बटाटा पिकातील मूल्यवर्धन...

शेतकरी उत्पादक कंपनीची आर्थिक परिस्थिती, खेळते भांडवल व उपलब्ध मनुष्यबळ याच्या आधारे बटाटा प्रक्रियायुक्त पदार्थांच्या उत्पादन व्यवस्थेत भाग घेण्याची दिशा ठरवावी.
Farmer companies have the opportunity to produce quality potatoes.
Farmer companies have the opportunity to produce quality potatoes.

शेतकरी उत्पादक कंपनीची आर्थिक परिस्थिती, खेळते भांडवल व उपलब्ध मनुष्यबळ याच्या आधारे बटाटा प्रक्रियायुक्त पदार्थांच्या उत्पादन व्यवस्थेत भाग घेण्याची दिशा ठरवावी. शेतकरी उत्पादक कंपनीला खूप साऱ्या उद्योगांची संधी उपलब्ध होऊ शकते. बटाट्यावर प्रक्रिया उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लहान मोठे उद्योग अस्तित्वात आहेत. त्यापैकी बरेच उद्योग हे बटाटा व बटाट्याव्यतिरिक्त इतर स्नॅक्समध्ये सुद्धा कार्यरत आहेत. खासगी उद्योगांचे ब्रॅण्डिंग झाले आहे, अशा उद्योगांनी ब्रॅण्डनिर्मितीवर मोठ्या प्रमाणावर खर्च करून बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रक्रिया उद्योगाच्या शाखा निर्माण करून या शाखांद्वारे शेतीमाल प्रक्रिया केली जाते. परंतु सर्वच शाखा या ब्रॅण्डसाठी कार्यरत असल्या तरी त्यातही दोन प्रकार असतात. 

  • अ) या शाखा संपूर्णपणे मोठ्या उद्योगामार्फत स्वयंखर्चाने उभारून यामध्ये उद्योगाचे स्वत:चे व्यवस्थापन असते.
  • ब) दुसऱ्या एखाद्या छोट्या उद्योगांशी प्रक्रिया पदार्थनिर्मितीसाठी करार करून मोठ्या ब्रॅण्डअंतर्गत विक्री करणे. यात व्यवस्थापन हे मूळ उद्योगाचे नसून ज्या उद्योगाला या मूळ उद्योगाने एजन्सी दिली त्यांचे असते. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वत: ब्रॅण्डनिर्मितीमध्ये उतरण्यापेक्षा सुरुवातीच्या काळात छोट्या का होईना ब्रॅण्डखाली काम करण्यास हरकत नाही. 
  • प्रक्रिया, ब्रॅण्डनिर्मिती आणि विक्री

  • प्रक्रिया उद्योगात ब्रॅण्डनिर्मिती करून विक्री करणे, ही एक मोठी प्रक्रिया पार पाडण्यास शेतकरी उत्पादक कंपनीला विविध दिव्यांतून जावे लागते. सुरुवातीला विविध योजना उपलब्ध असतील तर त्यांच्या साह्याने अथवा सभासदांकडून भागभांडवल जमा करून त्याला बँक कर्जाची जोड देऊन बटाटा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रणेचे नियोजन करून उद्योग उभारावा.
  • कंपनीला साजेशी ब्रॅण्डनिर्मिती करून हा ब्रॅण्ड लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिद्धी करावी.
  • पारंपरिक पद्धतीनुसार वितरक नेमणे, जाहिरात करणे, या माध्यमातून उद्योगाची उलाढाल वाढवावी, हा उद्योग उभारणीकरिता शीतगृह, पॅकहाउस, विविध प्रकारच्या मशिनरी, खेळते भांडवल, मनुष्यबळ यांची तरतूद करण्यासाठी व्यवसाय आराखडा बनवावा. यामध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ प्रशिक्षण, व्यवसाय आराखडा याकरिता साह्य करते. यंत्रणा निवड, ब्रॅण्डनिर्मिती, शासकीय योजनांसाठी सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून साह्य केले जाते. 
  • शेतकरी उत्पादक कंपनीला दुसऱ्या प्रकारात सुद्धा कामकाज करता येऊ शकते. यातील पहिल्या प्रकारात प्रत्यक्ष उत्पादन व उद्योग या दोघांची ब्रॅण्डनिर्मिती अपेक्षित आहे. तर दुसऱ्या प्रकारात फक्त उद्योगाची ब्रॅण्डनिर्मिती  करणे, अपेक्षित असून उत्पादनाचे ब्रॅण्ड निर्माण केले जात नाही. याप्रकारचे मॉडेल राज्यात खासगी उद्योगांच्या माध्यमातून कार्यरत असून गेल्या ३० ते ४० वर्षांपासून हा प्रकार यशस्वीपणे नफ्यामध्ये सुरू आहे. 
  • तमिळनाडू, कर्नाटक व केरळ या राज्यांमधून उद्योजक महाराष्ट्रात आले. त्यांनी अत्यंत कमी खर्चात व कमी मनुष्यबळाच्या साह्याने बटाट्यावर प्रक्रियायुक्त पदार्थांची साखळी उभारली. यशस्वीपणे बटाट्याचे विविध व ताजे पदार्थ विक्रीचे मॉडेल राज्यात विकसित करून ग्राहकांना असे पदार्थ पुरविण्याचा उद्योग सुरु केलेला आहे. बटाटा प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी या लोकांनी एका ब्रॅन्ड नेम खाली दुकानांच्या साखळ्या तयार केल्या आहेत. या साखळ्यांचे मॉडेल अत्यंत सोपे आहे. या मॉडेलमध्ये ८ ते १० दुकानांचे एक व्यक्ती व्यवस्थापन करते. यामध्ये दुकान भाडेतत्त्वावर घेणे, दुकानाचे अंतर्गत साहित्य जसे की, फर्निचर, बटाट्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे साहित्य आणि एक किंवा दोन जणांचे प्रशिक्षित मनुष्यबळ अशी प्राथमिक तयारी केली जाते. तसेच  या सर्व तयारीसह खेळते भांडवल, कच्च्या मालाचा पुरवठा व त्याचे नियोजन असा सर्व सेट-अपची मोक्याच्या ठिकाणी उभारणी करून व्यवसायास सुरवात केली जाते. या सर्व दुकानांमधील पदार्थांची गुणवत्ता व दर्जा, चांगले साहित्य वापरून सांभाळली जाते. तसेच ताजा पदार्थ मिळाल्याने ग्राहकांकडून इतर ब्रॅण्डच्या पॅकिंग केलेल्या पदार्थांपेक्षा अशा प्रकारचे पदार्थ घेण्यास प्राधान्य दिले जाते. एक दुकान सर्व खर्च जाऊन चांगला नफा ‍महिन्याकाठी कमावते. या सर्व दुकानांना आवश्यक असलेला कच्चा माल पुरविण्याचे कामकाज व पैसे जमा करण्याचे काम एकाच व्यक्तीमार्फत केले जाते. दुकानावर एक किंवा दोन व्यक्ती कच्च्या मालावर प्रक्रिया करणे, दुकान स्वच्छ ठेवणे, मालाची मांडणी करणे, ग्राहकाला माल विकणे, इत्यादी कामकाज करतात. अशा बटाटा प्रक्रियेच्या साखळ्या आजही आपणास पाहावयास मिळू शकतील. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विक्री व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने असे प्रयत्न करण्यास हरकत नाही.
  • व्यवसाय करताना बटाट्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करताना पदार्थानुरूप बटाट्याच्या जातींची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. ही माहिती दुकान चालविण्याच्या व्यक्तीस असणे आवश्यक आहे.
  • प्रक्रियायुक्त पदार्थाची विक्री

  • उद्योगाच्या स्नॅक्स कॅटॅगरीमध्ये निरीक्षण केले तर असे निदर्शनास येईल, की बरेचसे मोठ्या उद्योगांचे ब्रॅण्ड हे छोट्या उद्योगांकडून त्यांचे कामकाज करून घेतात किंवा त्यांच्याशी करार करून घेतात. अशा ब्रॅण्डशी करार करून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कामकाज करण्यापूर्वी पूर्ण तयारी करून बाजारपेठेत उतरावे. याची पहिली पायरी म्हणजे अशा पदार्थाच्या विक्रीच्या साखळीत उतरणे.
  • या साखळीत बटाट्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थाची माहिती घेऊन या साखळीच्या कोणत्या भागात प्रवेश करता येईल असा अभ्यास करणे आवश्यक आहे.
  • शेतकरी उत्पादक कंपनीची आर्थिक परिस्थिती, खेळते भांडवल व उपलब्ध मनुष्यबळ याच्या आधारे बटाटा प्रक्रियायुक्त पदार्थाच्या उत्पादन व्यवस्थेत भाग घेण्याची दिशा ठरवावी.
  • देशात बटाट्याच्या प्रक्रिया उद्योगात लघू व सूक्ष्म उद्योगांपासून ते मोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योगांपर्यत खूप पर्याय उपलब्ध आहेत. अशा उद्योगांची एजन्सी घेणे किंवा वितरणकर्ता म्हणून कामकाज करणे अन्यथा विविध प्रक्रियादार गृहउद्योगांकडून बटाटा व तत्सम शेतीमालापासून तयार केलेल्या स्नॅक्स वर्गातील / कॅटॅगरीतील पदार्थ घेऊन स्वत:च अशा पदार्थांची दुकाने / दालने उघडणे हा पर्यायसुद्धा अवलंबण्यास हरकत नाही. या प्रक्रियेत कुठेही शेतकरी कंपनीस उत्पादन तयार करावयाचे नसून फक्त विक्री व्यवस्थेवर भर द्यायचा आहे. 
  • शहरी अथवा ग्रामीण भागात निरीक्षण केले तर असे निदर्शनास येईल, की विविध मोठमोठ्या चौकात बटाट्याचे चिप्स, शेव, कुरकुरे, इत्यादीसारखे पदार्थांची दुकाने एकाच जागेवर थाटलेली आहेत. अशा दुकानांच्या साखळीला एकच नाव असेल, अशा मॉडेलमध्ये उतरण्यास शेतकरी उत्पादक कंपनीने प्रयत्न करावा. अशा साखळ्या स्थापन करण्यास शक्यतो तालुका किंवा मोठ्या गावांना प्राधान्य द्यावे. हाच प्रकार फ्रँचाईझी मॉडेलचा आधार घेऊन करण्यास हरकत नाही. या साखळ्यांमध्ये फक्त बटाट्याशी निगडित पदार्थ विक्रीस ठेवता येईल याची दक्षता घ्यावी. 
  • शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंडळ किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वैयक्तीक अशा साखळ्या निर्माण करून स्वत: त्या साखळ्यांमध्ये गुंतून राहण्याची आवश्यकता नाही. परंतु या मॉडेलमार्फत रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. या साखळ्यांना बटाट्याचा प्रक्रियायुक्त माल पुरविण्याची जबाबदारी शेतकरी उत्पादक कंपनीची असेल.
  • - प्रशांत चासकर,  ९९७०३६४१३०. (राज्य कृषी व्यवसाय व पणन तज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com