उसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजना

उसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते. पांगशा फुटतात. बाजूला फुटवे लागतात. उत्पादनात १५ ते २५ टक्के घट येते. उसाला तुरा येऊ नये यासाठी शिफारशीत वेळेतच लागवड करावी. पाणी आणि खतांचा योग्य वापर करावा.
उसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजना
Sugarcane should be planted at the recommended time so that it does not sprout.

उसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते. पांगशा फुटतात. बाजूला फुटवे लागतात. उत्पादनात १५ ते २५ टक्के घट येते. उसाला तुरा येऊ नये यासाठी शिफारशीत वेळेतच लागवड करावी. पाणी आणि खतांचा योग्य वापर करावा. ऊस पक्व होण्याच्या कालावधीपूर्वी अकाली तुरा येत असल्याचे दिसून येत आहे. तुरा आल्यामुळे वाढ थांबून कांडीमध्ये दशी पडते, वजनात घट येते. उसाची प्रत खराब होऊन साखरेचे प्रमाण कमी होते. तुरा बाहेर आल्यानंतर साधारणपणे १.५ ते २ महिन्यांच्या ऊस उत्पादनात आणि साखरेत घट होत नाही. तुरा आल्यामुळे उसाची पक्वता लवकर येते. साखरेचे प्रमाण सुरुवातीच्या काळात वाढते. म्हणून २० टक्क्यांपेक्षा अधिक तुरा असलेल्या क्षेत्रातील तोडणी तुरा दिसल्यानंतर दोन महिन्यांच्या आत करावी.उसाच्या शेंड्यातून होणारी वाढ निकृष्ट दर्जाची झाल्याने जनावरांना खाण्यासाठी चारा म्हणून त्याचा उपयोग होत नाही. फुलोरा आलेल्या उसाच्या तोडणीसाठी मजूर टाळाटाळ करत आहेत.   उसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते. पांगशा फुटतात. बाजूला फुटवे लागतात. उत्पादनात १५ ते २५ टक्के घट येते. साखर कारखान्यांना गाळपासाठी उसाची उपलब्धता कमी होऊन गळिताचा हंगाम लवकर बंद करण्याची वेळ येते. तुरा आल्यानंतर दोन महिन्यानंतर पाने वाळण्यास सुरवात होते. कांडीमध्ये पोकळी निर्माण होते. दशी पडते. ऊस पोकळ झाल्याने वजनात घट येते. दशीमुळे रस कमी पडतो. कमी रसामुळे साखर कमी पडते. साखरेचा उतारा घटतो. कांड्यांची वाढ खंडित होते. फुलोरा आल्यानंतर दोन ते चार महिन्यांनी साखरेचे विघटन होते. ग्लुकोज व फ्रुक्टोज साखरेत रूपांतर होते.  उसातील साखरेचे प्रमाणात व वजनात घट येते. धाग्याचे प्रमाण वाढते.  आडसाली आणि पूर्वहंगामी उसाला तुरा आल्यास उत्पादनात विशेष घट येत नाही. थंडी वाढल्यास नुकसानीचे प्रमाण कमी होते. मात्र सुरू लागवडीच्या उसाला तुरा आल्यास त्याचा शाकीय वाढीवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे उशिरा तुटलेल्या उसाचा खोडवा राखल्यास त्याच्या वाढीवर तुऱ्यामुळे परिणाम होतो. त्यामुळे साखर उताऱ्यात १८ ते २० टक्के घट येते.

तुरा आल्यानंतर पाने अरुंद होऊ लागतात. ती पिवळी पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे कर्ब ग्रहणाची क्रिया मंदावते. जेठा कोंब असलेल्या उसाला तुरा हमखास येतो.  फुलोरा टाळण्यासाठी उपाययोजना... लागणीची वेळ 

 •  सुरू लागवड १५ डिसेंबर ते फेब्रुवारी, पूर्वहंगामी १५ ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि आडसाली १५ जुलै ते १५ ऑगस्टमध्ये करावी.
 •  लागण कालावधी महत्त्वाचा आहे. उत्पादन महिन्याला सरासरी प्रति एकर ५ टन या प्रमाणात संतुलित वाढू शकते. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यातील लागवड आधारभूत मानून किमान १२ महिन्यांच्या कालावधीत एकरी ६० टन उत्पादन गाठता येईल. त्यासाठी ऑगस्टपासून पुढे लागवड केल्यास फुलोरा तयार होण्याचा कालावधी संपल्यानंतर उत्पादनासाठी जादा वेळ मिळतो. यासाठी उसाच्या फुलोरा रहित उत्पादनासाठी ठराविक जातींची निवड करावी. 
 •  निचरा प्रणाली, पाणी व्यवस्थापन

 • १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत जमिनीतील पाणीपातळी नियंत्रित करावी. याच कालावधीत पाण्याचा ताण पडल्यास फुलोरा येण्याचा कालावधी लांबतो. पाण्यामुळे फुलोरा येण्यास उत्तेजन मिळते. पाणी पाजणे शक्यतो बंद करावे. मात्र पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. 
 • एक पाणी कमी दिल्यामुळे फुलोरा येण्याची प्राथमिक प्रक्रिया थांबते. यामुळे ऊस पानामुळे अग्रकोंबात उत्पादन होणारे फ्लोरिजीन हार्मोन्सची वाढ थांबविता येईल. हे हार्मोन्स उसाला फुलोरा येण्यासाठी सहायभूत ठरणारे असतात. 
 • जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस व जमिनीतील ओलीचे प्रमाण वाढल्यास उसाला फुलोरा येतो. 
 • नत्र खतांचा वापर  अति पावसामुळे युरियाच्या माध्यमातून दिलेल्या खतांचा निचरा होतो. अशा परिस्थितीत १५ जुलैपूर्वी अमोनिअम सल्फेट किंवा अमोनिअम नायट्रेट खताचा जादा हप्ता एकरी ५० किलो द्यावा. यामुळे उसाची वाढीची अवस्था कायम राहून फुलोरा येण्यास प्रतिबंध होईल.  प्रकाश झोताचा वापर  उसाच्या शेतात १५ जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यान रात्रीचा प्रकाशाचा झोताचा वापर केल्यास फुलोरा येण्याचे प्रमाण कमी होईल. तुरा येण्याची प्रक्रिया उशिरा सुरू होईल.  तुरा आलेल्या ऊसतोडणीचे नियोजन 

 • उसाला २० टक्क्यांपेक्षा तुरा जास्त असल्यास त्याचे तोडणीचे नियोजन लवकर करावे. बाजूचे फुटवे, पांगशा येण्यापूर्वी उसाची तोडणी करावी.
 • तुरा आलेल्या आणि न आलेल्या क्षेत्राची तुलना केली असता तुरा न आलेल्या लागण क्षेत्राचे उत्पादन ५६ टक्के जास्त आढळले आणि खोडव्यामध्ये ३३ टक्के जास्त आढळले. साखरेच्या बाबतीत ६९ टक्के जास्त प्रमाण लागण ऊस आणि खोडव्यात ३५ टक्के आढळले. काही पिकाची तंतुमय पदार्थात तफावत आढळून आली नाही. 
 • फुलोराविरहित ऊस जातींचे संशोधन मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथील शास्त्रज्ञांनी संशोधनातून उसाच्या फुलोरा न येणाऱ्या व कुसळरहित नवीन जाती विकसित केल्या आहेत. उत्पादन क्षमता, साखरेचा जादा उतारा, उत्पादन कालावधी याबाबतीत काही जाती आशादायक दिसून आल्या आहेत. - डॉ. भरत रासकर,  ९९६०८०२०२८,  (ऊस विशेषज्ञ आणि प्रमुख मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.