अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी करा विद्राव्य खतांचा वापर

पाणी वापराची कार्यक्षमता सूक्ष्मसिंचन तंत्र वापरल्याने वाढते. तशीच खतांच्या वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापरही शेतकऱ्यांनी करावा.
Automated systems play a vital role in fertilizer management.
Automated systems play a vital role in fertilizer management.

पाणी वापराची कार्यक्षमता सूक्ष्म सिंचन तंत्र वापरल्याने वाढते. तशीच खतांच्या वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापरही शेतकऱ्यांनी करावा. अलीकडे विद्राव्य खतांच्या किमती वाढल्याचे सांगितले जाते. त्या उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतांपैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चांगल्या प्रतिचा म्युरेट ऑफ पोटॅश ही खते पाण्यात संपूर्ण विरघळतात. त्यांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे नक्कीच करता येईल. कोणत्याही पिकांसाठी खताची मात्रा ठरवताना  अपेक्षित उत्पादन, खतांची शिफारशीत मात्रा यांचा विचार केला पाहिजे. त्याच प्रमाणे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे. मातीच्या परीक्षणामध्ये जमिनीचा सामू, विद्युतवाहकता (ईसी), सेंद्रिय कर्बाचे प्रमाण या बरोबरच उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण मिळू शकते. त्यानुसार विद्राव्य खताची मात्रा ठरवावी. पारंपरिक पद्धतीत माणसांद्वारे खते देणे हे खर्चिक आणि वेळखाऊ ठरते. तसेच मातीवर पडलेल्या खतांचा ऱ्हास विविध प्रकारे होऊ शकतो. हे टाळण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे खतांची मात्रा देणे फायदेशीर ठरते. पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये द्रवरूप स्वरूपात (विद्राव्य खते) पिकांच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या क्रियेला ‘फर्टिगेशन’ असे म्हणतात. यात खताची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. अनेक नगदी पिकांमध्ये खते एक दिवसाआड दिली जातात. तसे देणे शक्य नसल्यास आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा द्यावीत. यामुळे खताची वापर कार्यक्षमता वाढून उत्तम व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.  फर्टिगेशनचे फायदे 

 • सर्व परिस्थितीत अचूक व समप्रमाणात खतांचा वापर शक्य होतो. 
 • खते ठिबकमुळे पाण्याबरोबर झाडाजवळ मुळांच्या कक्षेत पडतात. 
 • खताची मात्रा ही झाडाची गरज व हवामानातील परिस्थितीनुरूप वेळेवर निश्‍चित करता येते. 
 •  पाण्याची कार्यक्षमता ४० ते ५५ टक्के व खतांची कार्यक्षमता २५ ते ३० टक्के इतकी वाढते. 
 • ठिबकमुळे पिकाच्या कार्यक्षम मुळांच्या कक्षेत ओलावा निर्माण होतो. दिलेली खते या भागातच पसरतात. जमिनीतून वाहून निचऱ्याद्वारे ऱ्हास होत नाही.
 • पिकाच्या संवेदनक्षम अवस्थांनुसार आवश्यक तेवढी खत मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. 
 • उत्पादनात २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होते. उत्पादनाची गुणवत्ता, प्रत वाढते.
 • हलक्या व कमी प्रतीच्या जमिनीतसुद्धा पीक घेता येते.
 • ही बहुतांश खतेही आम्लयुक्त असतात. यात सोडिअम व क्लोरिनचे प्रमाण अत्यल्प असते. क्षारामुळे ठिबक यंत्रणा किंवा संच बंद पडत नाहीत.
 • फर्टिगेशनसाठी विद्राव्य खताचे गुणधर्म 

 •   संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी असावीत.
 •   आम्लधर्मी असावीत.
 •   घन स्वरूपात उपलब्ध असावीत, यामुळे हाताळणी व वाहतूक करणे सुलभ होते.
 •   क्लोराइड्स व सोडिअमसारख्या मूलद्रव्यापासून मुक्त असावीत.
 •   खते पाण्यात विरघळल्यावर साका तयार होऊ नये.
 •   विद्राव्य खतामध्ये सर्व प्रमख अन्नद्रव्यांसह दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध व्हावीत.
 • फर्टिगेशनची कार्यक्षमता  फर्टिगेशनची कार्यक्षमता खालील बाबींवर अवलंबून असते.

 • ठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी.
 • जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म म्हणजे सामू, विद्युतवाहकता, क्षारांचे प्रमाण, जमिनीची जडणघडण आणि पोत.
 • फर्टिगेशनसाठी वापरावयाची साधने.
 • खते देण्यासाठी निवडलेला कालावधी.
 • पिकाला द्यावयाचे पाण्याचे वेळापत्रक.
 • जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण किंवा पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रातील खतांची तीव्रता.
 • ठिबक सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता.
 • जमिनीचे तापमान,  पिकांच्या अवस्था.
 • खतांचा परस्पर सबंध  अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर खतांच्या परस्पर संबंधामुळे परिणाम होतो. दोन वेगवेगळी खते मिसळल्यामुळे त्यामधील अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊ शकते. बहुतेक कॅल्शिअमयुक्त खतांमध्ये इतर खते मिसळू नयेत. विद्राव्य खतांच्या वापरासंबंधी सूचना

 •   ठिबक सिंचन लॅटरल किंवा तोट्या पाण्यातील क्षार, शेवाळ यामुळे बंद पडू शकतात. त्यासाठी आम्ल व क्लोरिनची प्रक्रिया वेळोवेळी करावी.
 •   विद्राव्य खतमिश्रित पाणी देऊन संपल्यानंतर फक्त साध्या पाण्याद्वारे संच १५ ते २० मिनिटे अधिक चालवावा. यामुळे संचामध्ये खत द्रावण शिल्लक राहणार नाही.
 •   बऱ्याचदा कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, जस्त, तांबे व मॅंगनीज यांचा पाण्यात उपलब्ध असलेल्या क्षाराबरोबर साका तयार होतो. ते संचामध्ये अडकून राहतात. त्याकरिता चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा. खताची टाकी व इतर उपकरणे फर्टिगेशननंतर स्वच्छ धुऊन ठेवावीत.
 • फर्टिगेशनच्या मर्यादा

 • ठिबकबरोबरच ही उपकरणे, साधने विकत घ्यावी लागतात. त्याचा थोडा खर्च वाढतो.
 • योग्य ती काळजी न घेतल्यास ड्रीपर चोकअप होऊन संपूर्ण ठिबकवर परिणाम होऊ शकतो.
 • ठिबक सिंचन व फर्टिगेशन यंत्रणेचा निष्काळजीपणे वापर झाला तर खतमिश्रित पाणी विहिरीत अथवा पाण्याच्या टाकीत परत जाऊ शकते. यातून पाणी पिल्यास सजीवांना विषबाधा होऊ शकते.
 • काही प्रमुख विद्राव्य  खते आणि त्यांचे गुणधर्म

 • १९:१९:१९ - यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये समप्रमाणात आहेत. या ग्रेडला ‘स्टार्टर ग्रेड’ असेही म्हणतात. यातील नत्र या अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तीनही स्वरूपात असतो. प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी या ग्रेडचा उपयोग होतो. फवारणीमध्ये वापरण्यासही योग्य. अन्नधान्य, भाज्या, फळे व वेलवर्गीय पिकांसाठी उपयुक्त असते.
 • १२:६१:० - याला मोनो अमोनिअम फॉस्फेट म्हणतात. यामध्ये अमोनिकल नत्र कमी असून, पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळे व फळफांद्याच्या वाढीसाठी उपयुक्त असते. फुलांच्या पूर्ण वाढीसाठी व तुरे येताना फायदेशीर ठरते. कॅल्शिअमयुक्त खते वगळता सर्व विद्राव्य खतांबरोबर मिसळून वापरता येते. 
 •  ०:५२:३४ - या खतास मोनो पोटॅशिअम फॉस्फेट म्हणतात. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. फळांची योग्य पक्वता व रंगासाठी हे खत वापरले जाते. कॅल्शिअमयुक्त खतांसोबत मिश्रण करता येते.
 • १३:०:४५  - या खतास पोटॅशिअम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी व विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्यानंतर व पीक, फळ पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयुक्त ठरते. फळधारणा व फळवाढीच्या काळात फवारणीद्वारे वापरावे. यामुळे फळांचा आकार व त्यातील साखरेचे प्रमाण वाढते. हे खत जड धातू व क्लोराइड्स विरहित आहे. अकाली फळगळ थांबवते. या खतांमुळे पिके अवर्षण स्थितीत तग धरू शकतात.
 • ०:०:५०:१८ एस  (पालाश ५० टक्के आणि गंधक १८ टक्के) -यात पालाशसोबतच गंधक असून, त्यामुळे उत्पादनाचा दर्जा वाढतो. गंधकामुळे पीक किडी व रोग यांच्या हल्ल्यास उत्तम प्रतिकार करते. पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होते. फळांतील साखरेच्या प्रमाणात, आकार, दर्जामध्ये सुधारणा होते. फळ लवकर पिकते. क्लोरिनविरहित या खतामध्ये पालाश बरोबर उपलब्ध स्वरूपातील गंधक असतो. पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगीं पडते. 
 • - रवींद्र जाधव,  ९४०३०१६१०१ (लेखक कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विश्‍वविद्यालय, प्रयागराज येथे आचार्य पदवी घेत आहेत.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com