एनपीए : कृषी कर्जाची थकबाकी

कर्जाच्या प्रकारानुसार कोणते खाते कधी अनुत्पादक (एनपीए म्हणजेच नॉन परफर्मिंग ॲसेट) धरले जाते, याविषयी माहिती घेऊ.
NPA
NPA

एखाद्या कर्जखात्याचे हप्ते वेळच्या वेळी न गेल्यास अनेक वेळा बॅंकेचे अधिकारी आपल्याला समजावतात, ‘‘असे करू नका, हप्ते लवकर भरा... अन्यथा खाते एनपीए होईल.’’ त्यांच्या गंभीर बोलण्यावरून अनेक वेळा शब्दांचा अर्थ कळला नसला, तरी गांभीर्य काही लोकांच्या लक्षात येते. मात्र काहींना त्याचे गांभीर्य अजिबात कळत नाही. कर्जाच्या प्रकारानुसार कोणते खाते कधी अनुत्पादक (एनपीए म्हणजेच नॉन परफर्मिंग ॲसेट) धरले जाते, याविषयी माहिती घेऊ. सर्वप्रथम एनपीए म्हणजे काय, हे पाहू. एनपीएचा ( NPA) फुल फॉर्म Non Performing Assets असा असून, त्याचा मराठीत अर्थ बँकेचे अन्उत्पादक कर्ज ( किंवा मालमत्ता). आपल्याला जेव्हा बॅंक एखादे कर्ज देते, त्यातून बँकेला ठरलेल्या प्रमाणात व्याज मिळते. हेच व्याज म्हणजे बँकेचे उत्पन्न होय. बॅंकेकडून दिल्या गेलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थित होऊन, मुद्दल आणि व्याज हे नियमितपणे मिळत असते, तोवर ते कर्ज बँकेच्या दृष्टीने उत्पादक म्हणजेच काही उत्पन्न मिळवून देणारे आहे. मात्र ज्या वेळी कर्जदार कर्जाचे मुद्दल, किंवा कर्जाचे हप्ते आणि व्याज परत करू शकत नाही किंवा परत करत नाही. म्हणजेच ते कर्ज बॅंकेच्या दृष्टीने अनुत्पादक होते. या स्थितीत कर्जदार हा थकबाकीदार मानला जातो. कृषी कर्जअंतर्गत प्रत्यक्ष शेती कर्जासाठी ३० सप्टेंबर २००४ पासून एनपीएचे नियम असे आहेत. प्रत्यक्ष शेती कर्ज : शेती आणि शेतीसंलग्न व्यवसायासाठी घेतलेले कर्ज, वैयक्तिक कर्ज

 • शेती आणि शेतीसंलग्न व्यवसाय म्हणजेच दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग यांसाठी वैयक्तिक शेतकरी, बचत गट (स्वयंसाह्यता गट), शेतकरी समूह यांना बँकांनी दिलेले कर्ज.
 • शेती आणि शेतीसंलग्न व्यवसायासाठी म्हणजे दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग यासाठी कार्पोरेट कंपनी, भागीदारी फर्म आणि संस्था यांना बँकांनी दिलेले कर्ज (एकत्रित रु. २ कोटींपर्यंत.)
 • कृषी कर्जाचे मुदतीनुसार प्रकार पीक कर्ज हे अल्प मुदतीचे कर्ज असून, त्याची परतफेड (सर्व मुद्दल आणि त्यावरील व्याजासह) कर्जाची मुदत संपताच करणे आवश्यक असते. यातील पिके ही एक वर्षापेक्षा कमी कालावधीची असतात. मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज या कृषिकर्जाचे हप्ते व व्याज हे ठरवून दिलेल्या हप्त्याप्रमाणे भरायचे असतात. कर्जाचा हप्ता हा पिकाच्या कालावधीनुसार तिमाही, सहामाही किंवा वार्षिक असा ठरवला जातो. यातील पिकांचा हंगाम हा एक वर्षापेक्षा अधिक असतो. उदा. कृषी आणि कृषी संलग्न व्यवसायासाठी उदा. कृषी यंत्रे, पाणीपुरवठा योजना, फलोद्यान आणि इतर कृषी संलग्न व्यवसायासाठीचे कर्ज. कामाचे स्वरूप   पीक काढणीपूर्व कामे आणि पीक काढणीनंतरच्या विविध कामांसाठी उदा. पीक संरक्षण, तण काढणी, पिकाची कापणी किंवा काढणी, वाहतूक इ. साठी शेतकऱ्यांना दिलेले रु. ५० लाखांपर्यंतचे आणि १२ महिन्यांच्या कालावधीसाठी गोदामामध्ये ठेवलेल्या मालाच्या ठेव पावतीवर दिलेले कर्ज. शेती कर्ज केव्हा ‘एनपीए’ होतात?

 • अल्प मुदतीचे कर्ज किंवा पीककर्ज :  याचे मुद्दल आणि व्याज याची थकबाकी दोन पीक हंगामांत झाली नाही, अशी कर्जे एनपीए होतात.
 • दीर्घ मुदतीच्या पिकासाठी दिलेल्या कर्जाचे मुद्दल किंवा हप्ता आणि व्याज याची थकबाकी एका पीक हंगामात झाली नाही, अशी कर्जे एनपीए होतात.
 • कर्जदाराने कोणत्या पिकाची लागवड केली आहे, त्यानुसार शेती व शेतीसंलग्न मध्यम किंवा दीर्घ मुदतीच्या कर्जास ‘एनपीए’चे नियम लागू होतात.
 • थकबाकी झालेली शेती कर्ज खाती ‘एनपीए’ होऊ नयेत, यासाठी... सर्वांत प्रथम कर्ज खाते कोणत्या कारणामुळे थकबाकीमध्ये गेले आहे, ते पाहिले जाते. उदा. अति वृष्टी, पूर, दुष्काळ, भूकंप, आग अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे कर्ज आणि व्याजाची परतफेड होऊ न शकल्यामुळे थकबाकी आलेली कर्जे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची हानी होते, पिकाचे कमी उत्पादन मिळते किंवा उत्पादनच मिळत नाही. पर्यायाने कर्जदार हा कर्जाची व त्यावरील व्याजाची परतफेड करू शकत नाही. अशा कर्जाच्या परतफेडीसाठी बँक त्या शेतकऱ्याशी चर्चा करून त्याला एनपीए बाबतची माहिती देऊन खालील प्रमाणे उपाय करू शकते.

 • अल्प मुदतीच्या पीककर्जाचे रूपांतर मुदतीच्या कर्जामध्ये करणे आणि नवीन पीककर्ज मंजूर करणे.
 • मुदतीच्या कर्जाच्या परतफेडीच्या हप्त्यांचे पुनर्गठन करणे.
 • या दोन्ही उपायांमुळे अल्प मुदतीची पीक कर्जे आणि मुदत कर्जे ही नियमित कर्जे होतात. म्हणजेच ही कर्जे अनुत्पादक कर्जामध्ये (एनपीए) वर्ग केली जात नाहीत. उदा. सदाभाऊने खरीप हंगामात भात पिकासाठी बँकेकडून पीककर्ज घेतले होते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे कमी उत्पादन आल्याने सदर कर्जाची परतफेड करता आली नाही. तेव्हा बँकेने सदाभाऊशी चर्चा करून सादर कर्जरकमेचे (मुद्दल आणि व्याज) मुदतीच्या कर्जात रूपांतर केले. पुढील तीन वर्षांत येणाऱ्या अपेक्षित उत्पन्नावर आधारित असे तीन वार्षिक हप्ते करून दिले. त्याच वेळी नवीन पीककर्जही मंजूर केले. यामुळे दोन्ही कर्जे नियमित झाली. अन्यथा, थकबाकी झालेले पीक कर्ज हे दोन खरीप हंगामानंतर सादर कर्ज किंवा अनुत्पादक कर्जामध्ये (एनपीए) रूपांतरित झाले असते. शेतीसाठी दिलेल्या मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाच्या हप्त्याची (उदा. विहीर, विद्युत मोटर, पाइपलाइन वगैरे) परतफेड पिकापासून योग्य किंवा अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे होऊ शकली नाही, तर अशी कर्जे थकबाकीमध्ये वर्ग होतात. बॅंकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना थकबाकीचे कारण समजावून दिल्यास, थकीत हप्त्याचे बँकेमार्फत पुनर्गठन केले जाते. त्यामुळे अशी कर्जे नियमित होऊ शकतात.

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com