जिवाणू खत वापरायचे की जिवाणूंचे अन्न...

जिवाणू खत वापरायचे की जिवाणूंचे अन्न...
जिवाणू खत वापरायचे की जिवाणूंचे अन्न...

अलीकडे रासायनिक खतांच्या वापरासोबतच जिवाणू खतांच्या बीजप्रक्रिया किंवा वापराविषयी सांगितले जाते. मात्र, बाहेरून एकदा किंवा दोनदा ही खते टाकून चालणार नाही. शेतातील उपलब्ध किंवा बाहेरून टाकलेले जिवाणू यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळेच जिवाणू खत टाकायचे की जिवाणूंचे अन्न उपलब्ध करायचे, की दोन्ही करायचे याचा निर्णय शेतकऱ्यांना घ्यावा लागणार आहे.

बाजारात नत्र, स्फुरद आणि पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणू खतांचे काही प्रकार उपलब्ध आहेत. दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करणाऱ्या जिवाणू खतांचा व्यापारही मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र, जिवाणू खतांच्या वापरासंबंधीचे भू-सुक्ष्म जीवशास्त्रीय तथ्ये शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जात नाहीत. त्यामुळे बाहेरून टाकलेले हे घटक तात्पुरत्या स्वरुपात परिणामकारक ठरत असले तरी दीर्घकालीन फायदा देत नाहीत. दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी त्यांचा डोळस वापर होणे आवश्यक आहे. जैविक नत्र स्थिरीकरण ः नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू जमिनीत टाकले की हवेतील नत्र जमिनीत साठविला जाऊ लागतो. आणि रायासनिक खतांचा वापर कमी केला तरी चालतो, ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची समजूत असते. पण हे प्रकरण इतके सोपे नाही. यातील बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. नत्र स्थिरीकरणासाठी आज अॅझो, अॅझो स्पिरुलियम, अॅसेटोबॅक्‍टर अशा गटातील जिवाणू वापरले जातात. अन्य गटातील आणखीही काही जिवाणू असले तरी त्यांचा वापर प्रचलित नाही. हे स्थिरीकरण केव्हा होऊ शकते? खालील तीन स्थिती शेतात असल्यास, १. जमिनीत पिकाच्या गरजेपेक्षा कमी नत्र उपलब्ध असल्यास. २. वातावरणातील तापमान, आर्द्रता, हवेचा पुरवठा असे घटक योग्य प्रमाणात. ३. गरजे इतका सेंद्रिय कर्ब जमीनीत उपलब्ध असल्यास. नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया -

 • नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया ही चार पायऱ्यात होते.
 • शेतामध्ये वापरलेली जिवाणू खतातील जिवाणू फक्त पहिल्या पायरीचे काम करतात.
 • पुढील तीन पायऱ्यात तीन वेगवेगळे जिवाणूंचे गट काम करीत असतात. हवेतील नत्र (नायट्रोजन,N२) वायू हा नायट्रोजनचे (N) दोन अणू एकत्र येऊन बनतो. ते वेगवेगळे करण्याचे काम जीवाणूकडून केले जाते. या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते. ही ऊर्जा जमिनीखालील सेंद्रिय कर्बाच्या ज्वलनातून मिळविली जाते. पुढील तीन पायऱ्यात ऊर्जा काही प्रमाणात बाहेर टाकली जाते. ती वापरुन पुढील प्रक्रिया पार पडतात. या व्यतिरिक्त चारही पायऱ्यातील जिवाणूसाठी शरीरक्रिया व प्रजोत्पादनासाठी सेंद्रिय कर्बाची गरज असतेच. शास्त्रीय भाषेत या संपूर्ण प्रक्रियेला हेट्रोट्रॉपिक नत्र स्थिरीकरण असे म्हटले जाते. या हेट्रोट्रॉप्सचा अर्थ या जिवाणूच्या प्रक्रियेचे संपूर्ण कामकाज सेंद्रिय कर्बावर चालते.
 • ही सर्व माहिती फक्त भू सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासातून मिळू शकते. मात्र, आज त्याची फारशी चर्चा होत नाही. आज रासायनिक खतांचा भरपूर वापर असणाऱ्या शेतीत जिवाणू खतांच्या वापराचा आग्रह सुरू आहे. या जमिनीत सेंद्रिय कर्बाचा तुटवडा आहे. सेंद्रिय कर्बाची आवश्यकता शेतकऱ्यांना न समजावता, त्याबाबत योग्य ते प्रबोधन न करता केवळ जिवाणू खतांची पाकिटे टाका, बीज प्रक्रिया करा असे सांगितले जाते. वरील जिवाणूंच्या गरजेबाबत नियमित जिवाणूखतांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनाही माहिती नाही. फक्त पाकिटे टाकल्याने हवेतील नत्र पिकाला मिळेल असे भासविले जाते. त्यात जैविक स्थिर झालेला नत्र हा जवळपास फुकटात मिळणारा आहे, अशी शेतकऱ्याची गोड समजूत होऊन जाते. वास्तवात त्यासाठी सेंद्रिय कर्बाची जबर किंमत मोजून तो पिकांना प्राप्त होतो, हे विज्ञान शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचणार?
 • स्फुरद विरघळविणारे जिवाणू कसे काम करतात?

 • स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंद्वारे पहिल्या पायरीत सेंद्रिय आम्ले तयार केली जातात. ही आम्ले मागणीनुसारच तयार केली जातात. पिकाच्या गरजे इतकाच स्थिर साठ्यातील स्फुरद या आम्लात विरघळतो. पुढे हा पाण्यात विरघळून पिकाला उपलब्ध होतो. सूक्ष्मजीवशास्त्रीय अभ्यासातून सेंद्रिय आम्ले तयार करणे, जिवाणूंची शरीरक्रिया आणि प्रजोत्पादन यासाठी सेंद्रिय कर्बाची गरज असते.
 • प्रत्येक गरजेच्या अन्नद्रव्यांची वाटचाल थोड्याफार फरकाने अशीच आहे. पिकाच्या गरजेची १६-२० अन्नद्रव्ये आहेत. प्रत्येक अन्नद्रव्याचा पुरवठा करणाऱ्या जिवाणूच्या जाती प्रजाती यांचे अनेक गट कार्यरत असतात.
 • जिवाणूच्या एका पिढीचे आयुष्यमान २० ते २५ मिनिटांचे असते. म्हणजे एखाद्या हंगामी पिकाच्या वाढीसाठी जिवाणूंच्या किती पिढ्या काम करीत असतील, हे मोजण्यासाठीही कॅलक्युलेटर घेऊन बसावे लागेल. बहुतांशी जिवाणूंची सर्व कामे शेवटी सेंद्रिय कर्बापाशीच येऊन थांबतात.
 • शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाला कोणताही पर्याय नाही. वास्तवात अनेक कारणाने सेंद्रिय खतांचा वापर कमी होत गेला आहे. सेंद्रिय घटकांची उपलब्धता जमिनीमध्ये होत नसणे, ही जगभरातील सर्व शेतकऱ्यांची समस्या आहे. सेंद्रिय कर्बाअभावी शेतीतील जैविक कामे ठप्प होतात. शेतीमध्ये कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांनी दिलेल्या शिफारशीमध्ये सेंद्रिय खतांचा केवळ उल्लेख असतो. त्यावर जोर दिला जात नाही. सगळा जोर हा विद्यापीठाच्या रासायनिक खतांच्या शिफारशीवर असतो. त्यात फारच क्वचित माती परीक्षणाचा अहवाल शेतकऱ्यांकडून विचारात घेतला जातो. या अहवालाप्रमाणे रासायनिक खतांचे हप्ते दिले की शेतकऱ्यांचे काम संपले. दिलेले खत पिकापर्यंत कसे पोचते, याविषयी काहीही प्रबोधन होत नाही. नुसतेच शेतकऱ्याने सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांचा वापर करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केले पाहिजे, असे म्हटल्याने काही होत नाही. हे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना नीट समजावत राहिले पाहिजे.
 • जमिनीची स्थिती चांगली असेल, तर सर्व प्रकारचे जिवाणू जमिनीत असतात. त्यांच्या पालन पोषणाकडे आपले दुर्लक्ष होत असल्याने पिकाचे उत्पादन घटते. त्यांच्या पोषण, वाढीसाठी सेंद्रिय कर्बाची उपलब्धता योग्य प्रमाणात करून दिली पाहिजे. जमिनीत गरजेइतका सेंद्रिय कर्ब उपलब्ध नसल्यास बाहेरून कितीही उपयुक्त जिवाणू टाकून अपेक्षित काम कसे होणार? आता जिवाणू टाकायचे की जिवाणूंचे अन्न, हेच आपल्याला ठरवावे लागणार आहे.

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com