मूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्ट

मूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्टचा वापर केल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीचे जैविक तसेच भौतिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करणे शक्य होते.
मूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्ट
Valuable spent mushroom compost manure used radish cultivation area.

मूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्टचा वापर केल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीचे जैविक तसेच भौतिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करणे शक्य होते. मशरूम (अळिंबी) काढणी झाल्यानंतर शिल्लक राहिलेले बेडमधील माध्यम म्हणजे 'स्पेंट मशरूम सबस्ट्रेट' किंवा स्पेंट मशरूम कंपोस्ट. प्रति किलो अळिंबी उत्पादनामागे साधारणपणे ५ ते ६ किलो स्पेंट मशरूम सबस्ट्रेट शिल्लक राहते. याचे योग्य व्यवस्थापन केल्यास सेंद्रिय खत म्हणून वापर करता येतो. फायदे 

 • शेणखताला पर्याय म्हणून उत्तम सेंद्रिय खत (कंपोस्ट).
 •  जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीचे जैविक तसेच भौतिक आरोग्य सुधारण्यास मदत.
 •  उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत. हे जिवाणू अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यास फायदेशीर.
 • पिकांना आवश्यक प्रमाणात पोषण अन्नद्रव्यांची उपलब्धता.
 • जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते.जमिनीचा पोत सुधारतो.
 • पिकांचे आरोग्य उत्तम राहून कीड व रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ.
 • रासायनिक खतांचा मर्यादित वापर.
 • स्पेंट मशरूम कंपोस्टमधील घटक 

 • सेंद्रिय कर्ब - १५-२५ टक्के,
 •  नत्र - १-१.७५ टक्के,
 •  स्फुरद - ०.५ -१ टक्के,
 • पालाश - १-१.३ टक्के
 •  कार्बन:नत्र प्रमाण: १५:१
 • मूल्यवर्धन प्रक्रिया 

 •  स्पेंट मशरूम सबस्ट्रेट हे अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असते, त्यामुळे कमी कालावधीत (२ महिने) उत्कृष्ट प्रतीचे कंपोस्ट तयार होते.
 • जैविक खतांचा वापर करून कंपोस्टचे मूल्यवर्धन करता येते. सर्वप्रथम स्पेंट मशरूम सबस्ट्रेटचे बेड व्यवस्थित ओले करून, त्यामध्ये जिवाणू खते (ॲझोटोबॅक्टर, पीएसबी आणि केएमबी) एकत्रित मिश्रण करून प्रत्येक बेड मध्ये १५ ते ३० ग्रॅम या प्रमाणात मिसळावे.
 • जिवाणूंची प्रक्रिया केलेले स्पेंट मशरूम सबस्ट्रेट बेड २ महिने कुजण्यासाठी ठेवावेत. या प्रक्रियेदरम्यान बेड दोनदा अलटापालट करून मिश्रण करावे. बेडमध्ये ओलावा कमी वाटल्यास योग्य प्रमाणात पाणी शिंपडावे.
 • तयार झालेले स्पेंट मशरूम कंपोस्ट गर्द तपकिरी ते काळसर रंगाचे असते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवाणूंची संख्या वाढलेली असते. हेच जिवाणू पिकाला वाढीसाठी लागणारे आवश्यक अन्नद्रव्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध करून देतात. त्यामुळे रासायनिक खतांचा ५० टक्यांपर्यंत खर्च वाचतो.
 • कृषी महाविद्यालयातील प्रयोग

 • कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर मुळा लागवडीमध्ये सेंद्रिय खत म्हणून स्पेंट मशरूम कंपोस्टचा वापर (२० टन प्रति हेक्टर) करण्यात आला.
 • या कंपोस्टमध्ये वापरण्यात आलेली जिवाणू खते पिकाला आवश्यक प्रमाणात पोषण अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात. अझोटोबॅक्टर हे जिवाणू हवेतील नत्र शोषून ते पिकांना उपलब्ध करून देतात. पीएसबी हे जिवाणू जमिनीतील अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून देतात आणि केएमबी हे जिवाणू जमिनीतील निष्क्रय पालाशला पिकाच्या मुळाजवळ सक्रिय करण्याचे काम करतात. त्यामुळे रासायनिक खताच्या मात्रेमध्ये ५० टक्के बचत झाली.
 • प्रक्षेत्रावरील प्रयोगामध्ये मुळ्याची लांबी ४२ ते ४५ सेंमी, व्यास ४ ते ५ सेंमी आणि प्रत्येक मुळ्याला पानांची संख्या १७ ते २५ दिसून आली. प्रति हेक्टरी उत्पादन ३० ते ३२ टन आढळून आले.
 • संपर्क : डॉ.अशोक जाधव, ९४२३००७९३१ (वनस्पती रोगशास्त्र आणि कृषी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com