शेतकरी कंपन्यांसाठी बटाटा पिकातील मूल्यसाखळी

आजच्या लेखामध्ये आपण बटाटा पिकाच्या मूल्यसाखळीबाबत माहिती घेत आहोत. या पिकातील विविध व्यवसाय संधीचा शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी काय फायदा होऊ शकतो याबाबत चर्चा करत आहोत.
Demand for potatoes is increasing in the processing industry across the country.
Demand for potatoes is increasing in the processing industry across the country.

आजच्या लेखामध्ये आपण बटाटा पिकाच्या मूल्यसाखळीबाबत माहिती घेत आहोत. या पिकातील विविध व्यवसाय संधीचा शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी काय फायदा होऊ शकतो याबाबत चर्चा करत आहोत. देशातील कृषी क्षेत्रात पर्यायी बाजार व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनामार्फत विविध पाऊले उचलली जात असून त्यानुसार कृषी क्षेत्रातील घटकांसाठी परिवर्तन पूरक निर्णय घेतले जात आहेत. कृषी क्षेत्रातील पणन व्यवस्थेचा विचार केला तर समाजाच्या गरजांच्या माध्यमातून व घडणाऱ्या बदलानुसार, साजेशी पूरक पणन व्यवस्था निर्माण होत आहे. त्यादृष्टीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर पणन विषयाशी पूरक शासकीय योजना व प्रकल्पांची निर्मिती होत आहे. या सर्वांचे फलित म्हणजे शेतमालाच्या कृषी मूल्य साखळ्यांमध्ये निर्माण होणारे परिवर्तन. या परिवर्तनामूळे शेतकरी वर्गाला भविष्यात फायदा होणार आहे.  भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनामध्ये बटाटा पीक अग्रस्थानी आहे. जागतिक पातळीवर बटाटा पिकाचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होतो. त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. यानंतर रशियासह इतर युरोपीय देशांचा क्रमांक लागतो. भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बटाट्याची लागवड प्रामुख्याने केली जाते. या पिकाखालील एकूण क्षेत्राच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र या प्रमुख राज्यांमधील आहे. भारतातील उत्तर प्रदेशात या पिकाचे उत्पादन अधिक होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सातारा, नाशिक, नगर, बीड, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यात रब्बी हंगामात जास्त प्रमाणात या पिकाची लागवड केली जाते. बटाट्याचे आहारातील महत्त्व

 • सामान्य लोकांना स्वस्तात पिष्टमय पदार्थांचा पुरवठा व्हावा या उद्देशाने सिमला येथील बटाटा संशोधन केंद्राने देशातील प्रत्येक राज्यात उत्पादन घेता येईल, अशा जाती विकसित केल्या आहेत.  
 • आजही विविध राज्यातील खाद्य संस्कृतीमध्ये बटाटा पिकाचा समावेश आहे. महाराष्ट्रात बटाट्याचा प्रामुख्याने उपयोग पोहे, शेव, वडे, भजी, घरगुती सुकी व ओली भाजी याकरिता केला जातो. ओदिशा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बटाट्याचा उपयोग घरगुती भाजीमध्ये केला जातो. या राज्यात खाद्यपदार्थामध्ये अंडी व बटाटा असे एकत्रित मिश्रण असते. उत्तरेतील राज्यात बटाटा प्रामुख्याने विविध मांसाहारी पदार्थात मिश्रण करून वापरला जातो. दक्षिणेकडील राज्यात सांबाराच्या स्वरूपात बटाट्याचा वापर केला जातो. 
 • बटाट्यापासून निरनिराळे पदार्थ तयार करता येतात. महाराष्ट्रात वेफर्स, पापड, चिप्स करण्याचे कुटीरोद्योग आहेत. गेल्या काही काळात जागतिकीकरणामुळे प्रक्रिया उद्योगात मोठी वाढ झाली आहे. मागणी वाढल्यामुळे उद्योगही वाढत आहेत. हरियानामध्येही वेफर्स उद्योग फार मोठ्या प्रमाणावर चालू  आहेत.
 • करार शेतीतील संधी

 • काही ठरावीक व्यवसायासाठी बटाटा पिकाची लागवड उत्पादन व विक्री / विपणनाचे करार बटाटा शेतीत संपूर्ण अमेरिका व भारतात मोठ्या प्रमाणावर केले जातात. परदेशातील जास्त उत्पादन देणाऱ्या बटाटा जातींच्या लागवडीमुळे अल्पभूधारक शेतकरी वर्गाकडून खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटाटा जातीच्या लागवडीमध्ये घट होत आहे. 
 • देशी जातींची लागवड, बटाटाचा मुबलक पुरवठा, यामुळे मागील कित्येक शतकांपासून पोषणाच्या बाबतीत बटाटा हे पीक महत्त्वाची भूमिका बजावत होते. परंतु, सद्यःस्थितीत खाण्यासाठी आवश्यक बटाट्याच्या लागवडीत घट झाल्याने समाजातील काही घटक कुपोषित राहिल्याचे निदर्शनास येत आहे. सन २०२१ च्या जागतिक भूक निर्देशांकानुसार ११६ देशांमध्ये सर्व्हेक्षण केले गेले, यामध्ये भारताचा क्रमांक १०१ असून पाकिस्तान ९२, श्रीलंका ६५, नेपाळ ७६, बांगलादेश ७६. जगातील फक्त १५ देश हे भारताच्या मागे आहे. भारतासाठी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या सर्व घडामोडीत बटाटा पिकांचा मोठा सहभाग आहे. गरिबांचे अन्न म्हणून बटाटा पिकाकडे बघितले जाते. एका बाजूला भारतात पुढील तीन वर्षे पुरेल इतके अन्नधान्य आहे असे बोलले जाते. परंतु दुसरीकडे कुपोषितांचा आकडा वाढत चालला आहे. 
 • करारशेतीतील बेणे देऊन शेतीमाल खरेदी करणे या प्रकारात शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर तांत्रिक मार्गदर्शन पुरविले जाते. खासगी कंपन्यांकडून तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर क्षेत्रीय सल्लागारांची नियुक्ती केली जाते. 
 • क्षेत्रीय स्तरावर बऱ्याच खासगी कंपन्या स्वत:चे बियाणे, यंत्रणा आणि तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना पुरवितात. एवढे करूनही पिकामधून अपेक्षेप्रमाणे व योग्य गुणवत्तेचे पीक मिळाले नाहीतर शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड बसू शकतो.
 •  खाद्य प्रक्रिया उद्योगातील कंपनीमार्फत प्रक्रियेसाठी स्टार्चचे योग्य प्रमाण असणाऱ्या बटाटा  जातींची निवड केली जाते. यामध्ये बटाटा जातींची  १) स्टार्चयुक्त, २) तेलयुक्त, ३) मध्यम या तीन प्रकारांमध्ये वर्गवारी केली जाते. किंवा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपयुक्त जातीदेखील विकसित करण्यात आलेल्या आहेत.
 • फ्रेंच फ्राइज किंवा फिंगर चिप्स हा पदार्थ फ्रोझन प्रकारातील असून याकरिता एल.आर. (लेडी रोजेटा) या जातीची लागवड केली जाते. यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी व स्टार्चचे प्रमाण जास्त असते. तसेच मॉरिस पायपर, किंग एडवर्ड, स्वीट ज्वेल फीगरलिंग, युकोन गोल्ड, यांसारख्या जातींचा उपयोग प्रामुख्याने प्रक्रिया उद्योगांमार्फत केला जातो. 
 • आजच्या परिस्थितीत जगात जेवढे फास्टफूड किरकोळ विक्रीचे आउटलेट्स किंवा दुकाने आहेत यांचेमार्फत मांस व बटाटा हे पदार्थ हवा बंद डब्यात भरलेले किंवा कमी तापमानात गोठवलेले किंवा अंतिम पदार्थ बनविण्यापूर्वी प्रक्रिया केलेले वापरले जातात. जेणेकरून ग्राहकांना तत्काळ सुविधा देणे शक्य होऊ शकेल. 
 • फास्ट फूड दुकानांमार्फत किंवा आउटलेटमार्फत बटाट्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अमेरिकेमध्ये एकूण  बटाट्याच्या उत्पादनांपैकी ४० टक्के बटाट्याचे उत्पादन हे फास्ट फूडच्या आउटलेट आणि गोठविलेल्या अन्नाच्या  उत्पादनाकरिता वापरले जाते.
 • बटाटा पिकाची जागतिक बाजारपेठ

 • बटाटा हे पीक जागतिक स्तरावर इतर पिकांच्या तुलनेत सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगात बटाटा पिकाचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो.
 • बटाट्याच्या जागतिक बाजारपेठेला सन २०१७-१८ मध्ये काहीशी मरगळ आली होती. परंतु, २०१९ या वर्षात सुमारे सहा टक्क्यांनी बटाट्याच्या जागतिक बाजारपेठेला झळाळी मिळाली. 
 • अब्जावधी उलाढाल असलेल्या बाजारपेठेत चीन पाठोपाठ भारत व युक्रेन या राष्ट्रांचे उत्पादन व मागणीच्या बाबतीत वर्चस्व आहे. अमेरिका आणि कॅनडा यांचा अनुक्रमे पाचवा व तेरावा क्रमांक या यादीत लागतो. 
 • कोरोना काळात बटाटा पिकाची मागणी कमी न होता वाढतच गेली, याचे एकच महत्त्वाचे कारण म्हणजे या पिकाचा रोजच्या आहारातील वापर, प्रक्रियायुक्त पदार्थाच्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून मागणी व किराणा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री, खाद्यपदार्थांची पुरवठा साखळी या काळात थोडीफार विस्कळीत जरी झालेली होती, तरीही थांबलेली नव्हती. प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांच्या कार्यक्षमतेमुळे व बटाटा पिकातील कमी दरामुळे कोरोना काळात मंदीचा कमी फटका या पिकाला बसला. 
 • हवाबंद प्रक्रियायुक्त पदार्थ बनविणाऱ्या कंपन्या, चिप्स / इतर स्नॅक्स बनविणाऱ्या कंपन्या, शीतगृह / फ्रोझन प्रकारातील प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या, फास्ट फूड प्रकारातील अन्न पुरवठा करणाऱ्या दुकानांची साखळी, गृहिणींना तत्काळ बनविता येणारे पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या अशा विविध प्रकारच्या कंपन्यांमुळे बटाटा पिकाची साखळी टिकून राहिली.
 • - प्रशांत चासकर,  ९९७०३६४१३०,  (राज्य कृषी व्यवसाय व पणन तज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)  

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com