कॅल्शिअम नायट्रेट आणि मॅग्नेशिअम सल्फेट स्वरूपात असल्यास प्रत्येकी ४ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे किंवा चिलेटेड स्वरूपात वापरणार असल्यास अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे त्याचा वापर करावा.  घडाच्या देठावर गाठी येणे  बऱ्याच बागेत मण्यात पाणी उतरण्याच्या स्थितीमध्ये अचानक दांड्यावर गाठी येताना दिसून येतात. या वेळी शक्यतो तापमानात बऱ्यापैकी घट झालेली आहे. जितका वेळ तापमान कमी झालेले असते, तितका वेळ मण्याचा विकास थांबलेला असतो. या गोष्टीचा विचार करून बागायतदार घडाच्या विकासाकरिता वेगवेगळ्या संजीवके तसेच बाजारात उपलब्ध टॉनिकचा वापर करत राहतात. मण्याच्या विकासामध्ये उपलब्ध संजीवकांपैकी सायटोकायनीनयुक्त संजीवके महत्त्वाची भूमिका निभावतात. किमान तापमानात थांबलेल्या घडाच्या विकासाला सुरळीत करण्यासाठी उपाययोजना म्हणून उपलब्ध सायटोकायनिनयुक्त संजीवकांची (उदा.  उदा. सीपीपीयू, ६ बीए इ.) फवारणी करतो. घडाचा विकास होण्याकरिता वातावरणातील तापमान १५ अंशांपेक्षा अधिक असले पाहिजे. तापमान कमी असल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग मंदावून पेशींच्या वाढीमध्ये अडचणी येतात. शेतकरी शिफारशीपेक्षा अधिक फवारण्या करत राहतात. त्याचा विपरीत परिणाम म्हणजे घडाच्या दांड्यावरील गाठी होय. घडाच्या दांड्यावर जर गाठ जास्त जाड असल्यास आतमध्ये पोकळ व कापसाप्रमाणे पांढरी दिसून येईल. त्यामुळे संपूर्ण घडाचे वजन तिथे आल्यास घड कोलमडून पडेल. त्याच प्रमाणे घडाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होणार नाही किंवा कमी होईल. परिणामी, घडाचा पुढील विकास थांबेल. या घडामध्ये पुढील काळात आवश्यक ती गोडी मिळणे कठीण जाऊ शकते. या परिस्थितीवर मात करण्याकरिता या वेळी खरेतर काही उपाययोजना नाहीत. मात्र नत्ररूपी खतांचा वापर फवारणी, तसेच ठिबकद्वारे केल्यास पुढील काळात घडाच्या दांड्यावरील गाठी वाढण्याची शक्यता कमी होऊ शकते. अन्नद्रव्याचा पुरवठा सुरळीत राहू शकेल. यासाठी नत्र व स्फुरदयुक्त खतांचा उदा. १२-६१-०, युरिया किंवा १८-४६-० इ. वापर महत्त्वाचा ठरेल. या मुळे वेलीची वाढ पुढे होऊन गाठ विरघळण्याची शक्यता वाढेल.  बागेत भुरीचा प्रादुर्भाव  बऱ्याच बागेत मणी सेटिंगनंतरच्या अवस्थेमध्ये वातावरणात झालेल्या बदलानंतर फक्त भुरी रोगाची समस्या दिसून येत आहे. रात्रीची थंडी व दिवसाचे तापमान जास्त वाढणे यामुळे पाण्याच्या उतरण्याच्या अवस्थेपर्यंत असलेल्या बागेत भुरी रोगाची समस्या जास्त प्रमाणात येऊ शकते. भुरी रोग फारसा महत्त्वाचा नसला तरी जर द्राक्ष घडावर त्याचा प्रादुर्भाव झाल्यास तो घड खाण्यायोग्य राहत नाही. निर्यातक्षम प्रतीचा द्राक्ष घड तयार झाला असला तरी या रोगांची पांढरी भुकटी घडावर असल्यास तो घड फळ काढणीपर्यंत काळा पडू शकतो. या वेळी आपल्याला बागेत नियंत्रणासाठी फारसा उपाययोजना करणे शक्य नाही. फक्त कमी जास्त होत असलेल्या तापमानावर नजर ठेऊन योग्य ती काळजी घेणे गरजेचे असेल. मणी सेटिंगनंतर शक्यतो आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर टाळतो. या वेळी आपल्याकडे पर्याय उरतो, तो म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशके किंवा जैविक नियंत्रण. कॅनॉपीचा विस्तार जास्त झालेला असल्यास प्रत्येक घड कॅनोपीमध्ये दडलेला दिसून येईल. अशा वेळी स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर फवारणीपेक्षा धुरळणीद्वारे केल्यास जास्त फायदा होऊ शकतो. या सोबत जर बागेत तापमानात घट होऊन बागेत पाणी दिल्यामुळे जर आर्द्रता वाढलेली असल्यास या दाट कॅनोपीमध्ये जैविक नियंत्रणाचा वापर रोगनियंत्रणासाठी फायदेशीर ठरू शकतो. या वेळी आपल्याकडे ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलिस, स्युडोमोनास इ. वापरता येतात. तेव्हा आपण उपलब्ध परिस्थितीचा विचार करता अन्य उपायांपेक्षा जैविक नियंत्रणावरच भर देणे गरजेचे असेल. असे केल्यास रेसिड्यूची समस्या उद्‍भवण्याची शक्यता कमी होईल.  किमान व कमाल तापमानात जर जास्त प्रमाणात चढ उतार झाल्यास मणी क्रॅकिंगची समस्याही तितक्याच प्रमाणात दिसू शकते. या स्थितीत बागायतदारांनी बागेत पाणी वाढवणे, मल्चिंगचा वापर करणे व जैविक नियंत्रणाची फवारणी यावर भर द्यावा. पिंक बेरी   गेल्या आठवड्यात वातावरणातील कमाल व किमान तापमानात झालेल्या फरकामुळे बऱ्याच बागेत पिंक बेरीचा प्रादुर्भाव दिसून आला. वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली सुरळीत होऊन घडाचा विकास अपेक्षेप्रमाणे होण्यासाठी कमाल तापमान ३५ अंश आणि किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी किमान तापमान फारच कमी होऊन पाच ते सहा अंशापर्यंत खाली घसरले होते. यामुळेच पिंक बेरीसारख्या समस्या बागेत दिसून येत आहेत. यावेळी महत्त्वाच्या उपाययोजना आपल्या हाती नसल्या तरी बागेतील तापमान वाढवण्याच्या उपाययोजना कराव्यात. उदा. बागेत पाणी देणे, पेपरने घड झाकणे, बागेत ठिकठिकाणी शेकोट्या लावणे इ.  - डॉ. आर. जी. सोमकुंवर,   ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,  मांजरी, जि. पुणे) 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com