द्राक्षबागेतील सद्यपरिस्थितीतील रोगांचा प्रादुर्भाव, नियंत्रण

प्रामुख्याने केवडा (प्लास्मोपॅरा विटिकोला) व जिवाणूजन्य करपा (झान्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस विटिकोला) या रोगाचा प्रादुर्भाव वेलीची कोवळी पाने, शेंड्याचा भाग, लहान घड व लहान मणी यावर होऊ शकतो. त्यामुळे रोग व्यवस्थापनामध्ये योग्य वेळ व योग्य बुरशीनाशकांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
द्राक्षबागेतील सद्यपरिस्थितीतील  रोगांचा प्रादुर्भाव, नियंत्रण
द्राक्षबागेतील सद्यपरिस्थितीतील रोगांचा प्रादुर्भाव, नियंत्रण

बहुतांश द्राक्ष बागांमध्ये सध्या फळछाटणी पूर्ण झाली आहे. हा काळ रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबरअखेरपर्यंत वातावरणामध्ये सातत्याने बदल होताना दिसतील. या वर्षी काही भागांमध्ये फळछाटणी जरा उशिराही झाली आहे. अशा बदलणाऱ्या वातावरणामुळे द्राक्ष पिकावर रोगांच्या प्रादुर्भावाचे संकट वाढू शकते. यामध्ये प्रामुख्याने केवडा (प्लास्मोपॅरा विटिकोला) व जिवाणूजन्य करपा (झान्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस विटिकोला) या रोगाचा प्रादुर्भाव वेलीची कोवळी पाने, शेंड्याचा भाग, लहान घड व लहान मणी यावर होऊ शकतो. त्यामुळे रोग व्यवस्थापनामध्ये योग्य वेळ व योग्य बुरशीनाशकांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. केवडा/ डाऊनी मिल्ड्यू (प्लास्मोपॅरा विटिकोला) : या रोगात पानाच्या वरील बाजूस पिवळ्या रंगांचे गोलाकार तेलकट डाग दिसून येतात. हिरव्या द्राक्षजातीत या डागांचा रंग पिवळा, तर रंगीत द्राक्ष जातीत लाल आढळून येतो. पानांच्या खालील बाजूस पांढऱ्या रंगाचे आवरण दिसून येते. साधारणपणे मोहोर येण्यापूर्वी दोन ते तीन आठवडे, बुरशीचे बीजाणू जमिनीवरील पालापाचोळ्यावरून कोवळ्या पानांवर व फुटींवर पसरून या रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव होतो. द्राक्षातील ३ ते ५ पाने फुटण्याची अवस्था (पोंगा अवस्था) ही केवडा रोगाच्या प्रादुर्भावासाठी अधिक संवेदनशील असते. रोगाचा संसर्ग होण्याकरिता झाडाची पाने कमीत कमी दोन तास ओली असणे आवश्यक आहे. पाऊस, सिंचन किंवा कधी कधी खूप दव पडण्यामुळे झाडाची पाने ओली होतात. वाढीच्या हंगामात तेलकट डाग आणि अनुकूल परिस्थिती असेल तर दुय्यम संसर्ग कधीही होऊ शकतो. ज्या वेळी पानाच्या पाठीमागील बाजूस पांढऱ्या बुरशीची वाढ सुरू होते, त्या वेळी दुय्यम संसर्गाला सुरुवात होते. प्राथमिक संसर्गापेक्षा द्वितीय संसर्ग जलद गतीने व मोठ्या प्रमाणात पसरतो. त्यामुळे तो जास्त हानिकारक ठरतो. या अवस्थेपर्यंत संसर्ग जाऊ नये, या दृष्टीने आपले प्रयत्न असले पाहिजेत. व्यवस्थापन - रोगाचा परिणाम आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरू नये, यासाठी योग्य वेळी बुरशीनाशकांचा वापर करणे गरजेचे ठरते. केवडा रोगाच्या बुरशी नियंत्रणासाठी, बोर्डो मिश्रण, कॉपर हायड्रॉक्साइड यांसारख्या पारंपरिक बुरशीनाशकांचा वापर मुख्यतः केला जातो. या व्यतिरिक्त काही बुरशीनाशक संयोजनांचा वापर पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने सुचविला आहे. ते पुढीलप्रमाणे -

  1. महिन्यातून किमान दोन वेळा पंधरा दिवसांच्या अंतराने ट्रायकोडर्मा ठिबकद्वारे द्यावा. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये ट्रायकोडर्माची फवारणीही करणे गरजेचे आहे. ‘मांजरी ट्रायकोशक्ती’ आणि ‘मांजरी वाईनगार्ड’ हे अनुक्रमे पावडर आणि द्रावण स्वरूपात उपलब्ध आहेत. यामुळे झाडांना संरक्षणात्मक ताकद मिळते. मांजरी ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकरी ठिबकद्वारे सोडावे. फवारणीसाठी ट्रायकोडर्मा २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे वापर करावा.
  2.  या सोबत रासायनिक बुरशीनाशकांचा वापरही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. ज्या बागांमध्ये उशिरा छाटणी झाली आहे, अशा बागांमध्ये नवीन पान फुटण्याची अवस्था आहे. अशा आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा उपयोग करावा. नवीन पानांची शोषण क्षमता जास्त असते. ही नवीन पाने बुरशीनाशक शोषतात. त्यामुळे प्राथमिक आणि द्वितीय प्रादुर्भावाला अटकाव होतो. आंतरप्रवाही बुरशीनाशकासोबत एक स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी फायदेशीर ठरू शकते. आंतरप्रवाही बुरशीनाशक आतमधून, आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक बाहेरून रोगाचा प्रसार थांबवू शकतात. आपल्याला रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येऊ शकते.
  3. आंतरप्रवाही बुरशीनाशक बराच काळ कार्यरत राहण्यासोबतच अवशेषमुक्त उत्पादनाच्या दृष्टीने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध अनेक्श्चर ५ वापर महत्त्वाचा आहे. फळधारणेच्या एका हंगामात एका गटाशी संबंधित बुरशीनाशक (रासायनिक आणि कृतीची पद्धत समान असणारे) २ ते ४ फवारण्यांसाठी वापरली पाहिजे. प्रतिकाराच्या विकासामध्ये कमी जोखीम असलेल्या बुरशीनाशकांचा वापर उच्च जोखीम कालावधीत केला पाहिजे. प्रक्षेत्रावर बुरशीनाशकांविरूद्ध प्रतिकारक्षमता तयार होणे रोखण्यासाठी स्पर्शजन्य बुरशीनाशकांचाही वापर करावा.

डाऊनी नियंत्रणासाठी वापरली जाणारी उच्च जोखमीची बुरशीनाशके ः अ) क्विनोन आउटसायड इनहिबिटर बुरशीनाशके i. फेनामिडॉन ii. फॅमोक्साडोन iii. ॲझोक्सीस्ट्रॉबीन iv. पायरॅक्लोस्ट्रॉबीन ब. फेनीलअमाइड्स बुरशीनाशके i. मेटॅलॅक्सिल ii. मेटॅलॅक्सिल -एम / बेनलॅक्सिल एम (Benalaxyl-M 4% +Mancozeb 65% WP) वरील सर्व बुरशीनाशके ही आंतरप्रवाही असल्यामुळे जास्त जोखमीची ठरतात. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात या बुरशीनाशकांप्रति केवडा या बुरशीमध्ये प्रतिकारकता निर्माण झाली आहे. (याचा अर्थ असा नाही, की ही बुरशीनाशके वापरल्यानंतर रोगाचे प्रमाण कमी होणार नाही. मात्र याचा अति प्रमाणात वापर धोकादायक ठरू शकतो.)

  • फळछाटणीनंतरच्या ४० दिवसांच्या अवस्थेमध्ये द्राक्षवेलींवरील रोगनियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा.
  • ३५-४० दिवसांच्या आतमध्ये सीएए बुरशीनाशके उदा. मॅन्डीप्रोपॅमिड ०.८ मि.लि. किंवा अमिसुलब्रोम ०.३७५ मि.लि. प्रति लिटर पाणी यांच्या कमीत कमी दोन फवारण्या घ्याव्यात.
  • याव्यतिरिक्त डायमेथोमॉर्फ (५०% डब्ल्यू. पी.) ०.५० ते ०.७५ मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा
  • इप्रोव्हॅलीकार्ब (५.५५%) अधिक प्रोपिनेब (६१.२५% डब्ल्यू. पी.) (संयुक्त बुरशीनाशक) २.२५ ग्रॅम प्रति लिटर या बुरशीनाशकांची फवारणी करावी.
  • पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फोरिक अ‍ॅसिड केवड्याच्या बुरशी नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. याचा वापर ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावा. यामुळे बुरशीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा धोका कमीत कमी असतो. फळधारणेनंतर याचा वापर करू नये.
  • युरोपीय महासंघाने मॅन्कोझेब वापरासंबंधी नवीन निर्बंध आणले आहेत. त्यानुसार युरोपीय देशांमध्ये द्राक्ष निर्यात करणाऱ्या द्राक्ष बागायतदारांनी बागेमध्ये ४० दिवसांनंतर मॅंकोझेबचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा. स्थानिक बाजारपेठेसाठी द्राक्ष उत्पादन घेत असलेल्या बागांमध्ये मॅन्कोझेब वापरावर कोणतेही निर्बंध नाहीत. जिवाणूजन्य करपा रोगाचे व्यवस्थापन : वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये काही भागांमध्ये द्राक्ष बागेमध्ये जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बागेत ओलावा आणि उबदार वातावरण असल्यास रोगाची लक्षणे पानांवर दिसून येतात. या रोगामध्ये करपा रोगाच्या लक्षणांप्रमाणेच पानाच्या खालील बाजूस डाग दिसून येतात. कालांतराने हे डाग मोठे होऊन फुटीची वाढ खुंटते किंवा थांबते. जास्त प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी फुटीची वाढ कमी अधिक झालेली दिसून येईल. वेलींमध्ये जिवाणूंचा प्रवेश छाटणी, शेंडा मारणे, घडांची विरळणी तसेच गर्डलिंगच्या वेळी केलेल्या जखमेतून होतो. हे जिवाणू रोगग्रस्त वेलींच्या गाभ्यामध्ये जिवंत राहतात. गाभ्यातून वाहणाऱ्या अन्नरसाबरोबर ते नवीन, निरोगी फांद्या, फुटी व घडांमध्ये जातात. छाटणी व गर्डलिंगसाठी वापरलेल्या अवजारांमार्पत या रोगाचा प्रसार होतो. नियंत्रणासाठी (फवारणी प्रति लिटर) कासुगामायसीन (५%) अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (४५% डब्लूपी) ०.७५ ग्रॅम. टीप ः स्ट्रेप्टोमायसिन* चा वापर करू नये. डॉ. सुजोय साहा, ७०६६२४०९४६ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com