बीटी कपाशीतील अन्नद्रव्य व्यवस्थापन

बीटी कपाशी ही अन्य कपाशी जातींच्या तुलनेमध्ये अन्नद्रव्यांचे शोषण अधिक प्रमाणात करते. हे लक्षात ठेवून एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
Symptoms of nitrogen deficiency
Symptoms of nitrogen deficiency

बीटी कपाशी ही अन्य कपाशी जातींच्या तुलनेमध्ये अन्नद्रव्यांचे शोषण अधिक प्रमाणात करते. हे लक्षात ठेवून एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करावा. बीटी कपाशीमध्ये सुरुवातीला पात्यांचे रूपांतर बोंडामध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. पाते व बोंडे गळण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामागील कारणांचा शोध घेऊन ती कमी केल्यास उत्पादनात वाढ शक्य होते. कपाशी झाडावरील उत्पादनाच्या प्रमाणात पिकांची अन्नद्रव्याची वाढती गरजही पूर्ण करणे आवश्‍यक आहे.  एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये माती परीक्षण, सेंद्रिय खते, जिवाणू खते, रासायनिक खते (जमिनीतून द्यावयाची) आणि फवारणीद्वारे द्यावयाची खते यांचा एकत्रित आणि संतुलित वापर केला जातो. यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता टिकून राहण्यासोबतच उत्पादन व गुणवत्ताही चांगली मिळू शकते. सेंद्रिय खते जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकविण्यासाठी सेंद्रिय खतांची गरज असते. जमिनीत अन्नद्रव्यांची साठवणूक, वाहतूक, पांढऱ्या मुळांची वाढ आणि उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरणनिर्मिती यासाठी सेंद्रिय खतांचा अंतर्भाव अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा आहे. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट किंवा गांडूळ खतांचा वापर करावा. कोरडवाहू कपाशीसाठी एकरी २ टन चांगले कुजलेले शेणखत व गांडूळ खत उपलब्ध असल्यास ०.५ टन तर बागायती कपाशीसाठी एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत व गांडूळ खत १ टन वापरावे. सेंद्रिय खतांचा वापर मशागतीच्या वेळी करावा. जिवाणू खते जैविक खतांचा वापर अन्य खतांइतकाच महत्त्वाचा आहे. कपाशीसाठी ॲझेटोबॅक्‍टर व पीएसबी ही जिवाणू खते वापरावीत. ॲझेटोबॅक्‍टर जिवाणू वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळवणारे जिवाणू जमिनीत स्थिर झालेले स्फुरद पिकांना उपलब्ध करून देण्यास मदत करतात. जिवाणू खतांचा वापर पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेतून करावा. (बीजप्रक्रिया प्रमाण - प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे). अशी बीजप्रक्रिया ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाही, त्यांनी लागवडीनंतर एक महिन्याच्या आत भुकटी स्वरूपातील अ‍ॅझेटोबॅक्टर ४ किलो व पीएसबी ४ किलो या प्रमाणात शेणखत किंवा गांडूळ खत किंवा शेण गोमूत्र स्लरी यामध्ये मिसळून करावा. रासायनिक खते

  • रासायनिक खतांचा वापर करताना नत्र, स्फुरद व पालाश हे प्रमुख अन्नद्रव्ये, मॅग्नेशिअम व गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये तर लोह, जस्त व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे. बीटी कपाशीसाठी हेक्टरी नत्र १२० किलो, स्फुरद ६० किलो, पालाश ६० किलो देण्याची शिफारस आहे. सरळ वाणासाठी हेक्टरी नत्र १०० किलो, स्फुरद ५० किलो, पालाश ५० किलो आणि सरळ वाण दाट लागवडीसाठी हेक्टरी नत्र ८० किलो, स्फुरद ४० किलो, पालाश ४० किलो अशी शिफारस आहे. मात्र माती परीक्षण करून खत मात्रेत तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य ते बदल करून घ्यावेत. 
  • पीक पोषणशास्त्रानुसार गंधक हे चौथे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. प्रति हेक्‍टरी १५-२० किलो गंधक मात्रा (शिफारशीनुसार) द्यावी. गंधक अन्नद्रव्यासाठी स्वतंत्र गंधकयुक्त खतांचा वापर अवश्‍य करावा. शक्‍य झाल्यास स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेट या खताद्वारे द्यावे. गंधकयुक्त खतांचा वापर पेरणीपूर्वी जमिनीत करावा. गंधक (सल्फर) हे अन्नद्रव्य म्हणून आणि बुरशीनाशक म्हणून देखील कार्य निभावते. कापूस पिकात केवळ गंधकाच्या वापराने १० ते ३० टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गंधकाची कमतरता असल्यास पिके इतर अन्नद्रव्यांचे देखील शोषण योग्य प्रमाणात करू शकत नाहीत. 
  •  मॅग्नेशिअम हे दुय्यम अन्नद्रव्य असून, भारी जमिनीमध्ये त्याची कमतरता आढळते. प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेने अन्नद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेस चालना मिळावी आणि बोंडे चांगल्या रीतीने भरावीत यासाठी मॅग्नेशिअमचा वापर पूरक ठरतो. मॅग्नेशिअमची कमतरता असल्यास कापूस पिकाच्या पानांवर तपकिरी डाग दिसतात. जुन्या पानांवर शिरा, उपशिरा हिरव्या राहून आतील भागावर डाग पडतात. कमतरता तीव्र असल्यास पान पूर्णपणे लालसर तपकिरी होते. लागवडीनंतर एक ते १.५ महिन्यात शेणखताबरोबर मिसळून मॅग्नेशिअम सल्फेट एकरी १० किलो या प्रमाणात द्यावे. 
  • दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण  बीटी कपाशीला सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो व गंधक ८ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीला वापरावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये फेरस सल्फेट ८ किलो, झिंक सल्फेट १० किलो व बोरॉन २ किलो शेणखतात किंवा गांडूळ खतात ८ ते १० दिवस मुरवून वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करताना माती परीक्षणानुसार निर्णय घ्यावा. विद्राव्य खतांचा वापर  अनेक शेतकरी कपाशी सिंचनासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब करतात. ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर करता येतो. अशा प्रकारे खते दिल्यास उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ व रासायनिक खतांच्या मात्रेत २० ते २५ टक्के बचत होते. विद्राव्य खते आम्लधर्मी असल्याने मुळांच्या कार्यक्षेत्रातील सामू नियंत्रित राहतो. ठिबक सिंचन संचामध्ये क्षार साचून तोट्या (ड्रीपर्स) बंद होत नाहीत. ही खते सर्व झाडांना सारख्या प्रमाणात देणे शक्य होते. विद्राव्य खते देण्याची पद्धत

  • ठिबक सिंचन यंत्रणा तपासून सर्व गळती (लिकेज) प्रथम बंद करावेत, अन्यथा खतही वाया जातील. 
  • सर्व ड्रीपर्समधून सारख्या प्रमाणात पाणी पडते किंवा नाही, याची खात्री करावी. 
  • शिफारशीप्रमाणे अथवा माती परीक्षण करून पिकांच्या अवस्थेनुसार खतांची मात्रा ठरवावी. 
  • बादलीत खतांची मात्रा घेऊन प्रथम १५ ते २० लिटर पाण्यात द्रावण तयार करून ठिबक सिंचन संचातून सोडावे. 
  • खते देण्यासाठी व्हेंच्युरी किंवा एच.टी.पी. पंपाचा वापर करता येतो. 
  • संच चालू केलेल्यानंतर काही काळ साधे पाणी जाऊ द्यावे. चालविण्याच्या एकूण कालावधीपैकी काही काळ साधे पाणी सोडावे. नंतर खतांचे द्रावण ठिबक सिंचन संचात सोडून पाण्याबरोबर जाऊ द्यावे. खते दिल्यानंतर १० ते १५ मिनिटे संचातून पुन्हा साधे पाणी सोडावे.
  • फवारणीद्वारे खतांचा वापर

  • जमिनीतून दिलेली अन्नद्रव्ये अपेक्षित प्रमाणात पिकास उपलब्ध न झाल्यास कमी वाढ, फूलगळ, फळगळ, रोगांचा प्रादुर्भाव, कमी प्रतीचा माल अशा समस्या उद्भवतात. अशी कोणती समस्या किंवा कमतरता आढळल्यास फवारणी ग्रेडच्या खतांची (विद्राव्य, चिलेटेड इ.) पानावर फवारणी करता येते. पानाद्वारे त्वरित शोषण झाल्यामुळे समस्या कमी करता येतात. फवारणी ग्रेड्‌समध्ये मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त विविध ग्रेड्स उपलब्ध आहेत. त्यामुळे पिकांना योग्य पोषण वेळेत उपलब्ध करता येते. क्षारवट किंवा चोपण जमिनीत, पाण्याची टंचाई, अन्नद्रव्याची कमतरता यातून पीक वाचवून उत्तम दर्जाचे उत्पादन मिळण्यासाठी मदत होते.
  •     पीकवाढीसाठी व काळोखीसाठी १८:१८:१८ किंवा १९:१९:१९ एक किलो प्रति एकर फवारणी करावी.
  •   पाते लागताना व फुलधारणेच्या काळात १३:४०:१३ किंवा ००:५२:३४ किंवा १२:६१:०० एक किलो प्रति एकर या प्रमाणे फवारणी करावी. बोंडे पक्वतेला १३:००:४५ किंवा ००:००:५० एक किलो प्रति एकर फवारणी करावी.
  •   महत्त्वाचे रासायनिक खते जमिनीत गाडून किंवा पेरूनच द्यावीत. फेकून देऊ नयेत. नत्रयुक्त खतांचा शिफारशीपेक्षा अधिक वापर अजिबात करू नये. त्यामुळे केवळ कायिक/ शाखीय वाढ जास्त प्रमाणात होते. झाडास फुले येणे व फलधारणा कमी प्रमाणात होते. नत्राच्या जास्त वापरामुळे झाडांवर किडींचा प्रादुर्भावही वाढतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर नेहमी शिफारशीनुसार आणि माती परीक्षणानुसारच करावा. - रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१  (लेखक कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विश्‍वविद्यालय, प्रयागराज येथे आचार्य पदवी घेत आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com