खरड छाटणीनंतरचे पाणी व्यवस्थापन

खरड छाटणीनंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी आपणास साध्य करून घ्यायच्या असतात एक म्हणजे घडनिर्मिती व दुसरी म्हणजे फळ छाटणीनंतर मालाला वजन येण्याकरिता अन्नसाठा काडीमध्ये तयार करून घेणे. यासाठी अन्य काही महत्त्वाच्या बाबीसोबतच पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत मोलाचे ठरते.
grapes advisory
grapes advisory

खरड छाटणीनंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी आपणास साध्य करून घ्यायच्या असतात एक म्हणजे घडनिर्मिती व दुसरी म्हणजे फळ छाटणीनंतर मालाला वजन येण्याकरिता अन्नसाठा काडीमध्ये तयार करून घेणे. यासाठी अन्य काही महत्त्वाच्या बाबीसोबतच पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत मोलाचे ठरते. द्राक्ष वेलीच्या एकूण हंगामातील पाण्याच्या तुलनेमध्ये खरड छाटणीनंतर ते बाग फुटेपर्यंत सर्वांत जास्त पाण्याची आवश्यकता असते. या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुटीची कमी संख्या, कमकुवतपणा आणि पुढील घडनिर्मितीवरील विपरीत परिणाम या समस्या उद्भवतात. खरड छाटणीनंतरच्या पहिल्या ४० दिवसांच्या काळात पुरेसे पाणी दिल्यास नव्या वाढणाऱ्या मुळांची संख्या वाढते. यामुळे द्राक्ष बाग फुटणे व वाढ यासाठी लागणारे पाणी व अन्नद्रव्य त्याद्वारे पुरवले जाते. म्हणूनच या काळात जरी वेलीवर पाने नसली तरीही पाण्याची गरज जास्त असते. फुटी फुटल्यानंतर पुढील पंधरा ते वीस दिवस फुटीच्या वाढीचा वेग जास्त असतो म्हणूनही पाणी जास्त लागते. या कालावधीतील बाष्पीभवनाचा वेग लक्षात घेऊन पाणी देण्याचे प्रमाण ठरवावे. त्यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अजयकुमार उपाध्याय यांनी केलेल्या प्रयोगातून पुढे आलेले निष्कर्ष व शिफारशी पुढीलप्रमाणे... डॉ. उपाध्याय यांच्या प्रयोगातील निष्कर्ष द्राक्ष वेलीच्या गरजेनुसार व बाष्पीभवनाच्या अंदाजे वेगानुसार पाणी व्यवस्थापन दिलेले आहे.

  •  छाटणीनंतर १ ते ४० दिवस (१ एप्रिल ते १० मे या काळात बाष्पीभवनाचा वेग अंदाजे आठ ते बारा मि.मी. प्रति दिवस धरून) या वेळेत प्रति दिवस लागणारे पाण्याचे प्रमाण प्रति एकर १३,४४० ते २०,१६० लिटर.
  •  छाटणीनंतर ४० ते ६० दिवस (११ ते ३० मे या काळात बाष्पीभवनाचा वेग आठ ते दहा मि.मी. प्रति दिवस धरून) एकरी ४,४८० ते ५,६०० लिटर.
  •  छाटणीनंतर ६० ते १२० दिवस (१ जून ते ३० जुलै हा कालावधी पावसाचा असून, पाऊस नसल्यास गरजेनुसार पाणी द्यावे.) सहा हजार ते सात हजार लिटर प्रति एकर पाणी द्यावे.
  • टीप-

  •  वरील पाणी व्यवस्थापनाचा तक्ता हा मार्गदर्शक म्हणून आहे तो तंतोतंत लागू पडणार नाही
  •  प्रयोग केलेल्या ठिकाणची जमिनीची माती ही खोल काळी व पाणी धरून ठेवणारी आहे. येथील पाणी क्षारयुक्त, टीडीएस २००० असे आहे. येथील पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने सिंचनाचे पाणी कमी लागते. मात्र आपल्याकडील जमीन मुरमाड असल्यास पाणी जास्त लागेल, हे लक्षात घ्यावे
  •  पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतरही जमिनीची प्रत व जलधारण क्षमतेनुसार बदलते. याबाबत पुढे लेखामध्ये अधिक माहिती घेणार आहोत.
  • खरड छाटणीतील व फळ छाटणीतील पाणी व्यवस्थापनातील मुख्य फरक खरड छाटणीत घडनिर्मिती होण्यास पाण्याचा हलकासा ताण द्यावा लागतो, तर फळ छाटणीत पानांची, मण्यांची सतत वाढ करून घ्यायची असल्याने जमिनीत सतत वाफसा राहील, असे पाणी द्यायचे असते. या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये. मुरमाड जमीन - या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता खोल काळी जमिनीच्या तुलनेत फारच कमी असते. या कारणाने पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर कमी ठेवावे लागते. तुलनेने पाणीही दीड ते दोन पटीने जास्त द्यावे लागते. या प्रकारच्या जमिनीचे दोन उपप्रकार पडतात. एका प्रकारामध्ये जमिनीमध्ये पाणी न पसरता सरळ खाली जाते. वरंब्यात ड्रीपरखाली फक्त नऊ ते दहा इंच पसरते. यामुळे त्या एक फुटाच्या कक्षेतील तंतुमय मुळे पाणी घेऊ शकतात. पूर्ण बागेत पसरलेल्या अन्य मुळांपर्यंत पाणी पोहोचत नाही. उत्तम घडनिर्मितीसाठी वरंब्याच्या दोन्ही बाजू मिळून दोन ते तीन फूट रुंदीपर्यंत पाणी काही काळापर्यंत पसरले पाहिजे. अशा जमिनीत इनलाइन प्रकारच्या दोन- लॅटरल लावाव्यात. दर १२ ते १४ इंचावर ड्रीपर असलेल्या दोन लॅटरलमधील अंतर हे दीड फूट ठेवावे. या पद्धतीने ठिबक सिंचन केल्यास अधिक जमिनीमध्ये ओलावा पसरतो किंवा गरजेनुसार पाणी देता येते. दुसऱ्या प्रकारच्या मुरमाड जमिनीत दोन तासांच्या दरम्यान पाणी दिल्यास आडवे पाणी (रुंदी - अडीच तीन फुटांपर्यंत) चांगले पसरते. वरील थरातील मुळांना मिळते. या प्रकारच्या जमिनीत गरजेनुसार दर तीन ते चार दिवसांच्या अंतराने पाणी दिले पाहिजे. ज्या वेळी बाग फुटत असते, अशा वेळेस या दोन्ही प्रकारच्या जमिनीला मोकळे पाणी देणे गरजेचे आहे. त्यानंतर सबकेन केले जाते. सबकेन फुटायला सुरुवात होते, त्या वेळी या दोन्ही प्रकारच्या जमिनीला सबकेन चांगले फुटण्याकरिता मोकळे पाणी देणे जास्त फायद्याचे ठरते. ठिबक सिंचनाने पाणी देताना... अ) मुरमाड जमीन  खरड छाटणीनंतर पहिले चाळीस दिवस म्हणजे सबकेन फुटेपर्यंत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देताना वरंब्यावर दोन्ही बाजू मिळून किमान तीन फूट रुंदीत पाणी पसरेल एवढे पाणी दर तीन ते चार दिवसांनी द्यावे. सबकेन फुटून २ ते ४ पानांवर आल्यावर दोन फूट रुंदीत पसरेल एवढे पाणी दिले पाहिजे. म्हणजे घडनिर्मिती करता मध्यम जोमाच्या फुटी वाढतात. ब) मध्यम प्रतीची जमीन  वरील एक ते दीड फूट थर काळ्या मातीचा व त्यातील खाली मुरुमाचा असलेल्या जमिनीला मध्यम प्रतीची जमीन म्हणता येईल. यात वरील थरामध्ये पाणी धरून ठेवले जाते, तर खालील थरात अजिबात धरले जात नाही. अशा जमिनीत खरड छाटणीनंतर पहिले चाळीस दिवस वरंब्यावरील दोन्ही बाजू मिळून तीन फूट रुंदीत ओले होईल, एवढे पाणी दर सात दिवसांनी द्यावे. सबकेन फुटून २ ते ४ पानांवर आल्यावर दर सात दिवसांनी दोन फूट रुंदीत ओलावा राहील एवढे पाणी सबकेनचा शेंडा ७ ते ८ पानांवर बंद होईपर्यंत दिले पाहिजे. म्हणजे मध्यम प्रकारचा पाण्याचा ताण राहून मध्यम ते कमी जोम राहतो. घडनिर्मिती चांगली होते. चुकून किंवा काही कारणाने पाणी जास्त झाल्यास पुढील एक पाण्याची पाळी सात दिवसांऐवजी प्रत्यक्ष परिस्थिती पाहून १० ते १२ दिवसांनी द्यावी. क) वरील एक ते दोन फूट काळी माती व खाली चुनखडी असलेली जमीन आणि दोन ते दहा फूट खोल काळी माती  अशा जमिनी खोल काळ्या जमिनीपेक्षाही अधिक पाणी लावून धरतात. कारण खालील चुनखडीच्या थरातून पाणी फारच हळू पाझरून खाली जाते. अशा जमिनीत थोडे पाणी जास्त झाले किंवा पाऊस झाला तर पाणी साचून राहते. अधिक पाण्यामुळे पाने पिवळी पडण्याची समस्या उद्‌भवते. अशा जमिनीत खरड छाटणीनंतर दर १५ ते २५ दिवसांनी पाच ते सात तास पाणी (आठ लिटर क्षमतेचे दोन ड्रीपर प्रति वेल) दिले पाहिजे. पुढील भागामध्ये योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी वेलीचे निरीक्षण, वेलीतील विविध लक्षणे यांची माहिती घेऊ. - वासुदेव चि. काठे, ९९२२७१९१७१ (लेखक कृषी पदवीधर असून, दाभोळकर प्रयोग परिवार, महाराष्ट्र राज्य, मुख्य समन्वयक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com