नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी माशीचा प्रादुर्भाव

सध्या कोकण विभागामध्ये नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी माशी या परदेशी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आपल्या देशात या किडीची नोंद कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्रात झाली आहे. तिच्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना जाणून घेऊ.
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग  पांढरी माशीचा प्रादुर्भाव
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी माशीचा प्रादुर्भाव

डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील अन्न आणि कृषी विज्ञान संस्था (IFAS) येथील विस्तार कीटकशास्त्रज्ञ स्टीफन ब्राऊन यांनी अंजीर पिकामधून पांढऱ्या माशी गोळा केल्या होत्या. त्यापैकी ज्या पांढऱ्या माशा मेणामध्ये झाकलेल्या होत्या आणि त्या प्रादुर्भावित भागावर काळ्या काजळीचा थर दिसून आला. त्या पांढरी माशीची ओळख बोंडर नेस्टिंग पांढरी माशी (पॅरालेरोडेस बोंडरी) म्हणून करण्यात आली. पॅरालेरोडेस किडीच्या एकूण १७ प्रजातींपैकी पॅरालेरोडेस बोंडरी (बोंडर नेस्टिंग पांढरी माशी) ही एक प्रजात आहे. ही पांढरी माशी मेणाच्या वैशिष्ट्यपूर्ण नमुन्यामध्ये धाग्याने विणलेल्या जाळ्यामध्ये मध्यभागी राहून, आपल्या अंडी, पिल्ले, कोष आणि प्रौढ अवस्था पूर्ण करते. म्हणून या वंशाच्या प्रजातींना “नेस्टिंग” असे सामान्य नाव देण्यात आले आहे.  वर्णन आणि संरचना

  • मेणाच्या आच्छादनाच्या घरट्यात प्रौढ, पारदर्शक तरुण अवस्था, जुन्या अवस्था व चौथ्या अवस्थेतील पिल्ले राहतात. भारतात पांढऱ्या माशीच्या एकूण ४५५ प्रजाती. त्यात रुगोज चक्राकार पांढरी माशी आणि बोंडर नेस्टिंग पांढरी माशी (P. bondari) या परदेशी किडींनी भारतीय पिकावर आक्रमण केल्याचे दिसून येते. 
  • भारतात पांढऱ्या माशीच्या घरटे बांधण्याची सर्वप्रथम नोंद ‘मे २०१७’ मध्ये बस्ती, पोर्ट ब्लेअर, अंदमान येथे झाली. भौगोलिकदृष्ट्या, अंदमान आणि निकोबार बेटे इंडोनेशियाच्या मुख्य भूमीजवळ असल्यामुळे तेथून या किडीचा शिरकाव झाला. या किडीचा प्रादुर्भाव भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातील नारळ पिकावर जुलैमध्ये ४४.८५ टक्के आणि ऑगस्टमध्ये ३८.० टक्के तीव्रतेत आढळला. येत्या काळात प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • ओळख 

  • पॅरालेरोडेस प्रजाती ही अलेरोडिकस प्रजातीपेक्षा आकाराने लहान. 
  •  परिपक्व कोष अंडाकृती, अर्धपारदर्शक पिवळसर रंग, त्यावर ५-६ कंपाउंड छिद्रे असून, १ मिमी लांब असतात. 
  •  प्रौढ माशी १ मिमी लांब, निस्तेज पिवळे शरीर, पांढरे पंख. प्रत्येक पुढील पंखावर दोन तिरकस राखाडी पट्ट्या आढळतात. त्या मध्यभागी एका रेषेत एकत्र होतात. त्यामुळे इंग्रजी ‘X’ प्रमाणे आकार दिसतो. पंखाला नसांसह शाखा नसतात.
  •  पॅरालेरोडेस प्रजात त्या प्रजातीतील अन्य सर्व पांढऱ्या माशींपेक्षा वेगळी आहे. हा फरक प्रौढ नराच्या पुनरुत्पादक संरचनेवरून जाणता येतो. 
  •   लंबगोल अंड्यावर टोकाला एक देठ असतो. 
  •   पिल्ले फिकट रंगाची, अर्ध पारदर्शक असतात. 
  •   प्रौढ मादीला स्पष्ट मिशा असतात. तर प्रौढ नर माशी ‘कॉक हेड’ आकाराच्या एडेगसने ओळखता येते. 
  •   प्रौढ माशीच्या शरीरावर फिकट पिवळ्या ते सौम्य पावडरी मेणाचा लेप असून, पंख सपाट असतात. 
  •   या किडीच्या अवस्था फ्लॉक्युलंट मेणाची निर्मिती करून लांब, पातळ, रॉडसारखे फिलामेंट्स तंतूची जाळी पिल्लावस्थेभोवती उभी करतात. 
  •   चौथी प्रारंभ अवस्था अर्धपारदर्शक पिवळ्या आणि सभोवताली पांढरे मेणाच्या घरट्यात दिसून येते. 
  •  खाद्य वनस्पती : नारळ, सीताफळ, जास्वंद, संत्रावर्गीय पिके, अंजीर, वड, पेरू, चिकू, शाबुकंद, चेरी, साग, सुबाभूळ, दालचिनी इ.
  •  वितरण व प्रसार : ही बेलीज, ब्राझील, होंडुरास, व्हेनेझुएला, पोर्टो रिको, मडेरा, मालागासियन, कोमोरोस, मॉरिशस, रियूनियन, तैवान, हवाई, ब्रोवार्ड, कोलिअर इ. भागांमध्ये दिसून आली.   
  • विविध अवस्था 

  •  पिल्लासाठी मुबलक खाद्य आणि स्थायिक होण्यासाठी जागा असलेल्या ठिकाणी प्रौढ मादी अंडी देतात. या किडीचे एकूण चार पिल्लावस्था अवस्था असतात. कोषातून प्रौढ बाहेर पडल्यानंतर नर आणि मादीचे मिलन होते. प्रौढ मादी मेणाच्या गोलाकार लोकरी घरट्यांमध्ये ३६ ते ७५ पर्यंत अंडी घालतात. नुकतीच घातलेली ताजी अंडी अंडगोलाकार, फिकट पिवळसर रंगाची असून, त्यावर लांब देठ (Pedical) असतो. ही अंडी उबवण्यापूर्वी गडद पिवळसर किंवा केशरी रंगात बदलतात. 
  •  त्यातून बाहेर आलेल्या पिल्लांचा चार अवस्थेतून, १३ ते १६ दिवसांत विकास होते. पहिली पिल्लावस्था सक्रिय, चंचल, लंबगोल आणि अर्धपारदर्शक असते. ज्यात पार्श्व मार्जिनसह मेण तंतुंच्या हायलाइन फ्रिंज असतात. दुसरी आणि तिसरी पिल्लावस्था स्थिर असून, त्यांच्या शरीराच्या मध्यरेखेखाली पिवळ्या ठिपक्याची जोडी असते. चार पिल्लावस्थेतून नैसर्गिकरित्या जिवंत राहण्याचे प्रमाण ४२.६७ टक्के आहे.
  •  पांढऱ्या माशीचा आकार डोक्यापासून ते पोटाच्या टोकापर्यंत शरीराची लांबी १.१० (± ०.०९) मिमी असते. 
  • सर्व अवस्था २० ते २४ दिवसांत पूर्ण करतात.  
  •  नुकसान 

  • प्रौढ आणि पिल्ले झावळीच्या खालील बाजूस राहून, रस शोषतात. पाने निस्तेज होऊन त्यावर फिकट पिवळे, तपकिरी चट्टे दिसून येतात. पांढऱ्या माशीच्या शरीरातून स्रवणाऱ्या मधासारख्या गोड द्रवावर काळी बुरशी वाढते. पिकावर काजळी पसरल्याप्रमाणे दिसते. पानांवर या काजळीमुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा होतो. पिकाचे आरोग्य खालावते. पांढऱ्या माशीच्या अति प्रादुर्भावामुळे थेट अकाली पाने गळणे, झाडाची जोम कमी होणे आणि पाने सुकून गळून पडझड होऊ शकते. 
  •  अन्य पिकांवर आक्रमण, प्रसार
  • पॅरालेरोडेस बोंडरी पांढरी माशांचा प्रादुर्भाव मोनोकोट आणि डिकॉट वनस्पतींसह भारतातील १३ वनस्पतींवर दिसून येतो. प्रामुख्याने ही पांढरी माशी पानांच्या खालील भागावर राहत असली तरी कधीकधी वरील पृष्ठभागावरही दिसून येते. केरळमध्ये पी. बोंडरी ही नारळ व केळी पिकावर उपद्रवी ठरली असून, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या अन्य पेरू, साग इ. वनस्पतीवरही आढळली आहे. 
  • रुगोज चक्राकार पांढरी माशीच्या प्रादुर्भावित क्षेत्रामध्ये पी. बोंडरीची संख्या जास्त (८.०४ पिल्ले प्रति ३० सेंमी क्षेत्र) दिसून आली. रुगोज चक्राकार पांढरी माशीची संख्या कमी (४.४ पिल्ले प्रति ३० सेंमी क्षेत्र)  दिसून आली आहे. कर्नाटकात नारळ, सुबाभूळ, मोरिंडा (नोनी) आणि निकोबार बेटांवर दालचिनी पिकावर ही कीड आढळली आहे. या प्रजातीचे कोणतेही भक्षक किंवा परजीवी शत्रू नाहीत. मात्र अन्य पॅरालेरोडेस प्रजातींचे विविध नैसर्गिक शत्रू उदा. कोळी, ढालकिडा, क्रायसोपीड, अफेलिनीड वास्प आहेत.
  • नियंत्रण व्यवस्थापन

  • प्रादुर्भावित क्षेत्रामधून नारळ व शोभीवंत वनस्पती रोपांची इतरत्र वाहतूक करू नये. 
  • माडाच्या खोडाला ४ फूट उंचीवर पिवळे चिकटे सापळे हेक्टरी १५ लावावेत. 
  • कमी प्रादुर्भाव (प्रति पाते पांढरी माशीच्या १० घरट्यापेक्षा कमी) आणि ज्या माडावर फवारणी शक्य नसेल अशा ठिकाणी परभक्षी किटक सुडोमॅलॅडा अस्टर १०० ते १५० अंडी प्रति माड या प्रमाणात १५ दिवसाच्या अंतराने सोडावीत. जैविक कीडनाशक आयसेरिया फुमोसोरोसिया (१x१०८ स्पोअर्स प्रति मिलि) ५ ग्रॅम अधिक स्टीकर २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे नारळ झावळ्यांवर फवारणी केल्यास बोंडर नेस्टिंग पांढरी माशी व्यवस्थापनासाठी फायदा होऊ शकतो. या विषयावर आंध्रप्रदेश येथील डॉ. चलपथी राव यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष आयसीएआर -एनबीएआयआर न्युज लेटरमध्ये देण्यात आले आहेत.  
  •  दापोली येथील कृषी विद्यापीठामध्ये २०२१ मध्ये ॲझाडिरॅक्टीन (१५००० पीपीएम) २.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे नारळ झावळ्यांवर फवारणीचे प्रयोग झालेले आहेत.  
  • नारळ माडामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शिफारशीत वार्षिक खत मात्रा, निंबोळी पेंड, सुक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक खते द्यावीत. 
  • प्रादुर्भावित क्षेत्रामध्ये किडीचे नैसर्गिक शत्रू उदा. डायकोक्रायसा, क्रायसोपीड्स, ढालकिडा, कोळी इ. कीटक आढळल्यास त्याचे संवर्धन करावे. 
  • - डॉ. संतोष वानखेडे,  ९७६५५४१३२२ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com