नत्र स्थिरीकरणासाठी भात शेतीत ॲझोला वापर

ॲझोलाचा नत्र पुरविणारी वनस्पती आणि हिरवळीचे खत म्हणून चांगला उपयोग होतो. ॲझोलामध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तो जमिनीत टाकल्यानंतर लवकर कुजतो. त्याचे उत्तम सेंद्रिय खत तयार होते.
नत्र स्थिरीकरणासाठी भात शेतीत ॲझोला वापर
नत्र स्थिरीकरणासाठी भात शेतीत ॲझोला वापर

ॲझोला ही एक पाण्यावर तरंगणारी नेचेवर्गीय पाणवनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये ‘‘अॅनाबिना अॅझोली’’ नावाची नील-हरित शेवाळ सहजीवी पद्धतीने वाढते. अॅझोला पानांमध्ये हरितद्रव्य असल्याने स्वतःच्या वाढीसाठी आवश्यक अन्न स्वतः तयार करते. सोबत वाढणाऱ्या शेवाळालाही पुरवते. शेवाळ हवेतील नत्र स्थिर करून ॲझोला वनस्पतीला पुरवते. अशा प्रकारे ॲझोला व शेवाळ यांचे सहजीवन चालते. शेवाळाने स्थिर केलेले नत्र ॲझोलामध्ये साठविले जाते. त्यात ४ ते ५ टक्के इतका नत्र असतो. ॲझोलाची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे ॲझोलाचा नत्र पुरविणारी वनस्पती आणि हिरवळीचे खत म्हणून चांगला उपयोग होतो. ॲझोलामध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तो जमिनीत टाकल्यानंतर लवकर कुजतो. त्याचे उत्तम सेंद्रिय खत तयार होते. जागतिक पातळीवर ॲझोलाच्या ॲझोला कॅरिओलिना, ॲझोला फिलिक्यूलाइड्‌स, ॲझोला मेक्सिकना, ॲझोला निलोटिका, ॲझोला पिनाटा, ॲझोला माइक्रोपायला अशा सहा जाती आढळतात. भारतात ॲझोला पिनाटा ही जात सर्वत्र आढळते. अमेरिका, जपान, इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि चीन या देशात भात (धान) पिकामध्ये ॲझोला वाढवून त्याचा खत म्हणून वापर केला जातो. आपल्याकडेही भात पिकामध्ये पाणी साचवले जात असल्यामुळे ॲझोला वाढवणे शक्य आहे. भात पिकासाठी त्याचा दोन पद्धतीने वापर करता येतो. १) चिखलणीपूर्वी शेतामध्ये २० ते २५ दिवस अगोदर पाणी साठवून त्यात ॲझोला सोडला जातो. प्रति वर्गमीटर क्षेत्रासाठी ५० ग्रॅम ॲझोला सोडल्यास त्यापासून साधारण २० ते २५ दिवसांमध्ये हेक्टरी ८ ते १० टन ॲझोला तयार होतो. रोपे तयार होईपर्यंत ॲझोलाची चांगली वाढ होते. चिखलणी करतेवेळी हा ॲझोला शेतामध्ये गाडला जातो. हेक्टरी १० टन ॲझोला गाडल्यास, त्यातून भात पिकास २५ ते ३० किलो नत्र प्रति हेक्टरी मिळू शकतो. २) कृत्रिम उथळ हौद किंवा तळ्यात १० ते १५ सेंमी. खोलीपर्यंत पाणी साठवून ठेवावे. ॲझोला वाढीसाठी हेक्टरी ८ किलो या प्रमाणात स्फुरद मिसळावे. हौदाचा आकार १०० वर्गमीटरपेक्षा अधिक असू नये. त्यात प्रति वर्गमीटर क्षेत्रासाठी ५० ग्रॅम ॲझोला टाकावे. त्याची ला २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगली वाढ होते. अशा पद्धतीने वाढविलेला ॲझोला शेती आणि पाळीव जनावरांच्या आहारात वापरता येतो. दुधाळ जनावरांमध्ये योग्य प्रमाणात वापर केल्यास दुधात वाढ मिळते. मासे आणि बदकांसाठीही वापरता येते. शेतातील परिस्थितीत ॲझोलाचे उत्पादन : आवश्यक साहित्य : १) ४० चौरस मीटर आकाराचा वाफा २) गायीचे शेण ३) सुपर फॉस्फेट ४) ताजे ॲझोला मातृकल्चर ॲझोला वाढविण्याची पद्धत :

 • भात लागवडीकरिता वापरण्यात येणारी ओलिताची जमीन निवडावी व जमीन तयार करून सपाट करावी.
 • २० बाय २ मीटर आकाराचे वाफे तयार करून घ्यावेत.
 • वाफ्यात १० सें.मी. पर्यंत पाण्याची पातळी राखून ठेवावी.
 • १० किलो गायीचे शेण २० लिटर पाण्यात मिसळून घ्यावेत. ती स्लरी तयार केलेल्या वाफ्यात शिंपडावी.
 • सुरुवातीला वाफ्यात १०० ग्रॅम सुपर फॉस्फेट बेसल डोस म्हणून टाकावे.
 • प्रत्येक वाफ्यात ताजे ॲझोला टाकावे.
 • ॲझोला लागवडीनंतर चौथ्या व आठव्या दिवशी प्रत्येक वाफ्यात १०० ग्रॅम सुपर फॉस्फेट टाकावे.
 • लागवडीनंतर ७ व्या दिवशी १०० ग्रॅम प्रत्येक वाफ्यात कार्बोफ्युरॉन दाणेदार कीटकनाशक टाकावे.
 • दोन ते तीन आठवड्याच्या कालावधीत वाफ्यामध्ये १० सें.मी. पर्यंत पाण्याची पातळी राखून ठेवावी. निरीक्षणे नोंदवावीत.
 • दोन ते तीन आठवड्यानंतर वाफ्यामध्ये हिरव्या चटईसारखी अॅझोल्याची वाढ झालेली दिसेल.
 • वाफ्यातून ॲझोला गोळा करून टाकावा. पाणी काढून टाकावे.
 • भात शेतीला ॲझोला पुरवण्याची पद्धती : अ) ॲझोला वेगळ्या उथळ हौदामध्ये किंवा तळ्यामध्ये वाढवून, भात लागवडीपूर्वी एक महिना आधी शेतात सोडतात. हिरवळीच्या खताप्रमाणे नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात. या पद्धतीत अधिक प्रमाणात (सुमारे ५ टन प्रति हेक्टर) ॲझोलाची गरज लागते. दुसऱ्या पद्धतीमध्ये ॲझोला नर्सरीत वाढवून भात लागवडीनंतर शेतातील पाण्यात सोडतात. त्याची वाढ करून जमिनीत गाडतात. ब) भात पिकामध्ये दुहेरी पीक पद्धतीने ॲझोला लागवड - भात लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीमध्ये नर्सरीत तयार केलेल्या वाफ्यातून ताजा ॲझोला सोडावा. पुढे भात लागवडीनंतर ७ व्या दिवशी शेतामध्ये ५०० किलो प्रति हेक्टर प्रमाणात ॲझोला सोडावा. ॲझोला वाढीसाठी शेतात ५ ते ७.५ सेंमी इतकी पाण्याची पातळी राखावी. साधारणतः चार आठवड्यात शेतातील पाण्यात हिरव्या चटईप्रमाणे ॲझोला पसरलेला दिसेल. वाढलेला ॲझोला आंतरमशागतीदरम्यान नांगराने जमिनीत गाडून टाकावा. लागवडीपासून आठ आठवड्याच्या कालावधीनंतर ॲझोलाचा दुसरा बहर तयार होतो, तोही जमिनीत गाडावा. दोन वेळा ॲझोला जमिनीत पुरल्यानंतर ५ ते १० टन ॲझोला प्रति हेक्टर क्षेत्रात गाडला जातो. शेतकऱ्यांचा अनुभव ः १) मला कृषी महाविद्यालय, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली यांच्यामार्फत मी ॲझोला निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर ॲझोला मातृकल्चर व प्लॅस्टिक टाकी मिळाली. माझ्या भात शेतीमध्ये ॲझोला वापरला. अझोल्यामुळे रासायनिक खताच्या खर्चात बचत झाली. मला भात उत्पादनात वाढ मिळाली. सोबतच जमिनीचा पोत सुधारल्याचा अनुभव आला. मी भात शेतीमध्ये ॲझोलाचा नियमित वापर करत आहे. - गजेंद्र महादेव ठाकरे (रा. नैनपूर, ता. वडसा, जि. गडचिरोली.) २) आम्ही मोहगावमधील शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतो. नत्र स्थिरीकरणासंदर्भात आम्हाला ॲझोलाविषयी माहिती समजली. आम्ही केव्हीके मध्ये संपर्क साधून माहिती घेतली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली यांच्याकडून ॲझोला मातृकल्चर व ॲझोला वाढवण्यासाठी प्लॅस्टिक टाकी मिळाली. त्यामुळे भात शेतीमध्ये ॲझोलाचा वापरण्यास सुरुवात केली. आमच्या गावातील बहुतांश शेतकरी ॲझोलाचा वापर करीत आहेत. - देवसाय आतला, रा. मोहगाव ता. धानोरा जिल्हा गडचिरोली प्रवीण नामुर्ते, ८२७५३९८७१८ (प्रकल्प सहायक, ॲझोला तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com