सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन

खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या शिरा आणि मुख्य शिरेमधून मुख्य फांदीत अथवा खोडात शिरतात. आतील भाग खाल्ल्याने आत नागमोडी पोकळ्या तयार होतात. सुरुवातीला रोपावस्थेत तीन पाने पिवळी पडलेली दिसतात.
stem borer on soybean
stem borer on soybean

खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या शिरा आणि मुख्य शिरेमधून मुख्य फांदीत अथवा खोडात शिरतात. आतील भाग खाल्ल्याने आत नागमोडी पोकळ्या तयार होतात. सुरुवातीला रोपावस्थेत तीन पाने पिवळी पडलेली दिसतात. जगभरामध्ये सोयाबीन पिकात आढळणाऱ्या ३०० पेक्षा अधिक किडी आहेत. त्यातील महाराष्ट्रात प्रामुख्याने ८ ते १० किडी नियमीतपणे आढळतात. त्यांची विभागणी तीन गटात केली जाते.

 • खोड पोखरणाऱ्या किडी - खोडमाशी व चक्र भुंगा.
 • पाने खाणाऱ्या किडी – उंट अळी ,तंबाखूची पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी व पाने पोखरणारी अळी
 • रस शोषक किडी- मावा, तुडतुडे,फुलकिडे, पांढरी माशी.
 • यापैकी खोंडमाशी ही कीड बी उगवणीपासून १०-१५ दिवसांनी रोपावस्थेत प्रादुर्भाव सुरू होतो. तो पुढे पीक कापणीपर्यंत राहतो.
 • त्यामानाने चक्र भुंगा किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे पीक उगवणीनंतर ३५-४० दिवसांनी सुरू होतो. इतर पाने खाणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राहतो. रस शोषक किडीचा प्रादुभाव जुलै शेवटच्या आठवड्यापासून सप्टेंबर मध्यापर्यंत दिसून येतो. या रसशोषक किडीमुळे हिरवा मोझॅक विषाणू, पिवळा मोझॅक विषाणू व कळी करपा किंवा बड नेक्रोसिस सारख्या रोगाचा प्रसार होतो. खोडमाशी 

 • या खोड माशीच्या दोन प्रजाती Melanagromyza sojane व Melanagromyza phaseoli आपल्याकडे आढळतात.
 • प्रादुर्भाव - रोपावस्थेपासून पीक कापणीपर्यंत.
 • अन्य पिके :  सोयबीन व्यतिरिक्त चवळी, मूग, उडिद, तूर व वाटाणा इ.
 • नुकसानीचे प्रमाण :  खोडमाशीमुळे १६ ते ३० टक्के उत्पादनात घट येत असल्याचे जुने संदर्भ आहेत. मात्र, नुकत्याच अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्रावर घेतलेल्या घेतलेल्या चाचणी प्रयोगातील निष्कर्षानुसार नुकसाचचे प्रमाणे ३० ते ६० टक्क्यांपर्यंत आढळले आहे.
 • ओळख 

 • प्रौढ माशा - लहान चमकदार काळ्या रंगाच्या, लांबी २ मि. मी. असते. मादी नरापेक्षा किंचित मोठी असते. प्रौढावस्था ११-१३ दिवस राहते.
 • अंडी - मादी माशी पान पेशीत फिक्कट पिवळसर ८०-८५ अंडी घालते. अंडी अवस्था २-७ दिवस असते.
 • अळी - बिन पायाची, फिक्कट पिवळी, ३ ते ४ मि. मी. लांब. लहान अळ्या जमिनी जवळील भागात तर मोठ्या झाडाच्या फांद्यात असतात. अळी अवस्था १०-१५ दिवस राहते.
 • कोष - कोषात जाण्यापूर्वी पूर्ण वाढ झालेली अळी प्रौढ माशीला बाहेर पडण्याकरीता फांदीला किंवा खोडाला जमिनीलगत किंवा मोठ्या झाडाना वरच्या भागात छिद्र तयार करते. हे छिद्र भुरकट तपकिरी रंगाचे असते. फिक्कट तपकिरी रंगाचे कोष फांदी किंवा खोडातच आढळतात. कोषावस्था ७-१० दिवसांची असते.
 • असे एकूण ३१-५७ दिवसात एक पिढी पूर्ण होते. एका वर्षात ८-९ पिढ्या पूर्ण होतात.
 • प्रादुर्भाव व नुकसानीचे स्वरूप

 • खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या शिरा आणि मुख्य शिरेमधून मुख्य फांदीत अथवा खोडात शिरतात. आतील भाग खाल्ल्याने आत नागमोडी पोकळ्या तयार होतात. सुरुवातीला रोपावस्थेत तीन पाने पिवळी पडलेली दिसतात.
 • लहान रोपे सुकतात, पाने व फांद्याही सुकतात.
 • खरीपात कधी कधी ९० ते १०० टक्के झाडे किडग्रस्त होतात. प्रादुर्भावाची तीव्रता जास्त असल्यास झाडाची खोडे ७० टक्क्यांपर्यंत पोकळ होतात. परिणामी उत्पादनात ३० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होते.
 • सुरुवातीच्या कायिक अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास २०-३० टक्के घट येते.
 • सोयाबीन पिकामध्ये उशिरा १०० टक्के प्रार्दुभाव झाला तर १६ ते २१ टक्के घट येते. मात्र मोठी झाडे मरत नाही.
 • शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाने सुकली किंवा झाड मेले तर लक्षणीय घट येते.
 • प्रादुर्भावग्रस्त खोड आतून लालसर तपकिरी रंगाचे किंवा काही ठिकाणी फिक्कट तपकिरी रंगाचे आढळते.
 • रोपावस्थेत ३ किंवा जास्त अळ्या प्रति झाड असल्यास झाड सुकून मरते.
 • मागील दोन वर्षात अमरावती प्रादेशिक संशोधन केंद्रावर घेतलेल्या खोडमाशीच्या मोठ्या चाचणी प्रयोगामध्ये पेरणीनंतर ५६ ते ६३ दिवसाच्या दरम्यान खोडमाशीचा महत्तम प्रादुर्भाव सरासरी ६४.४४ ते ८९.५८ टक्क्यांपर्यंत आढळून आला. म्हणून या किडीचे पेरणीनंतर १५-२० दिवसांपासून ६०-६५ दिवसांच्या दरम्यान १५ दिवसाचे अंतराने फवारणीचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान टाळू शकतो.
 • खोडमाशी उद्रेकाची संभाव्य करणे 

 • उबदार तापमान, जास्त आर्द्रता व जास्त पाऊस कीडीच्या वाढीसाठी पोषक.
 •  पावसाचा मोठा खंड पडल्यास गंभीर स्वरूपात प्रादुर्भाव आढळतो.
 •  त्या त्या शेतात पेरणीचा कालावधी १५ दिवसांपेक्षा अधिक वाढल्यास खोडमाशींच्या पिढ्यामागे पिढ्यांची उत्पत्ती होते. लवकरच नुकसानीची पातळी गाठते.
 • एकच एक वाण वर्षानुवर्षे मोठ्या क्षेत्रावर वापरल्यामुळेसुद्धा या किडीचा उद्रेक होऊ शकतो.
 • व्यवस्थापन 

 • सोयाबीन पेरणीपूर्वी शेताची उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी. जमिनीतील किडीच्या अवस्था उष्णता, पक्षी यामुळे नष्ट होतात.
 • पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी.
 • प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊसमानानुसार ७५-१०० मि. मि . पाऊस झाल्यानंतर जास्तीत जास्त ८ दिवसांच्या आत पेरणी आटपावी.
 • शिफारशीप्रमाणेच नत्र खताची मात्रा द्यावी. अतिरिक्त मात्रा दिल्याने किडीचा प्रादूर्भाव वाढतो.
 • एकदम सुरुवातीला पेरलेल्या सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.
 • पेरणीसाठी कीड प्रतिकारक्षम वाणाचा वापर करावा .
 • पेरणीपूर्वी बुरशीनाशकासोबत थायामिथोकझाम (३०% एफ.एस.) १० मि.लि. प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे खोडमाशीसोबतच रस शोषक मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्या माशीच्याही नियंत्रणास मदत होते.
 • पेरणीनंतर १५ दिवसांनी १५ x ३० सें. मी. किंवा तत्सम आकाराचे सर्वांत स्वस्त आणि दीर्घ टिकावू अशा फोमशीटचे (घरगुती बनवलेले किंवा तयार स्वरुपातील) पिवळे चिकट सापळे एकरी ६४ या प्रमाणे साधारणपणे ८-१० मीटर अंतरावर लावावेत.
 • पिवळे चिकट सापळे उभारताना सोयाबीनमध्ये सुरुवातीला रोपावस्थेत किमान एक महिन्यापर्यंत पिकाच्या समकक्ष उंचीवर व त्यानंतर पिकाच्या उंचीच्या १५ सें. मी. खाली बसवावेत. यामुळे खोडमाशीसोबतच अन्य रसशोषक कीडी व पांढऱ्या माशीचाही बंदोबस्त होतो.
 • घरगुती बनविलेले सापळे असल्यास दर आठ दिवसानी सापळे ओल्या कापडाने आधी पुसून सुकल्यानंतर त्यावर चिकट पदार्थ लावावा. (उदा. एरंडेल तेल, पांढरे ग्रीस, गाडीचे खराब झालेले चिकट ऑईल यापैकी एक.) लावावे). रेडीमेड सापळे लावल्यास एक महिन्याचे अंतराने तीन वेळा बदलावे.
 • रासायनिक नियंत्रणासाठी  फवारणी प्रमाण प्रति लिटर ( कंसात एकरी प्रमाण दिले आहे.) किडीच्या प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी १५ दिवसाचे अंतराने पुढील पैकी किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.  पेरणी नंतर १५-२० दिवसांनी प्रथम फवारणी थायामिथोक्झाम (३० एफ. एस.) ०.२५ मि.लि. (५० मि.लि. प्रति एकर) किंवा इथिऑन (५० % ई. सी.) ३ मि.लि. (६०० मि.लि. प्रति एकर) (यामुळे खोडकिडीसोबतच चक्र भुंगा व रस शोषक किडीच्या नियंत्रणास मदत होईल.)  ३०-३५ दिवसानी दुसरी फवारणी क्लोरॲण्ट्रानीलीप्रोल (१८.५ % एस. सी.) ०.३ मि.लि. (६० मिलि प्रति एकर) किंवा इंडोक्साकार्ब (१५.८% ई. सी.) ०.६७ मि.लि.(१४० मि.लि. प्रति एकर) (यामुळे खोडकिडीसोबतच चक्र भुंगा, उंटअळी व स्पोडोप्टेरा अळीचे सुद्धा नियंत्रण होईल.) (टीप :  वरील सर्व कीटक नाशकांना लेबल क्लेम असून, प्रमाण नॅपसॅक पंपासाठी पंपाचे आहे.) - डॉ. अनिल ठाकरे, ९४२०४०९९६० (सहयोगी प्राध्यापक (वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ), प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com