तंत्र गांडूळ खत उत्पादनाचे...

आपल्याकडे आयसेनियाफेटिडा आणि युड्रीलस युजिनी या गांडूळ जातींचा वापर खतनिर्मितीसाठी केला जातो. गांडूळ खत निर्मितीसाठी वीट बांधकाम टाकी, ढीग पद्धत, ट्रेट्रा व्हर्मी बेडचा वापर करावा.
Vermicompost production project
Vermicompost production project

आपल्याकडे आयसेनिया फेटिडा आणि युड्रीलस युजिनी या गांडूळ जातींचा वापर खतनिर्मितीसाठी केला जातो. गांडूळ खत निर्मितीसाठी वीट बांधकाम टाकी, ढीग पद्धत, ट्रेट्रा व्हर्मी बेडचा वापर करावा.  सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खतास  अनन्यसाधारण महत्त्व आहे. गांडुळाच्या काही जाती जमिनीच्या पृष्ठभागावर राहून सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, काही जमिनीच्या खालच्या, तर काही त्या खालच्या भागात राहून मातीवर उपजीविका करतात. जमिनीच्या पृष्ठभागावर राहून सेंद्रिय घटकांचे विघटन करणाऱ्या गांडुळांचा वापर खत तयार करण्यासाठी करतात. आपल्याकडे आयसेनिया  फेटिडा आणि युड्रीलस युजिनी या गांडूळ जातींचा वापर खतनिर्मितीसाठी केला जातो. गांडुळे दिवसभरात जेवढे खातात त्यापैकी स्वतःच्या शरीरसाठी फक्त १० टक्के भाग ठेवून बाकीचा ९० टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतात. एका गांडुळापासून वर्षभरात साधारणपणे ८०० गांडूळे मिळू शकतात. गांडुळांचे आयुष्य सरासरी दोन वर्षे असते.  खतनिर्मिती 

 • गांडूळ खतनिर्मितीसाठी वीट बांधकाम टाकी, ढीग पद्धत, ट्रेट्रा व्हर्मी बेडचा वापर करावा.
 • खतनिर्मितीसाठी वाफे तयार करताना शक्‍यतो जमिनीच्यावर करावेत. गांडूळ खतनिर्मिती करण्यासाठी गोठ्याच्या जवळ उंचावरील जमीन निवडावी. खतनिर्मितीच्या जागी सावली आवश्‍यक असते. त्याकरिता झाडाची सावली किंवा उपलब्ध साधनसामग्रीनुसार कुडाचे छप्पर, शेडनेट, ॲसबेस्टॉसचे छत इत्यादीचा वापर करता येईल. गांडूळ खताच्या जागेजवळ पाण्याची सोय असावी.  गांडूळ खतनिर्मितीच्या पद्धतीमध्ये बेड लावण्याची कार्यपद्धती सारखीच असते. वाफे तयार करताना सिमेंट, वाळू व विटांच्या सह्याने एक ओळ बांधून घ्यावी. ढिगाच्या भोवती विटा रचल्या तरी चालतात. 
 • बेड करताना ४ मीटर लांब, १.२० मीटर रुंद आणि ०.६ मीटर उंच इतके ठेवावे. या बेडचा आकार शासनमान्य आहे.  
 • आपल्याकडे उपलब्ध असलेले शेणखत, पिकांचे अवशेष तसेच जागेच्या उपलब्धतेनुसार बेडची लांबी वाढविता येते. बेडचा तळ बनविताना त्यास थोडा उतार ठेवावा. जेणेकरून बेडमधील जास्तीचे पाणी एका बाजूला जमा होऊन बेडला ठेवलेल्या छिद्रातून बाहेर काढता येईल. बेडमधील छिद्राद्वारे झिरपलेले पाणी एका नालीवाटे जमिनीतील टाकीमध्ये जमा होईल अशी व्यवस्था करावी. जमा झालेले हे द्रावण पिकांना देण्यासाठी आणि पिकांवर फवारण्यासाठी वापरता येते.
 • बेड लावताना खालच्या थरामध्ये पालापाचोळा, उसाचे पाचट, पिकांचे अवशेष, सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. हा थर अर्धा फूट उंचीचा ठेवावा. दुसरा थर कुजलेल्या शेणाचा द्यावा. अर्धवट कुजलेल्या शेणाच्या थराची उंची दीड फुटापर्यंत ठेवावी. शेण व पालापाचोळा हा ३ः१ या प्रमाणात मिसळावा. तिसरा थर शेणाच्या रबडीचा द्यावा. हा थर १० सेंमीचा ठेवावा. 
 • बेडची उंची जास्त ठेवू नये. उंची जास्त झाल्यास बेडमधील तापमान वाढेल व त्यातील हवा खेळती राहणार नाही.
 • बेड लावताना ताजे शेण वापरू नये. कारण यामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे गांडुळे जगू शकत नाहीत. बेडच्या खालच्या बाजूला सिमेंट काँक्रीट किंवा विटांच्या साह्याने कोबा करावा.
 • बेड लावल्यानंतर ७ ते ८ दिवस त्यावर पाणी मारावे. बेड थंड झाल्यानंतर त्यामध्ये गांडुळे सोडावीत.
 • साधारणपणे एक टन शेणासाठी एक किलो गांडुळे वापरावीत. एक किलोमध्ये साधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. ही गांडुळे बेडमध्ये समप्रमाणात सोडावीत. गांडुळे सोडल्यानंतर बेडमध्ये सतत ४० ते ५० टक्के ओलावा राहील याची काळजी घ्यावी. बेडमधील तापमान नियंत्रित ठेवावे.
 •  बेडमधील ओलावा, हवा व सूर्यप्रकाश या बाबतींत गांडुळे खूप संवेदनशील असतात. गांडुळांना जास्त प्रकाश चालत नाही. बेडवर ऊन पडल्यास बेडमधील ओलावा कमी होतो. खताच्या बेडमध्ये ओलावा कमी झाल्याने गांडुळे मरतात, तसेच जास्त पाणी झाल्यास त्यांची क्रियाशीलता घटते, दलदल झाल्यास गांडुळे मरतात. म्हणून बेडवर गरजेनुसार उन्हाळ्यात दररोज, पावसाळ्यात आठवड्यातून ४ दिवस आणि हिवाळ्यात ३ दिवस पाणी मारावे.
 • उंदीर, पक्षी, मुंगूस, कोंबड्या, डुक्कर इत्यादींपासून गांडुळांचे संरक्षण करावे. त्यासाठी गरज असल्यास बेडवर किंवा कडेने जाळी बसवावी. मुंग्याच्या नियंत्रणासाठी बेडच्या कडेला कीडनाशक पावडर टाकावी. प्लॅस्टिक कागदाने बेड झाकू नये, कारण बेडमधील तापमान वाढेल. गॅस बाहेर पडणार नाही. गांडुळांची मरतूक होईल.
 •  खताचे उत्पादन 

 • सुरुवातीला गांडूळ खत तयार होण्यास जास्त कालावधी लागतो. परंतु एकदा गांडुळांची संख्या वाढली, की ते ४५ ते ५० दिवसांत गांडूळ खत तयार होते. साधारणपणे एक महिन्यामध्ये बेडमधील वरच्या थरामध्ये गांडूळ खत दिसू लागते. गांडूळ खत काढताना थर पद्धतीने काढावे. तयार झालेल्या खतावर २ ते ३ दिवस पाणी मारणे बंद करावे. तयार खताचा शंकूसारख्या आकाराचे ढीग करून ठेवावेत. जेणेकरून त्यातील गांडूळे खालच्या थरामध्ये जातील. ढीग केलेले गांडूळ खत स्वयंचलित किंवा हाताच्या चाळणीद्वारे चाळून  घ्यावे. 
 • चाळणीतून खत बाजूला केल्यानंतर काही चाळणीत शिल्लक राहते. त्यामध्ये गांडुळांची अंडी व छोटी पिले असतात. सदर चाळण इतर बेडवर 
 • पसरावी. तयार झालेल्या गांडूळ खताचा रंग गर्द विटकरी ते काळा असतो. 
 • खत चहा पावडरसारखे दिसते. खतास उग्र वास नसावा. तयार झालेले गांडूळ खत व्यवस्थित साठवून ठेवावे. विक्रीसाठी पॅकिंग करावे. 
 • खतातील घटक  

 •  मोनोसॅकॅराइड्‍स, डायसॅकॅराइड्‍स व पॉलिसॅकॅराइड्‍स हे पिष्टमय पदार्थ, अमिनो आम्ल, साधी प्रथिने, स्निग्ध पदार्थ, लिग्नीन, न्युक्‍लीन आम्ल आणि ह्यूमस जास्त प्रमाणात असते.
 •  गांडूळ खतामध्ये १ टक्का नत्र, ०.८ स्फुरद, ०.८ पालाश तसेच मॅंगेनीज, झिंक, कॉपर, मंगल, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात असतात.
 • खताचे फायदे 

 • पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असतात.  अन्नद्रव्ये पिकाला आवश्‍यक स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे झाडांची मुळे ती सहजपणे घेऊ शकतात. 
 • गांडुळाच्या पचनसंस्थेत अनेक सूक्ष्मजीव असतात. ते अन्नपदार्थांमध्ये मिसळले जातात आणि विष्ठेसोबत येतात. या सूक्ष्मजीवांमुळे रोगनिर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो. 
 • पाण्याचा योग्य निचरा होतो. जमिनीची जलधारण क्षमता वाढते. 
 • जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक सुपीकता वाढते. 
 • दीड टन शेणापासून गांडूळ खतनिर्मिती व्यवसायाचे अर्थशास्त्र 
  तपशील  किंमत 
  शेणखतः एक बेड किंवा एक वाफा पद्धतीने गांडूळ खत करण्याकरिता साधारणपणे दीड टन शेणखत लागते.   ४,००० रुपये
  मजुरी खर्च ः गोठ्यातून शेण उचलून बाहेर टाकणे आणि पुन्हा खत कुजल्यानंतर बेडमध्ये टाकणे  १,००० रुपये 
  मजूर खर्च ः गांडूळ खताच्या बेडवर पाणी मारणे, काढणीस आलेले खत चाळून घेणे, बॅग भरणे इत्यादी कामांसाठी  १,००० रुपये 
  गांडूळ खरेदी खर्च ः एका वाफ्यासाठी म्हणजेच दीड टन शेणासाठी दीड किलो गांडुळे   ६०० रुपये 
  एकूण खर्च  ६,६०० रुपये
  एका वाफ्यातून साधारणपणे १२०० किलो गांडूळ खत मिळते. प्रति किलो नऊ रुपये दराने विक्री    १०,८०० रुपये 
  एका वाफ्यातून मिळणारा नफा (१०,८०० - ६,६००)    ४,२०० रुपये 

  टीप हा एक वाफा करून एका बॅचमध्ये मिळणारा नफा ( रु. ४,२००) आहे. असे आपण कमीत कमी  पाच वाफे करू शकतो. वर्षभरात ५ ते ६ बॅच घेता येतात. याशिवाय पुढील बॅचेससाठी गांडुळांची खरेदी करावी लागणार नाही. गांडूळ खत व्यवसायामध्ये आपल्याला सुरुवातीला करावे लागणारे बेडचे बांधकाम आणि सावलीकरिता करावा लागणारा खर्च आपणास शासकीय अनुदानामधून मिळू शकतो. या उदाहरणामध्ये परिस्थितीनुसार आर्थिक गणित बदलू शकते. - डॉ. महेंद्र मोटे,  ९८९०१२३४६२,    ०२४२६- २४३३६१ (गो संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com