रोपवाटिका व्यवस्थापनात स्वच्छता, निचरा महत्त्वाचा

रोपवाटिका व्यवस्थापनासाठी फक्त अभिवृद्धीचीच माहिती असून पुरत नाही. स्वच्छता, निचरा, वळण-छाटणी इ. बाबीही महत्त्वाच्या ठरतात. त्याविषयी माहिती घेऊ.
रोपवाटिका व्यवस्थापनात स्वच्छता, निचरा महत्त्वाचा
रोपवाटिका व्यवस्थापनात स्वच्छता, निचरा महत्त्वाचा

रोपवाटिकेमध्ये उत्तम दर्जाच्या कलम काडीइतकेच उत्तम दर्जेदार मातृवृक्ष असावे लागतात. मातृवृक्ष मोठ्या कालावधीसाठी जतन करावे लागतात. कारण त्यावरच कलमे-रोपे तयार केली जातात. रोप किंवा कलमांची निर्मिती करून ठरावीक काळ जोपासना केल्यानंतर त्यांची विक्री-वितरण केले जाते. त्यामुळे रोपवाटिकेसाठी जागा तथा ठिकाण निवडताना पुरेसे क्षेत्र असेल, याची खात्री करावी. येथील माती सुपीक, निचरा होणारी जमीन असावी. त्याच प्रमाणे तयार झालेली रोपे विक्रीच्या दृष्टीने महामार्ग किंवा मोक्याच्या ठिकाणी असावी. रोपवाटिका जागा निश्‍चित झाल्यानंतर जागेनुसार व्यवस्थित आरेखन करावे. प्रत्येक कामाची, जाती, प्रजातीनुसार रोपे ठेवण्याची जागा, दरम्यानच्या हालचालीसाठी किंवा वाहतुकीसाठी मध्ये योग्य तितक्या मोकळ्या जागा सोडलेल्या असाव्यात. कलमांची विक्री, त्यानंतर  ग्राहकांच्या अडचणी, शंका आणि मागण्या किंवा तक्रार यांचे निवारण करणेही तितकेच महत्त्वाचे असते. कारण ग्राहकांची गरज, मागण्या लक्षात येण्यासोबतच तक्रार जाणून वेळीच सोडविल्यास तो ग्राहक आपल्या रोपवाटिकेशी कायमचा जोडला जातो.  स्वच्छता, निर्जंतुकीकरण रोपे ही विविध रोग-किडींसाठी संवेदनशील असतात. निरोगी, सुदृढ रोपे तयार करण्यासाठी स्वच्छता आवश्यक ठरते. रोपवाटिकेमध्ये रोग व किडी यांचा शिरकाव टाळण्यासाठी आणली जाणारी प्रत्येक गोष्ट निर्जंतुक करून घ्यावी. उदा. खत, माती, माध्यमे, अवजारे, बाहेरून आणलेली रोपे-कलमे, मातृवृक्ष, बी-बियाणे इ.  वापरावयाच्या माती, माध्यमांचे निर्जंतुकीकरण ः माध्यमांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सूर्याच्या उष्णतेचा वापर करूनही करता येते. मातीचे तापमान वाफ सोडून किंवा प्लॅस्टिक आच्छादन करून ६० ते ७२ अंश सें. पर्यंत ३० ते ५० मिनिटांपर्यंत वाढवावे. उष्णता देणे शक्य नसल्यास रासायनिक पद्धतींचा अवलंब करावा. निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध रसायनांची व पद्धतीची जाणकार किंवा तज्ज्ञांकडून माहिती करून घ्यावी. निर्जंतुकीकरणामुळे जिवाणू, बुरशी, सूत्रकृमी यांना अटकाव होतो. रोपांवर मातीतून उद्‌भवणाऱ्या रोगांचे प्रमाण कमी होते. रोगाचा प्रादुर्भाव लक्षात येण्यासाठी नियमित सर्वेक्षण करावे. गरजेनुसार योग्य त्या आळवणी व फवारणीचे नियोजन करावे.  वळण व छाटणी

रोपवाटिकेत रोपे-कलमांची छाटणी करणे व वळण देणे या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. योग्य वेळी आणि प्रमाणात केलेल्या छाटणीमुळे रोपवाटिकेतील अनावश्यक गर्दी टाळता येते. तसेच काही फांद्या, खोड व पाने कमी झाल्यामुळे वाढीचा जोर कमी होऊन मुळांची वाढ जोमदार होते. छाटणी धारदार, निर्जंतुक केलेल्या कात्री, सिकेटर किंवा शस्त्राने करावी. रोपांची छाटणी प्रामुख्याने २ वेळेस केली जाते. जोमदार वाढ होत असताना शेंडा खुडून हलकीशी छाटणी केल्यामुळे रोपे भरदार व डौलदार होतात. रोपांची बदलणी करताना दुसऱ्यांदा छाटणी करावी. विशेषतः रोपे-कलमांना जागा उपलब्ध करताना जादा फुटवे व काही प्रमाणात मुळांची छाटणी उपयुक्त ठरते. कारणपरत्वे आणि प्रसंगी तिसरी छाटणीही आवश्यक असते. रोपे-कलमांचे स्थलांतरण किंवा वितरण करतेवेळी अतिरिक्त मुळांची, अवाजवी शेंडे व काही प्रमाणात फुटव्याची/पानांची छाटणी केली जाते. यामुळे रोपांचे वजन कमी होते. काटकपणा वाढतो. जागा कमी लागते. रोपांचे साठवण, पॅकिंग, वितरण आणि वाहतूक करणे सोपे होते. छाटणी केल्यावर झालेल्या जखमांमुळे बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा प्रसार टाळण्यासाठी बुरशीनाशकांची फवारणी जरूर केली पाहिजे.  छाटणी करतानाच कलमांना योग्य वळणही द्यावे. कलमांची पुढील वाढ, सरळ, डेरेदार होण्यासाठी रोपवाटिकेतील त्यांची ठेवण आणि दिलेले वळण महत्त्वाचे ठरते. केवळ जोमदार शेंडा असल्यास पुढे झाडांची पसरट वाढ किंवा घेरा तितका चांगला होत नाही. खुंटांचे फुटवे व्यवस्थित काढावेत. अन्यथा, त्यांचे कलम फांदीवर वर्चस्व निर्माण होते.  स्थलांतर, कुंड्यांचा बदल कलमांचे एका जागेतून दुसऱ्या जागेत स्थलांतर केले जाते. एका गादीवाफ्यातून दुसऱ्या गादीवाफ्यावर अथवा एका कुंडीतून दुसऱ्या मोठ्या कुंडीत किंवा एका कुंडीतून अनेक कुंड्यांमध्ये स्थलांतर करावे लागते. कलम-रोपांना कुंडीतून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस ‘डी-पॉटिंग’ असे म्हणतात. नव्या कुंडीमध्ये भरण्याच्या प्रक्रियेस रिपॉटिंग म्हणतात.  रोपांची वाढ होत असताना त्यांच्या मुळांच्या गुंडाळी होऊन मुळांची कार्यक्षमता कमी होते. रोपांची वाढ खुंटते. हे टाळण्यासाठी योग्य वेळी लहान पिशवी किंवा कुंडीतून रोपे दुसऱ्या मोठ्या पिशवी किंवा कुंडीमध्ये भरली जातात. हे काम करीत असताना रोगट, कमकुवत, मुळांना इजा झालेली, कलमे-रोपे वगळावीत. नवीन कुंडी काही वेळ कडक उन्हापासून दूर सौम्य वातावरणात ठेवावी. जातीप्रमाणे, वयाप्रमाणे, वाढीप्रमाणे, वर्गीकरण करावे. शोभेची झाडे, बोन्साय, मोठ्या आकाराची झाडे यांची मागणी वाढत आहे. ग्राहकाच्या मागणीनुसार पॉटिंग व रिपॉटिंग करावे. हे काम करताना पुढील काळजी घ्यावी. 

  •  रोपांची भरणी, बदलणी ही शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी. कडक ऊन, वारा असलेल्या वेळा टाळाव्यात. 
  •  कलमे-रोपे उपटून अगर खेचून काढू नयेत. त्यामुळे मुळांना इजा पोहोचते. 
  •   नवीन ठिकाणी माध्यम आणि योग्य निचरा याकडे लक्ष द्यावे.
  •  गरजेनुसार रोपांची अनावश्यक लांब मुळे अथवा शेंडे कापून घ्यावेत. 
  • बदलण्याआधी व नंतर रोपांना मोजकेच पाणी हळुवारपणे घालावे.
  •  डी-पॉटिंग, रिपॉटिंग केल्यानंतर किमान एक आठवडाभर रोपांची विशेष काळजी घ्यावी. कडक ऊन, वारा व थंडी, उष्ण तापमान यांपासून सुरक्षित ठेवावे.
  • निचरा

    रोपे, कलमांच्या मुळांच्या कक्षेतून पाणी योग्य त्या वेगाने निघून गेले पाहिजे. रोपांचे खोडाला शक्यतो पाणी लागू नये. कुंड्या-पिशव्यातून अतिरिक्त होणारे पाणी काढून टाकावे. या पाण्याचा आपोआप निचरा होण्यासाठी मातीसोबत अन्य अधिक निचरा असणाऱ्या माध्यमांचे मिश्रण वापरता येते. कुंड्या, पिशव्या यांना निचरा छिद्रे (ड्रेनेज होल्स) असावीत. वाफ्यावर रोप करताना त्यास योग्य तितका (किंचित) उतार द्यावा. अशा अनेक उपायातून रोपवाटिकेतील निचरा सुधारता येतो.   

  • योग्य निचऱ्याचे फायदे 
  •  निचरा चांगला झाल्यास रोप-कलमांच्या मुळांजवळ हवा-पाणी यांचे संतुलन साधते. 
  •  जोरदार पावसाच्या स्थितीतही जमीन वाफसा अवस्थेत लवकर येते. रोपांना नुकसान होणे टाळता येते. 
  •  जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. 
  •  जमिनीतील उपकारक जिवाणूंची वाढ होते व उपलब्ध अन्नद्रव्यांचे शोषण सुधारते.
  •  बियांची रुजवण वेगाने होते.
  •  रोप-कलमांची वाढ जोमदार होते. रोग-किडींचा उपद्रव कमी राहण्यात मदत होते.
  •     संपूर्ण रोपवाटिकेची रचना करतानाच अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचे दोन प्रमुख मार्ग 
  •  भूपृष्ठावर उघडे चर खोदून निचरा करणे. हा स्वस्त उपाय आहे. मात्र यात काही जागा वाया जाते आणि सतत देखभालीची गरज भासते.
  •  जमिनीत काही खोलीपर्यंत चर खोदून त्यात कायमस्वरूपी सच्छिद्र पाइप गाडून घ्यावेत. त्यानंतर ते अधिक निचराक्षम माध्यमाने बुजवून घ्यावेत. हा थोडा खर्चिक उपाय असला तरी वरील जागा वापरता येते. देखभालीची गरज कमी होते.
  • - दर्शना मोरे,  ९६८९२१७७९० (सहायक प्राध्यापिका, के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com