जमिनीद्वारे अन्नद्रव्ये दिल्यानंतर ती मुळांद्वारे खोडात तेथून फांद्या, देठात व नंतर पानात पोहोचतात. ही क्रिया होण्यास बराच अवधी लागतो. यातुलनेत फवारणीद्वारे अन्नद्रव्यांची उपलब्धता जलद गतीने आणि सुलभ होते. सर्वसाधारणपणे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापराकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. परंतु, सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मुख्य तसेच दुय्यम अन्नद्रव्याशी संबंधित असल्याने त्यांच्या वापराकडे तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात व कार्यक्षम स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापरासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. जमिनीतून वापर सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीत कमी प्रमाणात असतील तर खालील खते किंवा संयुगातून जमिनीत त्यांचा पुरवठा करता येतो. माती परीक्षणाद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण बघून सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरावीत. सेंद्रिय पदार्थांमध्ये असणारी सुक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा
सेंद्रिय खते | सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण (दशलक्ष भाग) |
| जस्त | लोह | तांबे | मंगल |
शेणखत | ४०.० | १४६५ | २.८ | ६९ |
गांडूळ खत | ३१.० | ९६० | २१५ | ६२ |
उसाची मळीचे खत | ३८.० | १२६५ | २.२ | ६५ |
कोंबडीखत | ५०.० | १०७५ | ६.९ | १९० |
बायोग्रॅस स्लरी | १०५.० | २५०४ | ५०.० | २४१ |
शेळीचे लेंडी खत | २५७० | -- | १९२७ | ६४२० |
वरील सूक्ष्म अन्नद्रव्ये खते आणि मुख्य अन्नद्रव्यांच्या खतांसोबत मिसळून द्यावीत. विशेषतः चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये खते दिल्यानंतर त्यातील बराचसा भाग जमिनीत बद्ध होतो. त्यामुळे पिकास फारच कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये ही चिलेटेड स्वरूपात किंवा फवारणीद्वारे द्यावीत. फवारणीद्वारे वापर
पिकांची पाने अन्नद्रव्यांचे शोषण करू शकतात. मात्र या पद्धतीने अन्नद्रव्यांचे शोषण फारच कमी प्रमाणात होते. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पोषण पिकांस नियमित देणे आवश्यक असते. फळपिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे देणे फायदेशीर असते. सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे देताना द्रावणाचा सामू आम्ल किंवा अल्कधर्मीय असू नये. त्यासाठी द्रावणात खतांचा चुना योग्य त्या प्रमाणात वापरणे आवश्यकआहे. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करताना द्रावणाची तीव्रता पिकांच्या गरजेनुसार असावी. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरासाठी द्रावणाची तीव्रता पिकांच्या गरजेनुसार असणे आवश्यक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरासाठी फवारणी द्रावणात स्टिकर १ मिलि प्रति लिटर याप्रमाणात मिसळावे. यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते. वर दिलेल्या तक्त्यानुसार तीव्रतेचे द्रावण १५ ते २१ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ वेळा फवारणी करावे. सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे द्यावयाचे प्रमाण
सूक्ष्म अन्नद्रव्ये खत | प्रमाण |
जस्त सल्फेट | ०.५ ते १.०० टक्के |
लोह सल्फेट | ०.५ ते १.०० टक्के |
मॅग्नीज सल्फेट | ०.५ ते १.०० टक्के |
कॉपर सल्फेट | ०.५ ते १.०० टक्के |
बोरॅक्स किंवा बोरीक ॲसिड | ०.२ ते ०.५ टक्के |
सोडिअम किंवा अमोनिअम मोलाब्द | ०.०५ ते ०.१ टक्के |
पिकांना आवश्यक असलेली सर्व अन्नद्रव्ये पानांमार्फत शोषून घेता येतात. जमिनीद्वारे अन्नद्रव्ये दिल्यानंतर ती मुळांद्वारे खोडात तेथून फांद्या, देठात व नंतर पानात पोहोचतात. ही क्रिया होण्यास बराच अवधी लागतो. यातुलनेत फवारणीद्वारे अन्नद्रव्यांची उपलब्धता जलद गतीने आणि सुलभ होते. जमिनीतून खते दिली असता जमिनीच्या सामूनुसार व जमिनीत असलेल्या इतर क्षारांमुळे ही अन्नद्रव्ये त्याच्यांशी निगडित होऊन बांधली जाऊ शकतात. तसेच त्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होतो. झाडांच्या अन्न जैवरासायनिक घटकांशी निगडित होऊन ही पोषक द्रव्ये झाडांस उपलब्ध होतात. काही पिकांमध्ये उत्पादन वाढवणारी पाने किंवा नवीन फूट ही झाडाच्या वरील भागात असते. यातून अन्नद्रव्ये शोषली जाऊन पानांची कार्यक्षमता वाढते. तसेच झाडास अन्नद्रव्ये सहजतेने उपलब्ध होतात. याण्यांसोबत वापर (बियाण्यावर लेप) सूक्ष्म अन्नद्रव्यांचे द्रावण तयार करून बियाण्यांवर लावून पेरणी करता येते. परंतु या पद्धतीत अन्नद्रव्यांचा पुरवठा फारच कमी प्रमाणात होतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराचे फायदे
सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या जीवन चक्रातील विविध जैवरासायनिक प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे काम करतात. तसेच प्रकाश संश्लेषण व हरितद्रव्य निर्मिती, चयापचय, मुख्य अन्नद्रव्यांचे कार्यक्षम वनस्पती अंतर्गत शोषण इत्यादी कार्य करत असतात. त्यामुळे वरखतांच्या स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराने विविध फायदे आढळून येतात. पिकांच्या क्षमतेएवढे उत्पादन मिळण्यास मदत होते. पिकांचे आरोग्य उत्तम राहून उत्पादनाची गुणवत्ता वाढते. पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. पिकांत फुले व फळांची गळ होत नाही. प्रकाश संश्लेषणाची क्रिया जलद होऊन पिकांची वाढ जोमाने होते. फवारणी करण्यासाठी घ्यावयाची काळजी
द्रावणाची तीव्रता कमी ठेवून जास्त फवारण्या कराव्यात. परंतु जास्त तीव्रतेचा फवारा कधीही करू नये. फवारणीच्या वेळेस थेंबांच्या आकारमानावर लक्ष ठेवावे. आकारमान अत्यंत कमी असणे आवश्यक असते. म्हणजे थेंब पानांवर किंवा झाडावर पडताच चिकटला पाहिजे. थेंब मोठा असल्यास तो ओघळून जमिनीवर येवू शकतो. जर थेंब झाडावर चिकटत नसेल तर स्टिकरचा वापर करावा. खतांच्या फवारणीचे अनेक फायदे असले तरी, फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. परंतु फवारणीतील खते अचानक निर्माण झालेल्या पानांतील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. पीक फुलोऱ्यात येण्याच्या किंवा बहार येण्याच्या वेळी तसेच फळधारणा झाल्यानंतर, बियांची किंवा फळांची वाढ होण्याकरिता अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात. अशा वेळेस फवारणीद्वारे दिलेली खते खूप उपयोगी पडतात. - डॉ. सय्यद इस्माईल, ९८९०९३१८६१, ७५८८०८२०४५ (विभाग प्रमुख, मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)