ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजन

ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजन
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजन

ग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ राबवायचे असेल तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक असतो. योग्य नियोजन आणि स्थलानुरूप उपाय योजले तर ग्रामीण भागात वर्षभर पाणी टिकवण्यात यश मिळवता येते. मागील भागात आपण नागरी भागातील पर्जन्यजल संधारणाबद्दल माहिती घेतली. प्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचे बळकटीकरण करणे किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात आले. या भागात आपण ग्रामीण भागात पर्जन्यजल संधारण कसे करता येईल ते पहाणार आहोत. हल्ली, केवळ शहरांमध्येच नव्हे तर अगदी लहान गावांमध्येही गरजेप्रमाणे किंवा गरज नसूनही अनेक ठिकाणी खासगी कूपनलिका तयार करून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केवळ घरगुती वापरासाठी एक स्रोत म्हणून कूपनलिका एवढाच विचार नाही. जिथे भूगर्भात पाण्याची पातळी वेगाने खाली चालली आहे अशा खेडेगावांतसुद्धा केवळ घरासाठी स्वतंत्र स्रोत म्हणूनच नव्हे तर शेतीसाठी स्रोत म्हणून, अगदी नगदी पिकांसाठी कूपनलिका घेतल्या जातात. अनेक कोरडवाहू शेतीच्या प्रदेशातही उसासारख्या नगदी पिकासाठी सुद्धा शेतांमध्ये कूपनलिका केल्या जात आहेत. या सर्व गोष्टींमुळे भूगर्भातील पाणी पातळी वेगाने खाली जात आहे. अती कूपनलिकांचा परिणाम ः पूर्वी उन्हाळ्यात खाली गेलेली पाणी पातळी पुढच्या वर्षी येणाऱ्या पावसाळ्यात परत पूर्ववत होत असे. आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की अनेक ठिकाणी पाऊस पडल्यावरही पाणी पातळी पूर्वीप्रमाणे पूर्ववत होत नाही. उलट दरवर्षी त्यात घट होत आहे. त्यातच, एक स्रोत कोरडा पडला किंवा पुरेनासा झाला की नवीन दुसरा करणे हा सोपा वाटणारा पण पाणी संकट आणखी गंभीर करणारा उपायही जोरात चालू असल्याने कूपनलिकांची संख्या वाढते आहे. एवढे सगळे उपाय करूनही पाणी हवे तेवढे न मिळाल्याने (पाणी पातळी खाली जाते आहे हे एक आणि पाण्याची गरजही वाढत चालली आहे हे दुसरं महत्त्वाचं कारण) त्यांची खोलीही वेगाने वाढते आहे. जास्त पाणी हवे असेल तर आणखी खोल खणा, या सोप्या आणि परिणामकारक वाटणाऱ्या उपायामुळे भूजल पातळी खालावत जाण्याची समस्या अधिकाधिक गंभीर होत आहे. या अधिकाधिक गंभीर होत चाललेल्या समस्येवर नक्की योग्य उपाय काय याबद्दल पुरेशी माहिती न घेता आजूबाजूच्या परिसरात चाललेले उपाय आंधळेपणाने आपणही करणे ही सध्या सर्वत्र दिसणारी गोष्ट आहे. आणि त्याचा परिणाम ही समस्या कमी होणे वा सुटणे हा होत नसून, ती समस्या आणखी गंभीर होत जाणे हा होतो आहे. या सर्व गोष्टींमुळे सगळीकडे एक गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे. जलसंधारणासाठी उपाययोजना ः १) ग्रामीण भागात जलसंधारण यशस्वीपणे दीर्घकाळ राबवायचे असेल तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक असतो. गावाला लागणारे पाणी दुसरीकडून कुठून लांब काम करून तिथून गावापर्यंत आणणे हा अत्यंत खर्चिक प्रकार आहे. पण बरेचदा अव्यवहारी ठरणारा आणि त्यामुळे अपयशी होणाराही आहे. गावासाठी जलसंधारण उपाय योजताना त्या गावाच्या, खरंतर गावातील स्रोताच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी त्याच परिसरात योग्य जागा निवडून अडवणे, जिरवणे आणि साठवणे यातून गावाच्या पाण्याच्या गरजेची पूर्तता होऊ शकते. २) पाण्याचे गणित मांडताना केवळ माणसांना लागणाऱ्या पिण्याचे पाणी नाही तर घरगुती वापर, जनावरे, इतर वापरासाठी आणि दुसऱ्या, तिसऱ्या पिकासाठी पाणी याचा विचार करून उपाययोजना कराव्यात. ३) गाव कुठे आहे (भौगोलिक परिस्थिती), लोकसंख्या किती, गावाची पाण्याची मागणी किती, पाण्याचे स्रोत कोणते आणि किती, त्यांची ताकद काय, शेतीसाठी एकूण पाणी किती लागणार, गावात जनावरे किती, जमीन कशी आहे, माती कशी आहे, किती थर आहेत, दगड किती खोल आणि कसा आहे, उतार कसे आहेत, इत्यादी गोष्टी विचारात घेऊन मग योजना ठरवणे आवश्यक असते. हे सगळे मुद्दे विचारात घेऊन जलसंधारण योजना राबवली तर निश्चित यशस्वी होते. जलसंधारण करताना घ्यायची काळजी ः १) कोणताही उपाय नक्की करताना अनुभवी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन, शक्यतो त्याच्या मार्गदर्शनाखाली गाव शिवाराचे सर्वेक्षण करावे. उपाययोजनेचा आराखडा तयार करणे ही पहिली पायरी आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. सर्वेक्षण करताना जमिनीचा प्रकार, चढ-उतार, मातीच्या थराची जाडी, मातीचा प्रकार आणि गुणधर्म, भौगोलिक परिस्थिती, आदि गोष्टींचा अभ्यास करून योग्यप्रकारे जलसंधारण उपाय केले तर फायदा होतो. २) आपण काम करणार आहोत त्या भागातील पर्जन्यमान कसे आहे, म्हणजे पाऊस किती दिवस पडतो आणि किती पडतो याचा विचार करून मग त्याप्रमाणे योग्य जागा आणि उपाय निवडणे वर्षभर पाणी मिळण्यासाठी आवश्यक असते. बरेचदा, भूगर्भात असलेला पाण्याचा स्रोत कसा आहे, कुठे आहे, त्याची ताकद किती आहे हे कोणाला नक्की सांगता येणं अवघड असते. अनुभवाने त्याचा फक्त अंदाज बांधता येतो. काही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून याबद्दल अधिक खात्रीपूर्वक माहिती मिळवणे काही वेळा शक्य होते, पण बरेचदा या गोष्टी अंदाज आणि अनुभव यांचा वापर करून केल्या जातात. ३) विहिरीला पाणी मिळाले म्हणजे कूपनलिकेतही चांगले पाणी असेल हा समज चुकीचा आहे. दोन्ही स्रोतांचे प्रकार भिन्न आहेत आणि त्याला पाणी पुरवणारे भूजल स्रोत वेगवेगळे आहेत. ४) मुख्य नदीवर काम करण्याआधी उपनद्या, ओढे, झरे, इत्यादी स्रोतांवर काम करावे. गाळ काढण्याआधी, प्रवाहाच्या वरच्या भागात गॅबियन बंधारे (किमान २ ते ३) बांधावेत. त्यामुळे पावसात लगेच परत गाळ येणार नाही.  ५) ओढा, नदी वगैरे स्रोतांमधील गाळ काढताना, स्रोताचा नैसर्गिक उतार कायम ठेवावा. त्यात फेरफार करू नये.  ६) ओढा, नदी, इत्यादी पाण्याच्या स्रोतावर काम करताना, विशेषतः गाळ काढून खोलीकरण करताना, त्याच्या दोन्ही बाजूंचा उतार ४५ अंशांत ठेवावा. त्याने स्थिरता येते आणि बाजू ढासळून पडत नाहीत.  ७) कामाचे स्वरूप ठरवताना, आधी आजूबाजूचे उतार, भौगोलिक परिस्थिती, पाण्याच्या प्रवाहाचा वेग इत्यादी बाबींचा अभ्यास करून मगच गाळ किती काढायचा याबद्दल निर्णय घ्यावा. योग्य अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा.  ८) जलसंधारणाचे काम करत असताना जेवढे शक्य होईल तेवढे स्थानिक सामान वापरावे.  ९) बंधाऱ्यांत गाळ साठून बंधारे निकामी होणे ही एक सगळीकडेच दिसणारी बाब आहे. त्यामुळे असे बंधारे असतील तर त्यांची दुरुस्ती करून त्यात परत गाळ साठू नये यासाठी उघडबंद करता येतील अशा झडपा (पाइप) ठेवाव्यात.  १०) सर्वात महत्त्वाचं, आंधळेपणाने कोणाचीही नक्कल करू नये. तसे केल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. अनेकदा, तो पाण्याचा स्रोत उद॒ध्वस्त होऊन कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्यावी. संपर्क ः डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६० (वेळ ः सकाळी ९.३० – १०.३० , संध्याकाळी ७.३० ते ८.३०) ( लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com